का ? का? का?
मध्यमवर्गीय कुटुंबात मिळणाऱ्या थोड्या फार रिकाम्या वेळात स्त्रीवर्ग काहीशा नाईलाजाने किंवा काहीवेळा आवडीने टीव्ही वरच्या कौटुंबिक मराठी मालिका बघतो. त्यांनाही त्यातील काही गोष्टी खटकतात. पण त्या जाने दो म्हणून सोडून देतात. मीही वृद्धावस्थेत रिकामटेकडी झाल्याने ह्या मालिका बघते. मलाही काही गोष्टी खटकतात त्या अशा-
१) प्रत्येक मालिकेत एक रडकी नायिका असतेच. ती सारखी रडतच असते. तिला कुणीतरी छळत असतं. काही वेळा अनेक जण तिला (फारसं महत्त्वाचं कारण नसताना)छळत असतात.
२) कुठलीतरी एक सत्य गोष्ट कुणीतरी,कुणापासून तरी लपवत असतं आणि त्यावर एक वर्षभर मालिका चालते.
३) प्रत्येक मालिकेत नायक, नायिका यांचं प्रेम जमायला किमान एक वर्ष तरी लागतंच. मग त्यांच्या लग्नात विघ्नं येतात. अनेक संकटांनंतर त्यांचं लग्न लागतं.(एकदाचं) एकदोनदा तर भलत्याच माणसाशी तिचं लग्न होण्याचा प्रसंग उभा ठाकतो. तो भलता माणूस खलप्रवृत्तीचाच असतो. पण त्या खलनायकाचं "एखादं सत्य" बाहेर येतं आणि प्रसंग टळतो आणि काळजीत पडलेला महिलावर्ग सुस्कारा सोडतो. मालिका कोणतीही असो. कथानक हेच म्हणजे अगदी हेच.
४) एखाद्या मालिकेत एखादी घटना, प्रसंग पाॅप्युलर झाली की झाडून सगळ्या मालिकांमध्ये तेच घडलेलं दाखवतात. सध्या नायिकेला एखादी मुलगी असलेली दाखवण्याची टूम आहे.
५)आपण साजरे करत असलेले सर्व सण मालिकांमध्ये ही साग्रसंगीतपणे साजरे होतात. प्रत्यक्षात पाडवा, मालिकेत पाडवा.प्रत्यक्षात दिवाळी, मालिकेत दिवाळी.
६) मालिकेतल्या लग्नात हळद लावणे,औक्षण करणे, सप्तपदी,हार घालणे हेच विधी दाखवतात. लग्नात खूप कमी माणसं असतात पण हाॅल खूपच दिमाखदार सजवलेला असतो. मेहेंदी, संगीत,जोडे लपवणे इ.महाराष्ट्रीय लग्नात नसलेले विधी हमखास दाखवले जातात.
७) मालिकेत आजारी माणसाला नेहमी फक्त आणि फक्त टोमॅटोचंच सूप देतात.
८)जेवणाचं ताट नेहमी पूर्ण वाढलेलं असतं. भरपूर भात,चार पोळ्या, आमटी,भाजी,इ.इ.(हाॅटेलातली राईस प्लेटसारखी एकवाढ करुन टाकलेली) मग ते जेवणारं एखादं लहान मूल असो की आजारी माणूस असो, की म्हातारं माणूस असो. दूध सुद्धा पूर्ण ग्लासभर आणायचं. ते पिणारी व्यक्ती कुणीही असो.
९) मालिकेत पात्रांचे स्वभाव अचानक बदलतात. पूर्वी दुष्ट असलेली मामी, काकू अचानक चांगली वागू लागते. तर चांगली सासू सुनेवर विषप्रयोग करण्याइतकी दुष्ट बनते.
१०)दिवा विझणे ,उजवा कौल,डावा कौल इ.अंधश्रद्धांचा(कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व.)सुकाळ असतो. देवादिकांवर, कुण्या स्वामी, महाराजांवर तर कित्येक मालिका आहेत. भोळ्या भाबड्या अशिक्षित भारतीय जनतेला त्या खऱ्या वाटतात ,ही वस्तुस्थिती आहे.
