✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

काही विस्कळीत जुन्या नोंदी

ज
जिन्क्स यांनी
Wed, 11/02/2022 - 17:37  ·  लेख
लेख
Mandir माझ्या लहानपणीच्या घरा/अंगणाबद्दलच्या काही आठवणी. १. अंगणाच्या नैऋत्येला सूर्यास्तेकडे झुकलेला मोठा गुलमोहर होता. एवढे देखणे झाड पुढे आयुष्यात कधी पाहिले नाही. पूर्ण वाढीचा हा गुलमोहर एका सतेज कांतीच्या रुबाबदार पुरुषासारखा वाटायचा. ऐन रखरखलेल्या उन्हाळ्यात जेंव्हा इतर झाडे कोमेजून जायची तेंव्हा हा गुलमोहर तांबडी फुलें अंगावर फुलवून रुबाबात उभा असायचा. हा म्हशींच्या गोठ्याच्या मागे होता म्हणून रोजच्या वावरात तो दिसत नसे. अंगणातील इतर झाडी जशी त्यांच्या अंगाखांद्यावर बागडल्यामुळे ओळखीची वाटायची तसा हा थोडा परका वाटायचा. कधी चिंचा पाडायला किंवा असेच अंगणात फेरफटका मारताना घरामागे (गोठ्यामागे) गेलो तरच दिसत असे. ह्या गुलमोहराची मनात कोरलेले चित्र म्हणजे थंडीच्या दिवसात सूर्य मावळतेवेळी नांगरलेले घरामागचे रान पाहता पाहता कोपऱ्यात तटस्थपणे उभा असलेला हा वृक्ष एखाद्या सीमारेषेवरच्या राखणदार सारखा वाटे. २. लहानपणी अंगणात बरीच झाडी होती. सवंगगाड्यांसोबतचे बरेच खेळ ह्या झाडांच्या साक्षीने चालत. अंगणातल्या बऱ्याच जागांना झाडांचीच ओळख असे. घरामागचा आंबा, बोळीतला जांभूळ, रानातली दिवसमावळी, पुलावरची दिवसमावळी, देवळजवळचा रामफळ, देवळासमोरचा चाफा, ओसरीवरचा आंबा, पडवीतली जास्वंद, बांबू, पेरू, चिक्कू, कागदी फुलाचे झाड, विहिरीजवळचा मोठा आवळा, त्याच्या शेजारचा गोड आवळा जणू ही सर्व रोज समोर दिसणारी माणसं होती. त्या अंगणात त्यांचं स्वतंत्र अस्तित्व होतं. ३. वस्तीवरचे मित्र जेंव्हा उन्हाळी सुट्टीत त्यांच्या आजोळी निघून जात तेंव्हा हीच झाडी माझ्या खेळातले सवंगडी होत. रामफळाच्या झाडावर माझ्या कल्पना जगातले हेलिकॉप्टर होते, गोबरगॅस प्लान्ट माझी बोट होती, देवळासमोरच्या बदामाला पाणी देण्यासाठी मी मातीचे छोटे धरण बांधले होते. सरडे, पाली, खारुताई तर असंख्य. अशोकाच्या झाडावर मोठ्या घारीचे घरटे होते. बुचाच्या झाडाखाली मुळ्याच्या खोबणीत पिवळी धामण कधी कधी दर्शन देत असे. उंबराच्या झाडावर मोठमोठाली आगीमोहळे होती. ह्या सगळ्यात मी खूप रमून जात. आख्खी दुपार जेंव्हा घरातले इतर लोक गाढ झोपेत असे तेंव्हा माझे हे खेळ सुरू असत. पुढे आयुष्यात मी प्रचंड इन्ट्रोवर्ट झालो त्याचे बीज बहुदा तिथे असावे. ४. मला एक सवय आहे. नवीन ओळख झालेल्या आणि मैत्री होऊ शकणाऱ्या व्यक्तीला मी मुद्दामहून त्याचे लहानपणीचे संदर्भ येतील असे प्रश्न विचारतो.आपल्या घराबद्दल बालपणाबद्दल भरभरून बोलणारे लोक खूप आवडतात. त्यांच्या आणि माझ्या मध्ये काही समान दुवा आहेत असे वाटते. झाडांचा संदर्भ देऊन पत्ता सांगणारे लोकही मला आवडतात - समोरच्या चिंचेपासून डावीकडे वळा. असे लोक झाडांचे अस्तित्व consider करतात हे मला आवडते. लहानपणीच्या आठवणी केवळ माणसं केंद्रित असणारे लोक मला रूटलेस वाटतात. ५. पानगळीच्या दिवसात सारे अंगण झाडले जात. पानांचे मोठमोठाले खच बनवून पेटवून दिले जात. पेटवलेल्या वाळलेल्या पानांचा वास मला अतिप्रिय. उन्हाळ्याच्या सुरुवातीला रात्रीचा वारा सुटे. त्या हवे मध्ये ही वेगळाच वर्णन न करता येणार वास असे. खास त्या वासासाठी मी रात्रीचे जेवण झाल्यावर तुळशीच्या ओट्यावर बसत असे. पूर्वी देवळाजवळ खूप मोठे बुचाचे झाड होते. ह्या झाडाला छोटी छोटी पांढरी फुले येत. ह्या झाडाखाली खूप साऱ्या फुलांचा सडा सतत पडलेला असत. अख्खा आसमंत ह्या फुलांच्या वासाने सदैव भारलेला. पुढे एका वादळात हे मोठे झाड पडले. ह्या झाडाच्या लाकडातून अख्ख्या घरासाठी फर्निचर झाले. पडलेल्या