अलेक्सा झाssssली ...!!

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
22 Sep 2022 - 7:56 am

अलेक्सा... "झाssssलीssss ...!!!!!"

माझा नातू खच्चून ओरडत होता. मी जमेल तितका झटपट उठून बसलो. एकदम उभा राहिलो तर मला ब्लॅक आउट व्हायला होतं. बराच वेळ मी आडवाच असतो ना, म्हणून.

एक मिनिट बसून मी उभा राहिलो. संतुलित होऊन बाथरुमकडे पावलं टाकत निघालो. मीही जाता जाता अलेक्सा अलेक्सा ओरडत राहिलो. काय झालं होतं मला कळेना. मुलगा आणि सून बिल पेमेंट न केल्याबद्दल एकमेकांना जाब विचारत असल्याचे आवाज मला बाहेरच्या खोलीतून ऐकू येत होते.

शेवटी तूर्तास तातडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मी झटपट बाथरुमकडे जाऊन फवारानळीने योग्य ठिकाणी पाण्याची धार ओतून नातवाची सुटका केली.

"काय झालं आबा?, अलेक्सा नॉट रिस्पॉंडिंग?", नातवाने घाबरुन विचारलं.

आतापर्यंतच्या वर्णनावरून नातू म्हणजे अगदीच लहान बाळ असेल असं वाटलं असेल तर तो गैरसमज मी दूर करतो. तो आता सहा वर्षाचा आहे. पण काय करता? लहानपणी माझ्या पोराच्या दुधाची बाटली योग्य वयात सोडवावी हे साधं ज्ञान मी विसरलो होतो. माझा पोटचा कारटा त्याच न्यायाने आपल्या पोराला स्वतःचं ढुंगण स्वतः धुवायला शिकवायची वेळ हुकला. त्यासाठी वॉश सिस्टीम बसवली. पोराला शिकवणं राहू द्या उलट खुद्द "अलेक्सा झाली" म्हणताना मी माझ्या पोराला ऐकलं आहे.

आयतेपणा एकदा अंगात भिनला की तो झटकणं म्हणजे मानेवर बसलेला वेताळ उतरवण्यापेक्षा कठीण. पण हे कळायला ही जी वेळ उजाडली आहे ती इतकी उशिराची आहे की काहीही बदलणं आपल्या हाती नाही हे मी आताशा स्वीकारलं आहे.

सुरुवातीला मीच अलेक्साला आणली. नवीन संसार होता.
डिजिटली सॅच्युरेटेड संसार. मोबाईलफोन्समध्ये कॅमेरा आला तेव्हाचं अप्रूप नंतर एकाच हँडसेटमध्ये दोन तीन कॅमेरे आल्यावर इतकं बोथट झालं की कशाने नव्याचा फीलच येईना. पिक्सेल वाढवा, मेमरी वाढवा, बॅटरी वाढवा.. फोल्डिंग स्क्रीन, व्हर्चुअल स्क्रीन.. पुन्हा पुढच्या वाढदिवसाला लेटेस्ट काय खरेदी?

"अलेक्सा प्ले पार्टी म्युझिक", "अलेक्सा डिम द लाईट्स" असं म्हणून ते एक जोडपं रोमँटिक होताना जाहिरातीत बघितलं आणि मोहात पडलो. "अलेक्सा डिम द लाईट्स" या शब्दांचा उपयोग पुढे कोणती उत्पादनं विकण्यासाठी व्हायचा हे अलेक्सा जाणे.

पण तेव्हा ते लक्षात यायचं नाही. हिचा वाढदिवस आलाच होता, आणि तो लक्षात ठेवायला ताराबळ चंद्रबळ पुरेसं होतं, अलेक्साच्या रिमाईंडरची आवश्यकता नव्हती. म्हणून तीच अलेक्सा गिफ्टच्या निमित्ताने आणली.

नंतर वर्षामागून वर्षे गेली. घरातल्या सगळ्या वस्तू एकमेकांशी जोडल्या गेल्या, माणसं सोडून. पुलं देशपांडे म्हणून आमच्या आऊटडेटेड लोकांच्याही लहानपणीचे एक लेखक होते. त्यांनी भरपूर विनोद करण्यासाठी लिहिलेलं "इथंही ऑटोमॅटिक होतं की कुंथावं लागतं" हे वाक्य फार आठवायचं. त्यांचा ऑटोमॅटिक कुत्रादेखील.

.. भरकटलो वयानुसार.

