उगवला...चंद्र सुगीचा

नंदन's picture
नंदन in जनातलं, मनातलं
27 Sep 2007 - 3:02 pm

Harvest Moon
[आजच्या पूर्णचंद्राचे छायाचित्र.]

आज भाद्रपद पौर्णिमा. पाश्चात्य परिभाषेत 'हार्वेस्ट मून'. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात साधारण २३ सप्टेंबरच्या सुमाराला ऑटम्नल इक्विनॉक्स असतो. (याला मराठीत शरद-संपात किंवा शारदीय विषुवदिन म्हणता येईल. मोल्सवर्थच्या शब्दकोशात 'विसुपद' आणि 'ससद्भक्रांतिपथ' असे काही अर्थबोध न होणारे प्रतिशब्द आहेत.) या ऑटम्नल इक्विनॉक्सच्या सर्वात जवळ जी पौर्णिमा येते, तिला हार्वेस्ट मून म्हणतात. या हार्वेस्ट मूननंतर जी पौर्णिमा येते, ती 'हंटर्स मून' म्हणून ओळखली जाते. जानेवारीत येणारा 'वूल्फ मून' ते डिसेंबरमध्ये येणारा 'कोल्ड मून' अशी प्रत्येक 'मुनाला' वेगवेगळी नावे आहेत.

हार्वेस्ट मूनचे महत्त्व थोडे वेगळे आहे. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी, सूर्यास्त आणि चंद्रोदय साधारण एकाच वेळी होतात. पण मग जसजसा कृष्णपक्ष सुरु होतो आणि चंद्राची कोर लहान लहान होत जाते तसतसा सूर्यास्त आणि चंद्रोदयाच्या वेळेत फरक पडत जातो. संपूर्ण वर्ष विचारात घेतले, तर प्रत्येक दिवशी हा फरक सरासरी ५० मिनिटांचा असतो. उत्तर गोलार्धात, डिसेंबर - जानेवारीच्या सुमाराला हा फरक सर्वाधिक म्हणजे साधारण ७० मिनिटांचा असतो. म्हणजे, जानेवारीतील पौर्णिमेला चंद्रोदय संध्याकाळी ६ वाजता झाला, तर दुसऱ्या दिवशीचा चंद्र ७० मिनिटे उशीरा म्हणजे ७ वाजून १० मिनिटांनी उगवेल. हार्वेस्ट मूनचे वैशिष्ट्य हे की, या सुमाराला हा फरक किमान म्हणजे फक्त ३० मिनिटांचा असतो. [कृपया तक्ता पहा.]

याचाच अर्थ सूर्यास्त आणि चंद्रोदय यांच्यातला कालावधी या महिन्याभरात सर्वात कमी असतो. त्यामुळे उत्तर गोलार्धात जेव्हा या सुमाराला सुगी जवळ येते, तेव्हा शेतकऱ्यांना काम करायला सूर्यास्तानंतरही थोडा अधिक वेळ मिळतो.

गेल्या पौर्णिमेला प्रथमच पूर्ण चंद्रग्रहण पाहता आले होते. त्याआधी जूनमध्ये ब्ल्यू मून होता (एकाच महिन्यात जेव्हा दोन पौर्णिमा येतात, तेव्हा त्या दुसऱ्या पूर्णचंद्राला 'ब्ल्यू मून' म्हणतात. 'वन्स इन द ब्ल्यू मून' या वाक्प्रचाराचा स्रोत.) आज हार्वेस्ट मून पाहिला. आता एका महिन्याने कोजागिरी. अगदी 'नवीन आज चंद्रमा...' किंवा This moon just one म्हणावं, असे चांद्र-योग!

[अवांतर - पौर्णिमेचा चंद्र उगवताना कधीकधी आहे त्या आकारापेक्षा बराच मोठा का दिसतो, याचं स्पष्टीकरण येथे वाचता येईल.]

लेखासाठी संदर्भ --
१. http://spaceweather.com
२. http://science.nasa.gov/headlines/y2000/ast11sep_2.htm

हाच लेख येथेही वाचता येईल.

