*भारतीय चित्रपटात सर्वप्रथम*

srahul's picture
srahul in जनातलं, मनातलं
11 Jan 2022 - 3:31 pm

*भारतीय चित्रपटात सर्वप्रथम*
आता पर्यँत जी भारतीय चित्रपटाची वाटचाल झाली त्याला मुकपटा पासून धरलं तर १०० वर्षे पूर्ण होऊन गेली , बोलपटा पासून धरलं तर साधारण ७५ वर्षे पूर्ण होऊन गेली. या काळात प्रतिथयश लोकांनी या क्षेत्रात नवे नवे प्रयोग केले.या अस्थिर व्यवसायात रुळलेली वाट सोडून नवा रस्ता बनवणे हे जोखमीचे काम.पण तरी सुद्धा काही जिद्दी लोकांनी हे आव्हान स्वीकारलं आणि तो धोका पत्करला. काही यशस्वी झाले , काही अपयशी झाले. पण या साऱ्या धकाधकीतून आपण जो आजचा सिनेमा पाहतोय तो घडला.
एखादी गोष्ट जेव्हा प्रथम घडते तेव्हा तीन शक्यता असतात
१)हा बदल लोक लगेच स्वीकारतात , तो यशस्वी होतो आणि तो पायंडा पडून जातो.
२)हा बदल लोक स्वीकारत नाहीत , तो अपयशी ठरतो आणि परत त्याची पुनरावृत्ती होत नाही.
३)हा बदल त्यावेळी मान्य होत नाही ,पण काही काळानंतर लोकांना त्याचं महत्व समजत आणि तो ते स्वीकारतात
असे चित्रपट सृष्टी तले काही पहिले प्रसंग

