टेलिकॉम क्रांतीचे महास्वप्न -माझा प्रवास (सॅम पित्रोदा)-- भाग २
आधीचा भाग
टेलिकॉम क्रांतीचे महास्वप्न -माझा प्रवास (सॅम पित्रोदा)
तर मागच्या भागात आपण पाहिले की ६० च्या दशकात अमेरिकेत काही स्वप्ने घेऊन आलेले सॅम आता चांगलेच स्थिरावले होते, अमेरिकन नागरिकत्व ,दोन मुले आणि पत्नी असे सुखी कुटुंब, शिवाय भाऊ बहिणी आई वडील बहुतेक सर्वजण एक एक करून अमेरिकेत आलेले होते. वेसकॉम विकल्यामुळे तर इतका पैसा मिळाला होता की पुढचे सर्व आयुष्य केवळ त्या पैशांच्या व्याजावर जाऊ शकत होते. पण त्यांना आता भारतातील टेलिकॉम क्षेत्र सुधारण्याचा किडा चावला होता. इंडिया फोरम मध्ये झालेल्या चर्चेनुसार त्यांच्या असे लक्षात आले की या कामासाठी दिल्लीत एक विचारवंतांचा गट स्थापन केला पाहिजे जो सरकारवर दबाव टाकू शकेल. त्यानुसार ते पुढच्या भारतभेटीत त्यांच्या एका मित्राला भेटायला गेले. त्याच्या ऑफिसमध्ये या विषयावर चर्चा सुरु असताना त्याची खुर्ची सतत करकरत होती, आणि त्यामुळे सॅम अस्वस्थ होत होते. शेवटी त्यांनी मित्राला विचारले "मला लक्ष केंद्रित करता येत नाहीये. ही खुर्ची अशी किती दिवस करकरते आहे? तुला त्रास होत नाही का?" त्यावर तो म्हणाला "मला ते कधी लक्षातच आले नाही." सॅमनी तेल मागवले आणि ते लावून तो आवाज बंद केला. हा त्यांच्यासाठी एक धडा होता. त्यांची अमेरिकन मानसिकता विरुद्ध इथली "सब चलता है " ही वृत्ती असा तो संघर्ष होता. मग पुढचे काही महिने सॅम भारतभेटी करत राहिले, प्रत्येक भेटीत त्यांना वेगवेगळ्या तऱ्हेने इथली निष्क्रियता जाणवत राहिली. आणि टेलिकॉम बद्दल काहीच प्रगती होईना.
मग त्यांना कोणीतरी सांगितले की इंदिरा गांधींना भेटलात तर काहीतरी प्रगती होऊ शकेल, ताबडतोब सॅम सासऱ्यांच्या ओळखीने त्यांच्या एका वजनदार मित्राला भेटायला दिल्लीला गेले. आणि काही भेटीनंतर त्यांच्या मनात एक स्थान निर्माण करू शकले. त्यांना इंदिरा गांधींची १० मिनिटांसाठी भेटीची वेळही मिळाली. पण सगळी योजना समजावून सांगायला तेव्हढा वेळ पुरेसा नव्हता. त्यामुळे सॅमनी ती नम्रपणे नाकारली आणि १ तास वेळ मागितला. पुढे त्यांना समजले की राजीव गांधींच्या मार्फत ते इंदिराजींना भेटू शकतात, आणि त्यांनी तसे प्रयत्न सुरु केले. आणि शेवटी २ वर्षे चाललेल्या या सगळ्या खटपटींना यश येऊन सॅम ना १ तास भेटीची वेळ मिळाली. ही सॅम च्या आयुष्यातील अतिशय महत्वाची वेळ होती आणि त्यासाठी त्यांनी आपल्याकडून एकदम जय्यत तयारी केली. इतकी किती प्रोजेक्टरचा दिवा गेला तर पंचाईत नको म्हणून जास्तीचा दिवाही बरोबर आणला. याच बैठकीत सॅमची राजीव गांधींशी तार जुळली. भारतात संपर्क व्यवस्था सुधारणे कसे जरुरीचे आहे आणि त्याचे काय फायदे आहेत, तसेच हे