ताबडतोब रस मलाई.. :)
नमस्कार खवय्यांनो,
(झालं! आली का परत एक नवा प्रयोग घेऊन..असं कोण रे म्हणतंय तिकडे...??)
रसमलाई ही बंगाली मिठाई, बघताबघता महाराष्ट्रीयन गोड पदार्थात मिसळून गेली .. जशी दूधात साखर मिसळावी ना अगदी तश्शी.
आम्रखंड्,श्रीखंड.. हे पदार्थ तर छानच. गुलाबजाम, खीर तर रोजचेच. रसमलाई माझी अतिशय आवडती डिश आहे. गोड पदार्थांमध्ये जर मन लावून मी काही खात असेन तर ती रसमलाई. चपटे पेढ्याच्य आकाराचे गोळे असले की, रसमलाई. लहान लहान द्राक्षासारखे गोळे असले की अंगूर मलाई..
माझ्या कोल्हापूरी घशातून ही रसमलाई इतकी अलगद उतरते... व्वा! काय सांगू आता.
इथे स्वादची रसमलाई मिळते. तो टिन घरी आणून त्यामध्ये असलेल्या पाकातल्या पनीरच्या इडल्या आटवलेल्या दूधात घालून १-२ मिनीटे उकळल्या की मस्त रसमलाई तयार होते. आज पर्यंत मी तश्शीच करत होते. पण झालं असं.. की, त्या इडल्या भल्या मोठ्या असतात आणि टिनमध्ये ९-१० च असतात. त्यामुळे एकतर एका वेळी ती संपत नाही आणि तसाच टीन ठेवताही येत नाही. त्यामुळे सगळी मलाच संपवावी लागते एका दिवशीच (;) ) . मग डायट गेलं तेल लावत असं होतं.
एक मैत्रीण म्हणाली की, रिकोटा चीज ची रसमलाई मस्त होते. झालं.. मी लग्गेच रिकोटा चीज आणलं. त्यात साखर घालून अवन मध्ये तासभर बेक केलं. बाहेर काढून त्याचे गोळे बनवले आणि दूधात टाकले आटवलेल्या. पण तो जो काही प्रकार झाला तो झाला भलं मोठं पातेलं भर. त्यातून त्याची चव ना धड रसमलाई , ना धड पेढा, ना धड बासुंदी.. या तिन्हीच्या मधलाच प्रकार झाला. झाला तो असा काही झाला.. की खाव्वेना. पातेलं भर ते टाकवेनाही.. पण शेवटी टाकूनच द्यावं लागलं. त्यानंतर मात्र कानाला खडा. रसमलाई स्वादचीच आणून घरी दूधात टाकून खायची.
परवा एक मैत्रीण सहज म्हणाली, "मी रसमलाई घरी केली होती.. नेट वर बघून." रसमलाई हे नाव ऐकूनच मी कान टवकारले. तिला विचारून घेतलं कसं केलं.. काय काय केलं?
पद्धत सोपी वाटली. घरी येऊन रामनवमी दिवशी केली. दिवस चांगला होता त्यामुळे माझ्या प्रयत्नाला यश आलं.
तुम्हाला रसमलाई आवडत असेल तर खालील पद्धतीने जरूर करून बघा. आवडली तर सांगा.. मी मैत्रीणिला धन्यवाद सांगेन.
साहीत्य :
दूध - ३ कप + ३ कप
लिंबू- १/२
साखर - १ कप
पाणी २ कप
दूधाचा मसाला २ टी स्पून, पिस्त्याचे काप (ऐच्छिक)
कूकर
कृती :
१. ३ कप दूध पातेल्यामध्ये घेऊन उकळावे. उकलि यायला लागली की त्यात ते अर्धे लिंबू पिळावे. त्यातला रस पूर्ण संपला पाहिजे.
२. दूध फाटून चोथापाणि झालेले दिसेल. ते एका फडक्यातून गाळून घ्यावे. आणि तयार पनीर फडक्यामध्ये १० मिनिटे घट्ट बांधून ठेवावे.
३. फडक्यातले पनीर काढून घेऊन ते हाताने नीट मळून घ्यावे. गाठी मोडल्या पाहीजेत.
४. त्याचे लहान लहान गोळे किंवा पेढ्याचे आकाराचे गोळे करावेत.
५. कूकर मध्ये डायरेक्ट (भाताचे डबे न वापरता)१ कप साखर घालून त्यात २ कप पाणी घालावे.
६. त्यात पनीरचे गोळे घालून घट्ट झाकण लावून १ शिटी होऊ द्यावी. गॅस बंद करावा. पुढे मोजून ५ मिनिटामध्ये प्रेशअर उतरले तर ठीक नाहीतर कूकर पाण्याखाली धरून थंड पाणी सोडून प्रेशर उतरवावे.
पनीरचे गोळे मोठे झालेले दिसतील. ते अलगद पिळून बाजूला काढून ठेवावेत.
७. दुसर्या पातेल्यात ३ कप दूध आटवत ठेवावे. मग त्यात दूधाचा मसला, पिस्त्याचे काप घालावेत. आवडीनुसार साखर घालावी.
८. हे पनीरचे गोळे त्या दूधात घालून आणखी १-२ मिनिटे दूध उकळू द्यावे.
९. थंड झाले की, सजावटीसाठी आणखी पिस्त्याचे काप घालावेत. ही रसमलाई थंड करून खाण्यास द्यावी.
या प्रमाणात साधराण १५-२० गोळे होतात पनीरचे. ३ माणसांच्या कुटुंबाला पुरते रसमलाई. :)
शुभेच्छा
शुभेच्छा
वाचन
20336
प्रतिक्रिया
0