डॉक्टर

मराठमोळा's picture
मराठमोळा in काथ्याकूट
28 Apr 2009 - 10:59 pm
गाभा: 

नमस्कार मिपाकरांनो,
थोड्या दिवसांपुर्वी माझ्या लहान भावाबरोबर एक चर्चा केली आणी त्यातुन मिळालेली माहिती आणी अनुभव इथे लिहित आहे.
तर माझा लहान भाऊ बी. फार्मसी पदविका घेऊन उत्तीर्ण झाला आणी पुढे व्यवस्थापन शास्त्राची पदवी घ्यायची म्हणुन तयारीला लागला आणी तोपर्यंत काहीतरी नोकरी करायची म्हणुन मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव (एम आर) पदावर एका कंपनीत रुजु झाला होता. तर माझे काही आणी त्याला/ त्याच्या मित्रांना त्या कालावधीत डॉक्टरांचे आलेले काही अनुभव इथे मांडत आहे.
*************************************************************

तर डॉक्टर, फार महत्वाची व्यक्ती. जन्मापासुन मृत्युपर्यंत ज्याची गरज भासते अशी व्यक्ती. ज्याच्याशी नेहमी खरेच बोलावे लागते अशी विश्वासु व्यक्ती. मला कसलेही दुखणे खुपणे आले तर माझा डॉक्टर मला बरा करेल असा प्रत्येकाला विश्वास. असो....
तसे डॉक्टर बनणे सुद्धा काही सोपी गोष्ट नाही म्हणा. दहावीपासुन जो त्याचा अविरत अभ्यास सुरु होतो तो आयुष्य संपेपर्यंत चालुच असतो. इतक्या किचकट शरिराचा अभ्यास करायचा, चित्रविचित्र लोकांच्या आगळ्यावेगळ्या रोगांवर प्रेमाने आणी त्यांचा विश्वास जिंकुन उपचार करायचा हे तंत्र आत्मसात करणे कुण्या साध्या माणसाचे काम नव्हे. त्यामुळे मला डॉक्टरांचा नेहमीच आदर वाटतो. एक वेगळेच तेज आणी आत्मविश्वास नेहमी पहावयास मिळतो त्यांच्या चेहर्‍यावर.

तर आता मानवी शरीराचा आणी वैद्यकशास्त्राचा थोडा विचार करुया.
कोट्यवधी माणसे, त्यांची राहणी, आचार विचार, आहार, अनुवांशिकता आणी यावरुन घडलेली त्यांची भिन्न प्रकारची शरीरे.
सांगाडा जरी सारखा असला तरी प्रत्येकाचे शरीर कैक प्रकारे भिन्न असु शकते. आता अभियांत्रिकी सारखी कोणतीही परिमाणे उपलब्ध नाहीत मानवी शरीरासाठी. उदा. हृदयाचे ठोके ७२ असावेत किंवा रक्तदाब ८०-१२० असावा याला काहीही ठोस आधार नाही. सर्वसाधारण निरोगी माणसांचे हे आकडे असतात म्हणुन त्याचे परिमाण झाले. तसेच कोणत्याही आजाराला हेच औषध योग्यच आहे हे नक्की सांगता येत नाही. त्यामुळे फार्मास्युटीकल कंपन्या दरवर्षी नवनविन शोध लावुन औषधे निर्माण करुन बाजारात आणत असतात.
एखादा रुग्ण दवाखान्यात येतो आणी स्वतःचे दुखणे डॉक्टरला सांगतो. डॉक्टर प्राथमिक तपासण्या करुन औषधे लिहुन देतो आणी ३-४ दिवसांनी पुन्हा भेटायला सांगतो. ३-४ दिवसांनी रुग्ण बरा झाला नाही तर मग डॉक्टर औषधे बदलुन देतो आणी जोपर्यंत रुग्ण बरा होत नाही तोपर्यंत हा खेळ चालु असतो. कारण प्रत्येक डॉक्टर आयुष्यभर एखाद्या नवख्या अभियंत्यासारखा प्रॅक्टीस करत असतो औषधे बदलुन देण्याचे कारण हेच आहे की डॉक्टरला रोगाचे निदान झालेले नसते. (डॉक्टरला कितीही वर्षे अनुभव झाला तरी मी अमुक ठिकाणी प्रॅक्टीस करतो असेच ऐकायला मिळेल.)
तसेच रोगांचे निदानही खुप सोपे नाही कारण प्रत्येक रोगाचे/शरीराच्या भागाचे विषेशज्ञ डॉक्टर असतात. कितीतरी वेळा आजाराचे निदान होईपर्यंत बराच काळ लोटलेला असतो.

आता डॉक्टरने जर तुम्हाला फसवायला सुरुवात केली तर तुम्हाला कधीही ते कळणार नाही किंवा कदाचित विश्वास सुद्धा बसणार नाही. आजकाल देवाच्या नावाखाली सुद्धा बाजार केलेला आहे लोकांनी त्याला डॉक्टर तरी कसे अपवाद राहणार म्हणा.
तर असंख्य अशा फार्मास्युटीकल कंपनीज् बाजारातील स्पर्धेमुळे त्यांचा माल कसा खपेल याचाच विचार करत असतात. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवतात. प्रसिद्ध डॉक्टरांना लाखो रुपयाचे धनादेश, महागड्या वस्तू, परदेशवारी, दिल्या जातात.
काही डॉक्टरसुद्धा या मोहाला बळी पडतात आणी मग सुरु होतो पैशांचा, स्वर्थीपणाचा खेळ. आपल्या कंपनीची औषधे लिहावीत म्हणुन डॉक्टराना विविध आमिषं दाखवली जातात. खुप मोठ्या प्रमाणात पैसा ओतला जातो. पण हा पैसा य्तो कुठुन? तर हा पैसा आपणच पुरवतो. होय आपणच. एक रुपयाची गोळी आपल्याला पाच रुपयाना विकली जाते आणी आपण कोणतेच ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. एम आर डॉक्टराना भेटतो म्हणजे काय तर आम्ही ह्यावेळी तुम्हाला काय देणार आहोत किवा तुम्हाला ह्यावेळी काय हवे आहे ते विचारण्यासाठी आणी नविन औषधाचे नाव पोहोचवण्यासाठी. कित्येक डॉक्टर मग डोळे बंद करुन ही औषधे लिहायला सुरुवात करतात. ज्या कंपनीने जास्त पैसे दिले आहेत त्या कंपनीची औषधे प्रिस्क्रिप्शनमधे लिहिली जातात. बरेच डॉक्टर एम आर आला की त्यांनी घरात घेतलेल्या वस्तुंची बिलं त्यांच्या हातात ठेवतात. मग तो एसी असो किंवा एखादी देशाबाहेरची पिकनिक. डॉक्टरची मर्जी राखण्यासाठी काहीही न बोलता ही बिले स्विकारली जातात. एक विचित्र माहीती अशी की भारतात अनेक अशा छुप्या कंपन्या आहेत की ज्या ड्युप्लीकेट औषधे बनवतात. आणी अशी औषधेही आहेत की ज्यात खरे औषधच नाही, म्हणजे जी गोळी घेतो त्यात नुसती पावडरच आहे आणी आपण मात्र आठवण ठेवुन डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे नियमित औषधांचे सेवन करत असतो. आपल्या घरातल्या व्यक्तीला गोळी विसरला तर रागावतो.
गरीब लोकांनी काय करायचे हो? कर्ज काढुन कितीतरी लोक दवाखान्याचा खर्च करतात. ऐपत नसताना महागडी औषधे खरेदी करतात. गरीबांचेच काय म्हणा कोणाचाही पैसा हा मेहनतीनेच कमावलेला असतो. असो..
हॉस्पिटल मधे तर आणखीनच भयानक प्रकार आहे. एखाद्या रुग्णाला साधारणसा आजार आहे हे माहित असताना देखील ऍडमिट करुन घेतले जाते, विविध प्रकारच्या महागड्या तपासण्या करायला सांगितल्या जातात, औषधे मागविली जातात आणी मग जीवाच्या भितीने आपण जे सांगितले ते लहान मुलासारखे गुपचुप ऐकुन घेतो.
माझ्या बंधुच्या आणी त्याच्या मित्रांच्या मते फक्त १०% डॉक्टर आहेत जे कधीही पैसा, वस्तु मागत नाहीत आणी दिली तर घेतही नाहीत. प्रामाणिकपणे लोकांची सेवा करण्यातच धन्यता मानतात. आजकाल गरोदर स्त्रियाना तर मुद्दाम घाबरवुन सिझेरिअन ऑपरेशन करायला सांगतात. (कारण त्यात नॉर्मल डिलीवरीपेक्षा जास्त पैस मिळतो.) कारण एकच आहे. डॉक्टराना किंबहुना वैद्यकशास्त्रालाच चॅलेंज नाही. चुक की बरोबर सांगणारा एकच व्यक्ती आणी तो म्हणजे डॉक्टर. त्यांना कुणी उलट प्रश्न विचारला तर राग येतो आणी डॉक्टर मी का तुम्ही असा टोला लगावला जातो, काय करणार आपल्याला गप्प बसण्याशिवाय पर्याय नाही.
अजुनही खुप लिहिण्यासारखे आहे पण आता ईतक्यावरच थांबतो. बाकी जाणकार अजुन प्रकाश टाकतील अशी आशा आहे.

