मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खेळ मांडीयेला-भातुकली खेळ

Bhakti · · जनातलं, मनातलं
अ लेकीला म्हटलं "आज आपल्याला भातुकलीचा खेळ पाहायला जायचं आहे." ती म्हणाली "भातुकलीचा खेळ म्हणजे काय?" मनात‌ल्या मनात म्हणाले की "एका भातुकलीच्या खेळाची किंमत तुम क्या जानो, जेनझी(generation z)" तिला म्हणाले "अंग किचन सेट पाहायला जायचय" " ओके , बार्बीपण असेल का तिथे ?" "चल तुला ठकीच आणते" ती आपली शांतपणे माझ्याकडे पाहत होती आणि मी शांतपणे 'भातुकली 'शब्दाचा वनवास आजच्या काळात अनुभवत होते भातुकलीच्या विचाराने मन भूतकाळात गेले. मी लहानपणापासूनच शांत, एकटीच रमणारी हे सांगतांना आई नेहमी म्हणायची "आमची भक्ती, बाहेर खेळायला जा सांगितले तरी ती जायची नाही. तिची भातुकली ती फ्रॉकमध्ये भरून या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात मांडत दिवसभर घरातच एकटीच खेळायची." असं ती सगळ्यांना सांगत राहायची... "अच्छा, माझ्या इंट्रोव्हर्ट पणाचा उगम इथपासून आहे तर" अशा विचार मनात येऊन मी हसत राहिले ;) उज्वला ढमढेरे यांनी मेहनतीने वेगवेगळ्या ठिकाणाहून सुंदर अशी वेगवेगळ्या भातुकलीचे खेळ जमवले आहेत.अगदी सोन्या चांदीचीही भातुकली त्यात आहे. मातीच्या भातुकली अतिशय सुबक होती. तांब्याची, पितळाची भातुकलीतली विळी, पाण्याची भांडी विविध आकारतली छोटी मोहक वाटत होती. कागदाची, पानांची,कापडी पर्यावरण पूरक ‌भातुकलीही होती. भातुकलीतले बंब, सूप ,घंगाळे,चूल, पाण्याचे फिल्टर ,तीन ताळी डबा होते. स्टील, प्लास्टिक भातुकलीचे खेळ खूप प्रकारची होते. प्रदर्शन पाहायला जायच्या आधी भातुकलीविषयी आंतरजालावर माहिती शोधत होते. तेव्हा भातुकली वरच चक्क एक अनोखचं पुस्तक दिसलं .दिपाली केळकर यांनी अभ्यासपूर्ण नजरेतून अनेक मान्यवरांच्या भातुकलीच्या विविधांगी विचारांचा समावेश 'खेळ मांडीलेया' हे पुस्तक लिहिले आहे. या भातुकलीच्या खेळाचे प्रसिद्ध संग्राहक विलास करंदीकर यांच्याकडे जवळपास ३००० भातुकलीचे खेळ होते. ज्याची लिम्का बुकमध्येही दखल घेण्यात आली. या पुस्तकात या अवलियांची- विलास करंदीकर आणि उज्वला ढमढेरे यांचीही मुलाखत आहे.. ज्यांनी वाढता वाढता वाढे अशा पद्धतीने बहुविध भातुकलीचा संसार कष्टाने प्रचंड मोठा केला आहे. मग या पुस्तकाविषयी अजून काही माहिती शोधताना, दिपाली केळकर यांचे 'खेळ मांडीयेला' पुस्तकावरचे एक व्याख्यान ऐकायला मिळाले. या पुस्तकाची अनुक्रमणिका पाहिला असता लक्षात येईल की भातुकली खेळ के मुलांच्या मनोविश्वात डोकावण्याचा खेळच आहे. पुस्तकातील "काही काही गंमतीशीर, सखोल गोष्टी खुप मनोरंजक आहेत. "मोठ्यांच्या ज‌गात डोकावण्यासाठी दिलेला दरवाजा म्हणजे भातुकली "-माधवी पुरंदरे