सर्व परदेशी कंपन्यांवर अवलंबून न राहता देशातच उत्पादन करून आपल्याला हवी तशी यंत्रणा उभारणे कसे गरजेचे आहे हे सगळे मुद्दे सॅम नी प्रभावीपणे मांडले. सगळ्यांनाच सगळे मुद्दे कळले असे नाही पण या बैठकीतील प्रभाव आणि इंदिराजींचा मिळालेला पाठिंबा यामुळे पुढील घटना वेगाने घडू लागल्या आणि प्रत्येक खात्याचे मंत्री सॅम शी बोलायला धडपडू लागले. लवकरच तज्ज्ञ लोकांचा एक गट सॅम ची पार्श्वभूमी वगैरे पडताळणी करायला शिकागोला येऊन गेला आणि कामाने गती घेतली. पुढच्या भारतफेरीत राजीव गांधींच्या भेटीत सी डॉट म्हणजे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स स्थापन झाले. आणि ३६ कोटी रुपये त्यासाठी मान्यही झाले. ही एक कंपनीप्रमाणे काम करणारी संस्था असणार होती जी डिजिटल स्विचेस तयार करून दूरसंचार खात्याला विकेल. पण हे इतके सोपे नव्हते. सिमेन्स, अल्काटेल,एरिक्सन वगैरे सारख्या परदेशी महाकाय कंपन्या भारतात आपापली उत्पादने विकायला कसोशीने प्रयत्न करत होत्या आणि त्यांना असे देशी प्रतिस्पर्धी उत्पादन नको होते. त्यांनी राजकारणी लोकांवरही येन केन प्रकारेण दबाव आणायचे किंवा प्रलोभने दाखवायचे प्रयत्न चालू केले. मात्र सॅम ने आपले घोडे पुढे दामटायला एक मुद्दा मांडला कि सी डॉट सध्या फक्त खेडेगावात लागणारे छोटे १२८/२५६ लाईन्सचे स्विचेस बनवेल आणि त्यामुळे या मोठ्या कंपनीना शहरी मार्केट मोकळे राहील. खरेतर भारतात त्यावेळी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर दोन्ही क्षेत्रात तज्ज्ञ लोकांची कमतरता होती त्यामुळेही सध्या छोटे स्विचेस बनविण्यातूनच मग पुढे मोठे स्विचेस बनवता येणे शक्य होते.
पण इथली आव्हाने वेस कॉम पेक्षा फारच वेगळी होती. तिथे फक्त नवे उत्पादन बनवणे आणि त्याला मार्केट शोधणे हेच मुख्य काम होते. तर इथे उत्पादन तयार करण्याबरोबरच त्यामागील राजकारण, जनमत, सॅम यांचे अमेरिकन नागरिकत्व, त्यांचा यामागे नक्की उद्देश काय (नफा कमावणे किंवा इतर) याबद्दलचे संशय असे अनेक कंगोरे होते. त्यावर मत करत आता सॅम ची जागा शोधण्यासाठी पाहणी सुरु झाली. पण समोर कम्प्युटर ठेवून शेकडो तंत्रज्ञ मात्र काम करू शकतील अशी वातानुकूलित जागा मिळेना. हाती फक्त ३६ महिने होते. तेव्हा बऱ्याच चर्चेअंती चाणक्यपुरीतील सरकारी मालकीच्या अकबर हॉटेलमधील दोन मजले ताब्यात घेऊन तिथे फर्निचर,वायरिंग वगैरे कामे सुरु झाली. अशीच एक जागा बंगलोरमध्ये भाड्याने घेतली गेली. पुढचे महत्वाचे काम म्हणजे मनुष्यबळ. त्यासाठी सॉफ्टवेअरचे काम करणारे लोक दिल्लीत, तर हार्डवेअरचे काम करणारे लोक बंगलोरमधून निवडले गेले. दोन वरिष्ठ शास्त्रज्ञ त्यांचे नेतृत्व करणार होते. साल होते १९८४. फक्त नवीन कर्मचारी घेऊन भागणार