तात्पर्य एकच, कोर्टाप्रमाणेच हॉस्पिटलची पायरी चढण्याचा योग येऊ नये आणी आलाच तर मग त्या १०% डॉक्टरांपैकीच एक कोणीतरी आपल्याला भेटावा.

आपला,
मराठमोळा.

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

28 Apr 2009 - 11:29 pm | यशोधरा

बापरे! भयानकच आहे हे सगळे! :(

अडाणि's picture

29 Apr 2009 - 7:33 am | अडाणि

एक वेळ डॉक्टर बरे पण हॉस्पिटल नको आशी वेळ आहे... दुर्दैवाने दवाखान्याशी संबध जरा जास्तच आला त्यामुळे काही गोष्टी समजत गेल्या.... कुठलाही रुग्ण आला की पहीले सलाईन नावाचे पाणी लावणार (अगदीच पाणी नाही, पण जवळ्जवळ तेच...) कारण काय तर त्याची छापील किंमत असते ७० रुपये आणि दवाखान्याला ठोक मधे मिळते ७ रुपायाला एक बाटली... सर्वात जास्त नफा मिळवून देणारा हा साधा सरळ उपाय आहे आणि बर्‍यापैकी निर्धोकही आहे...

-
अफाट जगातील एक अडाणि.

योगी९००'s picture

28 Apr 2009 - 11:32 pm | योगी९००

मी जरी या गोष्टीचे समर्थन करत नसलो तरी आजकालच्या स्पर्धेच्या युगात व्यवसाय म्हटलं हे सर्व आलेच...

एक तर १०/१२ लाख घालून डॉक्टर व्हा. नंतर जर साधे क्लिनिक जरी नविन डॉक्टरला भाड्याने घ्यायचे असेल तर महिना ५०००/६००० च्या खाली कोणी देत नाही. शिवाय बाकीचा खर्च निराळाच. एवढे करून १-२ वर्ष कोणी पेशंट येतं नाही. मग नंतर एकदा जम बसायला लागला की वरिल प्रकार पुर्वीचे सर्व वसूल करायला डॉक्टरला करावे लागतात.

खादाडमाऊ

प्राजु's picture

28 Apr 2009 - 11:54 pm | प्राजु

मला सायनस,सर्दी आणि घसा येणं या गोष्टी साधारण कायमच होत असतात.
घसा दुखू लागला, डोकं दुखू लागलं की, मी आयब्युप्रोफेन कंटेंट असलेली २०० मि.ग्रॅ ची ऍडव्हिल घेते. पण मागे एकदा घसा खूपच दुखू लागला. अस्वस्थ व्हायला झालं. म्हणून इथल्या डॉक कडे गेले. त्या बाईंनी मला, प्रिस्क्राईब केलं आयब्युप्रोफेन आणि ८०० मि ग्रॅ, ची एक याप्रमाणे ३ गोळ्या एका दिवसांत घ्यायला सांगितल्या.
भरपूर नाष्टा करून सकाळी मी एक गोळी घेतली. आणि दुसरी दुपारी चहासोबत काहीतरी खाऊन घेतली. नंतर आम्ही जेव्हा बाहेर नेहमीची ग्रोसरी करायला गेलो, तेव्हा माझ्या डोळ्यांपुढे अंधारी येऊ लागली, ग्लानीत असल्यासारखे होऊ लागले, मान एकदम मागे कलते आहे.. असे वाटू लागले. माझ्या मागे उभ्या असलेल्या बाईने "एक्सक्युज मी" म्हंटलेले मला ऐकूही नाही आले इतकी मी ग्लानीत असल्यासारखी होते. घरी आल्यावरही असंच. गोळीने झाले असेल हे लक्षातच नाही आलं. रात्री जेवण करून तिसरी गोळी घेताना काय बुद्धी झाली आणि मी माझ्याकडे असलेल्या ऍडव्हील २०० मिग्रॅ च्या डबीवर वाचले तर त्यांनी लिहिले होते, २४ तासात १२०० मिग्रॅ पेक्षा जास्त आय्ब्युप्रोफेन घेऊ नका. आणि मी आधीच १६०० मिग्रॅ घेतले होते..ओव्हर डोस झाला होता. मग मात्र मी तिसरी गोळी नाही घेतली. तेव्हापासून हेवी डोस.. नको रे बाबा! ती रात्र फार वाईट गेली.
त्या डॉक्टर विजिटचा चार्ज मात्र इन्शुरन्स स्टेटमेंट आल्यावर समजला... तो ही हेवीच होता.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नितिन थत्ते's picture

29 Apr 2009 - 12:23 am | नितिन थत्ते

माझ्या मुलीला सर्दी/ऍलर्जीचा त्रास होता. दरवेळी डॉक्टरांकडे गेल्यावर ते प्रिस्क्रिप्शन लिहून देत. साधारण ६० किंवा १०० मिलीची बाटली आणली जाई.
एकदा आल्बुटामॉल नावाने, एकदा साल्बुटामॉल नावाने आणि एकदा एटो-साल्बेटॉल नावाने. नंतर त्यातले घटक वाचून पाहिले तर सगळे सारखे. प्रत्येक वेळी आणलेल्या बाटलीतले अर्धेअधिक औषध उरलेले.
त्यानंतरच्या वेळे पासून प्रिस्क्रिप्शन लिहिल्यावर विकत घ्यायच्या आधी वाचून पाहतो. यातलेच असले तर ठीक नाहीतर सरळ ही तीन नावे घेऊन यातले चालेल का असे विचारतो. बहुधा डॉक्टर चालेल म्हणतात. मग उगाच औषध आणले जात नाही. हल्ली तर डॉक्टरच विचारतात यातले काही शिल्लक आहे का?.

