Skip to main content

||इदं न मम||

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 09/05/2023 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
||इदं न मम|| भरली ओंजळ पूर्ण अगदी पूर्ण रिकामी करताना, चार पावलं सोबत चालून पुन्हा मागे येताना, उचलून घेतलं फूल पुन्हा मातीत ठेवताना, शब्दांची साथ सोडून समंजस मुकं होताना, डोळ्यामध्ये उगा कुणी पाणी आणू नये. मनामध्ये उगा तेव्हा त्रागा करू नये. हस-या मुखाने, भीष्माच्या अलिप्तपणाने अनुभवलेली ओल, गंध, स्पर्श वा अर्थ आठवावे. आणि तृप्तपणे म्हणावं, इदं न मम| इदं न मम|
लेखनविषय:

वाचने 1925
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणेच छान कविता.
शब्दांची साथ सोडून समंजस मुकं होताना, डोळ्यामध्ये उगा कुणी पाणी आणू नये. मनामध्ये उगा तेव्हा त्रागा करू नये. हस-या मुखाने, भीष्माच्या अलिप्तपणाने अनुभवलेली ओल, गंध, स्पर्श वा अर्थ आठवावे.
लैच अवघड असतं. -दिलीप बिरुटे

कविता भावली! "माझं असं काहीच नाही", असं म्हणून मनाची समजूत घालणं, एवढाच एक पर्याय उरतो, शेवटी!

अशी भावना असणे हेच मुळात खूप अवघड असते. इतकं तटस्थपणे व्यवहारात/संसारात वागणं, जगणं काही अपवादात्मक व्यक्तींव्यतिरिक्त इतरांना नाही जमत. छोट्या छोट्या गोष्टींत आपला जीव अडकतो. त्यामुळेच घरात अडगळ साठत राहते. त्यामुळेच (पुरेशी जागा असेल तर) अडगळीची खोली घरात असते. आणि हे केवळ वस्तूंसाठी नाही. त्या त्या वेळच्या भावना, स्मृती, विचार यांचंही तेच आहे. बर्‍याच जणांत वयानुसार, अनुभवानुसार कमी जास्त प्रमाणात अशी तटस्थता किंवा स्थितप्रज्ञता येते. बर्‍याच जणांत येतच नाही.