राजीव तांबे सांगतात, भातुकली एकटीने, किंवा सवंगडी जमवून किंवा कुटुंबातील व्यक्तीची भूमिका घेऊन लहान मुले खेळतात, जणू पुढील संसाराचा ,जगण्याचा सराव भातुकली आहे. भातुकली खेळ नेहमी मुलींनाच भेट देऊन, मुलगा-मुलगी असमानता दर्शव‌ली नकळत वाढत जाते, अशावेळी मुलग्यालाही भातुकली देऊन स्वयंपाकाची कला त्यालाही लहानपणापासून देता येईलच. अशाप्रकारे अनेक मान्यवरांचे भातुकली खेळाचे विचार समजून घेत असतानाच, अगदी विश्वनिर्मितीचे अध्यात्मिक विचार भातुकलीच्या खेळाशी धागे अलका मुतालिक या जाणकारांनी उलगडले आहे. इतक सुंदर भातुकली विषयावर पुस्तक वाचायची उत्सुकता आता वाढली आहेच पण पुन्हा लहानग्या भाच्याला भातुकलीचा खेळ भेट देऊन भातुकलीचा वसा पुढे देत राहण्याची इच्छा लवकर पूर्ण करायची आहे. तुमच्या काही आठवणी भातुकलीच्या ? -भक्ती आ खेळ मांडीयेला -अनुक्रमणिका १) गोष्ट भातुकलीच्या राजाची २) भातुकली १८ प्रकारची ३) निर्मिती भातुकलीची आणि भांड्यांची ४) भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली) -डॉ. गो. बं. देगलूरकर भातुकलीम्हणजे आपली संस्कृती -प्रतिभा रानडे भातुकलीचा इतिहास आधुनिक स्वरूपात यायला हवा -वामनराव देशपांडे भातुकली खेळणं हा भाग्यकुंडलीतला योग -डॉ. माधवी वैद्य नाट्यकलेचा उगम भातुकलीत -शोभा भागवत भातुकली एक शांत खेळ -हेमा लेले भातुकली खेळाला विविध कंगोरे -माधुरी पुरंदरे भातुकलीच्या माध्यमातून घडतं भाषाशिक्षण राजीव तांबे -भातुकली म्हणजे जगण्याचा सराव -नरेंद्र लांजेवार मुलांचं भावविश्व समृद्ध करणारी भातुकली -शुभदा चौकर आत्मनिर्भर होण्यासाठी पहिली पायरी म्हणजे भातुकली -आश्लेषा महाजन भातुकली म्हणजे स्वतःचा अवकाश शोधणं -आसावरी काकडे सर्जनशीलतेला वाव देणारा खेळ -अविनाश बिनीवाले भातुकली कालबाह्य होत आहे -अविनाश धर्माधिकारी व्यवस्थापन कौशल्य शिकवणारा खेळ -डॉ. संजय उपाध्ये लहान मुलांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा मार्ग -स्वाती चांदोरकर बालपणीच्या आठवणी मोठं सुख -प्रज्ञा कुलकर्णी भातुकली म्हणजे संस्कार -सुहासिनी कीर्तिकर बालपण भारून टाकणारा खेळ -डॉ. अनुपमा उजगरे बिनभांड्यांची भातुकली -डॉ. सिसिलिया हरपले श्रेय -प्रवीण दवणे भातुकली : स्वप्नांची पाऊलवाट *संतसाहित्य आणि भातुकली तसेच इतर खेळ -डॉ. रामचंद्र देखणे खेळ ही अध्यात्मातील मध्यवर्ती कल्पना -अलकाताई मुतालिक अंतःकरणाची मशागत करणारा खेळ भातुकली -सीमा गोखले संतांच्या नजरेतून भातुकली आणि तत्सम खेळ *डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून भातुकली -डॉ. स्नेहलता देशमुख नव्या-जुन्याची सांगड हवी -डॉ. वैजयंती खानविलकर भातुकलीप्रमाणेच मैदानी खेळही महत्त्वाचे इ इउऊऊएओकग

वाचने 3587 वाचनखूण प्रतिक्रिया 13

श्रीगुरुजी Wed, 04/16/2025 - 23:40
छान लेख! भातुकली लहान मुलींचा आवडता खेळ. या निमित्ताने भातुकलीवरील अत्यंत सुरेल गोड बालगीत पुन्हा एकदा ऐका. https://youtu.be/g588830ZqIk?si=SI2q6A9yTxfeiYV5

श्रीगुरुजी Wed, 04/16/2025 - 23:51
गीतकार - शांता शेळके संगीतकार - श्रीनिवास खळे गायिका - सुषमा श्रेष्ठ हे अतिशय गोड बालगीत लहानपणी माझ्या मुलींना खूप खूप आवडायचं. विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा भातुलकीचा साऱ्या तुम्ही केला चट्टामट्टा आता उठा आता उठा . . . पसाभर शेंगदाणे पसाभर गूळ एकटीनं फस्त केलं लागलं का खूळ? खादाडखाऊ विहीण म्हणून सारी करती थट्टा आता उठा आता उठा . . . कुठून मेलं बाहुलीचं लग्न काढ़लं आम्ही विहीण म्हणुन नशिबी आलात हो तुम्ही बाळी आमची नाजुक तुमचा बाळ्या केवढ़ा मोठा आता उठा आता उठा . . . सोन्यासारखी लेक दिली आणि फसलो भिकाऱ्याशी नातं जोडून बसलो वरमाईचा पोकळ नुसता पाहुन घ्यावा ताठा आता उठा आता उठा . . .

कंजूस गुरुवार, 04/17/2025 - 06:09
छान आहे प्रदर्शन. लहान मुलांना विशेषतः वय तीन ते सात या वयात खेळण्यासाठी खेळणी हवी असतात. त्यात भातुकलीचा खेळ येतो. हलणारी, आवाज करणारी आणि काही कृती करता येतील अशी तीन प्रकारची खेळणी असतात त्यात भातुकली ही तिसऱ्या प्रकारात येते. मुलगा मुलगी भेद करणारी खेळणी आपण लादत नसतो तर विविध खेळणी मांडून ठेवलेल्या जागी जर लहानांना सोडले तर ती मुले आपापल्या आवडीनुसार खेळणी निवडतात. उन्हाळ्याच्या सुटीत मुले घरीच असतात तेव्हा त्यांना वेळ घालवण्यासाठी ,रमण्यासाठी भातुकली हा उत्तम खेळ होता. आता मनोरंजनाचे खूप पर्याय आले आहेत पण त्याकाळी वेगळे खेळ होते. "भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली)" ...यात उगाचच अगम्य विचार मांडले आहेत बऱ्याच जणांनी.

In reply to by कंजूस

Bhakti गुरुवार, 04/17/2025 - 10:46
मुलगा मुलगी भेद करणारी खेळणी आपण लादत नसतो तर विविध खेळणी मांडून ठेवलेल्या जागी जर लहानांना सोडले तर ती मुले आपापल्या आवडीनुसार खेळणी निवडतात.
"भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली)" ...यात उगाचच अगम्य विचार मांडले आहेत बऱ्याच जणांनी.पण त्यांचे हे विचार लक्ष वेधून घेतात.