झाडातून परत छोटी छोटी फुलांची झाडे उमलली. अंगणाचा उत्तरपूर्व भाग आज ही सुवासाचे सुख देणाऱ्या झाडांनी भरलेला आहे. झोपायच्या खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहिले की उंच पण बारीक अंगकाठीचा चाफा दिसे. हा चाफा आज ही आहे. बहाराच्या मोसमात सगळी पाने गाळून फक्त सुबक पांढरी सुवासाची फुले अंगावर लेवून उभा असलेला चाफा हे फार सुंदर दृश्य असे. चाफ्याच्या समोर पूर्वी ओळीने लावलेला मोगरा असे. रातराणी, बकुळ ही इथे तिथे असत. पूर्वी गुलाबाची बाग लावण्याचा प्रयत्न झाला होता पण त्याच्या आठवणी अगदीच पुसटश्या. ६. घरामागचा उंबराच्या झाडाला बुंध्यापासूनच तीन फांद्या होत्या. उंबराच्या झाडावर लहानपणी खूप खेळलो. पण गोड फळामुळे ह्या झाडावर बऱ्याच लाल मुंग्या आणि इतर कीटक असत. खेळून झाल्यावर बराच वेळ अंग खाजत. त्याकाळी अर्थातच अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात. तर ह्या झाडाला बुंध्यापासूनच तीन फांद्या असल्याकारणाने तिथे दत्ताचे ठाणे आहे म्हणून तिथे मंदिर बांधण्यात यावे असा उपदेश एका देवरूषीने माझ्या आज्जीला दिला होता. उंबर घरामागे असल्या कारणाने मंदिर तिथे न बांधता घरासमोर असलेल्या उंबराजवळ बांधले. देवळात सुबक दत्ताची मूर्ती आहे. शंकराची पिंड आणि नंदी आहेत. मोठी काकू सोडली तर घरातले तसे फार पूजा पाठ देव देव करणाऱ्यातले नव्हते. पण देवळातल्या पूजेसाठी नेहेमी कोणी न कोणी माणूस ठेवला असल्याची आठवण आहे. ७. माझा जन्म होईस्तोवर गोठ्यातले गोधन बरेच कमी झाले होते. माझ्या आठवणीतल्या गोठ्यात २-३ म्हशी आणि तेवढ्याच शेळ्या होत्या. अगदी पुसटशी बैलगाडीची आठवण आहे. गोठा पूर्वीच्या सुबत्तेची साक्ष देत ऐसपैस होता. त्याकाळी तो मॉडर्न असावा. पाया ताशीव दगडांचा होता आणि दावणी लाकडी होत्या. शेळ्यांचा गोठा ही वेगळा होता. माझ्या बालपणी हा गोठा गुरांसाठी कमी आणि अडगळीचे सामान ठेवण्यासाठी जास्त वापरत. लपाछपी खेळताना लपण्यासाठी सगळ्यात आवडती जागा म्हणजे हा गोठा. पावसात गोठ्यात उभे राहिले की पत्र्यावर ताड ताड आवाज भीतीदायक पण तेवढाच मनोरंजक वाटे. गोठ्याशेजारी गॅरेज होते. गॅरेज शेजारी जांभळीचा बोळ ओलांडून दोन मोठाल्या खोल्या होत्या. हे नवीन घर बांधायच्या आधीचे घर. खोलीत मोरी, दगडी जातं, उखळ, तुळया, खुंट्या, मोठमोठाली पितळी भांडी असे सर्व होते. मी ही खोली दहावीच्या अभ्यासासाठी वापरली. नंतर माझ्या भाचीचा जन्म झाल्यावर पाहिले काही दिवस माहेरवाशीण बहिणीचा मुक्काम ह्या खोलीत होता. एकदा रात्री त्या खोलीत भिंतीतल्या कपाटातून खवड्या जातीचा साप निघाला होता. तो साप मी आणि आमच्या राखणदाराने मारला होता. पुढे त्या खोलीशेजारीच असलेल्या बोळीत (जांभळी खाली) त्या राखणदाराला नाग चावला होता. त्यातून तो बचावला पण नंतर आयुष्यभर बिचारा लंगडत चालत होता. ह्या खोलीशेजारी अजून एक अगदी तशीच खोली. तिचा उपयोग शेतीचे सामान, धान्य, खत आणि इतर अडगळ साठवण्यासाठी करत. एकदा खेळता खेळता मला ह्या खोलीत खूप जुनी तलवार सापडली होती. बरीच वर्षे ती होती. मध्ये कधीतरी घरी चोरी झाली तेंव्हा चोरांनी इतर सामनाबरोबर ती पण नेली. शिक्षणासाठी वयाच्या १८व्या वर्षी मी ही स्वप्ननगरी सोडली. निघण्याच्या दिवशी घरातल्या काही बुजुर्ग मंडळींच्या डोळ्यात पाणी आले होते. पण मला त्यावेळी त्या प्रसंगातली तिव्रता समजली नाही. हे असे उपजीविकेसाठी घरातून बाहेर पडणे बऱ्याच वेळेला परत न येण्यासाठीच हे माहीत नव्हते.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
साहित्यिक
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
4280 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