नव्हते तर त्यांना प्रशिक्षण, नवी कार्य संस्कृती, गुणवत्ता राखणे, किंमत राखणे अशी अनेक आव्हाने होती. युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम आणि सी लँग्वेज वापरात येऊ घातली होती तिचा वापर सी डॉट च्या डिजिटल स्विचमध्ये होणार होता. तेव्हा प्रशिक्षणापासुन सुरुवात झाली. गटागटाने हे तरुण नवशिके इंजिनीयर्स शिकागोला जाऊ लागले आणि युनिक्स व सी /सी ++ शिकून येऊ लागले. दुसरीकडे प्रसार माध्यमांना हाताशी धरून या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचतील याची (मार्केटिंग) काळजी घेतली गेली. ही सर्व तरुण मुले जितकी अन अनुभवी होती तितकीच उत्साही होती, त्यामुळे दिवसरात्र एक करून सगळे कामाला भिडले होते. बंगलोरला हार्डवेअरचे बांधणी तर दिल्लीत त्याला लागणारे सॉफ्टवेअर तयार होत होते. पण त्याच बरोबर वेगवेगळ्या कार्य संस्कृती एकत्र आल्याने होणाऱ्या गमती जमतीही खूपच होत्या, त्यात दिल्ली /बंगलोर, अमेरिका/भारत असे अनेक फरक होते. पहिल्यांदा ३० मुलींची भरती केली गेली तेव्हा या मुलींबरोबर कामाच्या ठिकाणी कसे वागायचे हेही त्या मुलांना माहित नव्हते, "सर कल्चर" म्हणजे बॉस आले की उठून उभे राहायचे, लिफ्ट वाले सलाम करायचे अशा अनेक तऱ्हा. मग त्यांचे वर्तणुकीविषयीचे काही धडे सॅम यांनी घेतले.
अशा रीतीने काम गती घेतच होते तोवर इंदिराजींची हत्या झाली. पुन्हा सगळे अनिश्चित झाले, पण मग मध्यावधी निवडणूक झाल्या आणि राजीव गांधी पंतप्रधान म्हणून निवडून आले. मात्र आता त्यांना मागे राहून नाही तर भारताच्या जडण घडणीत चालकाच्या सीटवर बसून गाडी चालवायची होती. "विकासासाठी तंत्रज्ञान " हा सॅम आणि त्यांच्या बोलण्यात कळीचा मुद्दा होता. आणि आता असे शिकागो-दिल्ली फेऱ्या मारून फारसे काही हाती लागणार नाही, आपला सहभाग वाढवण्यासाठी भारतात येऊन राहणे अधिक गरजेचे आहे हे सॅम ना कळून चुकले. साल होते १९८५. इथे राहूनही त्यांना सी डॉट च्या जबाबदारीबरोबरच एखाद्या मोठ्या कंपनीत नोकरी करता आली असती पण सी डॉट तर देश घडविण्याचे काम करत होती जे या सगळ्यापेक्षा प्रचंड महत्वाचे होते. अखेर सॅम नि कुटुंबासहित भारतात यायचा निर्णय घेतला. यथावकाश त्यांच्या डिजिटल स्विच चे प्रात्यक्षिक झाले आणि आता त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायची गरज निर्माण झाली. पण त्यासाठी सॅम कडे तेव्हढ्या मोठ्या फॅक्टरी कुठे होत्या? मग त्यांनी उद्योजकांची एक बैठक घेऊन प्रत्येकी ४ लाख रुपये डिपॉझीटच्या बदल्यात आपले उत्पादन बनवायचा परवाना विकायची योजना केली. एकूण ४८ लोक तयार झाले. या सगळ्या कामात राजीव गांधी प्रत्यक्ष सहभागी नसले तरी सॅम वेळोवेळी त्यांना भेटून या सगळ्याची कल्पना देता होतेच.
