Skip to main content

नराधम

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 01/07/2023 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
नराधम आज माझ्याकडे सोनोग्राफी साठी एक रुग्ण बाई आल्या होत्या. वय वर्षे ४२. त्यांची फाईल पहिली तर त्यात बऱ्याच गोष्टी तर्कास न पटणाऱ्या होत्या. त्यांना एक वर्षांपूर्वी गर्भाशयाच्या कर्करोगाची सुरुवात झालेली होती. पण आजतागायत गर्भाशय काढून टाकलेला नव्हता. प्रथितयश अशा स्त्रीरोग तज्ज्ञांनी गर्भाशय काढून टाकणे आवश्यक आहे असे एक वर्षांपूर्वी स्पष्ट लिहून दिलेले होते. अगोदर झालेल्या सोनोग्राफी प्रमाणे या बाईंच्या गर्भाशयात निदान सात आठ तरी फायब्रॉइड्स होते आणि गर्भाशयाच्या मधल्या भागास अडेनोमायोसिस म्हणूनआजार झालेला होता. तीन महिन्यापूर्वी पेट सिटी (PET CT) झालेला होता. त्यावेळेस हा कर्करोग गर्भाशयाच्या बाहेर पडलेला नव्हता. या महाशयांनी कोणी एक डॉक्टर गाठला होता ज्याने हॉर्मोन थेरपी चालू केली होती ज्यामुळे त्या बाईंना गेले सहा महिने पाळी आली नव्हती. मी त्यांची सोनोग्राफी करताना मी त्यांच्या यजमानांना विचारले अजून तुम्ही शल्यक्रिया का केलेली नाही? त्यावर त्यांनी मला सांगितले कि आम्ही तीन चार वेळेस वंध्यत्वासाठी आय व्ही एफ चे उपचार केले परंतु त्यात यश आले नाही म्हणून आम्ही या डॉक्टरांकडे जाऊन शल्यक्रियेच्या ऐवजी हॉर्मोन थेरपी चालू केली. सोनोग्राफीमध्ये गर्भाशयाचे आतील आवरण बरेच वाढलेले दिसत होते याचा सरळ अर्थ असा होता कि हा कर्करोग त्या हॉर्मोन थेरपीला जुमानत नव्हता मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले कि या हॉर्मोन थेरपीला कोणताही शास्त्राधार नाही. याने केवळ पाळी येणे बंद होईल गर्भाशयाचे आतले आवरण वाढणार नाही म्हणून कर्करोग थांबेल असा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. मुळात आपल्या पत्नीच्या गर्भाशयात असलेल्या फायब्रॉइड्स आणि ऍडेनोमायोसीसमुळे त्यांना गर्भधारणा होण्याची शक्यता फारच कमी ( फारतर ५%) आहे. त्यातून तुम्ही हॉर्मोन थेरपी घेत आहेत त्याने स्त्रीबीज निर्मिती होत नाही मग गर्भधारणा कशी होणार? त्यातून अगदी गर्भधारणा झालीच तरी गर्भाशयाचा कर्करोग गरोदरपणाच्या हॉर्मोन्स मुळे वेगाने वाढून गर्भपात होण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि या काळात हा कर्करोग गर्भाशयाच्या बाहेर पाडण्याचीशक्यत कितीतरी जास्त आहे. असे असताना तुम्ही तुम्ही केवळ आपल्याला मूल हवे त्यांच्या जीवाशी खेळता आहात. "शल्यक्रिया करू नका" असे सांगणारा डॉक्टर शोधणे बंद करा आणि कोणत्याही अनुभवी स्त्रीरोगतज्ञाचा ताबडतोब सल्ला घ्या किंवा टाटा रुग्णालयात जाऊन दाखवा. नऊ वर्षे कर्करोग केंद्रात काम केल्याने मला थोडाफार अनुभव आहे यामुळेच मी तुम्हाला हा सल्ला देतो आहे. तुमच्या दृष्टीने सर्वात चांगला मार्ग म्हणजे अनुभवी स्त्रीरोगतज्ञाचा ताबडतोब सल्ला घ्या आणि ताबडतोब शल्यक्रिया करून घ्या आणि नंतर सरोगसी मार्गाने (तुमचा गर्भ दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात वाढवायचा उपाय) वंध्यत्वावर उपचार करा. मी त्यांना स्वच्छ शब्दात सांगितले कि आपल्या पत्नीला गर्भधारणा होण्याची शक्यता फारशी नाही हे सांगताना मला अजिबात आनंद होत नाहीये. परंतु कुणी तरी हे वाईट काम करणे आवश्यक आहे आणि लष्करात गोल गोल बोलण्याचे आम्हाला शिकवलेले नाही. यामुळे जे आहे ते तोंडावर स्पष्ट सांगणे आवश्यक आहे. अशा बोलण्याने दोन चार रुग्ण गेले तरी मला फरक पडत नाही. एवढ्यात या महाशयांना एक फोन आला म्हणून ते बाहेर गेले त्या वेळेत त्या बाईंनी सांगितले कि हा माणूस माझा शत्रू आहे. मला शल्यक्रिया करू देत नाहीये. जितक्या डॉक्टरांकडे गेलो तितक्यांनी मला ताबडतोब शल्यक्रिया करा असा सल्ला दिला आहे. एवढ्यात ते यजमान परत आले. त्यावर त्या बाई गप्प झाल्या. मी त्यांना हाच सल्ला परत एकदा कळकळीने दिला. त्यांना तो फारसा पटलेला दिसला नाही. पुढे काय होईल माहिती नाही. अर्थात मी याच्यापेक्षा अधिक काहीही करू शकत नव्हतो. डॉक्टर्स डे च्या दिवशी माझी अगतिकता मला प्रकर्षाने जाणवत होती. या बाई कोणत्या कारणाने या माणसाचे ऐकत होत्या आणि आपला जीव धोक्यात टाकत होत्या हे समजत नव्हते. त्यांची काहीतरी अगतिकता असावी असेच मला वाटते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 29002
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