(संदर्भ -इंटरनेट , चित्रपट संबंधी पुस्तकं)
१) *पहिला भारतीय मूक चित्रपट*
,
"राजा हरिश्चंद्र (१९१३)" निर्माता , दिग्दर्शक , छायाचित्रण , संकलन दादासाहेब तथा धुंडिराज गोविंद फाळके (हिंदुस्थान फिल्म कंपनी).
या अगोदर दादासाहेब तोरणे यांनी इ.स.१९१२ साली "भक्त पुंडलीक" हा मूकपट बनवला होता , परंतु ते भक्त पुंडलीक या नाटकाचे चित्रीकरण होते ,तसेच या सिनेमाचे बाकीचे काम लंडन ला झाले होते.
त्या अगोदर काही कुस्त्या , काही नेत्यांची भाषणे , जादूचे प्रयोग , कोंबडयांच्या झुंजी यांचे चित्रीकरण करून ते पडद्यावर दाखवले जात असे. परंतु आज आपण जो कथाप्रधान सिनेमा (Feature Fim) पाहतो , त्याची सुरुवात दादासाहेब फाळके यांच्या "राजा हरिश्चंद्र" या सिनेमापासून झाली. तसंच हा सिनेमा पूर्णपणे भारतात बनवला गेला.
या घटनेचं महत्व भारतीय चित्रपट सृष्टीत अनन्यसाधारण आहे. इथूनच भारतीय चित्रपट व्यवसायाचा पाया घातला गेला.
त्यामुळे दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपट व्यवसायाचे जनक (Father Of Indian Cinema) म्हणून गौरवले जातात.
२) *पहिली भारतीय बाल कलाकार*
मंदाकिनी आठवले , श्री दादासाहेब फाळके निर्मित कालिया मर्दन या चित्रपटात बाल कृष्णाची भूमिका या मुलीने रुपेरी पडद्यावर साकारली.मंदाकिनी आठवले हि दादासाहेब फाळके यांची नात.
३) *पहिले चित्रपट पोस्टर*
१९२० साली "वत्सला हरण" या सिनेमाची प्रसिद्धी सर्व प्रथम पोस्टर्स द्वारे करण्यात आली.बाबुराव पेंटर हे या कल्पनेचे जनक होते.
४) *पहिला भारतीय बोलपट*
"आलमआरा (१९३१)" आर्देसर इराणी यांनी त्यांच्या "इम्पिरियल फिल्म कंपनी" च्या अंतर्गत बनवलेला हा सिनेमा.या चित्रपटा पासून भारतीय चित्रपट बोलू लागला.
"अयोध्येचा राजा (१९३२)" हा प्रभात फिल्म कंपनी ने निर्माण केलेला पहिला मराठी बोलपट. दिग्दर्शक-व्ही शांताराम.
५) *सिनेसंगीताची पहिली ध्वनिमुद्रिका*
"अयोध्येचा राजा। (१९३२)" या सिनेमातील गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका सर्वप्रथम बाजारात आली.या अगोदर चित्रपट संगीताच्या रेकॉर्ड्स निघत नसत. अर्थात सिनेमासाठी आणि ध्वनीमुद्रिका (तबकडी) रेकॉर्डींग वेगवेगळे रेकॉर्डींग करावे लागत असे.Original Soundtrack Recording हा प्रकार न्हवता.
"अयोध्येचा राजा" या सिनेमात एकूण १५ गाणी होती , त्यातील ६ गाणी श्री गोविंदराव टेंबे यांच्या आवाजात होती , या चित्रपटात राजा हरिश्चंद्र हि प्रमुख भूमिका त्यांनी साकारली होती.
६) *सिनेसंगीताची पहिली ध्वनिमुद्रिका (Original Soundtrack Recording)*
"सैरंध्री (१९३३)" या सिनेमाच्या गाण्याच्या रेकॉर्ड्स सिनेमाच्या रेकॉर्डींग ट्रॅक वरून घेण्यात आल्या.आज आपण जे सिनेसंगीत रेकॉर्ड वर ऐकतो ते या पद्धतीने रेकॉर्ड केलेले असते. त्याचा पाया या सैरंध्री सिनेमाच्या ध्वनीमुद्रिका मुळे घातला गेला.
या सिनेमाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनी ची होती , दिग्दर्शक होते व्ही शांताराम , संगीत गोविंदराव टेंबे यांचे , तर गीते भालजी पेंढारकर यांची होती.
७) *पहिला भारतीय रंगीत चित्रपट*
"किसानकन्या (१९३७)" हा आर्देसर इराणी यांच्या इम्पिरियल फिल्म कंपनी ने बनवलेला चित्रपट हा पहिला भारतीय रंगीत चित्रपट म्हणून नोंदवला जातो.