तर.. वस्तू एकमेकींना जोडल्या गेल्या. फ्रीजमधला अंड्यांचा रॅक रिकामा होऊ लागला की रिमाईंडर, दुधाच्या ट्रेचं वजन डिटेक्ट करून रिमाईंडर हे काही खास अप्रूप राहिलं नाही.

"नुसत्या रिमाईंडरचा काय उपयोग? सामान ऑर्डर करणं हे काम तर आपल्याच डोक्यावर पडतं ना?" .. असा वैताग माझ्या पिढीतच सुरु झाला. त्यांनतर सामानाची अपडेट झालेली यादी फ्रिजनेच थेट ऑर्डर करणं हे सोल्युशन आलं. अर्थात ही ऑर्डर आपोआप जावी किंवा आपल्या कन्फर्मेशननंतर जावी हे ऑप्शनल सेटिंग होतं. खूप मोठा अधिकार अद्याप मालकांकडे होता.

हां तर सोल्युशन्स.. आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला समस्या मानून त्यावर उपाय पुरवण्याला "सोल्यूशन" म्हणणं हे अगदी माझ्या तरुणपणापासून सुरु झालं होतं. "कम्प्लिट वन स्टॉप सोल्युशन टु युअर वेडिंग नीड्स", "एन्ड टु एन्ड फ्युनरल सोल्युशन", "गिफ्टिंग सोल्युशन" आणि अगदी भाज्या फळं बाजारातून खरेदी करून आणण्याच्याही "प्रॉब्लेम"वर सोल्युशन्स येत गेली.

"तुमच्या धकाधकीच्या बिझी आयुष्यात" हे शब्द सुरुवातीला ठेवून आम्हाला आयुष्याचं कर्तेपुरुषपण देऊन सुखावत सुखावत खूप गोष्टी विकायला आल्या. अगदी पूर्वी, "तुमच्या धकाधकीच्या बिझी आयुष्यात तुमच्या मुलांचं बालपण, खेडेगाव, आजोळ हरवलंय" याची आठवण देऊन सेकंड होम्स खपली. तिथे अनेक एकर हिरवळीवर नवरा, बायको आणि मुलं सायकल चालवत किंवा चेंडूने खेळत असताना मोठ्या फलकावरच्या जाहिरातीत हायवेच्या दोन्ही बाजूंना दिसायची. स्वप्नाळू डोळ्यांनी आणि थोडीशी पोरांना भरपाई देण्यासाठी ही घरं घेतली जायची. मग पहिली जोरदार पार्टी झाली की पुढे सर्वांना त्या हिरव्या गवतातले किडे चावायचे, खाज यायची, निसर्गाच्या कुशीतल्या घरात डास आणि सापसुरळ्या दिसायच्या. सायकल चालवणं किंवा फुटबॉल खेळणं याची तब्येत शहरी अंगात नव्हती ती सेकंड होममध्ये विकएंडपुरती कुठून येणार? हळूहळू महिन्यातून पूर्ण कुटुंब एकदा, मग सहा महिन्यांत पोरांचे फक्त आईबाबा एकदा आणि मग फक्त एकटा बाबा वर्षातून एकदा साफसफाई करून घेण्यापुरता त्या घरी यायचा. विकेन्ड्ससाठी शहरातच मॉलबाजी हे खूप सोपं साधं सोल्युशन असताना हे अवघड सोल्युशन घेऊन चूक झाली हे सर्वांना पटत गेलं.

"तुमच्या धकाधकीच्या जीवनात तुम्हाला वेळ नसतो" या सिरीजमध्ये मग अगदी लहान मुलांना गोष्ट सांगणं, अंगाईगीत गाऊन झोपवणं आणि बरंच काही अलेक्साच्या सुरक्षित हाती गेलं. खुद्द आईच्या आवाजात अंगाई, खुद्द बापाच्या आवाजात गोष्ट.. अशी खूप प्रगती होत गेली. पण फक्त आवाज आई बाबांचे होते. गोष्टी त्यांच्या नव्हत्या. पुढे कधीतरी माझ्या, म्हणजे मेलेल्या आजोबांच्या आवाजातही माझा नातू गोष्ट ऐकू शकेल. पण फक्त आवाजच माझा असेल. माझ्याकडे आता नवीन "गोष्ट" नाही.

अलेक्साला पर्याय म्हणून असंख्य आले. लोला, लिंडा, मायरा आणि मग अनु हे स्वदेशी व्हर्शन. पण आम्ही अलेक्साशी लॉयल राहिलो. सवयीने जवळीक, दुसरं काय?