विज्ञानशिक्षणमौजमजालेखमाहितीआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

27 Sep 2007 - 3:08 pm | विसोबा खेचर

त्याआधी जूनमध्ये ब्ल्यू मून होता (एकाच महिन्यात जेव्हा दोन पौर्णिमा येतात, तेव्हा त्या दुसऱ्या पूर्णचंद्राला 'ब्ल्यू मून' म्हणतात. 'वन्स इन द ब्ल्यू मून' या वाक्प्रचाराचा स्रोत.)

क्या बात है नंदनशेठ! तुझ्यासारख्या बहुश्रुत आणि चोखंदळ व्यक्तिने इथे स्वतःहून एक लेख लिहिला याचा खूप आनंद वाटला!

लेख छान आहे, चांदोबाचं चित्रही छान आहे. आणि हो, इथे नेहमी लिहीत जा रे! नाहीतर च्यामारी तुझे लेखही 'वन्स इन द ब्ल्यू मून' यायचे! :)

आपला,
(भास्करप्रेमी) तात्या.

सहज's picture

27 Sep 2007 - 3:18 pm | सहज

सुरेख सचित्र माहिती. असे काहीतरी वरचेवर तुमच्याकडून वाचायला मिळो.

मस्त!

-----------------------------------------------------------------------------------------------
कळल का प्रमोदराव आज ते तुमच्याशी तावातावान कसे वाजत होते. निसर्गनियम हो, चंद्राचा प्रभाव जास्त होता! दोष ना कुणाचा

प्रमोद देव's picture

27 Sep 2007 - 3:36 pm | प्रमोद देव

नंदन खूपच छान लेख लिहिला आहेस! पण फार वाट पाहायला लावतोस!

कळल का प्रमोदराव आज ते तुमच्याशी तावातावान कसे वाजत होते. निसर्गनियम हो, चंद्राचा प्रभाव जास्त होता! दोष ना कुणाचा
हा!हा!हा!
असू द्या हो सहजराव! मित्रांना परवानगी आहे!

बेसनलाडू's picture

27 Sep 2007 - 3:54 pm | बेसनलाडू

चायनीज लोकांचा हा उत्सव आहे, असे कालच कळले. म्हणजे चायनीज क्यालेन्डरप्रमाणे वर्षात जितके वेळा पूर्ण चंद्र दिसतो, त्यातला सगळ्यात मोठा (म्हणजे नक्की काय ते नीटसे कळले नाही :))) कालच्या/आजच्या दिवशी दिसतो, अशी माहिती हापिसातील चिनी सहकार्‍याकडून कळली. त्याचबरोबर सन्त्रे, खोबरे, अन्डी वगैरे घालून केलेला डिट्टो आपल्या 'खान्डवी' च्या चवीचा 'मूनकेक' हादडायला मिळाला.
(चविष्ट)बेसनलाडू

लेख छान, आटोपशीर आणि सहज. छायाचित्रही सुंदर. आणखी लिहा, दमाने वेळ काढून लिहा. म्हणजे गुंडाळल्यासारखे वाटायचे नाही. चित्र बघून खाली वाचायलाघेतले तोच संपले, अशी अतृप्त भावना येऊ नये, असे एक वाचक म्हणून वाटले.
(सविस्तर)बेसनलाडू

सहज's picture

27 Sep 2007 - 4:06 pm | सहज

ह्याला मीड्-ऑट्म फेस्टिवल असे म्हणतात.

मोठा सण असतो. ह्याच्या अगोदर त्यांचा महीनाभर सेवन्थ मन्थ (पितृ पंधरवड्यासारखा महीना) असतो. तेव्हा म्हणे गेलेली मंडळी पृथ्वीवर येतात तर त्यांची शांत करायला काय काय करत असतात.