"डॉक्टर्स डे च्या दिवशी माझी अगतिकता मला प्रकर्षाने जाणवत होती."
मी डॉक्टर नाही, पण गेल्या दोन वर्षांत चार कर्करोगग्रस्तांच्या केसेस पाहिल्या असल्याने हि अगतिकता नक्कीच समजू शकतो. केस क्र. १ दोन वर्षांपूर्वी एका जवळच्या मित्राच्या बायकोला प्राथमिक अवस्थेतील स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले. B.tech पर्यंत शिक्षण घेतलेली हि स्त्री डॉक्टरांनी दिलेला शल्यक्रियेचा (एक स्तन काढून टाकणे आणि खबरदारीचा उपाय म्हणून नंतर तीन सौम्य केमो घेण्याचा) सल्ला मानण्यास अजिबात तयार नव्हती. (तुम्ही दिलेल्या उदाहरणाच्या अगदी उलट) डॉक्टर, तिचा नवरा आणि आम्हा सर्व हितचिंतकांचा आग्रह फाट्यावर मारून तिने पर्यायी उपाय म्हणून तिच्या माहेरच्या लोकांच्या सल्ल्याने मित्राला मुंबईहुन पार यवतमाळला न्यायला लाऊन तिथल्या एका तथाकथित सुप्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर/वैद्याकडे उपचार घेण्यात पहिले दोन महिने अक्षरशः वाया घालवले. त्या आयुर्वेदिक उपचारांनी तिचा आजार कमी होणे तर जाऊद्या उलट आणखीन वाढला. शेवटी पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये शल्यक्रिया आणि सहा केमो घेतल्यावर आता तिथल्याच डॉक्टरांच्या सल्ल्याने गेल्या काही महिन्यांपासून हॉर्मोन थेरपी अंतर्गत रोज एक ह्या प्रमाणे Pfizer कंपनीच्या 'Palbociclib-125mg' ह्या कॅप्सूल्स घेत आहे. २१ कॅप्सूल्सच्या पॅकची किंमत (५% डिस्काउंट कापून) ९०,२५०/- रुपये मात्र आहे. ह्या कॅप्सूल्स घेण्याच्या बाबतीत सेकंडच नाही तर थर्ड ओपिनियनही आम्ही घेतलं, त्यावर उपचार म्हणून नाही पण आयुष्य वाढवण्यास सहाय्यक ठरतील असा त्या अन्य ऑन्कॉलॉजिस्टचा सल्ला मिळाला. माझा ऍलोपॅथी सोडून अन्य कुठल्याही वैद्यकीय उपचारांवर विश्वास नाही, कॅन्सरच्या बाबतीत तर नाहीच नाही! पण एक प्रश्न पडतो कि ह्या केस मध्ये दर महिन्याला सदर उपचारांवर लाखभर रुपये खर्च करण्याची ह्या कुटुंबाची ऐपत/क्रयशक्ती आहे हे ठीक, पण हे असले उपचार एखाद्या गरीब किंवा मध्यमवर्गीय कुटुंबाला परवडू शकतील का? केस क्र. २ एक चांगले परिचित, वय वर्षे सत्तर. त्यांना दीड-पावणे दोन वर्षांपूर्वी घशाच्या कर्करोगाचे निदान झाले. सुरुवातीला टाटा मेमोरियल मध्ये दोन-चार फेऱ्या मारल्यावर तिथल्या गर्दीला कंटाळून त्यांचे वय आणि रोगाचा झालेला प्रसार विचारात घेऊन त्यांच्या मुलांनी नवी मुंबईतल्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायचे ठरवले. शल्यक्रिया शक्य नसल्याने जेमतेम तीन केमो झाल्या पण शरीराने उपचारांना साथ न दिल्याने त्यांचा सहा महिन्यांच्या आतच मृत्यू झाला. तेवढ्या अवधीतही त्यांच्या उपचारांचा खर्च १२ लाखांच्या वर झाला होता. केस क्र. ३ माझ्या मामाच्या दुकाना शेजारी दुकान असलेला पन्नाशीच्या आतला एक मारवाडी ज्वेलर. चार महिन्यांपूर्वी त्याचे स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे थोड्या उशिराने निदान झाले. नवरा बायको, दोन मुली आणि एक मुलगा असे पाच जणांचे त्याचे कुटुंब. त्यातल्या मोठया मुलीचे लग्न झाले आहे, दुसरी मुलगी कॉलेज मध्ये आहे तर मुलगा