मी रिटायर होईपर्यंत ऑफिसच्या किंवा घरच्या, कुठल्याही कामासाठी प्रत्यक्षात घर सोडून कुठेही जाण्याची आवश्यकता पूर्ण नाहीशी झाली. पण हे जाणवलंसुद्धा नाही. लहानपणापासून बदलांचा वेग इतका दिसत गेला होता की त्याची सवय होऊन उलट नंतर नंतर तो फार हळू वाटायला लागला. वर्क फ्रॉम होम पूर्णपणे प्रत्यक्षात यायला फार वर्षं लागली असं वाटलं. बदलांची भूक संपेना. पण कशातच नावीन्य वाटेना.

मग एका पहाटे ही अचानक गेली. अलेक्साने कसलीही वॉर्निंग दिली नाही. मी झोपून राहिलो. कोणाच्या कायमच्या जाण्याबद्दल काही सोल्युशन अजून निघालं नसलं तरी गेल्यानंतरचं सोल्युशन उपलब्ध होतं. ते मुलाने घेतलं. कोणत्या पद्धतीने दहन, रजा किती दिवस, ऋग्वेदी, यजुर्वेदी कोणता ब्राह्मण बोलावणे, हे तुमच्या आडनावावरून आपोआप रेकमेंड करून कस्टमाईज्ड पॅकेज फायनल, बिलिंग अड्रेस, रक्षा डिलिव्हरी अड्रेस, आणि शेवटी पेमेंट ऑप्शन्स.. सबमिट.. ऑर्डर रिसिव्हड. संपलं.

त्यालाही आता बरीच वर्षं झाल्यासारखी वाटतात, कारण त्यानंतर बदल होतच गेले. बदल घडवत ठेवणं आणि काहीतरी पुढचं पाऊल टाकणं ही मार्केटची जगण्यासाठी अट बनली. आता बघा, लेखन, चित्रं, संगीत हे सर्व कस्टमाईज्ड. स्टोरी मॉड्युल्स तयार. थीम वाचायची. आवडली तर लेखक सिलेक्ट करायचा. मग त्या लेखकाच्या शैलीत प्रत्यक्ष कथा डाउनलोड. गाजलेले लेखक मेले तरी शैलीरूपे उरले. त्यासोबत काही व्हर्चुअल लेखकही आले. संगीतकार ऑबसोलीट कधी झाले ते जाणवलंच नाही. मधुर संगीत म्हणजे काय ते वेव्हफॉर्म्स आणि पॅटर्नसवरून जाणणाऱ्या आणि शिकून पक्व झालेल्या सिस्टिम्स आल्या त्याही बीथोवन, मोझार्ट अशा नावांनी. एका मिनिटात दहा नवीन सुश्राव्य गाणी. गाण्याची स्टाईल आणि गायक तुम्ही ठरवा. आवाज तयार आहे. शब्द तयार आहेत. आता कोणी विशिष्ट व्यक्ती अशी कोणाला लागत नाही. प्रसिद्ध गायक किंवा चित्रकार आता भेटत नाहीत, कारण ते फारसे नसतातच. आणि असले तरी प्रसिद्ध होणं अशक्य.

सुरुवातीला "तुम्ही दिवसभर दमून उशिरा घरी येता, अशावेळी तुमच्या बाळांना गोष्टी गाणी ऐकवायचं तुम्हाला त्राणच उरत नाही" म्हणून त्याचंही सोल्युशन बनलेली अलेक्सा. पण नंतर कोणीच आईबाबा दमून घरी येईनासे झाले. कारण ते घराबाहेरच जाईनासे झाले. अगदी आदल्या पिढीइतकं, म्हणजे मॉल आणि सिनेमा यासाठीही बाहेर पडणं बंद झालं.

दमलेल्या बाबाला उसंत मिळाली, तो घरीच असला की तो सानुलीला ती राहून गेलेली गोष्ट सांगेल किंवा तिच्यासाठी हातांचा झुला करेल असं वाटलं होतं. बाबा त्याच्या राहून गेलेल्या आवडत्या गोष्टींची बकेट लिस्ट पुरी करेल असं वाटलं होतं. तो भरपूर हिंडून फिरुन जग बघेल आणि शरीराकडे लक्ष देऊन त्याला मजबूत आणि लख्ख ठेवेल असं वाटलं होतं. पण उसंत मिळाल्यावर "न दमलेल्या बाबां"ची कहाणी अगदी वेगळ्या वळणावर गेली. न दमलेला बाबा पोरांना गोष्ट सांगण्याऐवजी निद्रानाशापायी अलेक्साकडे झोप येण्यासाठी सोल्युशन मागायला लागला. त्याचं वजन वाढून वाढून एक आख्खा दुसरा मनुष्य खांद्यावर वागवत तो घरातल्या घरात बाथरुमपर्यंत जायला लागला.

आता माझं वय पुरेसं झाल्यामुळे मी चालू काळाबद्दल कडवट होऊन लिहितोय हेही मला कळतं. या सर्वांवर काही सोल्युशन शोधणं किंवा सुचवणं हे मात्र मी करत नाही. कारण मला माहीत आहे की मी, किंवा आपण कोणीच काळाचा वेग रोखू शकत नाही. त्यातलं एकच बरं म्हणजे यापुढे आणखी काय काय होणार अश्या भयंकर कल्पना मी करत नाही. कारण जग आपोआप चालतं अशी माझी खात्री झाली आहे. सर्व समस्यांना सोल्युशन्स मिळणार. हो ना अलेक्सा?

अलेक्सा बोलत नाहीये हे पुन्हा आठवलं. नातू पुन्हा येऊन विचारायला लागला.

"प्लिज टेल आबा, अलेक्सा नॉट रिस्पॉंडिंग? इज मुंबई अंडर अटॅक?"

तेवढ्यात त्याचा बाबा पावलं मोजत आला. त्याने आपल्या पोराला समजावलं, "सर्व डेटा कनेक्टिव्हिटी बंद झालीय बेटा. डेटा नाही म्हणून फोन्स पण चालत नाहीयेत, बिल भरलंय मी वेळेवर. ऑटो डेबिट आहे. दुसरा प्रॉब्लेम असेल काहीतरी. फक्त अलेक्सा आज का रिस्पॉंड करत नाहीये एवढं बघायला लगेच घराचं दार उघडून बाहेर पडणं इतकी रिस्क वर्थ नाहीये. टू मच एक्स्पोजर. आपण संध्याकाळपर्यँत वाट बघू. जा ऑफलाईन सेव्हड गेम असेल ना कुठला, तोच खेळ थोडा वेळ"

"बट बाबा, इट नेव्हर हॅपंड बिफोर. इज द वॉर स्टार्टिंग ?", नातू खूप घाबरला होता.

त्याच्या बाबाने त्याला जवळ घेतलं आणि म्हणाला,"घाबरू नको. काही झालेलं नाही. होईल सगळं ठीक."

"बाबा, आय एम स्केअर्ड"

"यू डोन्ट नीड टु गेट स्केअर्ड, चल आज मी तुला गोष्ट सांगतो."

"यू नो स्टोरीज?", नातू त्याच्या बापाकडे अत्यंत आश्चर्याने बघत राहिला.

"आय विल मेक वन फॉर यू", बाबा म्हणाला.

"मी पण येऊ का रे गोष्ट ऐकायला?", मी विचारलं.

"नो. इट्स बिटविन फादर अँड सन", असं म्हणून माझा मुलगा नातवाला घेऊन निघून गेला.

मी म्हटलं ना, मी पुढे काय भयंकर भयंकर होईल असे विचार करत बसत नाही. काहीतरी सोल्युशन मिळेलच यावर मी विश्वास ठेवतो.

(मिपा छापील दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित)

समाजजीवनमानतंत्रप्रकटनविचार

प्रतिक्रिया

गवि's picture

22 Sep 2022 - 7:59 am | गवि

हल्लीच एका Artificial intelligence धाग्यावर झालेली चर्चा वाचून हे एक भविष्यकालीन काल्पनिक लिखाण आठवलं. ते प्रकाशित केलं. तीन वर्षांपूर्वीचा तो ऐतिहासिक मिपा छापील दिवाळी अंक ज्यांच्यापर्यंत पोचला नसेल अशा वाचकांसाठी.

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Sep 2022 - 8:58 am | ज्ञानोबाचे पैजार

गोष्ट वाचताना टाईम मशिन मधे बसुन भविष्यात चक्कर मारायला गेल्या सारखे वाटत होते.
यातल्या काही गोष्टी कदाचित आज अतिरंजित वाटत असतील, पण आपए भविष्य असेच काहिसे असणार आहे.
रच्याकने :- छापिल अंकात प्रतिक्रीया देता येत नाहीत.
पैजारबुवा,

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Sep 2022 - 10:46 am | राजेंद्र मेहेंदळे

पण हा लेख म्हणजे अतिशयोक्ती अजिबात म्हणता येणार नाही.
दुध कोण देतो? भैय्या
अन्नाचे स्त्रोत कोणते? स्विगी आणि झोमॅटो
हे विनोद जुने झाले. आणि निदान भैय्या आपला डेटा दुसर्‍या कोणाला विकत तरी नव्हता. विविध अ‍ॅप्स मुळे आपल्या जीवनातील सुखवस्तुपणा वाढला पण खाजगीपणा संपत चालला आहे.

टोकाच्या ऑटोमेशन कडुन आता टोकाच्या ऑफलाईन मोड्कडे जायची आवश्यकता निर्माण झाली आहे.

तेजस आठवले's picture

22 Sep 2022 - 11:06 am | तेजस आठवले

नंतर परत सविस्तर वाचतो, तूर्तास फक्त पोच देतोय. मागच्याच आठवड्यात युवाल हरारीचं होमो ड्युअस विकत घेतलंय, त्यात आज हा धागा.

अथांग आकाश's picture

22 Sep 2022 - 11:12 am | अथांग आकाश

मस्त लिहीले आहे!!!
.

श्वेता२४'s picture

22 Sep 2022 - 11:35 am | श्वेता२४

असं भविष्यात घडू नये यासाठी आतापासूनच काळजी घेतली पाहिजे. नातेसंबंध इतके टोकाचे आर्टीफीशिअल व्हायला वेळ लागणार नाही.

वामन देशमुख's picture

22 Sep 2022 - 12:31 pm | वामन देशमुख

@गवि,

सध्या ऑफिसात आहे; ही पोच; वाचून नंतर लिहितो.

वामन देशमुख's picture

23 Sep 2022 - 8:50 am | वामन देशमुख

लिखाण आवडलं. पंचेस, कोट्या आणि ओघवती शैली... टिपिकल गवि!

लेखात लिहिलेल्या गोष्टी अंशतः सध्याच अस्तित्वात आहेत उरलेल्या गोष्टीही अस्तित्वात येण्याचा काळ फार दूर नाही.

श्वेता व्यास's picture

22 Sep 2022 - 1:11 pm | श्वेता व्यास

ही वास्तववादी भविष्यकालीन गोष्ट आहे.
आयतेपणा एकदा अंगात भिनला की तो झटकणं म्हणजे मानेवर बसलेला वेताळ उतरवण्यापेक्षा कठीण. हे अगदी खरंय.

प्रचेतस's picture

22 Sep 2022 - 1:41 pm | प्रचेतस

छापील अंक घरी असूनही हा लेख वाचल्या गेला नव्हता.
धन्स गविशेठ लेखाबद्दल.
लेखाचे कौतुक अधिक काय करावे, नुसते लेखक 'गवि' असणेच पुरेसे आहे.

कर्नलतपस्वी's picture

22 Sep 2022 - 1:42 pm | कर्नलतपस्वी

झाssssलीssss ...!!!!!

ही आरोळी दररोज आमच्या कानावर पण येते. बहुतेक तीन पिढ्या एकत्र असल्या व तीसरी आगदी छोटी असेल तर हमखास.

माणूस सोशल प्राणी. सोशल मिडीया पहिल्यांदा पण होता पण त्याचे स्वरूप वेगळे होते. अतीशय मर्यादित होते.
तंत्रज्ञानाने त्या सर्व मर्यादा तोडल्या माणसाच्या हातातला कंट्रोल बराचसा काढून घेतला.

बाकी आम्ही तुमच्याच पिढीतले,

दुःख म्हणजे दुःख असतं
ते तुमचं आमचं सेम असतं

मुक्त विहारि's picture

22 Sep 2022 - 6:12 pm | मुक्त विहारि

घरातल्या सगळ्या वस्तू एकमेकांशी जोडल्या गेल्या, माणसं सोडून.

किती तरी वर्षे झाली, मुलां बरोबर साधा, बदाम सात, पण खेळलेलो नाही ...

कालाय तस्मै नमः

Bhakti's picture

22 Sep 2022 - 8:05 pm | Bhakti

मस्तच! कथा आवडली.
तंत्रज्ञानाने आपला ताबा घेतला आहे तो वाढतच आहे.
लेकीला सेन्स ओरगन (ज्ञानेंद्रिये) शिकवत होते...तेव्हा
मी-आपण कशाने पाहतो?
मुलगी-मोबाईलने
मी-तस नाही आपण टीव्ही कशाने पाहतो?
मुलगी-रिमोटने
तिसऱ्या प्रयत्नात जमलं !!
आपली कामं कोणता यंत्र करून देईल याचाच शोध सतत आपण घेत असतो.

शाम भागवत's picture

22 Sep 2022 - 8:29 pm | शाम भागवत

👌

उपाशी बोका's picture

22 Sep 2022 - 9:13 pm | उपाशी बोका

तंत्रज्ञानावर अती अवलंबून राहणे सुरू झाले आहे.
---------------------
हा फेमस पिझा कंपनीचा फोन नंबर आहे का?
नाही, आम्ही गूगल पिझा कंपनी आहोत.
ओह, मी चुकीचा नंबर डायल केलेला दिसतोय.
नाही सर, आम्ही आता त्या कंपनीला विकत घेतलंय.
असं आहे होय. बरं, मला पिझा ऑर्डर द्यायची होती.
सर, तुमची नेहमीचीच ऑर्डर का?
नेहमीचीच? तुम्हाला काय माहीत ते?
सर, तुमच्या फोननंबर वरून आम्हाला माहीत आहे की गेल्या १५ वेळेला तुम्ही १२ स्लाइसचा लार्ज पिझा विथ डबल चीज, सॉसेज आणि थिक क्रस्ट ऑर्डर केला आहे.
हो, या वेळी पण तोच पाहिजे.
सर, मी सुचवू का की या वेळेस तुम्ही ८ स्लाइसचा व्हेजिटेबल पिझा विथ ब्रोकोली, मश्रुम आणि टोमॅटो असा घ्यावा.
नको, मला तो भाज्यांचा पिझा आवडत नाही.
पण सर, तुमचे कोलेस्ट्रॉल जास्त आहे.
तुम्हाला काय माहीत?
तुमच्या एमेलमधल्या गेल्या ७ वर्षांच्या रिपोर्टवरून कळले तसे.
असु दे, असु दे. पण मला नकोय तो पिझा. आणि तसं पण मी कोलेस्ट्रॉलचं औषध घेतो.
पण सर, तुम्ही औषध नियमीत घेत नाही. गेल्यावेळी तुम्ही हॅपिहेल्थ फार्मसीमधून फक्त ३० टॅबलेट्स खरेदी केल्या त्या पण ४ महिन्यांपूर्वी.
मी अजून टॅबलेट्स दुसर्‍या फार्मसीमधून घेतल्या.
पण सर, तुमच्या क्रेडिट कार्डवर तसं काही दिसत नाहीये.
मी रोख पैसे दिले.
पण सर, तुमच्या बँक स्टेटमेंटवर तर दिसत नाहीये की तुम्ही पुरेसे पैसे काढले.
माझ्याकडे उत्पन्नाचा दुसरा सोर्स आहे.
पण सर, अशी रक्कम जाहीर केलेलं तुमच्या टॅक्स रिटर्नवर दिसत नाहीये.
खड्ड्यात गेला तुमचा पिझा. मला या गूगल, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप सगळ्याचा वीट आला आहे. मी आता दूर एका बेटावर जाऊन राहाणार आहे, जिथे फोन पण नसेल आणि इंटरनेट पण नसेल.
मला तुमच्या भावना समजतात. पण सर, तुम्ही पासपोर्टशिवाय जाणारच कसे? कारण आमच्या रेकॉर्डनुसार तर तो २ महिन्यापूर्वीच संपला.

तुषार काळभोर's picture

22 Sep 2022 - 9:44 pm | तुषार काळभोर

लेखातील परिस्थिती जास्त दूर नाहीये.
२०४५?
२०४०?
२०३५?
२०३०?

nanaba's picture

23 Sep 2022 - 12:05 am | nanaba

आवडली

प्राची अश्विनी's picture

23 Sep 2022 - 9:13 am | प्राची अश्विनी

छान झालाय लेख!:)

लिओ's picture

24 Sep 2022 - 8:51 pm | लिओ

" नातु अलेक्सा... "झाssssलीssss ...!!!!!" "असे ओरडला ?

मला वाटते नातु alexa..... it's done असे ओरडला असेल ?

लेखाचा पूर्वार्ध वाचून खूप हसू आले, उत्तरार्ध तेवढ्याच तोलामोलाचा झालाय... आवडला लेख.