वजनकाटावाला
---------------------
तो चौकात वळणावर बसायचा . वजनकाटा घेऊन.
पांढरा पायजमा ,पांढरा नेहरू शर्ट आणि पांढऱ्याच मिशा . सावळासा देह. वय झालेलं असूनही अंगाने तो चांगला होता . रोज सकाळी तो त्याच्या काट्याला नमस्कार करून स्वतःचं वजन बघायचा. म्हणजे धंदा चांगला होतो अशी त्याची श्रद्धा होती.
त्याचा वजनकाटा सर्वधर्मसमभाव मानणारा होता .
त्याच्याकडे लहान अवखळ पोरं , लुकड्या पोरी , मध्यम वजनाची मध्यमवयीन माणसं आणि जाड्याजुड्या बायका , सगळेच यायचे .
चौक बदलला . शेजारचं दारूचं दुकान मोठं झालं . चायनिजच्या नव्या गाड्या रस्ता अडवू लागल्या .
तो तसाच राहिला .
एके दिवशी लॉकडाउन पुकारण्यात आलं . पहिलं . कडक ! सगळं बंद !
त्याचा वजनकाटाही. त्याला कितीही नमस्कार केला तरी त्याचा काहीच उपयोग नव्हता आता . तो आणि त्याच्यासारखी माणसं अशा वेळी काय करतील ?... कोरोनाला त्याच्याशी काहीच घेणंदेणं नव्हतं ... आणि कोणालाच ... प्रत्येकाला आपलं आपलं पडलेलं .
रोज कमवायचा तेव्हा खायचा तो . अवघड परिस्थिती झाली . बाहेर पडायची चोरी . करायचं काय ? त्याच्याकडे बँक बॅलन्स थोडाच होता ? की वर्क फ्रॉम होम ? की घरी बसून पगार ? ...
म्हाताऱ्याची अन्नानदशा झाली . भीक मागायला लागला तो .
वजनकाटा मात्र तो उराशी बाळगून होता . पडलाझडला तरी - शेवटी पोटपाणी होतं ते त्याचं .
लॉकडाउनच्या ऑक्टोपससारख्या नांग्यांनी जीव गुदमरायला लागल्यावर काही जणांना काही लोकांच्या भुकेकंगालपणाची जाणीव झाली . ती अशी भुकेकंगाल माणसं होती की जी कायमची भिकारी नव्हती . पण वेळच अशी वाईट आली होती . पोट माणसाला सारं विसरायला लावतं ! लाचारी पत्करायला लावतं xxx !
मग अन्नदान सुरु झालं . थोडयाफार गरीब बिचाऱ्या जनतेची भूक तरी भागू लागली . थोडीफार. तोही रांगेत उभं राहू लागला . दोन टायमाला गिळू लागला . xxxx , जीवजाळ्या भुकेला बुस्टर डोसच जणू ! पण पुढे ? ...
अशा अवघड काळातही देशात अब्जाधीशांची संख्या एकेकाने वाढत होती ; तेव्हा त्याच्यासारख्या लोकांच्या फाटक्या पत्रावळींवरचं एकेक शीत कमी होत चाललं होतं .
परिस्थितीच्या पारड्यात त्याचं वजन कमीच होतं .
त्याची परिस्थिती आणखी बिघडत गेली . त्याच्या डोईवरचे केस आणखी राठ झाले. तो आणखी म्हातारा दिसू लागला . खंगला बिचारा .
एके दिवशी तो त्याच चौकात मरून पडला .
कॉर्पोरेशनच्या लोकांनी त्याला सहज उचलला , कारण त्यावेळी त्याचा देह वजनाला कापसासारखा हलका झाला होता .
बाजूला पडलेला वजनकाटा पोरका झाला होता . त्याचं आता कोणीच नव्हतं . तो धुळीने भरला होता , त्याचा काटाही तुटला होता , त्याची वाट लागली होती ... मालकासारखी अन भंजाळलेल्या विस्कळीत समाजासारखी .
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4577
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
हृद्रयविदारक
विदारक
अरे रे
एकदम सहमत
In reply to अरे रे by ज्ञानोबाचे पैजार
करून नक्कीच आहे. पण एक प्रश्न
नाय विजूभाऊ गरीबी फार वाईट,
In reply to करून नक्कीच आहे. पण एक प्रश्न by विजुभाऊ
कळत नाही काय प्रतिक्रिया द्यावी
सरकार दरबारी
हृदयद्रावक
सहमत. खरोखर हृदयद्रावक कथा
In reply to हृदयद्रावक by श्रीरंग_जोशी
ह्रुदयद्रावक कथा
लोकसंख्यावाढीची कारणे
In reply to ह्रुदयद्रावक कथा by सुखीमाणूस
सर्व वाचकांचे खूप आभार
कथेबद्दल लिहावंसं वाटतं - पण
:(
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Siva Jag Mein... :- Tadap