आता ९ वी - १०वीत असेल. आर्थिक परिस्थिती उत्तम असूनही कुठलाही शारीरिक त्रास/वेदना सहन करण्याची मानसिक तयारी नसलेल्या ह्या व्यक्तीने व्यवसायातले सर्व व्यवहार मार्गी लावून, मृत्युपत्र वगैरे करून, सुसाईड नोट मध्ये सर्व काही लिहून कुठलेही उपचार न घेता कर्करोगाचे निदान झाल्यापासून अवघ्या १५ दिवसांत आत्महत्या केली. केस क्र. ४ माझी मामेबहीण. गेल्या वर्षी फुप्पुसांजवळ पाणी जमल्याने काही तपासण्या केल्यावर ठाण्याच्या एका नामवंत डॉक्टरांनी तिला कर्करोग असल्याचा निर्वाळा दिला. ६ जून २०२२ रोजी टाटा मेमोरियल (प्रायव्हेट) हॉस्पिटलमध्ये उपचारांना सुरुवात झाली. तिथे असंख्य वेळा ब्लड टेस्टस, एक्स-रे, पेट स्कॅन, कोलोनोस्कोपी, मॅमोग्राफी असे सर्व काही करून झाल्यावरही तिथल्या तद्न्य डॉक्टरांच्या टीमला तिला नक्की कुठल्या अवयवाचा कॅन्सर झाला आहे आणि त्याचा किती प्रसार झाला आहे ह्याचा काहीच अंदाज येत नसल्याने उपचारांची दिशा ठरवता येईना. शेवटी त्यांच्यात चर्चा होऊन केमो देऊन उपचारांना सुरुवात करण्यावर एकमत झाले. २१ दिवसांच्या अंतराने सहा केमो देऊन झाल्यावर काही दिवस तिला जरा बरे वाटले पण पुन्हा पाणी जमा व्हायला लागल्यावर लगेच आणखीन केमो देणे शक्य नसल्याने नव्वद दिवसांसाठी रोज एक प्रमाणे Pfizer कंपनीच्या 'Talazoparib' ह्या प्रचंड महाग (३० कॅप्सुल्सच्या डबीची किंमत जवळपास चार लाख रुपये) कॅप्सूल्स घेण्याचा सल्ला तिथल्या डॉक्टरांनी दिला. cap जेमतेम पंधरा दिवस ह्या कॅप्सूल्स घेतल्यावर तिच्या रक्तातले हिमोग्लोबिनचे प्रमाण आणि प्लेटलेट्सची संख्या प्रचंड खालावली. अंथरुणावरून उठण्याचीही ताकद तिच्या शरीरात राहिली नाही. मग महिनाभर टाटा (HBB) मध्ये ऍडमिट करून रक्त आणि प्लेटलेट्स चढवण्याचा सिलसिला सुरु झाला. मग तब्ब्येतीत थोडी सुधारणा आढळून आल्यावर पुन्हा दोन केमो दिल्या. ह्या दोन केमों नंतर मात्र तिची प्रकृती कमालीची खालावली. रक्तातले हिमोग्लोबिन आणि प्लेटलेट्सच्या प्रमाणाने धोक्याची पातळी ओलांडली. हे कमी कि काय म्हणून पहिल्या केमोनंतर बंद झालेली तिची मासिक पाळी अचानक सुरु झाली. कुठल्याही कारणाने शरीरातून रक्ताचा एक थेंबही बाहेर पडणे अत्यंत धोकादायक असल्याची परिस्थिती निर्माण झाल्याने जवळपास दीड महिना पुन्हा HBB मध्ये ऍडमिट करून उपचार केले. २३ मे २०२३ रोजी टाटा वाल्यांनी तिची फाईल बंद करून डिस्चार्ज दिला. त्यादिवशी रात्री साडेदहाला आम्ही तिला घरी आणली पण जेमतेम चार तासात तिची प्राणज्योत मालवली. माझ्या अर्धवट राहिलेल्या कोकण-गोवा मालिकेतील काही भागांत ज्या गोव्यातल्या मामे बहिणीचा उल्लेख आला आहे तीच हि बहीण. उण्यापुऱ्या वर्षभराच्या अवधीत पाण्यासारखा पैसा खर्च करून (७० लाखांपेक्षा अधिक) आणि प्रचंड मरणयातना भोगून तिचा झालेला असा दुःखद/वेदनादायी अंत जिव्हारी लागल्याने अद्याप त्या मालिकेचा पुढचा भाग लिहिण्याची इच्छा होत नाहीये. असो, तुम्ही लेखात उल्लेख केलेल्या स्त्री विषयी प्रचंड सहानुभूती आहे आणि तिला योग्य वैद्यकीय उपचारांपासून वंचित ठेवणाऱ्या तिच्या नवऱ्यासाठी वापरलेला 'नराधम' हा शब्दही अगदी परफेक्ट आहे!