११) मालिकांमध्ये पाणी पाजणे हा प्रकार सर्रास घडत असतोच असतो. कुणी बाहेरून आलं रे आलं की तत्क्षणी,"बसा हं,मी पाणी आणते."कुणी संतापलं की"तुम्ही आधी पाणी प्या."(टेबलावर पाण्याचा भरलेला जार आणि ग्लास तयारच असतो.) कुणी घाबरलं, पाणी पाजा. कुणी उत्तेजित झालं, पाजा पाणी. अरे किती पाणी पाजाल!
१२) खुद्द नायिका,तिची सासू,जाऊ, थोडक्यात मालिकेत काम करणाऱ्या सर्व स्त्रिया रात्री झोपताना सुद्धा अंगावर भरजरी कपडे, सर्व दागिने घालून झोपतात. झोपेतून जागे झाल्यावर त्यांचे केस जराही विस्कटलेले नसतात. ॲक्सिडेंट होऊन हाॅस्पिटलला ॲडमिट असले तरी मेकअप,आयलायनर, लिपस्टिक,केस सगळं शाबूत!
१३) मालिकेत मोठमोठे बंगले असतात पण नोकरमाणसं मुळीच नसतात. एखादी जादा शहाणी स्वयंपाकीण असेल पण झाडूपोछावाली बाई दिसणार नाही. (सिनेमासाठी किंवा कॉमेडी शो साठी राखीव?)
१४)भाषा तर विचारुच नका "तुला हसतात"नाही"तुझ्यावर हसतात"."मला मदत कर"नाही."माझी मदत कर.""तुझ्या बाबतीत हे काय घडलं?"नाही."तुझ्यासोबत हे काय घडलं?"
"मैं तुमसे प्यार करता हूॅं।"ऐवजी मैं तेरे पर प्यार करता हूॅं।"असं म्हटलं तर चालेल का?
१५) मालिकेत नायिका नऊ महिने नऊ दिवसांपेक्षा जास्त दिवस गरोदर राहते. अनंत काळ. घरातील सर्वांचं कल्याण होईपर्यंत दिग्दर्शक तिला काही बाळंत होऊ देत नाही. कित्येक महिने तिचं पोटही मोठं दिसत नाही. पाळी चुकल्यापासून लगेच तिची काळजी घ्यायला सुरुवात!"तू वाकू नको,काम करु नको, विश्रांती घे."इ.इ.आम्ही सामान्य बायका नवव्या महिन्यापर्यंत काम करतो!
असो. कोळसा उगाळावा तितका काळाच. निर्माते तेच दाखविणार आणि इतर पर्याय उपलब्ध असूनही आमच्यासारखे लोचट प्रेक्षक ते बघणार, त्याच त्याच जाहिरातींसकट!
..कुटे ग्रुपचे गुड मॉर्निंग तूप, दूध, तिरुमला ऑइल खा, मजेत रहा. हॅपीनेसची चिंता डोन्ट वरी..
वर्गीकरण
प्रतिक्रिया
१) प्रत्येक मालिकेच्या
श्रीयुत गंगाधर टीपरे, काय
मराठी चित्रपटासारख्या मालिका कधी कात टाकणार?
घरात टीव्ही नाही परंतु
ज्याला परवडते ते करतील.
मालिकेतल्या लग्नात हळद लावणे
करेक्ट निरिक्षण आज्जे.
टीआरपी धागा
छान
छान
मस्त गं आजी.
मालिकांमध्ये पाणी पाजणे हा प्रकार सर्रास घडत असतोच असतो
खरं आहे ग आज्जी
सिरियल मधिल स्त्रिया
ज्या मालिकांची काही लोक हेटाळणी करतात
छान निरीक्षण
ह्या मालिकांपेक्षा न्युज
न्यूज चॅनेल
मी राष्ट्रपती झालो तर
चानेल्सचे मालक पाहा.
टार्गेटेड ऑडीयंन्स
होय.
कपिलमुनींशी सहमत. मागे खुपते
यास प्रेक्षकच कारण.
हा ... हा ...
श्रीगुरुजी-तुम्ही सांगितलेले