प्रभात फिल्म कंपनीने "सैरंध्री (१९३३)" हा सिनेमा रंगीत बनवण्याचे योजले होते.पण निगेटिव्ह चे प्रोसेसिंग करताना काही तरी चुकले आणि रंगसंगती काही व्यवस्थित जुळली नाही.शिवाय हा सिनेमा पण फ्लॉप झाला.
त्या नंतर १९३८ साली एक मदर इंडिया नावाचा सिनेमा आला,(निर्माता-दादा गुंजाळ , सिने इंडिया पिक्चर्स) हा पण रंगीत सिनेमा होता.
८) *खलनायकांची भूमिका सर्वप्रथम लोकप्रिय*
प्रभात च्या "अमृतमंथन (१९३४)" या सिनेमातील राजगुरू ची भूमिका खलनायकी असून पण लोकप्रिय झाली.खलनायक लोकप्रिय होणे हा भाग सर्वप्रथम या चित्रपटात घडला. हिंदी आवृत्ती त हि भूमिका चंद्रमोहन या अभिनेत्याने तर मराठीत आवृत्तीत हि भूमिका केशवराव दाते यांनी साकारली होती.आजही हि भूमिका अजरामर आहे
९) *क्लोज अप तंत्राचा सर्व प्रथम वापर*
प्रभातच्या "अमृतमंथन (१९३४)" या सिनेमात सर्वप्रथम क्लोजअप या फोटोग्राफी तंत्राचा प्रभावी वापर केला गेला.राजगुरू या पात्राचा एक डोळा पूर्ण पडदा व्यापून दिसतो , आणि एक भीतीदायक वातावरण निर्मिती होते.
या साठी लागणारी खास लेन्सेस जर्मनीहुन मागवण्यात आली होती.
१०) *ट्रॉली शॉट्स चा सर्वप्रथम वापर*
प्रभात च्या "चंद्रसेना (१९३५)" या सिनेमात सिनेमॅटोग्राफी करताना ट्रॉली चा वापर केला गेला.
व्ही शांताराम यांनी मुंबई इथे व्हरायटी नावाचा जर्मन सिनेमा पहिला.त्यातील वेगवान ट्रॉली शॉट्स पाहून ते प्रभावित झाले. एक चार चाकी लाकडी ट्रॉली बनवून त्यावर कॅमेरा ठेवून तो ऑपरेट करण्याचा सराव केला गेला.फत्तेलाल यांनी पण यात सहभाग घेतला.
अशा रीतीने चंद्रसेना या चित्रपटात सर्वप्रथम ट्रॉली शॉट्स आले.
११) *सर्वप्रथम आयटम सॉंग*
याच प्रभात निर्मित "चंद्रसेना (१९३५)" या चित्रपटात त्या काळची प्रसिद्ध नर्तिका अझुरी हीच एक नृत्य होतं. गाण्याचे बोल होते "सुरा हि सुखखानी" . हे गाणं त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झालं. हे गाणं , हा डान्स पहायला प्रेक्षक आवर्जून यायचे. चित्रपट यशस्वी करण्यासाठी आयटम सॉंग हा प्रकार तिथून रुजला.
१२) *लहान मुलाच्या आवाजातील गाणे चित्रपटात सर्वप्रथम*
प्रभात निर्मित "धर्मात्मा (१९३५)" या सिनेमात वासंती (वासंती घोरपडे) या बालतारकेने चित्रपटात सर्वप्रथम गाणे गायले.
१३) *बॅक प्रोजेक्शन चा वापर सिनेमात प्रथम*
प्रभात च्या "अमराज्योति(१९३७)" या चित्रपटात जहाजाची दृश्ये समुद्राच्या पार्श्वभूमीवर खरी वाटावीत म्हणून , समुद्राच्या पार्श्वभूमीचा वापर बॅक प्रोजेक्शन म्हणून केला गेला.
१४) *इंग्लिश गाणे सिनेमात सर्वप्रथम*
"कुंकू (१९३७)" या सिनेमात सर्वप्रथम इंग्लिश गाणे ,(पल्सम ऑ लाईफ , कवी-लॉंग फेलो) नायिका शांता आपटे यांच्या आवाजात घेतले गेले. दिग्दर्शक व्ही शांताराम , निर्माते - प्रभात फिल्म कंपनी.
यानंतर "एक फुल चार कांटे (१९६०)" या सिनेमात बॉम्बसेल बेबी हे गाणे (गायक-इकबाल सिंग) , "संगम (१९६४)" या सिनेमात इसलेबरी आय लव्ह यु ,(गायक-व्हीव्हीयन लोबो) हि इंग्लिश गाणी आली, दोन्ही चित्रपटांचं संगीत शंकर जयकिशन होत.
त्यानंतर "ज्युली (१९७५)" या सिनेमात प्रिती सागर हिने गायलेले माय हार्ट इज बिटिंग हे इंग्लिश गाणे गाजले , संगीत-राजेश रोशन