अवांतरः मागीलवेळी काय औषध दिले होते ते डॉक्टर तरी कसे लक्षात ठेवणार. आपणच थोडे लक्ष ठेवायचे.

खराटा
(रंग माझा वेगळा)

केळ्या's picture

29 Apr 2009 - 4:43 pm | केळ्या

याचसाठी सरकारवर generic name बाटलीवर छापावे असा दबाव आणला जात आहे.

नाटक्या's picture

29 Apr 2009 - 12:42 am | नाटक्या

या नावाचं एक नाटक आहे. ले़खक आहेत अजित दळवी. हे नाटक इथे बघायला मिळेल. मेडीकल प्रॅक्टीस मध्ये काय काय प्रकार चालतात ते फार सुंदर पध्दतीने सांगीतले आहे. ९० च्या दशकात या तीन अंकी नाटकाने संपुर्ण महाराष्ट्रात वादळ निर्माण केलं होतं. डॉक्टर आणि त्याच्यावर आंधळे पणे विश्वास टाकणारे पेशंटच्या नात्यावर आधारलेल्या या नाटकात दोन प्रवृत्तींचा संघर्ष चांगलाच ताकदीने दाखवला आहे. डॉक्टरी पेशामध्ये आलेल्या टोकाच्या धंदेवाईक प्रवृत्तीच्या डॉक्टरांचा आणि आपल्या पेशंटच्या विश्वासामुळे येणारी जबाबदारी मानणार्‍या डॉक्टरांचा संघर्ष आणि त्यातून निर्माण होणारी तेढ हे नाटकाचे वैशिष्ठ्य म्हणता येईल.

मी या सगळ्या गोष्टी फार जवळून पाहील्या आहेत. खरं तर या पेक्षा फार भयंकर गोष्टी घडतात.

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

टारझन's picture

29 Apr 2009 - 2:14 am | टारझन

डॉक्टर्स ची चुक नाही !! माझे सगळे मित्र डॉक्टर झाले .. पण साडे चार वर्षांचं एम.बी.बी.एस. करून मधेच लटकल्या सारखं होतं .. त्या नंतर त्यांना १७०० रुपये पगारावर इंटर्नशिप करावी लागते . पिजी ला फारच टॅलेंटेड मुलांचा ( आणि ऑफकोर्स फर्स्टक्लास जात असली तर आरक्षणाच्या कृपेमुळे) नंबर लागतो , त्या साठी किमान एक -दोन वर्षे घासावे लागते . ह्या काळात तर नो इनकम . प्रायव्हेट कॉलेजात शिकलेल्यांचं तर विचारूच नका . डॉक्टरचं करियर मार्गी लागे पर्यंत त्याची पस्तिशी आलेली असते . नुसता पैसाच नाही तर वेळही इनव्हेस्ट झालेली असते. त्यामुळे त्यांनी स्वार्थ पाहिला तर कुठे बिघडते. आणि हे ड्यूप्लिकेट औषधांचं मला जरा अतिच वाटलं .. कोणता ही डॉक्टर स्वत:ची डिग्री पणाला लाऊन औषधे प्रिस्क्राईब करेल असं वाटत नाही. इतका मुर्ख माणूस डॉक्टर असूच शकणार नाही.
बाकी डॉक्टर पैसे खातो म्हणून ओरडायला मोकळे.. का ? तर तो आजारी पडल्यावर (किंवा वाईट प्रसंगी) पैसे खातो म्हणून ? ते त्याच्या पुर्वी केलेल्या कष्टांचं फळ असतं ...
आपल्या पैकी किती जण थोटक रक्कम कमी देउन खरेदी केलेल्या वस्तूचं बिल घेतात? तिथे मात्र सोयिस्कर मार्ग काढला जातोच ना ?

नाटक्या's picture

29 Apr 2009 - 3:02 am | नाटक्या

प्रश्न फक्त "आजारी पडल्यावर (किंवा वाईट प्रसंगी) पैसे खातो म्हणून" हा नाही तर बर्‍याचदा पेशंटला काहीही झालेले नसताना त्याच्यावर वेगवेगळे उपचार आणि वेळ पडली तर शस्त्रक्रिया देखील करण्याचा आहे. आपण पैसे मिळवण्याच्या नादात पेशंटच्या जिवाशी खेळतो आहोत हे भान देखील विसरले जाते. वस्तू खरेदी करणं आणि एखाद्याच्या जिवाशी खेळणं ह्या दोन खुप वेगळ्या गोष्टी आहेत.

डॉक्टरचं करियर मार्गी लागे पर्यंत त्याची पस्तिशी आलेली असते. नुसता पैसाच नाही तर वेळही इनव्हेस्ट झालेली असते.

पण हे त्याने स्वतःहूनच स्विकारलेले असते. कुठलाही व्यवसाय करताना त्या व्यवसायाचे चढ-ऊतार सहन करावेच लागतात. आणि जर करायचे नसतील तर त्या व्यवसायापासून दुर रहा. खरं सांगायचं तर डॉक्टरांना करायचा असतो धंदा पण बिरुद मात्र व्यवसायाचं लावायचं असतं. कारण या व्यवसायाबरोबर प्रतिष्ठा पण येते. प्रतिष्ठा हवी, पैसा हवा आणि तोही लवकरात लवकर हवा पण जवाबदारी नको अशी काहीशी परिस्थीती आहे.

हे ड्यूप्लिकेट औषधांचं मला जरा अतिच वाटलं .. कोणता ही डॉक्टर स्वत:ची डिग्री पणाला लाऊन औषधे प्रिस्क्राईब करेल असं वाटत नाही

माझ्या ओळखीच्या कित्येक डॉक्टरांची नावं सांगता येतील मला, जे स्वताची डिग्री पणाला लाऊन काय वाट्टेल ते करतात. कारण मेडीकल कौन्सीलमध्ये बसलेली माणसं सुध्दा डॉक्टर्सच असतात (आणि बर्‍याचदा ती 'आपली' माणसंच असतात). डिग्री देणारेही तेच, चौकशी करणारेही तेच आणि डिग्री काढूनघेणारेही तेच. तेव्हा तेरी भी चुप मेरी भी चुप असा प्रकार सर्रास चालतो. शिवाय मेडीकल एथीक्स (ह्या वेळेस बरे समजते ते पाळायचे असते म्हणून) नुसार एक डॉक्टर दुसर्‍या डॉक्टरच्या विरुध्द बोलू शकत नाही.

अर्थात सगळेच काही असे नसतात, अगदी त्याच्या विरुध्द प्रकार पण पाहीले आहेत. पण ते अगदी १०% ही नाहीत.

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

केळ्या's picture

29 Apr 2009 - 4:46 pm | केळ्या

अगदी १००% सहमत!

