Skip to main content

‘पंचाक्षरी’चे व्यसन !

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 21/01/2022 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या ऑनलाईन इंग्लिश शब्दखेळांचे विश्वात Wordle हा पंचाक्षरी खेळ जबरदस्त लोकप्रिय झालाय. याचा उल्लेख मी शब्दखेळांच्या ‘चौकटीतील रत्ने’ या जुन्या धाग्यावर केला होता. त्याला एक प्रतिसाद आला. मग असा विचार केला की, जास्तीत जास्त शब्दप्रेमींना तो माहित होण्यासाठी नवा धागा काढलेला बरा. तुमच्यातील काहीजण हा खेळ खेळून त्याचा आनंद घेत असतील हे नक्की. परंतु माहित नसलेल्यांसाठी हा परिचय धागा. हा खेळ तीन स्वरूपात उपलब्ध आहे : 1. दैनंदिन एक शब्द : याचे आतापर्यंत 216 भाग झालेत. 2. वरील सर्व जुन्या भागांचा संग्रहित खेळ 3. अमर्यादित खेळ नवागतांसाठी आपण प्रथम दैनंदिन खेळ पाहू. 1. खेळ निर्मात्याने एक ५ अक्षरी शब्द योजलेला असतो. तो आपल्याला ओळखायचा आहे. त्यासाठी या शब्दाचा अर्थ/ भावार्थ/ समानार्थ इत्यादी काहीही दिलेले नाही. मग ओळखायचा तरी कसा ? खेळाच्या पटलावर पाच अक्षरी सहा ओळी दिलेल्या आहेत. त्यातील पहिल्या ओळीत तुम्ही कुठलाही आवडीचा पंचाक्षरी शब्द लिहायचा उदाहरणार्थ CHAIR. मग खेळातील enter दाबायचे. ते दाबल्यावर प्रत्येक अक्षराची चौकट एका रंगाने भरेल. हे रंग तीन प्रकारचे आहेत. त्यांचा अर्थ असा : १. हिरवा : ते अक्षर अपेक्षित शब्दात त्याच स्थानी आहे; म्हणजे बरोबर. २. पिवळट : ते अक्षर शब्दात आहे पण तुमचे स्थान चुकले आहे. ३. राखाडी : ते अक्षर त्या शब्दात अजिबात नाही. आता पहिल्या ओळीतील हे रंगीत दृश्य हेच तुमचे पुढचे शोधसूत्र ठरते. त्यानुसार तुम्ही सुधारित शब्द पुढच्या ओळीसाठी तयार करायचा. हा करताना एक लक्षात ठेवायचे : • हिरव्या अक्षराचे स्थान कायम ठेवायचे • वर ज्या अक्षरांची चौकट राखाडी झालेली आहे ती अक्षरे वापरायची नाहीत. • जी अक्षरे पिवळी झाली होती त्यांचे स्थान बदलायचं. आता याप्रकारे नवीन जुळवलेला शब्द दुसऱ्या रांगेत भरा. पुन्हा enter दाबा. पुन्हा चौकटी ३ रंगांनी भरतील. असे करत करत जास्तीत जास्त सहा प्रयत्नात बरोबर उत्तर आले पाहिजे. ज्या क्षणी तुमचे उत्तर बरोबर येते तेव्हा सर्व चौकटी हिरव्या रंगाने भरतात व खेळ संपतो. ... एव्हाना तुमच्या लक्षात येईल की हा खेळ आपल्यातील कोणीही खेळू शकतो- अगदी दहावी पास विद्यार्थी देखील ! त्यासाठी शब्दार्थ, समानार्थ अशा भाषाज्ञानाची गरज नाही. तुम्हाला लढवायचा आहे तो तुमचा तर्क. या प्रकारे दैनंदिन खेळ तीन-चार दिवस खेळलात की त्याची गोडी लागते. लवकरच त्याचे व्यसन जडते ! मग 24 तासांसाठी फक्त एक शब्द पुरत नाही. 😀 मग काय करायचे ? घाबरू नका त्यासाठी पुढची पायरी तयार आहे : 2. संग्रहित खेळ : इथे हवा त्या प्रकारे खेळ निवडण्याचे विविध पर्याय आहेत. त्यातील choose बटणावर टिचकी मारल्यावर तुमच्यापुढे १ पासून कालपर्यंत झालेल्या दिवसांचे अंक आहेत. कुठल्याही शब्दाचे उत्तर अर्थातच कुठेही दिलेले नाही. तुम्ही कुठलाही अंक निवडा किंवा Random हे बटन निवडूनही खेळ सुरू करू शकता. या प्रकारे तुम्ही एकाहून अधिक शब्द लागोपाठ तुमच्या आवडीनुसार खेळू शकता. हे खेळता-खेळता तुमचे इथले सर्व शब्द संपले आणि तुम्ही जर अट्टल व्यसनी झालेला असाल तर मग पुढची पायरी तयार आहे : 😄 3. अमर्यादित खेळ : तुमच्या सवडीने कधीही इथे या आणि हवे तेवढे खेळत बसा ! पण याची शिफारस मी करत नाही. इथे त्यांनी शब्दखेळांचे काही मूलभूत नियम पाळलेले नाहीत. नवोदितांनो, या तर, सुरू करा या खेळाच्या दैनंदिन प्रकारापासून. तुमचे अनुभव जरूर लिहा. मात्र एखादा दिवस(24 तास) संपल्याशिवाय ओळखलेला शब्द इथे लिहू नका. कारण तोच शब्द त्या संस्थळावर सर्वांसाठी समान असणार आहे. या पंचाक्षरीचे व्यसन लागण्याची खात्री आहे ! तेव्हा स्वतःच्या जबाबदारीवर त्यात पडा !! पण घाबरायचे कारण नाही. शब्दांचे तळीराम झाल्याने नुकसान काहीच नाही !!! तर्कबुद्धी मात्र तल्लख होईल !!!! 😉 ……………………………………………………………………………………………………………………………..