अखेर पहिले देशी बनावटीचे १२८ लाईन्सचे स्वयंचलित दूरध्वनी केंद्र (डिजिटल स्विच) बंगलोरच्या ताज वेट एन्ड हॉटेलमध्ये समारंभ पूर्वक दाखविले गेले. दर दिवसाला एक केंद्र उभारण्याची घोषणा किंवा आश्वासनही त्यात दिले गेले. पण भारतात सहा सात लाख खेड्यांमध्ये ती पोचवायची तर दिवसाला एक या हिशोबाने १०-१५ वर्षे लागली असती. पुन्हा वृत्तपत्रांनी टीका सुरु केली. पण तरुण इंजिनियर्सच्या साहाय्याने सॅम नी हेही आव्हान स्वीकारले आणि हळू हळू रोज १० केंद्र उभारण्यापर्यंत मजल मारली. दुसरीकडे गावोगावी गल्लो गल्ली एस ती डी बूथही उभे राहू लागले आणि त्या द्वारे रोजगार निर्माण होऊ लागला. दुसरीकडे ५१२ लाईन्सचे केंद्र तयार करायची धडपडही चालू होतीच, पण आता अजून एक नवीन प्रश्न निर्माण होऊ लागला. ब्रेन ड्रेन. इथे तयार झालेल्या इंजिनियर्सना काही प्रमाणात बाहेर मागणी येऊ लागली आणि ते सोडून जाऊ लागले. अर्थात अनेक समस्यांपैकी हि सुद्धा एक. आता हळूहळू सॅम ना सी डॉट च्या दैनंदिन कामात लक्ष घालणे आवश्यक राहिले नाही आणि राजीव गांधींबरोबर राहिलेल्या वेळात त्यांच्या अनेक विषयांवर चर्चा झाडू लागल्या. त्यात मुख्यतः; दारिद्र्य, विषमता निर्मूलन,मूलभूत गरजांची पूर्तता आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती , ऊर्जा, दळण वळण, आरोग्य,पाणी,साक्षरता अशा गोष्टी असत. हळूहळू सॅम राजीव यांच्या हरेक योजनेत सल्लागार किंवा तंत्रज्ञ किंवा इतर काही भूमिकेत दिसू लागले. प्रत्येक योजनेचा सखोल अभ्यास करणे, त्यातील व्यवहार्यता तपासणे , प्रोजेक्ट प्लॅन बनवणे किंवा पारखणे अशी एक ना अनेक कामे. आणि मग त्यांना तंत्रज्ञान मिशनखाली मंत्रिपदाचा दर्जा दिला गेला. पाणी,साक्षरता,लसीकरण,खाद्यतेल आणि टेलिकॉम याकडे हे खाते तंत्रज्ञान वापरून लक्ष ठेवणार होते. पुढे त्यात दुग्ध उत्पादनाचाही समावेश झाला. या सगळ्या खात्यांचा समन्वय होऊन कामे प्रचंड गतीने सुरु झाली.
पण अजून एक नवा अध्याय पुढे वाट पाहत होता. पुढे आलेल्या काही अडथळ्यांमुळे किंवा अपघाताने सॅम टेलिकॉम खात्याचे सचिव बनले. तिथे सगळी अनागोंदी होती. जवळपास ५.५ लाख कर्मचारी व त्यांच्या १७ संघटना. ४० लाखाच्यावर टेलिफोन लाईन्स असा अवाढव्य पसारा आणि वर्षानुवर्षे बाहेरच्या कंपन्यांकडून यंत्रे विकत घ्यायची सवय होती. धुळीने भरलेल्या खोल्या, फायलींचे गट्ठे, वास मारणाऱ्या बाथरूम्स, आवाज करणारे पंखे असे काय नि काय. सर्वप्रथम सॅम नी सगळ्या सफाई कामगारांना एकत्र केले आणि ताज सारख्या मोठमोठ्या हॉटेलात ट्रेनिंगला पाठविले. दुसरा मुद्दा होता कामगार संघटना आपलेसे करण्याचा. त्यांच्या पुढाऱ्यांना विश्वासात घेऊन सॅम ने अजून एक बाजी