प्रीसिशन सर्जिकल स्ट्राईक करणारा आणि मधमाशांचं पोळं उठवणारा कश्मीर फाईल्स!!
प्रीसिशन सर्जिकल स्ट्राईक करणारा आणि मधमाशांचं पोळं उठवणारा कश्मीर फाईल्स!!
नमस्कार. आपण सर्व कसे आहात? नुकताच कश्मीर फाईल्स चित्रपट बघितला. त्याबद्दलचे माझे विचार शेअर करतो. कदाचित आपल्याला काही मुद्दे पटतील आणि काही पटणार नाहीत. पण वेगवेगळे अँगल्स, विचार आणि दृष्टिकोन कमीत कमी विचारात तर घ्यायचे असतात ना. म्हणून हे शेअर करावसं वाटलं.
कधी ट्रेकिंग, कधी फिरण्यासाठी तर कधी मदत कार्यासाठी कश्मीरला प्रवास झाले. कश्मीर खो-यात अनेक जागी फिरायचा योग आला- श्रीनगर, पुलवामा, अनंतनाग, छत्तीसिंगपोरा (जिथे बिल क्लिंटन भारतात आले असताना ३६ शीखांना मिलिटरीच्या पोशाखातील अतिरेक्यांनी ठार मारलं होतं) आणि शंकराचार्य हिलसुद्धा! लहानपणापासून कश्मीरबद्दल खूप वाचलं होतं. हा चित्रपट बघताना मी बघितलेलं कश्मीर, तिथे अनुभवलेल्या गोष्टी व घटना आठवल्या. जम्मूमधून टॅक्सीने श्रीनगरला जाताना सोबतचे कश्मीरी लोकांचं अबोल असणं आणि बोलणं टाळणं, श्रीनगरमध्ये ऑटो रिक्षावाल्याने पहिले हिंदु का मुसलमान हे विचारणं, श्रीनगरमध्ये गोळीबार, दगडफेक (स्टोन पेल्टिंग) बघणं, छत्तीसिंगपोरामध्ये अजूनही शीख लोक राहात असलेले दिसणं, अनंतनागला इस्लामाबाद आणि शंकराचार्य टेकडीला सुलेमान टॉप म्हंटलं जाणं, काही स्थानिक लोक सतत एक प्रकारचं अंतर ठेवून असणं, सेनेच्या सततच्या मोठ्या उपस्थितीमुळे स्थानिकांना होत असलेली गैरसोय हे सगळं बघितलं. हेसुद्धा अनुभवलं की, अनेक प्रकारचे फरक, भिन्न पार्श्वभूमी, वेगळ्या प्रकारचं राहणीमान हे सगळं असूनही लोकांमध्ये आत्मीयता आणि सरलताही आहे. मधुर कश्मिरी बोलीमध्ये हिंदी व संस्कृत शब्दही ऐकले. ह्या सगळ्या अनुभवांच्या आधारे म्हणावसं वाटतं की, ह्या चित्रपटाने सगळ्यांसमोर असं एक सत्य आदळलं आहे जे बहुतांश लोकांसमोर आत्तापर्यंत आलेलं नव्हतं.
(जम्मू- कश्मीरमध्ये २०१४ मध्ये आलेल्या महापुराच्या वेळच्या मदत कार्यातील सहभागाचे अनुभव इथे वाचता येऊ शकतात निरंजन वेलणकर 09422108376, niranjanwelankar@gmail.com)
चित्रपट बघून वाटलं की अगदी विचारपूर्वक हा एक प्रकारे केलेला सर्जिकल स्ट्राईकच आहे. ज्या सिस्टीमने आजपर्यंत हे सत्य समोर येऊ दिलं नव्हतं, त्या सिस्टीमवर हा सरळसरळ केलेला हल्ला आहे. चित्रपटाचं सादरीकरण, कलाकारांचे अभिनय, मांडणी इ. बद्दल काही सांगण्याची गरज नाही. फक्त इतकंच म्हणेन की, चित्रपट अतिशय सटीक वार करणार आहे आणि एक प्रकारे मधमाशांचं पोळं उठवणारा आहे. निश्चितच वेगवेगळे कंगोरेही ह्या पूर्ण विषयाला आहेतच. पण चित्रपटाचा हेतुच मुळी एक बाजू समोर आणणं आहे आणि चित्रपट त्यामध्ये यशस्वी झाला आहे. कोणत्याही विषयाला ३६० अंशाने बघताना अनेक अनेक मुद्दे समोर येतात, बाजू दिसतात. त्या आहेतच. पण तरीही चित्रपटात जे सत्य समोर मांडलं गेलंय, ते ज्वलंत सत्य आहे. आणि ते आपल्याला ज्वलंत ह्यामुळे वाटतं, कारण आजपर्यंत त्या दिशेमध्ये घनघोर अंध:कार होता.
शेवटी इतकम्च म्हणेन की, हा चित्रपट जो परस्पेक्टीव्ह देतो, तो कोणाच्या विरुद्ध नाही आहे. जे आहे, ते अगदी प्रामाणिकपणे समोर आणलं गेलंय. आणि सत्य नेहमी कडवंच असतं. सत्य सहन करण्यासाठी तर मोठी हिंमत आणि साहस पाहिजे. ह्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विवेक अग्निहोत्री जी आणि अन्य सर्वांचं खूप अभिनंदन! प्रकाशात आलेल्या ह्या सत्याची जवाबदारी आपण सर्वांची आहे. आपल्या देशातील पूर्ण सिस्टीम, पूर्ण प्रशासन आणि समाजतंत्र त्यासाठी जवाबदार आहे. इतकीच अपेक्षा आता आहे की, आपण सगळ्यांकडे वेगवेगळे दृष्टीकोन आणि परस्पेक्टीव्हज ऐकून घेण्याची व त्यांच्यावर विचार करण्याची क्षमता यावी व जे आहे ते खरं खरं बघण्याचं साहस यावं. तसं झाल्यास आपण ह्या चित्रपटातून शिकलो असं म्हणता येईल. धन्यवाद.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सहमत
पुढें काय घडते ते
सर्व जागृत जनते नी काश्मीर
तुमचे मुद्दे
सहमत
सर्वांना धन्यवाद!
काश्मीरमधे निवडणुका झाल्यावर
चित्रपटाचे परिक्षण आवडले