
रास्तों पर निगाह रखने वाले, मंज़िल कहाँ देख पाते हैं|
सफर तो ताउम्र हैं, दरमियाँ सुकून के दो-पल कमाने है|
घड्याळाच्या काट्याला बांधलेलं आयुष्य स्वीकारून आता उणीपुरी दोन दशके सरायला झालीत. प्रवास सुरु आहे आणि राहील ही, रस्ता पायाखाली तर आहे पण पोहोचणार कुठे व कधी याचा काहीचं अदमास अजूनही लागलेला नाही. त्यामुळेच एखाद्या अनवट वळणावर वाट थोडी वाकडी करून, चाकोरीबद्ध जगण्याला हुल देण्याची लागलेली खोडं काही जाता जात नाही.

सह्याद्री आणि समुद्र म्हणजे चाकोरीला मोडण्यासाठी नेहमीच आव्हान देणाऱ्या जागा. वाट वाकडी करून उतरायचं असेलच तर याशिवाय दुसऱ्या पर्यायाचा विचार मी सहसा करत नाही.

हया वेळेस वाकडी केलेली वाट मला "वेळणेश्वर" या छोट्याशा पण नितांतसुंदर गावाला घेऊन गेली. अपार निसर्गसौंदर्याने नटलेली कोकणची भूमी, माडा-पोफळी, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे, डोंगरउतारांवरील खाचरांची नक्षी आणि पार्श्वभूमीला समुद्राची घनगंभीर गाज...... निसर्गाचा वरदहस्त या अपरांतक प्रदेशाला लाभला आहे.

गुहागर-तवसाळ रस्त्यावरून डाव्या हाताला वळून सड्यावरून जाणारा सपाट रस्ता संपला की मग तीव्र उतारांचा वळणा-वळणांचा रस्ता उतरून गावात प्रवेश होतो. वळणावरून गाडी पास होतांनाच समोर अथांग सिंधू-सागराचं अमोघ दर्शन होतं.

वेळणेश्वर हे गुहागरपासून साधारण १५ किलोमीटरवर, वेळणेश्वर-महादेवाच्या साथीने सुमारे १२०० वर्षांपुर्वीपासून जागते-राबते गाव, सभोवताली नारळ-पोफळीच्या बागा, अर्धचंद्राकृती, सुरक्षित आणि स्वच्छ समुद्रकिनारा. किनाऱ्यावरून डाव्या हाताला दिसणारा जिंदाल औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्प आणि उजव्या हाताला सुरू होऊन मागे जाणारी टेकडी, झाडांच्या गर्दीतून माना उंचावणारी घरे, रिसॉर्ट्स असा इथला परिसर.

कोकणातील अनेक घराण्यांचं कुलदैवत असणाऱ्या इथल्या वेळणेश्वर महादेवाच्या मंदिराचा परिसर तर अक्षरक्ष: भुरळ पाडणारा आहे. प्रशस्त मंदिर आवार, साधारण १० फुट उंचीची दीपमाळ, घुमटाकार शिखराचा सभामंडप, बाहेर पितळी ओटा, त्यावर चारही बाजूने एकमुखी मुखवटे आणि त्यावर पाच फन्यांचा नाग आहे. गाभाऱ्यात अडीच -तीन फुटी लांबीची पिंड असून पिंडीच्या मागे कोनाड्यात पार्वती आणि गणपतीच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याबाहेर कालीमाता , महिषासुरमर्दिनी , गोपाळकृष्ण यांच्या पंचधातूच्या तर विठ्ठल-रखुमाईची पाषाणातील मुर्त्या आहेत. मुख्य मंदिराला लागुनच काळभैरव, गणपती, लक्ष्मीनारायण अशी मंदिरे आहेत.

तसेच गावराखा, भुताई या ग्रामदैवतांचं ही एकमंदिर मुख्य मंदिराला लागूनच आहे. संपुर्ण मंदिर परिसर आकर्षक रंगसंगतीमध्ये रंगवला आहे व कटाक्षाने स्वच्छ राखला जातो. मन प्रसन्न करणारी ऊर्जा इथे जाणवत राहते.

पर्यटकांसाठी गावात घरगुती तसेच जवळपास काही हॉटेल्स-रिसॉर्ट्स मध्ये सोय होते. वेळणेश्वर भक्त निवासही उपलब्ध आहे.

जेवणाबद्दल बोलायचं तर मत्स्यप्रेमींची थोडी निराशा होते कारण पापलेट-सुरमई सारख्या माशांची इथे वानवा आहे. आधी सांगून ठेवलं तरच सोय होऊ शकते. इतर शाकाहारी-मांसाहारी जेवण मात्र अप्रतिम मिळते. MTDC रिसॉर्टचं लोकेशन तर एकदम लाजवाब आहे.

समुद्रकिनारा अजिबात गर्दी नसलेला, कुठल्याही प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्सचा गोंगाट नसलेला, पांढऱ्या शुभ्र वाळूचा आहे. किनाऱ्यावरून छोट्या मासेमारी बोटी अतिशय सुंदर दिसतात. या ठिकाणावरून आम्ही पाहिलेल्या सूर्यास्ताचं वर्णन करण्यास तर शब्द ही थिटे पडावे अशी गत.....

असो, दोन दिवस निवांत घालवावे अशी ही सुंदर जागा सदोदित अशीच राहो ही वेळणेश्वर चरणी प्रार्थना !!!
#कोकण
#वेळणेश्वर
#रत्नागिरी
#गुहागर
प्रतिक्रिया
वाह!
अ ति श य सुंदर
अ ति श य सुंदर
मस्त! वेळणेश्वरला खूप
सुंदर परिसर. गुहागर-हेदवी
झकास!!
चांगलं आहे.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
दोन्ही भाग लगेच वाचले, खरं
In reply to छान लिहिलंय. by श्रीगणेशा
सुंदर.
सुंदरच!
कोकण दर्शन...
कोयना म्हणजे कुंभार्ली घाटच
In reply to कोकण दर्शन... by कर्नलतपस्वी
होय..नाव आठवत नव्हते.
In reply to कोयना म्हणजे कुंभार्ली घाटच by चक्कर_बंडा
सर्वांचे आभार
आज परत त्याच जुन्या दिवसात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- SHOORVEER 3 - A Tribute to छत्रपति शिवाजी महाराज | Rapperiya Baalam Ft. Shambho I Meetu Solankiभटकंती आवडली.
मस्त वर्णन
हा धागा भटकंती सदरात हलवावा ही विनंती...