धम्मकलाडू's picture

28 Sep 2007 - 1:43 pm | धम्मकलाडू

लेख आटोपशीर. वाचतान कंटाळा येत नाही. तिर्पा बेसनलाडूसिंग मि असह्मत हाये.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"

खूपच माहितीपूर्ण लेख

हा भाग नीट समजला नाही :

> जानेवारीतील पौर्णिमेला चंद्रोदय संध्याकाळी ६ वाजता झाला,
> तर दुसऱ्या दिवशीचा चंद्र ७० मिनिटे उशीरा म्हणजे ७ वाजून
> १० मिनिटांनी उगवेल. हार्वेस्ट मूनचे वैशिष्ट्य हे की, या
> सुमाराला हा फरक किमान म्हणजे फक्त ३० मिनिटांचा असतो.

कुठल्याही महिन्यात पूर्णिमेचा चंद्र संध्याकाळी ६ वाजता उगवेल, आणि अमावास्येला सकाळी ६ वाजता उगवेल. म्हणजे १४ दिवसांत १२ तास उशीरा = दररोज साधारण ५० मिनिटे उशीरा (लेखात सांगितलेली सरासरी). पण जानेवारीतली सरासरी ७० मिनिटे अशी असेल तर जानेवारीत अमावास्या पूर्णिमेनंतर ८-९ दिवसांतच येईल...

ही गोष्ट कदाचीत यावर अवलंबून असेल की चंद्राचे "ऑर्बिटल प्लेन" हे पृथ्वीच्या "ऍक्सिस"शी ९० अंशाच्या कोनात नाही. म्हणजे चंद्राची आकाश-मध्य वेळ कुठल्याही महिन्यात ~५० मिनिटे इतकीच लांबणार (दोन मध्यान्हवेळा वर्षभर २४ तासच असतात, त्याप्रमाणे), पण चंद्रोदय-काळ कमी जास्त होऊ शकेल... हंऽऽऽ (हम्म चा प्रतिशब्द) ... नंदन, आणखी थोडे समजावून द्या.

सूर्यास्त वर्षातून मागेपुढे होत असल्यामुळे सूर्यास्त-पूर्णचंद्रोदय मधील काळ कमीजास्त होतो हे कळले. पण तो सर्वात कमी २४ जूनच्या जवळच्या पूर्णिमेला होणार, कारण तेव्हा सूर्यास्त उत्तर गोलार्धात सर्वात उशीरा होणार...

नंदन's picture

28 Sep 2007 - 1:37 am | नंदन

शोधतो आहे. दरम्यान, कुठल्याही शहरातून वर्षभरात सूर्योदय/सूर्यास्त किंवा चंद्रोदय/चंद्रास्त कधी होतो, हे या दुव्यावरुन (http://aa.usno.navy.mil/data/docs/RS_OneYear.ph) पाहता येईल. चंद्रोदयाचा तक्ता पाहिला तर वरील विधानांचा पडताळा येतो खरा, पण त्यामागची कारणीमीमांसा आणि तक्त्यात मोकळ्या असणार्‍या जागांबद्दल खुलासा याची कारणे शोधायला हवीत.

धोंडोपंत/घाटपांडे साहेब, याबद्दल अधिक माहिती देऊ शकाल का?

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

चंद्राचे स्थिर-पृथ्वीभोवती भ्रमण २४ तास आणि ~५० मिनिटांचे असते. त्यामुळे काही २४ तासांच्या सौर दिवसात कधीकधी त्याचे उगवणे आणि मावळणे असे दोन्ही होत नाही. ज्या सौर तारखेला तसे आहे तिथे तक्त्यात मोकळ्या जागा आहेत.
आता हा तक्ता बघा. अक्षांश ०, रेखांश ०, चंद्रोदय/चंद्रास्त निवडा. बटणावर टिचकी मारल्यासरशी २००७ सालचा तक्ता दिसेल.

उदाहरणार्थ सप्टेंबर १८ ही शुक्ल सप्तमी-अष्टमीची रात्र घेऊ या. १८ सप्टे २३:१३ ला समजा चंद्र मावळला, तो १९ सप्टेच्या ~११:४० ला उगवला. आता तो पुन्हा मावळायला मागच्या मावळण्यापासून ~२४ तास आणि ५२ मिनिटे लागतील, पण तोवर सौर तारीख २० सप्टे चे ००:०६ झाले! म्हणजे १९ सप्टे ही सौर तारीख असताना चंद्र एकदाही मावळला नाही. मग १९ सप्टे तारखेला तक्त्यात चंद्र मावळण्याच्या ठिकाणी मोकळी जागा आहे.