डॉना शलेला (यू. एस.च्या माजी आरोग्यमंत्री) यांचे भाषण काल ऐकले. डॉक्टरकीच्या शिक्षणातला अवाच्या सवा खर्च डॉक्टरांना पैशासाठी मिंधे करतो - पण त्याबद्दल काय करावे, याबद्दल चर्चा झाली. (स्पष्ट उत्तरे नाहीत.)

"मेडिकल रेप्रेझेंटिटिव्हकडून भेट स्वीकारणे" या कृतीचे काही नैतिक पडसाद आहेत, हे कित्येक डॉक्टरांना ठाऊकच नसते. हा नैतिक आंधळेपणा माझ्या काही सज्जन मित्रांचा मी बघितला आहे - भारतातील सरकारी कॉलेजात जवळजवल फुकट शिक्षण मिळालेल्यांचा. मग शिक्षणावर लाखोंनी पैसे ओतलेल्यांचे काय होत असेल?

श्रावण मोडक's picture

29 Apr 2009 - 2:31 am | श्रावण मोडक

सहजच काही पाने चाळता-चाळता वाचलेला एक किस्सा -
एक बाप निवांत एक मासीक वाचत बसलेला असतो. त्याची छोटी मुलगी त्याला सारखं काही ना काही विचारून त्रास देत असते. वैतागून तो मासिकामधील एक पान फाडतो. त्यावर जगाचा नकाशा असतो. त्या कागदाचे तो काही तुकडे करतो आणि तिला देतो. सांगतो, नकाशा नीट होईल असे रचून आण. त्याला वाटते पोट्टीचा आख्खा दिवस जाईल. काही मिनिटांमध्येच पोरगी समोर हजर. तिने बरोबर नकाशा जुळवलेला असतो. बाप चकीत. विचारतो, कसे काय केलेस बेटा? ती म्हणते, बाबा या कागदाच्या मागील बाजूवर माणसाचा एक चेहरा होता. मी तो जुळवला, आणि हा नकाशा जुळला.
तात्पर्य - प्रत्येक गोष्टीला दुसरी एक बाजू असते.
हा मॅनेजमेंटचा धडा वाटतो का? वाटेलच. कारण तो तसा आहेही.
तातपर्यासकट हा किस्सा मी वाचला एका हॉस्पिटलच्या गृहपत्रिकेत. इथंवर ही मॅनेजमेंट आली आहे. अर्थकारणाच्या दिशा आणि दशा या अशा आहेत. वरचा लेख हा त्यातला एक साईडइफेक्ट आहे.
याच गृहपत्रिकेत काही काळापूर्वी अधिकाधिक रुग्ण आपल्याकडे कसे येतील याविषयी विवेचन होते.

भाग्यश्री's picture

29 Apr 2009 - 3:19 am | भाग्यश्री

उडदामाजी काळे गोरे ही म्हण सगळीकडेच आहे, त्याला डॉक्टर्सही अपवाद नाही.. मात्र याचा अर्थ सगळेच वाईट असाही करणार नाही , आणि सगळे सज्जन असाही नाही!
केवळ व्हायचे म्हणून डॉक्टर झालेले/ वडीलांचा सगळा हॉस्पिटलचा सेटप आहे, तो वाया जाऊ नये(इतका उदात्त विचार अर्थातच नाही! त्यामागचा विचार हा की आपल्याला सगळे आयते मिळेल!) म्हणून झालेले/ काठावर पास होत गेलेले डॉक्टर्स/ भ्रष्टाचार, पेशंट्सबरोबर गैर वर्तन करणारे डॉक्टर्स इत्यादी उदाहरणं मी ऐकून आहे(काही पर्सनली माहीत आहेत).. कारण माझे सासरे डॉक्टर आहेत.. ही सगळी उदाहरणं ते सतत आजूबाजूला पाहातच असतात..

केवळ शिक्षणात खूप पैसा गेला म्हणून जेव्हा डॉक्टर्स पेशंटशी खेळतात, किंवा पेशंट म्हणजे पैसे उकरायची गुहा वगैरे समजतात तेव्हा माझ्या दृष्टीने त्याच्याइतका हीन प्रकार नसेल !
हे म्हणजे एखाद्या पेड सीट घेऊन इंजिनिअर झालेल्या मुलाने पाट्या टाकून कनिष्ठ प्रतीचा , कधीही कोसळणारा पूल बांधण्यासारखेच आहे!
www.bhagyashree.co.cc

स्मिता श्रीपाद's picture

30 Apr 2009 - 10:43 am | स्मिता श्रीपाद

केवळ व्हायचे म्हणून डॉक्टर झालेले/ वडीलांचा सगळा हॉस्पिटलचा सेटप आहे, तो वाया जाऊ नये(इतका उदात्त विचार अर्थातच नाही! त्यामागचा विचार हा की आपल्याला सगळे आयते मिळेल!) म्हणून झालेले/ काठावर पास होत गेलेले डॉक्टर्स/ भ्रष्टाचार, पेशंट्सबरोबर गैर वर्तन करणारे डॉक्टर्स इत्यादी उदाहरणं मी ऐकून आहे(काही पर्सनली माहीत आहेत)..

हे पटले...जरी सगळे डॉक्टर असे नसले तरी मी पाहिलेल्यांपैकी काही असे आहेत..
---एक घटना सांगते....म्हटली तर गंभीर आहे ..म्हटली तर गंमतशीर....
आमच्या ओळखिचे एक डेंटिस्ट आहेत्....त्यांच्याकडे घरात आई-वडिलांचा असाच मोठा हॉस्पिटलचा सेटप वगैरे असल्यामुळे ते पण डॉक्टर झाले असावेत्....एकदा माझ्या घराशेजारील काकु त्यांच्याकडे दाढ काढुन घ्यायला गेल्या होत्या....दाढ काढुन घरी परत आल्या...भूल उतरल्यावर परत ठणका सुरु झाला....२-४ तासानी ठणका कमी होईल असे सांगितले होते डॉक्टरनी...पण कुठचं काय्....वेदना कमी होईनात्...मग त्यांनी दाढेत धरलेला कापसाचा बोळा काढुन पाहु म्हणुन आरशात पाहिलं तर काय्..जी दुखरी दाढ होती तिच्या शेजारची चांगली दाढ काढली होती डॉक्टरांनी...आता डॉक्टरांशी भांडुन तरी काय उपयोग...

बाकी तुमचा लेख वाचुन खरच भिती वाटली..
मी ज्या डॉक्टरांकडे जाते ते माझ्यावर असे ट्रायल अँड एरर प्रकार करत नसतिल ना?