In reply to by टर्मीनेटर

आता करत आहे, कारण टर्मिनेटर ह्यांनी ज्या काही कॅन्सरच्या केसेस वर्णिलेल्या आहेत, त्याच अनुषंगाने थोडे अजून लिहीतो. एक, वैद्यकीय क्षेत्रांतील जवळजवळ शून्य माहिती असलेला मी, इथे 'ब्रेस्ट कॅन्सरच्या विषयावरील माझे निरीक्षण असे नमूद करतो की, पूर्वी (म्हणजे सुमारे २० वर्षांपूर्वीपर्यंत) मी ऐकलेल्या/ पाहिलेल्या केसेस मधील स्त्रीया उपचार घेऊन, विशेषतः कॅन्सरग्रस्त स्तन काढून टाकल्यावर संपूर्ण रोगमुक्त झाल्या. मात्र गेल्या एक- दोन वर्षांत मात्र सुरूवातीसच लक्षांत येऊन उपचार सुरू केल्यावरही, असे आढळून आले की रोग झपाट्याने शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचलेला असतो--- एका जेमतेम पन्नाशीच्या स्त्रीचा ब्रेस्ट कॅन्सर, योग्य वेळी व योग्य ठिकाणी उपचार केल्यामुळे बराचसा नियंत्रणांत आहे, पण सुरूवातीसच पेट् स्कॅनमधे दिसून आले की तो तिच्या लिव्हरपर्यंतही पोहोचलेला आहे, नियमित व्यववस्थित उपचार सुरू आहेत. दुसर्‍या एका स्त्री वयोवृद्ध आहेत-- वय ऐशीच्या पुढे, त्या आपल्या मुलीकडे अमेरिकेत गेल्या असतांना, एकाएकी त्याण्ना असह्य पाठदुखी सुरू झाली, तेथील तपासण्यांतून शेवटी, ब्रेस्ट कॅन्सरचे रोगनिदान झाले. तसेच अलिकडे भरतीयांत कोलोन/ कोलो- रेक्टल कॅन्सरचे प्रमाण वाढल्याचेही दिसून आले.

In reply to by प्रदीप

थोडे विषयांतर आता करत आहे
हे विषयांतर नसुन धागा विषयाला धरुनच आहे!
पूर्वी (म्हणजे सुमारे २० वर्षांपूर्वीपर्यंत) मी ऐकलेल्या/ पाहिलेल्या केसेस मधील स्त्रीया उपचार घेऊन, विशेषतः कॅन्सरग्रस्त स्तन काढून टाकल्यावर संपूर्ण रोगमुक्त झाल्या.
योग्य निरीक्षण! सहमत आहे. अशा तीन केसेस आमच्या आप्तस्वकियांमध्ये असुन त्यातली एक तर आमच्या घरातच आहे! २००९ साली टाटा हॉस्पिटल मध्ये माझ्या आईचा कॅन्सरग्रस्त स्तन काढून तिला पाच केमो दिल्या होत्या. आता त्या गोष्टीला जवळपास १४ वर्षे लोटली असुन ती संपूर्ण कर्करोगमुक्त जीवन जगत आहे. वयोमानानुसार तिला काही शारीरीक कुरबुरी आहेत पण ते स्वाभावीक आहे! मागे चार-एक वर्षांपुर्वी खरे सहेबांनीच 'विळखा' नावाची एक मालिका लिहिली होती, त्यात त्यांनी त्यांच्या मातोश्रींना झालेल्या ह्या आजाराबद्दल लिहिले होते. त्या धाग्यावर दिलेल्या ह्या प्रतिसादातही मी वरील गोष्टीचा उल्लेख केला होता. पण आता ह्या रोगाचे आणि त्यावरील उपचारांचे स्वरुप फारच बदलले असल्याचे माझे निरिक्षण आहे. दिवसेंदिवस वाढत्या रुग्णसंख्येच्या मानाने सध्या सर्वसामान्यांना परवडु शकतील असे उपचार देणारी रुग्णालये फारच कमी आहेत. आणि खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी होणाऱ्या खर्चाविषयी तर बोलायलाच नको, तो तर आता सर्वसामान्यांच्या आवाक्यापलिकडे गेला आहे!