छान लिहिलंय.

सस्नेह
Wed, 11/02/2022 - 17:49 नवीन
रम्य आठवणी. डोळ्यासमोर चित्र साकार झाले!
  • Log in or register to post comments

हे असे उपजीविकेसाठी घरातून बाहेर पडणे बऱ्याच वेळेला परत न .....

श्वेता२४
Wed, 11/02/2022 - 17:54 नवीन
छान लिहीलंय. अगदी याच अनुभवातून रम्य बालपण गेले आहे.
  • Log in or register to post comments

तुमची लिहिण्याची शैलीही

कानडाऊ योगेशु
Wed, 11/02/2022 - 21:24 नवीन
तुमची लिहिण्याची शैलीही गुलमोहराच्या झाडासारखीच बहारदार आहे. लिहिते राहा.
  • Log in or register to post comments

फक्कड.

कंजूस
Wed, 11/02/2022 - 21:43 नवीन
उगाच ललित साहित्यातात न घुसता कामाचं मांडलं. सहज.
  • Log in or register to post comments

स्वप्ननगरी

चौकस२१२
गुरुवार, 11/03/2022 - 06:31 नवीन
स्वप्ननगरी आपली हि स्वप्ननगरी कुठली ते जाणून घयायला आवडेल , देश कि कोकण ? कि इतर ठिकाण निमशहरी कि त्यापेक्षा छोटे गाव ? या घराचं वर्णाबरोअबर , त्या गावातील एके एक व्यक्तिरेखा हि डोळ्यासमोर येऊ लागलया का कोण जाणे हे वाचून मग प्रकाश नारायण संत यनचय " लंपन" ची आठवण झाली ! त्याचे बालपण आणि तुमचे सारखे असावे ! किंवा जयंत दळवीनचे ठणठणपाळ ( बहुतेक तेच ज्यात त्यांचे गावातील - कोकणातील बालपण वर्णिले आहे )
  • Log in or register to post comments

नितीन आखवे ...