डॉ.प्रसाद दाढे's picture

29 Apr 2009 - 10:02 am | डॉ.प्रसाद दाढे

मराठमोळा महाशयांनी चांगले लिहिले आहे. डॉक्टरी व्यवसाय आणि ढासळती नैतिकता
हा विषय अमर्त्य आहे. पन्नास वर्षांपूर्वीही हेच प्रश्न होते व आजही आहेत. फरक फक्त व्यापकतेचा आहे; तेंव्हा
लोकसंख्याही कमी होती आणि तंत्रज्ञानही आजच्या एव्हढे प्रगत नव्हते (उदा. आज सीटी स्कॅनसाठी रूग्ण पाठविला
तर डॉक्टरला साधारणतः तीस टक्के म्हणजेच बाराशे- पंधराशे मिळतात, पण पूर्वी सीटी स्कॅन नसल्याने
हे कमिशनही मिळत नव्हते !)
भारतात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था एव्हढी भयंकर आहे की तिथे यमदूतही जायला कचरतील. आणि तिथे चांगले अपवाद औषधालाही सापडत नाहीत. (वाचा: बॅरिस्टरचे कार्टं- डॉ. हिम्मतराव बावस्कर किंवा पाहा: ससून हॉस्पिटल, पुणे वा महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र). तो एक स्वतंत्र विषयच आहे, त्यावर थोडे सवडीने लिहिन. पण मतितार्थ इतकाच की थोडे फार पैसे खिशात असतील तर सर्वसामान्य
माणूस 'त्या' दिशेला फिरकत नाही.
सर्वच मोठी खाजगी रूग्णालये व मोठी नावे असलेले ऐंशी टक्के कन्सल्टन्ट्स व्यापारी वृत्तीचे आहेत. जनरल
प्रॅक्टीस करणारे बहुतांशी डॉक्टर्स (ह्यात आयुर्वेदीक, होमिओपाथी जास्त) तीस टक्क्यांवर जगतात. कमिशन
हा ते जन्मसिद्ध हक्कच मानतात व त्यावरून स्पेशालिस्टशी वादही घालायला कमी करत नाहीत. शिवाय त्यांना
स्पेशालिस्टकडून पार्ट्या वगैरे इन्सेंटिव्हही हवी असतात. हे जर नाकारले तर दुसरा स्पेशालिस्ट तयार असतोच!
मग स्पेशालिस्टही रूग्णाचा खिसा कापतो, भरमसाठ तपासण्या, आय-व्ही ड्रग्ज हा सिलसिला चालू होतो.
हे एक भयंकर दुष्टचक्र आहे, फार थोडे डॉक्टर्स ह्यापासून दूर राहतात. किंवा राहू शकतात.
एक वेळ पैशाला लुटणं परवडलं असा आणखी भयानक प्रकार चालतो.
कॅन्सर ह्या रोगाच्या उपचारांच्या नावाखाली पेशन्ट्सना ज्याप्रकारे नागवले जाते आणि कापले जाते (शब्दशः)
त्या भ्रष्टाचाराची तुलना तेलगीशीसुद्धा करणे कठीण आहे. ऍलोपॅथीवाला डॉक्टर पुष्कळदा अनुभवी असतोच असे नाही. म्हणजेच एम. एस नंतर कमीत कमी तीन वर्षे त्याने टाटा मेमोरियलसारख्या ठिकाणी रजिस्ट्रार पोस्ट केली असेल तर तो अनुभव मानला जातो. परंतु अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले लोकंच जास्ती असतात. कुठलाही डॉक्टर आपल्याकडे आलेली केस सोडत नाही. आपला वकूब किती, ज्ञान किती, आपल्या रूग्णालयाची अवस्था काय ह्याचे भान न ठेवता सर्रास पेशन्टला टेबलवर घेतो आणि अर्धवट ऑपरेशन करतो. त्यामुळे रिकरन्स होतोच! बरं, कॅन्सर हा रोगच असा आहे की अगदी कुशल सर्जनने अचूक शस्त्रक्रिया करूनही तो पुन्हा उद्भवू शकतो ह्या गोष्टीचा फायदा हे अर्धवट सर्जन घेतात. ह्यात पेशन्ट मेला तरी ताप नसतो कारण कॅन्सरचे निदान झाले की रूग्णाच्या नातेवाईकांच्या मनाची तयारी झालेली असते. त्यामुळे अपयशाचे खापर सर्जनच्या माथी नसते!
ह्याहून भयानक प्रकार आयुर्वेद आणि होमिओपाथीत चालतो. तो म्हणजे हे डॉक्टर्स पेशन्टला सतत खोटा
विश्वास देत राहतात की तो बरा होणार आहे. ज्या केसेस इनऑपरेबल किंवा टर्मिनल स्टेजला असतात त्यांनाही धादांत खोटा निर्वाळा दिला जातो. उदा. माझ्या नात्यातल्या एका बाईंना पोटाच्या कॅन्सरचे निदान टर्मिनल स्टेजलाच झाले होते म्हणजे मेटास्टासिस (कॅन्सर इतरत्र पसरणे) झालेले होते. ऍलोपथिक तज्ञांच्या मते जास्तीत जास्त तीन महिने आयुष्य होते व काहीही करण्यासारखे नव्हते. पण अश्या वेळी माणूस अगतिक होतो, सारासार विचारबुद्धी हरवून बसतो आणि आयुर्वेद / होमिओपाथी किंवा निसर्गोपचाराकडे धाव घेतो. मुंबईतील एका प्रख्यात होमिओपॅथने हा रोग चक्क पूर्ण बरा करण्याचे आश्वासन दिले व अत्यंत महागडी औषधे सुरू केली. काही दिवसांनी रूग्णाला असायटीस झाला (म्हणजे पोटात पाणी होणे). ही खरे म्हणजे शेवटची घडी जवळ आल्याची सूचना होती; पण त्या होमिओपॅथने 'मी पोटातल्या कॅन्सरचे पाणी केले आहे' अशी दर्पोक्ती केली व सर्जनकडे जाऊन पाणी काढायचा सल्ला दिला! अर्थातच होमिओपथीचा उपयोग झाला नाही आणि त्या दुर्दैवी रूग्णाचा लवकरच अंत झाला. असाच आयुर्वेदीक उपचारांचा अनुभव माझ्या माहितीतल्या एका रूग्णाला आला. अशी असंख्य उदाहरणे आहेत, कॅन्सरचीच नाही तर आर्थ्रायटीस, वंध्यत्व अश्या हतबल करणार्‍या व्याधींच्या उपचारातही असेच लुबाडले जाते. स्टोरीचे तात्पर्य इतकेच की कुठलाही डॉक्टर आपल्याकडे आलेला पेशन्ट सोडत नाही, भले त्याला काहीच येत नसेल, कळत नसेल. हे फार भयानक आहे, कुठेतरी थांबले पाहिजे.. थांबले पाहिजे.
(वेळेअभावी आणखी लिहू शकत नाहीये, पण अजून बरेच लिहिण्यासारखे आहे)

मराठी_माणूस's picture

29 Apr 2009 - 10:46 am | मराठी_माणूस

वरील बर्‍याच वाईट अनुभावावरुन असे वाटते की 'ऍलोपॅथीक' व्यवसायात ही समस्या बहुतांशी जास्त आहे असे दिसते.

काळा डॉन's picture

29 Apr 2009 - 10:49 am | काळा डॉन

बरोबर...कारण आजरी पडले की बहुतांशी लोक 'ऍलोपॅथीक' डॉक्टरकडेच जातात..

मराठी_माणूस's picture

29 Apr 2009 - 10:57 am | मराठी_माणूस

म्हणजेच ते लोक अनुभवातुन काहीच शीकत नाहीत

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Apr 2009 - 11:13 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

उदा. हृदयाचे ठोके ७२ असावेत किंवा रक्तदाब ८०-१२० असावा याला काहीही ठोस आधार नाही. सर्वसाधारण निरोगी माणसांचे हे आकडे असतात म्हणुन त्याचे परिमाण झाले.