कर्नलतपस्वी गुरुवार, 04/17/2025 - 06:45
मे महिन्याची सुट्टी लागली की मुली घरातल्या घरात हे खेळ खेळायचे. कधी कधी त्यांनी खेळायला घेतलेले दाणे गुळ खोबरे चोरून खायचे त्यांची भांडी व खेळ विस्कटून टाकायची ही मुलांची भातुकली. सुट्टीत एकदा खरोखरचे पिठले भात आई करून द्यायची व ते मुलांना वाढायच्या. कधी कधी चिंचा,आवळे,बोरं कैर्‍या कच्चे पेरू मुलींना खेळायला आणून द्यायचे. भावी,सुखी संसाराची शिकवण आणी रुजवण येणाऱ्या पिढी मधे कर णरा खेळ. तीन ताळी डबा याला तीन पुडाचा डबा म्हणायचे. बाकी, पुण्यात तांबट गल्लीत त्वष्टा कासारदेवी मंदिराजवळ तांबट समाज असे प्रदर्शन भरवतो. मुंबईत डोंबिवली का कुठे तरी असेच मोठे संग्रहालय आहे. पुण्यातील तुळशीबागेत अशी खेळणी मिळायची. मुली लहान असताना लखनौ वरून सुट्टीत आल्यावर खरेदी जरूर व्हायची. दोन वर्षापूर्वी नाती साठी अम्रीकेतून अधुनिक भातुकलीचा खेळ 100 $ देऊन आणला होता. अम्रीकेत आजही हा खेळ मुली खेळताना आढळल्या फक्त भांडी कुंडी वेगळ्या प्रकारची. मुलांसाठी पिझ्झा हट,अईसक्रिम पार्लर सारखे खेळ आहेत. आयक्या सारख्या मोठ्या माॅल मधे चिमुकली भांडीकुंडी आजही अम्रीकेत मुली आईवडिलां बरोबर खरेदी करताना दिसल्या. याला "डाॅल हाऊस" म्हणतात. फोटो टाकेन. बाकी अरूण दाते यांनी अजरामर केलेले मंगेश पाडगावकर यांचे गीत भातुकलीच्या खेळा मधली राजा आणीक राणी..... आजही डोळे पाणावतात. https://youtu.be/Zxu-rWjyM3Y?si=JH7mnmrlcgpeLDrh आवांतर वारकरी सुद्धा खेळ मांडतात वाळवंटी काठी.... लहानपणीचे खेळ हे व्यक्तिमत्त्व विकासाची नांदी व साधन आहे असे मला वाटते. म्हणून मुलांना मनसोक्त खेळू द्यावे.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti गुरुवार, 04/17/2025 - 10:47
लहानपणीचे खेळ हे व्यक्तिमत्त्व विकासाची नांदी व साधन आहे असे मला वाटते. म्हणून मुलांना मनसोक्त खेळू द्यावे.

सौंदाळा गुरुवार, 04/17/2025 - 11:18
छान लेख भातुकली माझ्या मुलीला घेतली होती सावंतवाडीहुन, लाकडी भांडी होती. नंतर कोणीतरी भेट म्हणून दिलेली त्यात काळानुरुप चांगलेच बदल झाले होते. फ्रिज, मायक्रोवेव, मोड्युलर किचन, इंडक्क्षन वगैरे होते. पण सर्व प्लास्टीकचे :( व्यापारडावच्या नोटा आणि ही मोडर्न भातुकली मिळून ती हॉटेल हॉटेल खेळायची.

मुक्त विहारि गुरुवार, 04/17/2025 - 11:55
श्री. करंदीकर यांचे भातुकली प्रदर्शन पण बघितले आहे. पोह्यांचा भात, दाणे आणि गूळ यांचे लाडू, हे पण खाल्ले आहेत.

श्वेता२४ गुरुवार, 04/17/2025 - 12:23
फोटो बघून मन जुन्या आठवणीत रमुन गेले. आम्ही दोघी बहीणी लहानपणी तासनतास हा खेळ खेळायचो. सुटीत भावंडे आली की तीपण सामील. मुलगा मुलगी भेद नसायचा पण खेळाचे स्वरुप बदलायचे. उदा. बाहुला बाहुलीचे लग्न लावून भातूकलीच्या भांड्यात जेवण बनवायचे व पंक्ती उठवायच्या, गेले ते दिवस...

चौथा कोनाडा गुरुवार, 04/17/2025 - 14:10
व्वा ...खुप सुंदर परिचय ! विविध दिग्गजांची मतं सुद्धा भारी ! इटुकली पिटूकली संसार वस्तू पाह्ताना बालपणात गेलो. आमच्या गल्लीत एकाच ताई कडं अशी पितळ स्टीलची भातुकली होती ... काय भाव खायची ती ... पण थोडा मस्का मारला की पाघळायची. मग सुरू व्हायचा भातुकली खेळ .. पुढचे दिड दोन तास मज्जाच मज्जा ! माझ्या सहावीत त्या ताईच्या बाबांची बदली सोलापुरला झाली अन आमचा हा भातुकली खेळ बंद झाला तो कायमचाच !

Bhakti गुरुवार, 04/17/2025 - 21:50
सौंदाळा खरंय आता प्लॅस्टिकची आधुनिक भाड्यांच्या प्रकारची भातुकली वापरली जाते अगदी त्यात बारबेक्यूही असतो. श्वेता बाहुलीची लग्न कधी पाहिले नाही पण खूप ऐकलं आहे,खरंय गेले ते दिवस. चौको ,मुवि छान आठवणी सांगितल्या. प्रगो आणि सर्वांना धन्यवाद!