In reply to by टर्मीनेटर

कर्करोगाचे शेकडो प्रकार आहेत आणि त्यातील अनेक प्रकारामध्ये उपचार अत्यंत स्वस्त आहेत तसेच अत्यंत महागडे पण आहेत त्यामुळे केवळ कर्करोग आणि उपचार याचे सार्वत्रीकरण शक्य नाही. रोग निदान झाल्यापासून चौथ्या दिवशी निधन झालेली स्वतः डॉक्टर ( गर्भश्रीमंत घरात जन्माला आलेली) असलेली मुलगी मी पाहिली आहे तसेच १९८४ मध्ये चौथ्या स्टेज मध्ये असलेली एका सैनिकाची आई शेवटी २००६ मध्ये (मुलगा सुभेदार झालेला) संपूर्ण रोगमुक्त असलेली सुद्धा मी पाहिली आहे.

In reply to by टर्मीनेटर

टर्मिनेटर यांच्या प्रतिसादात कर्करोगावरील प्रचंड खर्चाचा मुद्दा आला आहे. त्या अनुषंगाने -- काही विमा कंपन्या आता टर्म इन्शुरन्समध्ये अशी सुविधा देतात की जर कर्करोगासारख्या प्राणघातक आजाराचे (याला या कंपन्यांनी टर्मिनल डिसीज असे म्हंटले आहे) निदान झाले तर सदर व्यक्ती जिवंत असतानाच विम्याची रक्कम त्याला मिळू शकते व तो ती रक्कम उपचारार्थ वापरु शकतो. यातले सगळे बारकावे मला माहित नाही. जाणकारांनी कृपया अधिक माहिती द्यावी.

In reply to by तर्कवादी

याला रायडर म्हणतात. माझ्या ५० लाखाच्या "भारती एकसा" च्या टर्म विम्यावर (ज्याचा हप्ता १५ हजार रुपये वर्षाचा आहे) मी असे रायडर घेतले आहे ज्यात २० वेगवेगळे प्राणघातक आजाराचे जर निदान झाले आणि त्यात तुमचे एक महिन्यात मृत्यू झाला नाही तर एक महिना अखेरीस तुमच्या खात्यात १० लाख रुपये जमा करतात.यासाठी वर्षाला मी ८ हजार रुपये अतिरिक्त भरतो. (जर एक महिन्याच्या आत मृत्यू झाला तर आपला आयुर्विम्याचे ५० लाख मिळतील आणि हे १० लाख रुपये मिळणार नाहीत) २० वेगवेगळे आजार असे आहेत, कर्करोग, हृदयविकार, मूत्रपिंडे निकामी होणे, लकवा (पॅरालीसीस), ल्युकेमिया, यकृत निकामी होणे असे महत्त्वाचे पण साधारणपणे जास्त आढळून येणारे ( common) आजार आहेत. असे रायडर अनेक कंपन्या देतात. हा सोडून मी दुसऱ्या कंपनीचा ५० लाखाचा दुसरा आयुर्विमा ( टर्म इन्शुरन्स) पण घेतलेला आहे. सर्व विम्याचे हप्त्याचे पैसे फुकट जावेत अशीच माझी परमेश्वर चरणी प्रार्थना असते.

अनुभव वाचतांना वाईट वाटलं.

का लोक असे वागतात. पैशाची अडचण असेल तर फंड रेज होऊ शकतो. बाईंचे कुणी नातेवाईक? गंभीर आजारा कडे डोळेझाक करण्याचे कारण समजत नाही. कर्क रोगा बद्दल पुष्कळ अवेअरनेस समाजात आला आहे. बराच कालावधी झाला, उपचार नसल्यामुळे कर्क रोग इतरत्र पसरला नसेल काय? MDTC मधे काऊन्सिलर असतात ते गाईड करू शकतील. बाईना मदतीची खरेच गरज आहे. तुम्ही त्यांच्या इतर नातेवाईकांना सुचित करू शकता काय. डाॅ.आपली तळमळ कळते.

