Skip to main content

श्री गणेश लेखमाला २०२३ - ॥ श्रीगणेश स्तवन ॥

लेखक मी-दिपाली यांनी मंगळवार, 19/09/2023 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
. ॥ श्रीगणेश स्तवन ॥ जय गिरिजात्मज हे गणनायक तू सकळांत कलाधिपती वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥ध्रु॥ तिलकविलेपित चंदनगंधित चंद्रविराजित भाळ तुझे मुदित चतुर्भुज रूप मनोहर तेज मुखावर दिव्य सजे सुमुख तुझे स्मरता अवघे खल, पापविचार, दशा हरती वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥१॥ मुनिजनपूजित वेदपुरस्कृत लौकिक सर्व दिशांत वसे चरण शुभंकर पंकज कोमल लीन जिथे मम शीश असे गजवदना तव आशिष मंगल दुःख निवारण ते करती वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥२॥ भवभयहारक दुष्टनिवारक अंकुशधारक रुद्रसुता शुभगुणकानन तू करुणाघन तूच महोदर विश्वपिता कलियुग हे घनघोर धरेवर घे अवतार गुणाधिपती वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥३॥ स्वरसुमने नित अर्पियली तुज नादप्रतिष्ठित छंदपती अवतरती स्तवनात निरागस भक्तिसुधारसयुक्त श्रुती निसदिन जे भजती प्रथमेश्वर, ते भवसागर हा तरती वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥४॥ ( वृत्त - हंसगती ) ©® दीपाली ठाकूर

वाचने 6489
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

या नादमय गणेशस्तवनाने गलेमाची दणदणीत सुरूवात झाली, मस्त.... आवडले... पैजारबुवा,

उत्तम रचना आणि गलेमाची उत्तम सुरुवात. -दिलीप बिरुटे

कसं लोकांना जमतं एवढं सुंदर लिहायला !!

सुंदर रचना. नादमय गणेशस्तवन अ ति शय आवडले. एक मोठ्ठी प्रिंट काढून लावून ठेवतो ऑफिसात समोर. सं - दी - प

छान लिहिले आहे!

सुंदर नादमय रचना. गणेशस्तवन आवडले ! चाल लावली असेल, पार्श्वसंगीत दिले असेल तर नक्की इथे टाका !