वाचने 39259
प्रतिक्रिया 114

प्रतिक्रिया

आजचा हा कुठलातरी कोपऱ्यातला देश "ऐकला" नाही बुवा कधी ! #Worldle #59 4/6

In reply to by हेमंतकुमार

:-)) क्लू देण्याची तुमची सवय काही जात नाही बुवा. ;-)

In reply to by गवि

काय करणार! चांगले भारत, अमेरिका ,कॅनडा ,ब्राझील असे देश दिले तर काही गरज नाही हो :)) काही तरी हुडकून काढतात हे लोक

५१ खेळलो. ९८% जमले. आज लागोपाठ २५व्यांदा जमले. एकदा दुसरा प्रयत्न (मी पहिले दोन शब्द POWER आणि NASTY वापरतो. एकदा हवा असलेला शब्दच NASTY होता..!) १० वेळा तिसरा प्रयत्न १३वेळा चौथा १६ वेळा पाचवा प्रयत्न ९ वेळा सहावा प्रयत्न

In reply to by गवि

मला वाटलं आता पाच अक्षरी कोणी खेळत नसेल. शिवाय संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. पॉइंट नोटेड. पुढच्या वेळी योग्य तिथे मास्किंग केले जाईल..

In reply to by तुषार काळभोर

म्हटले तर विशेषनाम म्हटले तर क्रियापद !

आजचा देश अगदी ठळक असून प्रथमच पहिल्या फटक्यात जमला ! #Worldle #62 1/6

६ अक्षरीचे संस्थळ व नाव बदलले आहे . योग्य अक्षरासाठी आता निळा रंग येतो ..... भूगोल : #Worldle #63 1/6 (100%). सोपा !

In reply to by हेमंतकुमार

सहा अक्षरीच्या संस्थळावर चार पाच व सहा अक्षरी अशा तीन खेळांचा एकत्रित अंतर्भाव केलेला आहे.

आज पंचाक्षरीचे शतक पूर्ण झाले. ९९ प्रतिशत यश आतापर्यतं एकदा Lollypop समजून lolly च्या मागे धावलो आणि Lowly वाटले.

या खेळाचा आनंद लुटणाऱ्या सर्वांना शुभेच्छा ! अनुभवांची देवाण-घेवाण होतच राहील...

सांख्यिकीय दृष्टीकोन ! आमच्या सांख्यीकीय फील्ड मध्ये काम करणार्‍या एका मित्राने वर्डल सोडवण्याची ऑप्टिमल स्ट्रॅटेजी शोधुन काढली आहे ती म्हणजे -

ब्लॅक यंग डेप्थ आणि फर्म्स

हे चार शब्द पहिल्यांदा वापरायचे. ह्या चार शब्दात २० वेगवेगळे लेटर्स आहेत आणि सर्वच्या सर्व वॉवेल्स कव्हर केली जात आहेत , आणि समजा ह्यातही सर्व ५ भिन्न लेटर्स न मिळाल्यास उर्वरीत लेटर्स ही क्यु , डब्ल्यु , झेड, जे, एक्स , आणि व्ही ह्यामधीलच असणार हे निश्चित होते . सो बहुतांश केसेस मध्ये तुम्हाला पाचव्या ट्राय फायनल सोल्युशन मिळुन जाते ! हा सक्सेस रेट वापरुन आमचा स्कोर १००% आहे ! स्टॅटिस्टिक्स रॉक्स !!