बायकोचा जीव (किवा कोणाचाही जीव) वाचणे जास्त महत्वाचे आहे की नवीन मूल जन्माला घालणे? हा प्रश्न मनात डोकावला. आणि ईतर वाचकांनी म्हटल्याप्रमाणे--त्या बाईची अशी कोणती अडचण असेल(आर्थिक्/सामाजिक्/कौटुंबिक) की ती ठामपणे नवर्‍याला असे सांगु शकत नाही की "तु काहीपण झक मार, पण मी ऑपरेशन करणारच"

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

काही करणांमुळे, असे नवरे पदरी पडले आणि घर सोडायची हिंमत नसेल तर, अशा स्त्रीयांचे जीवन म्हणजे, जिवंतपणी नरकयातना.... अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, मौर्य काळांत, स्त्रीयांच्या भल्यासाठी पण काही कायदे केले होते ... संदर्भ, कौटिल्याचे अर्थशास्त्र, पान क्रमांक 239-240 ...

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

त्या बाईची अशी कोणती अडचण असेल आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी नसेल आणि आई वडिलांचा आधार नसेल अशा असंख्य स्त्रिया अशा अगतिक अवस्थेत असतात. गरोदर असताना पोटावर लाथ मारणारे नवरे अनेक पाहिले आहेत. कारण नंतर पोट दुखायला लागले कि त्या स्त्रिया सोनोग्राफी साठी येतात. आणि सुरुवातीला पोटावर पडले, पाय घसरला सारखी कारणे देणाऱ्या बायका नवरा समोर नसताना लाथ मारल्याचे कबुल करतात. ४२ वर्षाची स्त्री असेल तर आई वडील साठीच्या पुढचे नक्कीच असतात. तेंव्हा मुलीला आधार देण्याअगोदर त्यांना स्वतःचाच विचार करावा लागतो किंवा घरात करता मुलगा असेल तर त्याचा किंवा सुनेचा पाठिंबा असणे आवश्यक असते. उगाच नसतं लफडं कशाला गळ्यात घ्या असा विचार करणारे भाऊ भावजयी भरपूर असतात. त्यामुळे असा तर्हेवाईक/ विक्षिप्त जावई/मेहुणा असला तरी मुलीला/बहिणीला कायमचा आधार देणे हे किती लोकांना जमेल?

वर कुणीतरी दत्तक घेणे फार कठीण आहे अशा प्रकारचे विधान केले आहे. ते समजले नाही. प्रतीक्षा यादीत वेळ लागतो हे खरे आहे पण कठीण हे त्यात काही नाही

खरच नराधम आहे हा नवरा. त्या स्त्रीला लवकर आराम पडो किंवा या नराधमापासून तिची सुटका होवो हे सोडून काहीच बोलता येण्यासारखे नाही.

अब यार धागलेखक ही आर्ग्युमेंट मे गांधी वगैरे विषय ले कर आ रहे तब कोई क्या बोल सकता है. वैसे एक धागे मे कितने बार गांधी लाना रिझनेबल होता है ? (दिग्दर्शक) ई. ई प्रेरणा :- ३ इडियट्स

गांधीजींनी बलात्कार टाळण्यासाठी बायकांनी आपला श्वास अवरोधून आत्महत्या करायला हवी होतीस असे एका बलात्कार झालेल्या स्त्रीला सुचवले होते त्याची आठवण झाली.
आठवणीत आहे तर संदर्भ देऊनच टाका ह्या विधानाचा. नसेल तर सज्जनपणाचा एक आदर्श घालून द्या, स्वतःच संपादक मंडळाला सांगून तो विविक्षित वाक्य समूह delete करायला सांगून. धन्यवाद. - (जस्टिस) ई. ई.

ते लोहगड, कळसूबाई इथली भयानक गर्दी पाहून जीवावर (कर्करोग असताना)मनावर(दुसरं लग्न)उदार होऊन मूल जन्माला घालून लोकसंख्येत भरच पडेल.एखाद्या अनाथाला एडआप्ट करावं.ही अशी विकृती येतेच कुठून?त्या स्त्रीची अवस्था फारच वाईट आहे,तिने खंबीर व्हावं असं काहीतरी घडावं.

In reply to by Bhakti

छोडो मेहँदी खडक संभालो खुद ही अपना चीर बचा लो द्यूत बिछाये बैठे शकुनि, मस्तक सब बिक जायेंगे सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयेंगे| कब तक आस लगाओगी तुम, बिक़े हुए अखबारों से, कैसी रक्षा मांग रही हो दुशासन दरबारों से| स्वयं जो लज्जा हीन पड़े हैं वे क्या लाज बचायेंगे सुनो द्रोपदी शस्त्र उठालो अब गोविंद ना आयंगे| कल तक केवल अँधा राजा, अब गूंगा बहरा भी है होठ सी दिए हैं जनता के, कानों पर पहरा भी है| तुम ही कहो ये अश्रु तुम्हारे, किसको क्या समझायेंगे? सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयंगे| इंटरनेटवरून साभार

अरेरे ... स्त्री च्या नशीबाची दुर्दैवी कहाणी. नराधम नवरा तिचा जीव घेऊनच थांबणार. बिचार्‍या "ती" ला माहेराचा / नातेवाईकांचा आधार पाठींंबा नसणार त्यामुळे "ती" चे मरण ओढावणार हा विचार करुन वाईट वाटायला लागलंय ! रोचक आणि साधक बाधक चर्चा आहे !