मारली. पुढे हळूहळू नवीन नोकर भरती कमी आणि काही योजना आणून जुनी माणसे कमी करणे असे उपाय योजायला सुरुवात केली. शिवाय एक फाईल, तिच्यामागे आठवण द्यायला अजून एक फाईल, त्यावर सही करायला अजून एक फाईल, अशी वेळखाऊ फाईलींची सिस्टीम हळूहळू बंद कशी होईल याकडे लक्ष दिले,भारतात फायबर ऑप्टीकचे उत्पादन सुरु करण्याकडे लक्ष दिले असे अनेक. याचवेळी जी इ कंपनीबरोबर घडवून आणलेली विप्रो, इन्फोसिस,टी सी एस या सॉफ्टवेअर आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नवीनच रांगू लागलेल्या कंपन्यांची भेट हाही प्रसंग वाचण्यासारखा आहे. जी इ ने त्यांना १० दशलक्ष डॉलर्सची ऑर्डर दिली, मग टेक्सस इंस्ट्रुमेंट्स त्यांचा कारखाना काढण्यासाठी बंगलोरला येण्याचा प्रस्ताव घेऊन आले. पण त्यासाठी त्यांना डलासला जोडणारी सॅटेलाईट लिंक हवी होती. ती ही दिली गेली. त्याच काळात अमेरिकेने भारताला महा संगणक देण्याचे फेटाळले आणि मग इरेला पेटून इथे सी डॅक ची स्थापना झाली ज्याचे विजय भाटकर आणि त्यांनी बनविलेला परम महा संगणक सर्वांनाच माहित आहे. कामानिमित्ताने मग सॅम यांचे देशोदेशीच्या राजकारणी लोकांशीही ओघानेच संबंध येऊ लागले ज्यात अगदी मिखाईल गोर्बाचॉव्ह यांचाही समावेश होता.
पण चढत्या कमानीला उतारही असतोच. १९८९च्या निवडणुकीत बोफोर्स प्रकरणावरून राजीव गांधींचा पराभव झाला आणि राजीव गांधी विरोधी पक्षात आले. त्याबरोबरच टेलिकॉम खाते सॅम कडून गेले आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप व्हायला लागले. सगळीकडून टीका आणि आरोप होऊ लागले. त्यातही ते अमेरिकन नागरिक असल्याचा मुद्दा उचलला जाऊ लागला. पण त्यांनी आधीच भारतीय नागरिकत्व घेतले होते . मात्र पत्नी व मुले अमेरिकन नागरिक राहिले. पुढे लवकरच हे सरकार कोसळले आणि नवीन आघाडी सरकार आले व परिस्थिती सुधारली. मात्र मुले या सगळ्याला कंटाळली होती आणि त्यांनी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत परतायचा निर्णय घेतला. या सगळ्या दगदगीमुळे की काय सॅम ना हृदय विकाराचा झटका आला. साल होते १९९०. पण लवकरच एप्रिल १९९१ च्या निवडणूक जाहीर झाल्या आणि सॅम राजीव गांधींच्या प्रचारात गुंतले. जोरदार मोहीम चालू होती आणि राजीव गांधींची हत्या झाली. पुन्हा सॅम यांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. राजीव गांधींशिवाय भारतात राहण्याची कल्पनाच त्यांना करवेना. आणि ते शिकागोला परतले. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे या १०-१२ वर्षात त्यांनी आपली सगळी पुंजी खर्च केली होती आणि त्यांच्याजवळ फार काही शिल्लक राहिले नव्हते. आता ते अमेरिकन नागरिकही नव्हते. सगळीकडून अंधार दाटून आला होता.