#Worldle #112 4/6 (100%) आजचा न ऐकलेला देश शोधल्यानंतर मला हिंदी चित्रसृष्टीतील एका बहुचर्चित अभिनेत्रीची आठवण झाली !

Worldle #118 3/6 (100%) कालचा देश बऱ्याच नामांतरांतून गेलेला आहे त्याचे सर्वात नवे नाव सर्व नकाशांमध्ये नसते

कालच्या आणि आजच्या देशांचा आकार अगदी शिस्तबद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे पहिल्या प्रयत्नात ओळखता आले #Worldle #149 1/6

#Worldle #153 4/6 (100%) आजचा जो देश आहे, त्यांची कथाकथन ही समृद्ध परंपरा आहे.

जगातील तीन देशांचे एक समान भौगोलिक वैशिष्ट्य आहे. या प्रत्येक देशाभोवती संपूर्णपणे दुसऱ्या देशाने वेढा घातलेला असतो. आजचा देश या तिघांपैकी एक आहे

आजच्या देशाबद्दल काय बोलावे ? त्याचे नाव काढताच भारतीयाला ...... जाऊद्यात झालं... :) तो धागा पण झाला आहे....

WORLDLE भूगोलाच्या खेळात नुकतेच त्यांनी काही नाविन्य आणलेले दिसते. देश ओळखून झाल्यानंतर पुढे काही फेऱ्या सुरू होतात. त्यातल्या पहिल्या फेरीत दोन नकाशे देऊन संबंधित देशाचे शेजारी ओळखायचेत. त्यानंतर पुढच्या फेरीत देशाची राजधानी आणि नंतर देशाचा नकाशा ओळखायचा असतो. हे गुगल न करता न आल्यास खरी मजा. पाहून उत्तर दिल्यास सामान्यज्ञानाची उजळणी ! :)

In reply to by हेमंतकुमार

आणि नंतर देशाचा नकाशा >>> झेंडा असे वाचावे

आज नऊशे नव्याण्णववा भाग होता. उद्या हजारावा असेल. आठ नऊ महिन्यापूर्वी मोबाइल रिसेट करावा लागला आणि शून्यातून सुरुवात करावी लागली. त्यानंतर nytimes मध्ये गुगल login करून ठेवल्याने पुन्हा तसं होणार नाही, अशी आशा आहे. तसेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सहलीमुळे एक दिवस सोडवणे राहून गेलं. सद्यस्थिती - STATISTICS Number of games played 255 Win percentage, 100% Current Streak count, 65 GUESS DISTRIBUTION 1 - 0 2 - 6 3 - 66 4 - 92 5 - 70 6 - 20 (माझी सरासरी ४.१ होते)

In reply to by तुषार काळभोर

छान आढावा. मी सुद्धा हे पाच अक्षरी आणि अन्य एका ठिकाणी असलेले सहा अक्षरी नियमित सोडवत असतो

हा धागा वर आल्याच्या निमित्ताने खूप महिन्यांनी किंवा कदाचित एका वर्षाने आठवण होऊन वर्डल सोडवले. पाच प्रयत्न. त्यानंतर खाय खाय लागून वर्ल्डल सोडवायला घेतले. पण ते क्वचितच सुटते. मग उत्साह बसला. :-))

In reply to by गवि

छान ,:) पाच अक्षरी वर्डलमुळे काही बिगर इंग्लिश देशांमधले खाद्यपदार्थही समजले. ते आता सामान्यनाम म्हणून इंग्लिशमध्ये स्वीकारले गेलेले आहेत उदाहरणार्थ, sushi, bagel

आजच्या पाच अक्षरी wordle मधील शब्द प्रथमच ऐकला. एकदम वैशिष्ट्यपूर्ण ! सोडवून पहाच !!

In reply to by अमेरिकन त्रिशंकू

तो उद्गारवाचक आहे . ..... , and voila ! या पाच अक्षरी शब्दकोड्यात अंत्य a/ i वाले शब्द सटीसहामाशी येत असतात तेव्हा मजा येते. हा खेळ घरी आता जुना झाला असला तरीही आपण काही व्यसनी लोक त्यात अजून आहोत हे पाहून बरे वाटले ! :)

१.
फ्रेन्च शब्द आहे
होय, त्यामुळे त्याचे कोशातील शुद्धलेखन खास पद्धतीने आहे ! .. २.
तिसऱ्या गेसमधेच आजचा शब्द सुटला.
वा ! " a " चे स्थान समजणे महत्त्वाचे होतेच त्याची थोडीशी स्पेलिंगची अदलाबदल केली की एकदम वेगळीच वस्तू . . . :)