हे वाक्य जाम पटलं. :-)

बाकी आमचा डॉक्टर आणि/किंवा त्याची डॉक्टर बायको माझ्या सगळ्या शंका-कुशंकांना समाधानकारक उत्तर देतात. तेव्हाच्या तेव्हा नाही आलं तर नंतर अगदी आठवणीने वाचन करून उत्तर देतात त्यामुळे आत्तापर्यंत कधीही डॉक्टरवर शंका आलेली नाही.

नाटक्या, श्रावण, डॉ. दाढे, भाग्यश्री यांचे प्रतिसाद पटले (आवडले म्हणायला हात धजावत नाही आहे). डॉ. दाढ्यांनी सांगितलेले प्रकार तर खरोखर भयानक आहेत. इतर अनेक 'लाईफस्टाईल' विकारांपासून स्वतःला वाचवणं शक्य असतं पण आनंदाने ओढवून घेतलेली 'दुखणी' (स्त्रियांच्या बाबतीत बाळंतपण), कॅन्सरसारख्या रोगांपासून स्वतःला वाचवता येणंही शक्य नाही! :-(

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

नितिन थत्ते's picture

29 Apr 2009 - 11:22 am | नितिन थत्ते

एका डॉक्टर मित्राला 'यंदा टर्नओव्हर इतका इतका झाला' असे बोलताना ऐकले.
यातच सर्व आले.

खराटा
(रंग माझा वेगळा)

मराठी_माणूस's picture

29 Apr 2009 - 11:23 am | मराठी_माणूस

शेम शेम

अवलिया's picture

29 Apr 2009 - 11:35 am | अवलिया

हम्म. चांगली चर्चा !

--अवलिया

JAGOMOHANPYARE's picture

29 Apr 2009 - 12:43 pm | JAGOMOHANPYARE

डॉक्टराविरोधात आलेले प्रतिसाद चुकीचे नाहीत, पण एकान्गी आहेत... डॉक्टरना 'भस्म्या 'झालेला आहे असाच एक सूर आहे.... पण हल्ली दवाखाने हेच 'भस्मासूर 'झालेले आहेत... डॉक्टरचे सेविन्ग, पार्ट टाइम नोकरीचा पगार, बायकोचा पगार हे सगळे खात असतात... काय करणार बिचारे... ( भस्मासूर ही उपमा कालच एका मित्राकडून समजली, तेव्हा फार हसलो होतो.. ) कमिशनचे औषध हेही काही अन्शी खरे आहे... पण हे काही रुटीन नाही..... या सगळ्या प्रोफेशनल गोश्टी न जमल्यामुळे मी प्रॅक्टीस सोडली आणि आज मी खूप मजेत आहे.... डॉक्टरानी तरुण पणी चांगल्या नोकर्या, रिसर्च, लेक्चरशिप वगैरे करावे.... म्हातारपणी अल्प दरात सेवा आपप्ल्या गावी जाऊन द्यावी.... किन्वा आपलेच गाव हेही बन्धन ठेऊ नये.... या मताप्रत मी आलेलो आहे.... मेडिकलचे करियर करण्यात उमेदीची बरीच वर्शे फुकट जातात... पैसेही जातात... आणि मग हे सगळे वसूल करण्याची एक सक्ती म्हणजे मेडिकलचे करियर.. हे दुर्दैवी आहे, पण सत्य आहे....

सुमीत भातखंडे's picture

29 Apr 2009 - 3:37 pm | सुमीत भातखंडे

कोर्टाप्रमाणेच हॉस्पिटलची पायरी चढण्याचा योग येऊ नये आणी आलाच तर मग त्या १०% डॉक्टरांपैकीच एक कोणीतरी आपल्याला भेटावा.

माझ्या एका मित्राचा अनुभव स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्यावर वरचं वाक्यं मनापासून पटलं.

खासकरून ही जी मोठी हॉस्पिटल्स असतात ना, जशी इथे हैदराबाद मधे इमेज हॉस्पिटल्स किंवा अपोलो हॉस्पिटल्स तिकडे खरच खूप विचित्र अनुभव येतात.
माझ्या मित्राला किडनी स्टोनचा त्रास होता. एकदा दुखणं खूप वाढलं म्हणून ऍडमिट व्हावं लागलं. आम्हाला फारसा अनुभव नसल्याने, तो सांगून बसला की तो आय. टी. वाला आहे. आता आय. टी. वाल्यांचा मेडिकल इन्शुरंस असतो हे माहित असल्याने तो नको नको म्हणत असताना, त्याला स्पेशल वॉर्डात ठेवलं. नंतर ३-४ डॉक्टरांनी मिळून त्याची काहितरी ट्रिटमेंट ठरवली.

खरे गमतीशीर प्रकार नंतर सुरु झाले. एक दिवस एक डॉक्टर येऊन रेग्युलर चेकअप झाल्यावर त्याला सांगू लागला - फार स्ट्रेस घेऊ नको, जास्तं जिने चढं - उतर करू नको वगैरे - वगैरे. मझा मित्र गोंधळून गेला. किडनी स्टोनचा त्रास असताना, ह्या सगळ्या काळज्या कशाला. नंतर कळलं की त्याच्या शेजारच्या खोलीत एक हार्ट पेशंट होता. त्याला सांगायच्या गोष्टी चुकून ह्याला सांगितल्या गेल्या.
नंतर एक दिवस एक नर्स खिशात ५ इंजेक्शंस घेऊन आली. आमचा मित्र इंजेक्शंसना जाम घाबरतो. त्यानी विचारलं ही सगळी कशा - कशा साठी? तिने एक - एक करून, हे अमुक्-अमुक साठी, हे अमुक्-अमउक साठी वगैरे सांगितलं. मित्र शांतपणे म्हणाला, ही तीन नको, बाकिची दोन द्या. तिनीपण तितक्याच शांतपणे तीन इंजेक्शंस खिशात परत ठेऊन दिली, दोन त्याच्या कंबरेत टोचली आणि निघून गेली.

खरा हॉरिबल प्रकार शेवटच्या दिवशी झाला. त्याची डिस्चार्ज ची वेळ झाली होती. इन्शुरंस वाले पैसे भरणार असल्याने पेमेंट कहीच नव्हतं. पण इन्शुरंस वल्यांनी काहितरी गोंधळ केला आणि पेमेंट साठी उशीर झाला. ह्या लोकांनी चक्क बाहेरून रूम बंद करून घेतली. शेवटी आम्ही सगळ्यांनी आमच्या एच. आर. वाल्यांना भेटून, त्यांच्याकरवी त्या इन्शुरंस वाल्यांना काँटॅक्ट केला. आणि पेमेंट झाल्यावर एकदाचा डिस्चार्ज मिळाला.

दवबिन्दु's picture

29 Apr 2009 - 11:23 pm | दवबिन्दु

आमच्या इतच एक काका राहातात. ते बीपीटिमधी काम करतात. तेना हार्ट प्राब्लेम होत. एक बड हास्पिटल बोल्ल, तुमी बरे झालत आता घरला जावा. आनि डिश्चाज देन्याची वेल आली तेवा हास्पिटलला कळल कि काकान्चे हास्पिटलचे पेशै बीपीटि देनार तेव्हा बोल्ले, बायपास करा, नायतर दिश्चार्ज पेपर देनार नाही. तुमाला पुन्ना नोकरीवर ज्वाईन होता येनार नाई.