१५) *चित्रपटात नायक पोलिसाच्या भूमिकेत प्रथम*
प्रभात निर्मित "माणूस/आदमी (१९३९)" या चित्रपटात सर्वप्रथम नायकाची भूमिका पोलीस खात्यातील व्यक्तीची होती.
१६) *सिनेमात पहिले बहुभाषिक गीत*
प्रभात च्या "माणूस/आदमी (१९३९)" , या सिनेमात भारतीय सिनेमातील पहिले बहुभाषिक गाणे घेतले गेले. कशाला उद्याची बात /अब किस लिये कल कि बात हे ते गाणे.
मराठी , हिंदी , गुजराथी , पंजाबी , बंगाली , तामीळ , तेलगू अशा भाषा या गाण्यात वापरल्या गेल्या
१७) *चित्रपटात सर्वप्रथम न्यूड सिन*
"चित्रलेखा (१९४१)" या सिनेमात त्यावेळची अभिनेत्री मेहताब हिने अंघोळीच्या दृश्यात न्यूड सिन दिला. या प्रकाराने त्या वेळी बरीच खळबळ माजली.
१८) *अमेरिकेतील लाईफ मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकलेली पहिली भारतीय चित्रतारका*
बेगम पारा , (अभिनेता नासीर खान ची पत्नी , दिलीप कुमार ची भावजय) , हि सर्वप्रथम लाईफ या अमेरिकन मासिकाच्या मुखपृष्ठा वर झळकली.
१९) *भारतीय चित्रपट संगीतातील पहिली सगीतकार जोडी*
प्रभात च्या "चाँद (१९४४)" ला संगीत देणारी संगीतकार जोडी हुस्नलाल भगतराम हि भारतीय
चित्रपट संगीत क्षेत्रातील पहिली संगीतकार जोडी.
२०) *भारतीय चित्रपट संगीतातील पहिले त्रिकुट*
लाला , असर , सत्तार
२१) *चित्रपटात प्रथम पार्श्वगायन*
धूप छाव (१९३५) , संगीत रायचंद बोराल
३०) *परदेशात चित्रण झालेला पहिला सिनेमा*
संगम(१९६४) निर्माता , दिग्दर्शक ,राज कपूर
३१) *प्रथम दोन मध्यंतरं असलेला जास्त लांबीचा सिनेमा*
संगम(१९६४) निर्माता , दिग्दर्शक ,राज कपूर
३२) *सर्वप्रथम फ्लॅश बॅक तंत्राचा वापर*
रुपलेखा (१९३४) ,दिग्दर्शक पी सी बरुआ
३३) *पहिला गीत विरहीत सिनेमा*
नौजवान (१९३७) , निर्माता -वाडिया फिल्म्स
३४) *पहिला सिनेमास्कोप चित्रपट*
कागज के फुल (१९५९) , निर्माता दिग्दर्शक गुरु दत्त , प्यासा च्या अभूतपूर्व यशानंतर गुरु दत्त ने 20th Century Fox शी करार करून हे तंत्रज्ञान पुढील सिनेमासाठी घेतले . सिनेमा छान जमला. व्ही के मूर्ती ची फोटोग्राफी अप्रतीम होती.पण सिनेमा कोसळला आणि गुरु दत्त साधारण त्या काळात १२ लाखाला डुबला. हा सिनेमा ब्लॅक अँड व्हाईट होता.
त्या नंतर १९६१ मध्ये रुपम चित्र या संस्थेतर्फे "प्यार कि प्यास" हा सिनेमा सिनेमास्कोप मध्ये आणि रंगीत काढला .दिग्दर्शक - महेश कौल.हा पण सिनेमा अपयशी ठरला .
त्यानंतर "लीडर (१९६४)" हा दिलीप कुमार , वैजयंती माला यांचा सिनेमा (दिग्दर्शक-राम मुखर्जी , निर्माता शषधर मुखर्जी) , आणी मेहबूब खान यांचा "सन ऑफ इंडिया (१९६२)" हे पण कलर आणि सिनेमास्कोप मध्ये आले , आणि तिकीट बारीवर कोसळले.
त्या मुळे सिनेमास्कोप हा प्रकार आपल्याला धार्जिणा नाही असं धरून सर्वांनी त्या कडे पाठ फिरवली.
नंतर ८० च्या दशकात मात्र सर्रास सिनेमास्कोप सिनेमे निघाले , आता तर प्रत्येक सिनेमा साधारण सिनेमास्कोप असतोच.
३५) *पहिला ७० एम एम सिनेमा*
"अराउंड दि वर्ल्ड (१९६७)" निर्माता , दिग्दर्शक पाछी . हा चित्रपट अपयशी ठरला.
त्यानंतर १९७५ साली याच तंत्राने आलेला शोले ऐतिहासिक यश मिळवून गेला.
३६) *प्रथम सिक्स ट्रॅक साउंड रेकॉर्डींग*
