सोशल नेटवर्क

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
20 Feb 2022 - 9:42 pm

"So are you Indian?"

स्पेनच्या उत्तर पश्चिम टोकाला असणार्‍या A Coruña ह्या छोट्याशा शहरातल्या Take Away काउंटर पलिकडे Soledad नावाचा बॅज लावलेल्या त्या मुलीने माझ्या चेहर्‍याकडे बघून मी भारतीय आहे हे ओळखलं ह्यात काय कौतुक? ह्यांना प्रत्येक brown माणूस भारतीय वाटणारच.

"Yes Soledad, I am."

"व्हॉत पार्त ऑफ इंदिया?"

"आय अ‍ॅम फ्रॉम अ सिटी कॉल्ड पूने." (माझा "पूने" उच्चार प्रश्नार्थक असतो)

ओSSSह पु"णे"??? (मी चाट!). "एम जी रोड? कोरेगांव पार्क?? दागडूशेट गानापती बाप्पा मोरया!!!"

"सो यू'व बीन टू पुणे?" (माझे उच्चार सुधारले!)

"येSSस...थ्री मोंथ्स...ब्यूतिफुल प्लेस... लवली पीपुल!"

Soledad माझ्याकडून लंचचे पैसे घेत नाही - तिला मिळणारं कुपन जमा करते. माहेरचा माणूस भेटावा तशी मला काय हवं नको विचारत राहाते.

-----------------

"पण्डितजी, ये मॉर्गनजी हैं और ये बच्चे हमारे गुरुजीकी बेटी सावनीसे तबला सीख रहें हैं| इनको बनारस देखना है|"

बस्स! इतकी ओळख पुरेशी असते. पुढचे दोन तास तालवाद्य विभाग प्रमुख डॉ. प्रवीण उद्धव काशी हिंदू विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाची साद्यंत माहिती देतात. संध्याकाळी पं. कन्हैयालाल मिश्रा पूर्ण कबीर चौरा हिंडवतात. बिरजू महाराज, सितारादेवी, राजन-साजन मिश्रा ह्यांची घरं दाखवतात. पं. रामसहाय, पं. कण्ठेमहाराज ह्यांच्या घरी घेऊन जातात. आजोबांनी नातवंडांना सांगावं तश्या प्रेमानी मुलांना मार्गदर्शन करतात.

----------------

"काय मामा, कसा काय बाजार?" बायको भाजी घेत असताना मी अगदी सहजच भाजीवाल्या मामांना विचारतो.
"सातार्‍याऊन यायाला उशीर जाला...आत्ता कुटं सुरू करतोय"
"सातारा? कोणतं गाव?"
"चिंधवली"
"म्हंजे आप्लं भुईंज - चिंधवली? - अहो मी पाचवडचा!"
"असंय व्हंय? पुन्याला कवापास्नं?"
... आम्ही उगाच २ मिनिटं बोलत बसतो. बायकोचे पैसे देऊन झाल्यावर मामा पाटीखालची चार वांगी काढून पिशवीत टाकतात. "ह्याचे किती?" विचारल्यावर "अवो 'आपल्या' रानातली हायेत." म्हणत 'काय वंगाळ प्रश्न इचारता?' असा कटाक्ष टाकतात.

------------------

"आणि ऐक...शक्यतो बाहेरचं खाऊ नकोस... इथे आहेस तोपर्यंत जेवायला माझ्याकडेच येत जा." - बायको फोनवर कोणालातरी सांगत असते.
"कोण गं"?
"अरे ती अक्षता - ग्वाल्हेरहोऊन आली आहे कथक शिकायला. खूप गुणी आहे. होस्टेलवर राहणं आणि मेसचं जेवण काय असतं मला महितीये. इतकं तर करू शकतोच ना आपण?"

------------------

"दत्ताभाऊ - आपण ड्रायक्लीनिंग करू शकू का?"
"करू की"
"मग फ्लेक्सवर वॉशिंग अँड ड्रायक्लीनिंग पण टाकू?"
"चालेल साहेव."
"उद्या सकाळी ११ पर्यंत फ्रेम 'आपल्या' दुकानावर पोहोचेल. असाल ना?"
"हो अशेन ना.... थॅंक यू साहेव."
"बास का दत्ताभाऊ... थॅंक यू सोडा...दुकान सेट झालं की एकदा वहिनींच्या हातचा शिरा खायला बोलवा!"

......... आमचं "सोशल नेटवर्क" वाढत असतं!

- जे.पी.मॉर्गन

समाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

सुखी's picture

20 Feb 2022 - 11:05 pm | सुखी

झकास

श्री ट्रंप यानी स्वत:चे समाज माध्यम सुरु केले आहे.
https://truthsocial.com/
https://en.wikipedia.org/wiki/Truth_Social

मुक्त विहारि's picture

20 Feb 2022 - 11:26 pm | मुक्त विहारि

माणसे ....?????...????...

असे शीर्षक देऊन, एखादी कथामालिका लिहीता येईल...

श्रीगणेशा's picture

21 Feb 2022 - 12:48 am | श्रीगणेशा

छान विषय. वेगळी मांडणी. परिणामकारक!

कर्नलतपस्वी's picture

21 Feb 2022 - 9:04 am | कर्नलतपस्वी

आज काल अनोळखी लोक अंतर ठेवून वागतात. पण थोडे काळजाला हात घातला तर खुलतात. स्वानुभव. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी
ओळखी होतात.

ते भुईंज पाचवड चिंधवली असंच नाव माहीत आहे म्हणून लिहिले आहे का आपण खरंच तिकडचे आहात?

जे.पी.मॉर्गन's picture

21 Feb 2022 - 8:50 pm | जे.पी.मॉर्गन

जन्म पुण्याचा - नाळ पाचवडची :-)

रावसाहेब चिंगभूतकर's picture

22 Feb 2022 - 10:45 am | रावसाहेब चिंगभूतकर

नाळ म्हणजे जन्म का? नाळ जमणे हा वाक्प्रचार ऐकला आहे, पण बहुधा पूर्वीपासून जन्मगाव असा त्याचा वापर सुरू झाला असावा का?

नाळः आई आणि बाळ यांचामधील गर्भाशयात असलेली जोडणी.
https://en.wikipedia.org/wiki/Placenta

नाळ तुटणे हा वाक्प्रचार सुध्द्दा आहे.

अमेरिकन त्रिशंकू's picture

23 Feb 2022 - 5:22 pm | अमेरिकन त्रिशंकू

नाड (नाडी) जुळणे असा वाक्प्रचार आहे.

मुक्त विहारि's picture

23 Feb 2022 - 8:08 pm | मुक्त विहारि

नाडी जमली तर उत्तम नाहीतर हालत बेकार ...

सोत्रि's picture

21 Feb 2022 - 10:38 am | सोत्रि

छान विषष!

-(सोशल) सोकाजी

योगायोगचे नेटवर्किंग मस्त!!

फारच छान मांडणी. खूप आवडले !

कंजूस's picture

21 Feb 2022 - 8:57 pm | कंजूस

काहिंना हे छान जमते.

सरिता बांदेकर's picture

21 Feb 2022 - 10:29 pm | सरिता बांदेकर

छान लिहीलंय.

चौथा कोनाडा's picture

22 Feb 2022 - 11:53 am | चौथा कोनाडा

मस्त ! झकास ! छान लिहिलंय, शॉर्ट फिल्म सारखं, प्रसंग डोळ्यापुढे तरळून जातात !
माणूस जितका बोलका, तितिक जग मोठं, मित्र परिवार मोठा !
छान अनुभव येतात असे !