.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?

मराठमोळा's picture

29 Apr 2009 - 11:47 pm | मराठमोळा

चर्चा अगदी ऑन ट्रॅक आहे पण या समस्येचा तोडगा काही निघणार नाही असेच दिसते.. असो.
आपणच शक्य तेवढी सावधगिरी बाळगावी, बाकी सगळा नशिबाचा भाग.

नाटक्या, श्रावण, कर्क, डॉ दाढे आणी JAGOMOHANPYARE यांचे प्रतिसाद विचारपुर्वक/अनुभवी आहेत.
आभार..

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
(आजकाल मिपावर यायला वेळ मिळत नाहिये जास्त.)

डॉ.प्रसाद दाढे's picture

30 Apr 2009 - 7:11 am | डॉ.प्रसाद दाढे

पुण्याच्या आसपास डोंगरच्या डोंगर जुन्या डॉक्टरांच्या मालकीचे आहेत. कारण जुन्या
काळी खेड्यातून खिशात रोख पैसे नसलेले शेतकरी उपचारांसाठी/ शस्त्रक्रियांसाठी येत असत. अश्यांकडून पैश्यांच्या ऐवजी हे डॉक्टर्स त्यांच्या जमिनी लिहून घेत असत म्हणे!
खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये सरकारीच्या तिप्पट पगार व कमी कटकटी असतात म्हणून सरकारी महाविद्यालयातील उत्तमोत्तम अनुभवी प्रा. डॉ. तिकडे जातात. त्यामुळे सरकारी हॉस्पिटल्सची दुर्दशा झाली आहे, पी.जी सिट्स कमी होत चालल्या आहेत. इच्छूक उमेदवारास नाईलाजाने खाजगी कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. डोनेशनचे आकडे पाहताक्षणी ढासळत्या नैतिकतेचे कारण कुणाच्याही लक्षात येईल.
एम.डी. रेडिओलॉजी- रू. एक कोटी (ब्लॅक) अधिक फी (व्हाईट)
एम.एस. ऑर्थोपेडीक- रू. ऐंशी लाख '' ''
एम.एस. गायनॅक- रू. साठ लाख '' ''
एम.एस. जन्.सर्जरी- रू. पन्नास लाख '' ''
एम. डी. जन. मेडिसिन- रू. पन्नास लाख '' ''
पॅकेजः एम बी बी एस + एम डी+ डी.एम (कार्डियोलॉजी) - रू. दीड ते दोन कोटी !

आयुर्वेद आणि होमिओपॅथची कहाणी फारच करूण आहे. ती कॉलेजेस विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. एकतर त्यांना कुठल्यातरी खाजगी लहान मोठ्या रूग्णालयात हाऊसमन म्हणून काम करावे लागते (पगार रू दोन हजार ते मॅक्स सहा हजार) तिथे त्यांना व्हर्टिकल ग्रोथ शून्य असते. कंटाळून काही वर्षांनी त्यातले काही जणं छोटासा दवाखाना काढतात तेंव्हा त्यांना ऍलोपॅथी प्रॅक्टीस करणे भागच पडते. पण मुळात त्यांच्या अभ्यासक्रमात त्यांना इन डेप्थ ऍलोपॅथी शिकविलीच नसते त्यामुळे तिथेही गोची होते. काही जण प्युअर आयुर्वेद प्रॅक्टीस करतात; पण मग तेही मी वर उदाहरण दिले तसे रूग्णांला उभे-आडवे कापतात. डोंबिवलीतच काही वर्षांपूर्वी 'कॅन्सर संजीवनी' तयार करणार्‍या एका भोंदू आयुर्वेदाचार्याला अटक झाली होती. पण त्यापूर्वी अनेक वर्षे हा इसम किती शे रूग्णांना राजरोस लुबाडत होताच. वर पुस्तकेही छापत होता!
आज निदान ऍलोपॅथीत किती तरी प्रकारचे संशोधन होत आहे, नव-नवीन औषधे-टेक्निक्स
येत आहेत ही निश्चितपणे समाधानाची बाब आहे. पण त्याच वेळेला आपल्या स्वदेशी आयुर्वेदात मात्र ऑलमोस्ट झीरो आर एन डी आहे! तीच ती जुनी वाग्भट / चरक कवटाळून
बसल्याने नवीन संशोधन फारसे होत नाही. होमिओपॅथीची तीच रड आहे. हानेमानने अठराव्या शतकात तयार केलेले फॉर्म्युलेच अजून चालले आहेत. होमिओपॅथी वा आयुर्वेदाच्या पदवी अभ्यासक्रमात असलेले क्रमिक पुस्तकांची दशकोनदशके केवळ पुनर्मुद्रणेच होत आहेत, नवी आवृत्ती नव्हे.
तुलना करता ऍलोपथीच्या 'डेव्हीडसन्स मेडिसिनच्या दोन हजार सालातल्या आवृत्तीपेक्षा आजच्या आवृत्तीतही प्रचंड ऍडिशन्स आहेत.
गंमत म्हणजे आयुर्वेदीक डॉक्टर्स ऍलोपॅथीला प्रचंड शिव्या घालतात पण आयुर्वेदीक पदवीधराला ऍलोपथी प्रॅक्टीस करण्याची कोर्टातून परवानगी आणतात!
ह्या तिन्ही पॅथीच्या डॉक्टर्समध्ये समन्वयाचाही खूप अभाव आहे. खरं म्हणजे आपापली लिमिट्स ओळखून जे काही रूग्णाच्या हिताचे आहे (स्वतःच्या खिशाच्या नव्हे) तेच केले
पाहिजे. ज्या रोगावर होमिओपॅथीत चांगला उपचार उपलब्ध आहे, तो रूग्ण इतर डॉक्टरांनी आपणहून तिकडे पाठविला पाहिजे (कमिशनची अपेक्षा न ठेवता!)
जेव्हढा पैसा तुमच्या नशिबात आहे तो कुठेही जात नाही. उलट सचोटीने अन सेवाव्रत अंगी बाणवून जर प्रॅक्टीस केली तर 'पुरे' म्हणण्याची वेळ येते इतकी तुफान प्रॅक्टीस चालते असा अनुभव आहे. माझे गुरू आदरणीय डॉ अशोक डबीर नेहमी सांगत असत, "टेबलवरचा पेशन्ट स्वत:ची आई, बहीण, वडील आहेत असे समजा अन मगच सुरी चालवा!"

प्रकाश घाटपांडे's picture

30 Apr 2009 - 10:09 am | प्रकाश घाटपांडे

डॉ अनंत फडके हे जनाअरोग्य चळवळ गेली कैक वर्षे चालवतात. औषध कंपन्यांचे अर्थकारण ते वेळोवेळी मांडतात. इथे काही भाग पहाता येईल
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रकाश घाटपांडे's picture

30 Apr 2009 - 10:22 am | प्रकाश घाटपांडे

होमिओपॅथीबद्दल झालेल्या भ्रमनिरासातून ऍलोपॅथीकडे वळलेल्या एका डॉक्टरांचं स्वानुभवकथन! डॉ शंतनु अभ्यंकर यांचा अनुभव एप्रिल २००९ मधील लेख वाचा. या लिंकवरील पाने नंतर बदलतात. जपुन ठेवा.