माणसाला आपल्या प्राथमिकता नेहमीच तपासून पहायला हव्यात. काय करायचं, कशासाठी करायचं ह्याचं भान असायलाच हवं. अवांतरः कर्करोगाचं मूळ कारण कधी समजू शकतं का? म्हणजे शरीरात अमुक बिघाड झाल्यामुळं अमुक यंत्रणा काम करेनाशी झाली आणि या सर्वाचा परिणाम म्हणजे अमुक कर्करोग.. अशी काहीशी कारण मिमांसा करणं शक्य आहे काय? अन् तसं शक्य असल्यास आणि त्या मूळ कारणावर उपचार केल्यास कर्करोग बरा होण्याचे चान्सेस वाढू शकतील काय? मी वैद्यकीय क्षेत्रातला नाही अन् याबद्दल काही माहितीही मला नाही. केवळ जिज्ञासा म्हणून असा विचार आला. त्यामुळं चुभुद्याघ्या. अति-अवांतरः काही अपवादात्मक केसेस मधे न्यायालय स्वतःच एखादी केस दाखल करून घेते. किंवा पोलीस स्वतःच तक्रार नोंदवून तपास करतात. तसं वैद्यकीय बाबतीत अशी काही अनुचित घटना दिसत असेल की ज्यामुळे पेशंटच्या जिवाला धोका आहे, तर अशावेळेस डॉक्टरनं अशी तक्रार नोंदवून काही करणं शक्य असतं काय? किंवा याबाबतीत महिला आयोगाकडे डॉक्टरनं अशी बाब नोंदवली तर ते याबाबतीत थेट कारवाई करू शकतील काय?

महिला आयोगाकडे डॉक्टरनं अशी बाब नोंदवली तर ते याबाबतीत थेट कारवाई करू शकतील काय? होय ते किंवा न्यायालय अशा तक्रारींची दखल घेऊ शकतात. पण त्या तक्रारीचा पाठपुरावा आकारण्यास ती महिला येणार नसेल तर या सर्व खटाटोपीतून केवळ मनःस्ताप सोडला तर काहीही निष्पन्न होणार नाही. तिची अगतिकता काय आहे हे समजल्याशिवाय तिला मदत करणे फार कठीण आहे. कारण ४२ वर्षाच्या महिलेचे आईवडील हयात असतील तरी वरिष्ठ नागरिकच असणार तेंव्हा त्यांचा सबळ आधार नसेल तर एखादी स्त्री सहजासहजी नवऱ्याविरुद्ध तक्रार करू धजत नाही. नवऱ्याने लाथ मारलेल्या गरोदर स्त्रिया अधून मधून सोनोग्राफीसाठी येतात. बहुसंख्य बायका आम्ही बाथरूम मध्ये पाय घसरून पडलो असेच सांगतात. कारण अशा नाजूक स्थितीत सासरच्यांशी भांडण करणे बहुसंख्य बायकांना परवडणारे नसते. आणि बहुसंख्य वेळेस माहेरचा धड आधारही नसतो. नवऱ्याशी जमवून घे असाच सल्ला मिळत असतो. अगदीच टोकाचा छळ झाला तर बायका तक्रार करतात असाच अनुभव आहे. कायदा कागदोपत्री छान असतो पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती फार वेगळी असते.

In reply to by सुबोध खरे

कायदा कागदोपत्री छान असतो पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती फार वेगळी असते.
हे वाक्य फार आवडले :D

