Skip to main content

काठावरचे प्रेम.....

लेखक उदय सप्रे यांनी बुधवार, 06/05/2009 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
काठावरचे प्रेम..... अस्ताला जाणार्‍या सूर्याला बघून एकदा रात्र म्हणाली, "बराच काही काळ तळपतोस मग शेवटी असा का मावळतोस?" सूर्य म्हणाला , "वेडे , मी जातो तुझ्या सुखासाठी तू आसुसलेली असतेस तुझ्या चंद्राच्या मुखासाठी ! आपलं तारुण्य उधळतेस , पहाटे पहाटे दु:खी होतेस पुन्हा यावं लागतं मला , तुला फुलवायला , तुझ्या सुखासाठी !" रात्र : " खरंच राजा , चंद्रापेक्षाही तूच खरा सखा आहेस भेटतोस काही क्षणांसाठी , पण धग देतोस जगणार्‍या प्रत्येक कणासाठी ! मला तुम्ही दोघेही हवेत , दोघांना एकत्र मला बघायचंय 'एक हात तुला अन् एक हात त्याला' असं बेधुंद जीवन जगायचंय !" सूर्य म्हणाला , "मलाही सखे एकदा तुझ्या कुशीत निजायचंय ही धग खूप असह्य आहे , शांत होईतो चांदण्यात भिजायचंय ! पण .....आपल्याला असं वागता येणार नाही तुझ्या रात्रीच्या प्रियकरासाठी तुला जायलांच हवं आणि.....तुझ्या त्या सुखी क्षणांसाठी..... "तो" येताच , मला असं विझायला हवं ! ----------कवी : सन्मित्र (उदय गंगाधर सप्रे-ठाणे , ०८ डिसेंबर २००५ , ०८.०० वा.)
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2109
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

कल्पना आणी कविता खुप आवडली. येऊ द्या अजुन. ( अवांतरः "एक फुल दो माली", "संगम" सिनेमे आठवले. ;) ) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

पण उदयराव, अंमळ राज कपूरच दिसतोय तुमचा सूर्य.... राजेंद्रकुमारपायी वैजयंतीमालेला गमावणारा... धत तेरेकी!! :)

राव , असं काय करता? सूर्य एकदम वास्तववादी आहे , नाहीतरी आपल्याला हे झेपणार नाही हे त्याला दिसतंच आहे (चंद्र १२ तास आणि हा फक्त पहाटे उगवताना रात्रीला काय भेटेल तेव्हढाच !) , मग निदान प्रेम तरी व्यक्त करून उदारपणा का मिळवू नये? अवांतर : राज कपूर ने फक्त सिनेमात हिरॉईन्स दुसर्‍यांना दिल्या , प्रत्यक्षात मात्र.....तुम्ही सुजाण आहातच , आज तो जिवंत असायला हवा होता , नाती ज्या उघड्या नाचतायत त्या बघायला.....(एक कलाकार म्हणून आदर असला तरी वास्तव नाकारता येत नाही ना?)

In reply to by उदय सप्रे

मग निदान प्रेम तरी व्यक्त करून उदारपणा का मिळवू नये? असं आहे होय!! मग चालूद्या... :) बाकी तुमचं 'अवांतर' अगदी खरं आहे!! त्या बिचार्‍या नितू सिंग ला उगाच ऍक्टिंग सोडून द्यावी लागली.....

रात्र : " खरंच राजा , चंद्रापेक्षाही तूच खरा सखा आहेस भेटतोस काही क्षणांसाठी , पण धग देतोस जगणार्‍या प्रत्येक कणासाठी .. या ओळीचा नक्कि अर्थ काय ??

"जगण्यासाठी आपण खातो त्याचे रुपांतर ऊर्जेत होते आणि त्या ऊर्जेवर आपण जिवंत राहू शकतो " हे वैज्ञानिक सत्या तुम्हाला माहित आहेच , त्याच धर्तीवर , सूर्य पहाटे म्हणजे रात्र मावळताना फक्त काही क्षणच रात्रीला भेटतो आणि त्या पहाटेच्या आपल्या दर्शनाने जी ऊब तिच्यात निर्माण करतो , त्यावर प्रत्येक कण ती अजून १२ तसांनी १२ तास जिवंत राहू शकते .....

जर नदीचा उल्लेख नसेल तर काठावरचा शब्द हा नेहमी काठावर म्हणजे जेमतेम, नक्की असे नाही, अगदी काठावर पास झाला हेच पहीले आठवते. काठावरचे प्रेम म्हणजे अजुन १००% कमीट्मेंट नाही आहे दुसरे कुणी सापडले तर हा करार संपुष्टात असे वाटते. :-) बाकी सुर्य, पृथ्वी व चंद्र यांचे लफडे, एकमेकांना कुशीत घेणे व सोडणे ... जाउ दे.. चालू दे... पुलेशु