जुना अभिजित's picture

27 Sep 2007 - 4:50 pm | जुना अभिजित

मागच्या वर्षी कोजागिरीला क्षितिजाजवळ मोठा दिसणार्‍या चंद्राचे फोटो काढले होते.

पण उगवल्यानंतर मात्र झपाट्याने वर येतो बुवा.

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

स्वाती दिनेश's picture

27 Sep 2007 - 6:09 pm | स्वाती दिनेश

लेख आवडला,छान लिहिला आहे.
जानेवारीत येणारा 'वूल्फ मून' ते डिसेंबरमध्ये येणारा 'कोल्ड मून' अशी प्रत्येक 'मुनाला' वेगवेगळी नावे आहेत.
थोडे विषयांतर : असेच आपल्या क्यालेंडरातही प्रत्येक पौर्णिमेचे काही वैशिष्ट्य आहे ना!
चैत्र- हनुमान जयंती, वैशाख-बुध्दपौर्णिमा,जेष्ठ- वट्पौर्णिमा,आषाढ- गुरुपौर्णिमा,श्रावण- नारळीपौर्णिमा/राखीपौर्णिमा भाद्रपद-? ,
अश्विन-कोजागरी पौर्णिमा,कार्तिक-त्रिपुरी पौर्णिमा,मार्गशीर्ष- दत्तजयंती,पौष- शाकंभरी पौर्णिमा,माघ- ? फाल्गुन-होळीपौर्णिमा.
भाद्रपद व माघ पौर्णिमेचे वैशिष्ट्य कोणाला माहित असल्यास सांगावे ही विनंती.
स्वाती

भाद्रपद- प्रौष्ठपदी पौर्णिमा , माघ-नव्याची पुनव ,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Sep 2007 - 6:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उगवला...चंद्र सुगीचा, माहिती आवडली !

सूर्यास्त आणि चंद्रोदय यांच्यातला कालावधी या महिन्याभरात सर्वात कमी असतो. त्यामुळे उत्तर गोलार्धात जेव्हा या सुमाराला सुगी जवळ येते, तेव्हा शेतकऱ्यांना काम करायला सूर्यास्तानंतरही थोडा अधिक वेळ मिळतो.

क्या बात है !

चित्र आणि दुव्यासहीतची माहिती आवडली ! येऊ दे आणखी असेच लेख.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिखाळ's picture

27 Sep 2007 - 8:18 pm | लिखाळ

वेगवेगळी चांद्र नावे वाचून मजा आली. नव्यानेच हे समजले.
आपल्याकडे सुद्ध असे काही आहे हे स्वातीताईंच्या प्रतिसादाने आताच जाणवले.
--लिखाळ.
तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

सर्किट's picture

27 Sep 2007 - 10:32 pm | सर्किट (not verified)

मिसळपावावर माहितीपूर्ण लेखनालाही परवानगी आहे तर !
नंदन छोटेखानी लेख आवडला. पौर्णिमेची रात्र असतेच सुंदर.
वरती स्वाती ताईंनी हिंदुंच्या पौर्णिमा दिल्या आहेतच.
पूर्ण चंद्राचा डोक्यावर परिणाम होतो, हे सहजरावांच्या प्रतिसादातही दिसतेच.

आणखी अशीच माहिती येऊ देत.

- (चांद्रसेनी) सर्किट

नंदन's picture

28 Sep 2007 - 1:38 am | नंदन

आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

प्रकाश घाटपांडे's picture

28 Sep 2007 - 8:40 am | प्रकाश घाटपांडे

ज्योतिर्वैभव - ले त्र्यं. गो. ढवळे यांच्या (दुर्मिळ) पुस्तकातील काही माहीती इथे१ आणि इथे२
बघा.
प्रकाश घाटपांडे

srahul's picture

20 Jan 2022 - 12:56 pm | srahul

धन्यवाद

चित्रा's picture

28 Sep 2007 - 8:56 am | चित्रा

चांगला आहे छोटेखानी लेख. आवडला.