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मराठमोळा's picture

30 Apr 2009 - 1:35 pm | मराठमोळा

डॉ.शंतनू अभ्यंकर यांचा होमिओपॅथी ते ऍलोपॅथ हा लेख वाचला. उत्तम लेख आहे पण त्यांनी होमिओपथी बद्दल चांगले काहीच असे लिहिले नाही. कदाचित होमिओ मधे चांगले काहीच नाही असे असेलही किंवा त्याना वाटले असेल तसे दृष्टीकोन विज्ञानवादी असल्यामुळे. असो.

बर्‍याच वेळा रुग्णाला आजार हा फक्त मानसिकदृष्ट्या असतो. म्हणजे काहीही झालेले नसताना आपल्याला काहीतरी झाले आहे असे वाटणे आणी डॉक्टरकडे गेल्यावरच मी बरा होईन असा ठाम विश्वास असणे. किरकोळ गोष्टींसाठी दवाखान्यात जाणे, किंवा गोळी घेणे असेही महाभाग मी पाहिले आहेत. डॉक्टरांना बघितल्या बघितल्या यांना बरे वाटायला लागते. तुम्हाला काहीही झालेले नाही असे जर डॉक्टर म्हणाला तर हे दुसर्‍या डॉक्टरकडे जातात. असे रुग्ण म्हणजे 'त्या' डॉक्टरांसाठी पैशाची खाणच.
कंपनी औषधांचे सगळे पैसे देते म्हणुन भरमसाठ गोळ्या खाणारे लोकंही आहेत. काय करावे बरे?
खेडोपाडी तर आणखीनच बिकट अवस्था.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

कोलंबस's picture

1 May 2009 - 2:09 am | कोलंबस

अवांतर-
<<उत्तम लेख आहे पण त्यांनी होमिओपथी बद्दल चांगले काहीच असे लिहिले नाही. >>
हो ना हेच वाटलं मलाही...
मीही होमिओपॅथी वरचा लेख वाचला. मी लहानपणापासून होमिओपॅथी चं औषध घेतोय आणि मला नेहेमीच बर वाटत आलय. ३ वर्षाचा असताना खुप टॉन्सिल्स चा त्रास झाला. ३ एलोपॅथी डॉ. नी ऑपरेशन करायला सांगितलं. एवढ्या लहानपणी ऑपरेशन करावं लागू नये म्हणून आईने होमिऑपॅथी ट्राय करायचं ठरवलं. १ महिन्यात पूर्ण बरा झालो आणि परत २८ वर्षात एकदाही टॉन्सिलस चा त्रास झाला नाहीये मला ..हे कसं शक्य आहे? पुढेही कित्येक वेळा खूप चांगला अनुभव आला. मग हे कसं होऊ शकेल?
किरकोळ गोष्टींसाठी दवाखान्यात जाणे, किंवा गोळी घेणे असेही महाभाग मी पाहिले आहेत
१००% सहमत.

नितिन थत्ते's picture

30 Apr 2009 - 3:00 pm | नितिन थत्ते

होमिओपाथीच्या वैज्ञानिकतेविषयी लिहिलेले विकीपिडिया वर पूर्वी वाचले होते. तेव्हा तो लेख बायस्ड आहे असे वाटले होते. अभ्यंकरांचा लेख वाचून ते खरोखरच तसे असल्याचे शिक्कामोर्तब झाले.

माझा एक आयुर्वेदिक डॉक्टर मित्र आहे त्याची आयुर्वेदाविषयीची मते काहीशी अशीच आहेत. म्हणजे आयुर्वेद भंपक आहे असे नव्हे तर त्याचे व्हॅलिडेशन नव्या विज्ञानाच्या कसोट्यांवर केले पाहिजे असे त्याचे मत आहे पण त्या क्षेत्रातील मंडळी मात्र याला तयार नसतात आणि पोथिनिष्ठा असते असे त्याचे म्हणणे आहे.

खराटा
(रंग माझा वेगळा)

भडकमकर मास्तर's picture

1 May 2009 - 4:13 pm | भडकमकर मास्तर

डॉ.अभ्यंकरांचा लेख भन्नाट आहे.......माझ्या घराशेजारीच एक होमिओपॅथी कॉलेज आहे... तिथले विद्यार्थी नेहमी दिसतात.
.... होमिओपॅथीचे विद्यार्थी ऍलोपॅथीचा द्वेष का करतात असा नेहमी प्रश्न पडत असे... लेख वाचून उत्तर मिळाले....

"ऍलोपॅथी कशी चुकीच्या सन्कल्पनांवर आधारित आहे" हे सांगायला १८ मार्क.... हाहाहाहा .काय विनोदी आहे रे हे....नो वंडर, हे लोक इतका द्वेष करतात...

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

रेवती's picture

30 Apr 2009 - 11:17 pm | रेवती

डॉ. अभ्यंकरांचा लेख वाचला.
ग्रेट लिहिलाय!
दुव्याबद्दल आपले आभार!

रेवती

प्राजु's picture

1 May 2009 - 12:24 am | प्राजु

अतिशय आवडला. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अभिज्ञ's picture

1 May 2009 - 12:38 pm | अभिज्ञ

डॉ.शंतनु अभ्यंकर ह्यांनी लिहिलेला लेख प्रचंड आवडला.
घाटपांडे साहेबांचे आभार.

अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

यशोधरा's picture

1 May 2009 - 12:54 pm | यशोधरा

सुरेख आहे अनुभवकथन डॉक्टरांचं. त्यांच्या जिद्दीला सलाम.

चिरोटा's picture

30 Apr 2009 - 10:47 am | चिरोटा

ऍलोपॅथीच्या डॉक्टरांचा प्रॉब्लेम म्हणजे हे लोक आजार होवू नये म्हणुन काय पथ्ये पाळावीत हे सांगत नाहीत. डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेल्यावर मला हा अनुभव आला.'काय काळजी घ्यायची/काय खायचे' ह्यावर 'असे काही नाही.कीतीही वाचा,काहीही खा' अशी उत्तरे आली.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

सँडी's picture

1 May 2009 - 2:47 pm | सँडी

आणी अशी औषधेही आहेत की ज्यात खरे औषधच नाही, म्हणजे जी गोळी घेतो त्यात नुसती पावडरच आहे
हे ऐकुन होतो... तसेच औषध कंपन्या औषधाच्या किमती अव्वाच्या सव्वा आकारतात हे एका मित्राकडुन समजले.
गरिब लोक कर्ज काढुन औषधे, दवाखान्याचा खर्च भागवतात...पण या औषध कंपन्याना गरिब, श्रीमंतीच काय देणं घेणं? शुद्ध लुट चालु आहे .
या लोकांसाठी काही कायदे आहेत की नाही?

शिल्पा ब's picture

21 Aug 2010 - 6:51 am | शिल्पा ब

हे खरेच आहे...आम्हालासुद्धा असा अनुभव आलेला आहे...