पण त्या तक्रारीचा पाठपुरावा आकारण्यास ती महिला येणार नसेल तर या सर्व खटाटोपीतून केवळ मनःस्ताप सोडला तर काहीही निष्पन्न होणार नाही.
होय हा भाग आहेच. अन् असं बहुतेक घरगुती अत्याचाराच्या केसेस मधे दिसतं देखील. यात त्या पीडीत महिलेचं प्रबोधन महत्त्वाचं तितकंच तिच्या घरच्यांचंही. माझ्या माहिती प्रमाणे अशा महिलांसाठीच राष्ट्रीय महिला आयोग आहे, ज्यांना काय करावं ह्याचा निर्णय घेता येत नाही. ते हे प्रबोधनाचं कामही करतात. अर्थात् या केसेस त्यांच्या समोर आल्यानंतर. पण हा भाग मान्य आहे की प्रक्रीया फार वेळखाऊ आणि किचकट असणार. त्यात पुन्हा त्या महिलेचं कुटुंब बहुदा तिला अ‍ॅक्सेप्ट करत नाही, त्यामुळंही महिला पुढे यायला धजावत नाहीत. पण अगदीच जीवाशी खेळ चालला आहे असं दिसल्यामुळे विचारावंसं वाटलं. असो.
अवांतरः कर्करोगाचं मूळ कारण कधी समजू शकतं का? म्हणजे शरीरात अमुक बिघाड झाल्यामुळं अमुक यंत्रणा काम करेनाशी झाली आणि या सर्वाचा परिणाम म्हणजे अमुक कर्करोग.. अशी काहीशी कारण मिमांसा करणं शक्य आहे काय? अन् तसं शक्य असल्यास आणि त्या मूळ कारणावर उपचार केल्यास कर्करोग बरा होण्याचे चान्सेस वाढू शकतील काय? मी वैद्यकीय क्षेत्रातला नाही अन् याबद्दल काही माहितीही मला नाही. केवळ जिज्ञासा म्हणून असा विचार आला. त्यामुळं चुभुद्याघ्या.
याबद्दल कुणी काही सांगू शकेल काय? की हा विचारच चुकीचा आहे?

In reply to by राघव

शरीरात जितक्या तर्हेचे अवयव आहेत आणि त्यातील जितक्या तर्हेच्या पेशी आहेत त्या सर्व तर्हेच्या पेशींचा कर्करोग होऊ शकतो. म्हणजेच निदान २०० च्या वर तर्हेचे कर्करोग आहेत. त्यामुळे इतक्या वैविध्य असलेल्या रोगाला एकाच धाग्यात गुंफणे अशक्य आहे. https://www.cancerresearchuk.org/what-is-cancer/how-cancer-starts/types…

In reply to by सुबोध खरे

धन्यवाद. लेख बराचसा वाचला अन् आणिक जिज्ञासा उत्पन्न झाली. म्हणून आणखीही बऱ्याच साईट्स बघून झाल्यात. अर्थात् ही केवळ वरवरची माहिती आहे आणि डॉक्टरांनाच काय ती कारणमिमांसा करणं खरोखर शक्य आहे हा भाग मान्य. कर्करोगाचं मूळ कारण जीन्स मधील झालेले अनैसर्गिक बदल हे सांगीतलेलं सापडलं आणि हे अनैसर्गिक बदल अनेक कारणांमुळे होऊ शकतात असंही गूगलल्यावर दिसलं. त्याच्या पलिकडे आणखी खोलात जाऊन मूळ शोधण्यावर आणि त्याबरहुकुम उपचार शोधण्याचं काम चाललंच असणार, त्यामुळे एका धाग्यात हे बसणं अशक्यच आहे हेही मान्य. एक सांगायला हवं. "कोणत्याही पेशंटच्या आंतरिक बिघाडाचं मूळ कारण कळू शकेल काय?" असा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे या पुस्तकांतील काही टेस्टीमोनीज - लिंक त्या अनुषंगानं कर्करोगासंदर्भातून माझा प्रश्न इथं मांडला होता. आपल्या धाग्यामुळं अन् प्रतिसादामुळं बरीच माहिती मिळाली त्याबद्दल अनेकानेक आभार.

आज दोन वर्षांनी हा धागा कसा पाहण्यात आला ठाऊक नाही. पण तो नवरा नराधमच नसून मूर्खही आहे. स्वतःचे मूल असणे हा त्याचा उद्देश असेल तर तो साध्य होण्याच्या दृष्टीने काहीच प्रगती होत नाहीये. त्याच्या बायकोला मूल होऊ शकत नाही असेही नाही. ती केवळ मूल आपल्या पोटात वाढवू शकत नाही. तिचा जीव वाचवण्यासाठी गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रकिया आणि इतर कॅन्सरचे उपचार हे पहिले तात्काळ पाऊल. त्यासाठी खूप खर्च आहे असेही नाही. त्यांनी आधीच त्यापेक्षा जास्त खर्च इतर गोष्टींवर केला आहे. त्यांनतर तिच्या बीजांडाचे त्याच्या शुक्राणूंसह IVF फलन करून इतर कुठल्या सरोगेट स्त्रीच्या पोटात गर्भ वाढवून तो नवरा व त्याची बायको ह्या दोघांचेही स्वतःचे जैविक मूल प्राप्त करून घेणे ह्यात त्याला काय प्रॉब्लेम आहे? २०२३ मध्ये सरोगसीची प्रोसेस फार कठिण नसावी. दुसरे लग्न, दत्तक वगैरे भानगडींची गरजच नाही.