अशातच सॅम ला वृत्तपत्रातून समजले कि इलेक्ट्रॉनिक डायरी फार लोकप्रिय होत आहेत आणि मोठ्या कंपन्या त्या तयार करून बक्कळ पैसे मिळवत आहेत. त्यात तोशिबा,शार्प,कॅसिओ,एच पी असे बरेच होते. पण सॅम ने तर जी टी इ मध्ये असताना १९७४ मध्ये हे पेटन्ट घेतले होते, आणि या कंपन्या त्याची परवानगी ना घेताच हे उत्पादन करत होत्या. सॅम ने त्यांना पत्र पाठवून जाब विचारला पण अर्थातच त्यांनी त्या पत्राला भीक घातली नाही. मग सॅम ने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली. खटला सुरु झाला. कंपन्यांनी मोठे मोठे वकील उभे केले. पण शेवटी २० लाख डॉलर्सवर तडजोड झाली आणि सॅम पुन्हा मूळपदावर आले. पुढे सखोल विचार करून त्यांनी मोबाईल वोलेटचेही एक पेटंट फाईल केले. आणि मग त्याच्या उत्पादनासाठी धावपळ सुरु झाली. कंपनीचे नाव ठरले सी-सॅम . त्यातून पुढे केवळ खाजगी टेलिकॉम आणि आय टी कंपन्यांना कर्ज देणारी वर्ल्ड टेल बँक निर्माण झाली. त्या बँकेचे एक संस्थापक म्हणून सॅम ची पुन्हा जग भ्रमंती सुरु झाली. वेगवेगळ्या देशातील आय टी आणि टेलिकॉम क्षेत्र गुंतवणूक करून फायदा मिळवणे हे वर्ल्ड टेलचे काम होते. या सगळ्यात २००० साल उजाडले आणि सॅम ना प्रोस्टेट कँसरची लागण झालेली लक्षात अली. अर्थात यावेळीही झटपट उपचार झाले आणि सॅम घरी परतले. पुन्हा २००४ मध्ये सोनिया गांधींच्या आग्रह खातर सॅम प्रचारात उतरले आणि मनमोहन सिंग सरकारचे घटक बनले. पुन्हा डोक्यात रुंजी घालणाऱ्या अनेक नवनवीन संकल्पना त्यांनी मांडायला आणि राबवायला सुरुवात केली. एकीकडे सी सॅम चे काम, दुसरीकडे वर्ल्ड टेल चे काम, तिसरीकडे सरकारी कामे अशी सर्व आघाड्यांवर लढाई सुरु असल्याने सॅम ने निर्णय घेऊन सी-सॅम मास्टर कार्ड कंपनीला विकून टाकली.
========================================================
आता ही कथा पुढे रेल टेल ची स्थापना, आधार बायो मेट्रिक ची कल्पना, आय टी क्रांती, उदारीकरण, पल्स पोलिओ मोहीम, फायबर ऑप्टिक क्रांती, जी आय एस मॅपिंग, नॅशनल इन्फर्मेटिक सेंटची स्थापना अशा अनेक स्टेशनांमधून पुढे पुढे सरकते. आणि थोडीशी "फिलॉसॉफिकल" सुद्धा बनते. खूप सारी माहिती थोड्या पानांमध्ये भरायचा प्रयत्न केल्यामुळे त्यातील बरेच तपशील कदाचित डोक्यावरून जाऊ शकतात. पण एक माणूस आपल्या आयुष्यात काय काय करू शकतो आणि एक देश ३०-४० वर्षात कुठून कुठवर जाऊ शकतो याचे भान या पानांमधून आपल्याला येते. आणि शेवटी सॅम यांची नात अरियाच्या जन्माशी येऊन हे वर्तुळ पूर्ण होते. (समाप्त)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान लेख
सर्वच माहिती नविन होती.
वाह,एका अवलियाची ओळख झाली
सुंदर पुस्तक परिचय.
आवडलं.
खूप
हे चित्र १९८१ मध्ये APPLE हा
नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटरची स्थापना १९७६ मधील आहे
आपण
हम्म
भारतात प्रथम (१९६०/७० च्या
छान पुस्तक परिचय, पित्रोदा
अतिशय माहितीपूर्ण झाली आहे हि
श्री टर्मीनेटर, तुमचा प्रतिसादातील भावना मी समजु शकतो.
उत्तम माहितीपूर्ण प्रतिसाद!!
ह्या विषयी अधिक जाणुन घ्यायला आवडेल.
ऑर्डर देणे आणि रद्द करणे
भारी लिहिलंय..
पुस्तकाची ओळख आवडली! चांगली