कर्नलतपस्वी
गुरुवार, 11/03/2022 - 09:50 नवीन
स्मरण रंजन आवडले. नितीन आखवे यांचे गीत आठवले. सुदंर. माझे बालपण आशाच खेडेगावात गेले आणी आजच्या शहरी धकाधकीत अशा आठवणी नेहमीच वर उसळी मारतात. एक वेस ओलांडली गाव एक दूर राहिले एकट्याच वाटेस या दिशांनीच सांभाळले उसासे फुलांचे , खुलासे सणांचे , का मी ऐकतो मातीच्या उरातल्या स्पंदनात गुंगतो पुन्हा मनात भंगतो पावलास स्पर्श सांगतो गाव दूरदूर थांबले एक वेस ओलांडली गाव एक दूर राहिले
  • Log in or register to post comments

तुमच्या झाडांच्या आठवणी छान

श्वेता व्यास
गुरुवार, 11/03/2022 - 11:23 नवीन
तुमच्या झाडांच्या आठवणी छान आहेत. आमच्या अंगणात मोठे वृक्ष फक्त आंबा नि निरगुडी होते, पण फुलझाडांची छान बाग होती. गल्लीत सिलिंडर द्यायला येणारे टेम्पोदेखील उन्हात या आंब्याखाली विसाव्याला थांबायचे. भाजीवाले, फेरीवाले दुपारी आंब्याच्या सावलीला थांबायचे ते आता आतापर्यंत! पण झाडांचेही कोणी शत्रू असू शकतात हे हळू हळू समजू लागलं. आजूबाजूला लोकांनी घरं मोठी बांधण्यासाठी स्वत:ची झाडे तोडून टाकली आणि शेजारीपाजारी तुमच्या आंब्याचा खूप कचरा आमच्या दारात येतो म्हणून ओरडा करू लागले, रस्त्याने मुलं कैऱ्यांसाठी दगड मारत ते इतरांच्या घरांवर पडतील याची धास्ती होती म्हणून नाईलाजास्तव आंबा तोडावा लागला. खूप वाईट वाटलं. निरगुडी कीड लागली म्हणून तोडली, थोडी फुलझाडं आहेत पण घर ओकंबोकं दिसू लागलं.
  • Log in or register to post comments

आठवणींची पोतडी मस्त उघडून

सुखी
Fri, 11/04/2022 - 05:06 नवीन
आठवणींची पोतडी मस्त उघडून दाखवलीय
  • Log in or register to post comments

आम्ही राहायचो त्या वाड्यात

नचिकेत जवखेडकर
Fri, 11/04/2022 - 07:46 नवीन
आम्ही राहायचो त्या वाड्यात चाफा, जांभूळ, पारिजातक, गुलाब, कर्दळी, रातराणी अशी झाडं होती आमची . चाफ्याच्या झाडाची एक फांदी बाहेर आली होती तिकडे मी एक सायकलच्या टायर मधली ट्यूब लावून झोका खेळायचो :) तुमच्या लेखामुळे त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद
  • Log in or register to post comments

चाफ्याच्या झाडाची एक फांदी

कर्नलतपस्वी
Fri, 11/04/2022 - 12:52 नवीन
चाफ्याच्या झाडाची एक फांदी बाहेर आली होती तिकडे मी एक सायकलच्या टायर मधली ट्यूब लावून झोका खेळायचो चाफ्याचे झाड कितीही मोठे झाले तरी ठिसूळ असते व खुप ओझे सहन करू शकत नाही. लगेच तुटते अगदी पिवळ्या,पाढंर्‍या चाफ्याचे सुद्धा. काहिही हं श्री&#128512
  • Log in or register to post comments

छान आठवणी!

श्रीगणेशा
Sun, 11/13/2022 - 11:04 नवीन
छान आठवणी! लहानपणीचं घर, अंगण, सभोवतालची झाडं, सर्व काही आपलंसं, हवंहवंसं वाटण्यामागे, त्या वयातील निरागसता, स्वच्छंदीपणा, उत्सुकता असावी. आणि साधं सरळ आयुष्य हे संपन्न आयुष्यापेक्षा कितीतरी जास्त समाधान देऊन जाणारं असतं.
  • Log in or register to post comments

नशीबवान आहात ...

मुक्त विहारि
Sun, 11/13/2022 - 12:08 नवीन
लहानपण निसर्गाच्या सानिध्यात जाणे, हे परमभाग्याचे लक्षण ...
  • Log in or register to post comments

धन्यवाद

जिन्क्स
Tue, 12/13/2022 - 12:14 नवीन
सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा