महाराज की जय..
माझ्या नोकरीच्या निमित्ताने मी एका गावी राहात होते. माझ्या कडे एक १५/१६ वर्षांची मुलगी कामाला होती. वरकाम करायची. मी तिला शाळेतही घातलेली होती. तिच्या शिक्षणाचा खर्च मीच करायची. तिची आई माझ्याकडे काही जास्तीचं काम निघालं तर ते करायला यायची. तिचा नवरा दारुड्या होता. काबाडकष्ट करून मुलीचं,नवऱ्याचं आणि स्वतःचं पोट भरत होती. नेहमीचं चित्र.
एके दिवशी मी तिला विचारले,"उद्या माळा झाडायचाय. येशील का?" तर ती म्हणाली,"मला हजार रुपये उसने द्या. मला भगताकडं जायचंय."मी म्हटलं "का ग?भगताकडं का? तुला काही होतंय का?"
तिनं उत्तर दिले,"मला बाया आल्याती. उतरवायच्या आहेत."
मला काही कळलं नाही. मी बाया येणं हा प्रकार पहिल्यांदाच ऐकत होते. मी विचारले,"बाया म्हणजे काय?" आपल्या छातीकडे बोट दाखवत ती म्हणाली,"छातीत गाठी झाल्यात. बायांचा कोप झालाय माझ्यावर. बायांना उतरवलं पायजे. भगत उतरवतो."
मी म्हटलं,हे बघ. मी तुझ्या छातीत कुठं गाठ लागतीय ते बघू का चाचपून?"ती बर म्हणाली. तिनं चोळी सैल केली. मी चाचपून पाहिले तर माझ्या बोटांना गाठी लागल्या. मी तिला म्हटले,"ठीक आहे. गाठी आहेत. पण तू भगताकडं जाऊ नकोस. मी तुला उद्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तिथं डाॅक्टरीणबाई तुझी गाठ तपासतील. तुला औषध देतील. त्या गाठी काढून,त्यांची तपासणी करतील. मी तुझ्या औषधपाण्याचा खर्च करेन. मी तुझ्याबरोबर दरवेळी येईन. तू काळजी करू नकोस."
तिनं होकारार्थी मान डोलावली. ती गाठ कॅन्सरचीही असू शकेल अशी मला भीती वाटली. पण मी तिला तसं बोलून दाखवलं नाही. दुसऱ्या दिवशी आमचं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जायचं ठरलं. मी ऑफिसात थोडी "उशीरा येते"असं सांगून सवलत घेतली.
दुसऱ्या दिवशी मी तिची वाट पाहत बसले. पण ती आलीच नाही. मी तिची तासभर वाट बघून ऑफिसात गेले. ती उद्या आली की तिला का नाही आलीस,असं विचारु असं ठरवून मी माझ्या कामात व्यस्त झाले. (त्याकाळी मोबाईल नव्हते.)
दुसऱ्या दिवशीही ती आलीच नाही. मी माझ्याकडे येणाऱ्या तिच्या मुलीला विचारलं,"काय ग,तुझी आई काल आली नाही,आजही आली नाही,काय झालं? तिला बरं नाही का?"
मुलगी म्हणाली,"ती कुठंच कामाला गेली नाही. ती काल भगताकडं जाऊन बाया उतरवून आली. उद्या पासून जाईल कामावर."
मी चाट पडले. मी तिला इतकं सगळं समजावून सांगितले तरीही ती भगताकडे गेलीच होती. त्या भगतानं काय विधी केले, ते मला माहीत नव्हतं. मुळात"बाया येणं"हा शब्दच मी पहिल्यांदाच ऐकला होता. बाया येणं,बायांचा कोप होणं म्हणजे काय हे मला माहीत नव्हतं. मी तिला भेटायला बोलावलं आणि एवढंच म्हटलं,"भगताकडे जाऊन आलीस ना? झालं ना तुझं समाधान? पण एकदा डाॅक्टरांकडे पण जाऊन ये."
"अवो वैनी, डॉक्टर काय करणार? त्याच्याच्यानं होणारं नाही हे काम !"
शेवटपर्यंत (दुर्दैवाने तिच्या शेवटापर्यंत), ती काही डाॅक्टरकडे गेली नाही. नंतर काही वर्षांनी, आम्ही जागा बदलून दुसरीकडे गेल्यावर ही कॅन्सरने वारली म्हणून कळलं.
दुसरं एक उदाहरण काही वर्षांनी घडलेलं! तेव्हा मोठ्या शहरात बदली झाली होती. माझ्याकडे एक बाई कामाला होती. तिला नवरा आणि दोन मुले होती. त्यातल्या एका आठ वर्षांच्या मुलाला एकदा ताप आला. त्याच्यासाठी ती लवकर घरी गेली. दुसऱ्या दिवशी सांगायला लागली की,मुलाचे डोळे पिवळे झालेत. लघवीला पण पिवळं होतंय. अंगात ताप होता. भूक मेलीय. कावीळ असेल काय? मी म्हटलं की, ताबडतोब डॉक्टरांकडे जा. खरंच कावीळ झाली असेल तर लगेच इलाज करायला हवेत. ती म्हणाली,"डॉक्टर काय करणार याला? हितं बाजूला वाडीत एक माणूस आहे. तो कावीळ उतरवतो. त्यांच्याकडे जाऊन कावीळ उतरवून आणते."
ती दुसऱ्या दिवशी सुट्टी टाकून वाडीत गेलीच.
मी गप्प बसायचं ठरवलं. बाई दहावीपर्यंत शिकलेली.मोबाईल, टीव्ही,फ्रीज (सेकंडहॅंड का होईना)वापरणारी, मोठ्या शहरात राहणारी. तरीही अशी अंधश्रद्धा बाळगणारी!
आपल्या देशात अनेक लोक असेच आहेत. आपण काही करू शकत नाही असे म्हणून हताश झाले.
एका निमशहरात मी नोकरी करत होते. तिथं माझ्या परिचयाचे एक डाॅक्टर आहेत. ते मेंटल हॉस्पिटलमध्ये काम करतात. मी त्यांच्याकडे सहज हा विषय काढला. त्यावर ते म्हणाले,"तुम्ही सांगितलेले बाया येणे, कावीळ हे तर शारीरिक आजार आहेत. पण कित्येक आजार मानसिक असतात. कित्येक माणसं मनोरुग्ण असतात. त्यांना मानसोपचार, आणि औषधं द्यायची आवश्यकता असते. पण हे त्यांना पटत नाही. खेड्यापाड्यात अंगात येणं,करणी करणं,भुतानं झपाटणं,झाडानं धरणं हे प्रकार सर्रास घडत असतात. ह्या अंधश्रद्धा आहेत हे त्या माणसांना कळत नाही. पटत नाही. आपल्या गावाकडून एस.टीनं शहरात येणं, डॉ क्टरांची फी देणं त्यांना परवडत नाही. मग ते जातात त्यांच्या भगताकडे, स्वामींकडे, महाराजांकडे. ते चमत्कार करतात. आपलं दुःख नाहीसे करतात अशी त्यांची श्रद्धा असते. मग मी काय करतो, अशा माणसांकडे माझी औषधांची बॅग घेऊन जातो. आणि त्यांना सांगतो की ही औषधे तुम्ही त्यांना अंगाऱ्याऐवजी,भस्माऐवजी द्या. तुमच्यावर त्यांचा विश्वास आहे. माझ्यावर नाही. ते बरे व्हावेत एवढीच माझी इच्छा आहे. तुम्ही दिलेली औषधे ते घेतील. मी ही औषधे विनामूल्य देतो. सोशल सर्व्हिस म्हणून! अंधश्रद्धा निर्मूलन करणं हे कठीण काम आहे. त्याला चिकाटी आणि सततचे प्रयत्न केले पाहिजेत. ते मी करु शकत नाही. मी एवढंच करु शकतो,जे मी आत्ता करतोय."
हे कितपत सुरक्षित आहे माहीत नाही, पण त्यांनी एक डॉक्टर म्हणून पूर्ण विचार केला असेलच. त्यांचा उद्देश खूपच चांगला होता. कळकळ होती. त्या डॉक्टरांबद्दलचा माझा आदर दुणावला. त्यांना नमस्कार करून मी म्हटलं "तुम्ही ग्रेट आहात."
प्रतिक्रिया
छान
लेख उत्तम, सहमत.
"अंगावर बाया आल्या"
हॉरिबल.
बाया येणे
अवघड आहे, काही श्रद्धा या
अंधश्रद्धांचं जनक मेकॉलेछाप शिक्षण आहे
कोणत्याही लेखात तुमचे
करोना व लशीचे तुणतुणे
छान.
आजी औषध उतारे आणि आशिर्वाद हा
भगताकडे दिलेली औषधे
यातला, कावीळ उतरवणं हा
कॅन्सर आणि बाया
"नकोच ते डॉक्टरी इलाज" असे वाटणे स्वाभाविक
+१
उशीरा स्टेज
आंबटगोड -ते डॉक्टर सरसकट