Skip to main content

(कपाळ)मोक्ष!! :-)

लेखक चलत मुसाफिर यांनी रविवार, 15/12/2019 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व व्यर्थता उमजत असते तरि चित्ताला थारा नसतो संदेशाची तिच्या प्रतीक्षा मी प्रतिचातक बनुनी करतो हस्तसंच मज गमे उपांगच क्षणिक दुरावा असह्य होतो 'अजुनी उत्तर का येईना?' प्रश्न मनाला कच्चा खातो सतरा कामांचा खोळंबा भार्या घोष ठणाणा करते तरी पालथी घागर माझी आंतरजालावर गडगडते शेवटची कधि 'दिसली' होती किती त्यावरी प्रहर लोटले मोजुन घटिका तिज गमनाच्या पंचप्राण कंठाशी रुतले अन्य पुरुष तर नसेल कोणी? भिवविति लाखो शंका हृदया 'निळ्या खुणे'ला विलंब होता चलबिचले मम अवघी काया कुठे वावगे, अधिक-उणे कधि चुकून बोलुन मी गेलो का, तपासतो ते पुनःपुन्हा मी तरी न होई निरसन शंका अखेर उगवे सूर्यासम ती हर्षवायु मज पाडी भूल कुडीत माझ्या प्राण परतती प्रेमवसंताची ये चाहुल "कुठे उलथली होतिस तू बे?" लटक्या रागे विचारतो मी "गेले होते स्मशानभूमित" पटकन येई जवाब नामी! "प्रभातसमयी फुरसत नसते भोजनसिद्धी, शाळा, बाई शंभरवेळा सांगुनही हे तुझ्या मस्तकी घुसतच नाही" पाठवतो मी हास्यआकृती ओठावरही हास्य उमलते जगात पसरे शांती, शांती मोक्षाची मज प्राप्ती होते --------- टीप: निळी खूण: व्हॉटसॕपवरची 'तुमचा संदेश वाचला गेला आहे' हे दर्शवणारी ब्लू टिक हास्यआकृती: स्माइली

वाचने 10997
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

आवडली!

कोणताही इंग्रजी शब्द न वापरता कायप्पाच्या संज्ञांची रचना बेमालूमपणे कवितेत करण्याचे तुमचे कसब वाखाणण्यासारखे आहे. बाकी एक शंका 'ती' कोण? :)

:-)

In reply to by राघव

सूचक, समंजस हास्य! :-)

कविता छान. पण कवी आपल्या पत्नीशी फेस टू फेस न बोलता. व्हाट्सएपवर का बरे संवाद साधत आहे ? ते कळले नाही.

In reply to by mrcoolguynice

काही सूक्ष्मदृष्टी काव्यरसिक हा मुद्दा बरोबर पकडणार हे कविता प्रकाशित केल्यावर लक्षात आले. जर सुरुवातीला "संदेशाची 'तिच्या' प्रतीक्षा" असं असतं ('सतत प्रतीक्षा'ऐवजी) तर प्रश्न मिटला असता. अर्थात वाचकाला कवितेचा अर्थ तरीही समजतोच. तुमचा हा प्रतिसाद म्हणजे गंमतदार चावटपणाचे उदाहरण आहे. (स्वतःच्या!) पत्नीशी असा निर्मळ व नियमित संवाद व तसे नाते ज्यांचे असेल ते खरोखरच भाग्यवान म्हणावेत. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. :-)

In reply to by चलत मुसाफिर

व्यवस्थापकाधिकार वापरून करणे जर शक्य असेल तर 'संदेशाची तिच्या प्रतीक्षा' असा बदल कराल का?

बोरकर-कुसुमाग्रज-पाडगावकर यांची आठवण करून देणारे काव्य. हस्तसंच, निळ्या खुणा, हास्यआकृती वगैरे थोरच.
मोजुन घटिका तिज गमनाच्या
यातल्या 'तिज' चा 'तिला' असा अर्थ जास्त प्रचलित आहे. 'तिच्या ' असाही अर्थ आहे का? हा जरा संभ्रम आहे. कृपया खुलासा करावा. 'बाष्कळरसा'तली कविता खूपच आवडली. मन हे विटाळ अखंड चंचळ । न राहे चपळ एके ठायीं ॥ परि देखता निळ्या खुणा । लाहिजे तत्त्वता ब्रह्मसुख ॥