"अराउंड दि वर्ल्ड (१९६७)" निर्माता , दिग्दर्शक पाछी . संगीत - शंकर जयकिशन
३७) *प्रथम स्टिरिओफोनीक साऊंड रेकॉर्डींग*
"जल बिन मछली,नृत्य बिन बिजली (१९७१)"
निर्माता , दिग्दर्शक व्ही शांताराम ,संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल
३८) *चित्रपट गीतात सर्वप्रथम अनोखे बोल*
प्रभात फिल्म्स चा माणूस/आदमी (१९३९) , या सिनेमात चहा वाला पोऱ्या च्या तोंडी गाणे होते "तार ननाव नॉव...." हे अनोखे बोल प्रथम या सिनेमात , या गाण्यात आले
त्या नंतर याहू , ऊऊ,ओये ओये , ओले ओले इ शब्द गाण्यात आलेले सर्वांना माहीत आहे.
३९) *प्रथम डॉल्बी डिजिटल स्टिरिओ*
"१९४२ अ लव्ह स्टोरी (१९९४)" , निर्माता , दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा , संगीत - आर डी बर्मन
४०) *सर्वप्रथम स्लो मोशन तंत्राचा वापर*
"लाखों में एक (१९७१)" दिग्दर्शक एस एस बालन
निर्माता जेमिनी स्टुडिओ
जोगी ओ जोगी हे गाणे स्लो मोशन मध्ये आहे
४१) *पहिला रजत महोत्सवी चित्रपट*
सरस्वती सिनेटोन (मालक दादासाहेब तोरणे) निर्मित भालजी पेंढारकर दिग्दर्शित "श्यामसुंदर (१९३२)" हा पहिला रौप्य महोत्सवी चित्रपट. पण या चित्रपटाची मराठी आवृत्ती रौप्य महोत्सवी (सलग २७ आठवडे) चालली , हिंदी आवृत्ती तितकी यशस्वी झाली नाही.
प्रभात चा "अमृतमंथन (१९३४)" हा दोन्ही (मराठी,हिंदी) त्या काळी सलग तीस आठवडे चालला. त्यामुळे या चित्रपटाची गणना पण पहिल्या रौप्य महोत्सवी चित्रपटात होते.
४३) *पहिला सुवर्ण महोत्सवी चित्रपट*
प्रभात चा "संत तुकाराम (१९३६)" हा पहिला सुवर्ण महोत्सवी चित्रपट , त्या काळी हा सिनेमा सलग ५७ आठवडे चालला.प्रभात फिल्म कंपनी ला सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणारा चित्रपट अशी या सिनेमाची नोंद घेतली जाते.त्या काळी या सिनेमा चं उत्पन्न होतं ७,९१,३१८/- रुपये.
या सिनेमाचे दिग्दर्शक होते विष्णुपंत दामले , फत्तेलाल शेख (व्ही दामले , एस फत्तेलाल)
४३) *पहिला हीरक महोत्सवी चित्रपट*
"किस्मत (१९४३)" ,निर्माता बॉंबे टॉकीज , दिग्दर्शक ज्ञान मुखर्जी (Gyan mukherji)
अभिनेता- अशोक कुमार
हा सिनेमा सलग१८७ आठवडे चालला , हा विक्रम ३२ वर्षे अबाधित होता.
हरवले सापडले (lost & found) हा यशस्वी फॉर्म्युला या सिनेमात प्रथम वापरला , सर्वप्रथम अँटी हिरो हि संकल्पना पण याच सिनेमाने रुजवली.
४४) *चित्रपटातील पहिला डबल रोल*
"औट घटकेचा राजा (मराठी)/आवारा शहजादा(हिंदी)-(१९३३)" , या सरस्वती सिनेटोन (मालक दादासाहेब तोरणे)सिनेमात सर्वप्रथम डबल रोल चा वापर केला गेला.

चित्रपटविचार

प्रतिक्रिया

तर्कवादी's picture

11 Jan 2022 - 3:52 pm | तर्कवादी

इतकी रंजक माहिती इथे दिल्याबद्दल धन्यवाद

*अमेरिकेतील लाईफ मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकलेली पहिली भारतीय चित्रतारका*

याचे वर्ष काय ?

३०) *परदेशात चित्रण झालेला पहिला सिनेमा*
संगम(१९६४) निर्माता , दिग्दर्शक ,राज कपूर

कोणत्या देशात ?

*अमेरिकेतील लाईफ मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकलेली पहिली भारतीय चित्रतारका*

याचे वर्ष काय ? १९५१

३०) *परदेशात चित्रण झालेला पहिला सिनेमा*
संगम(१९६४) निर्माता , दिग्दर्शक ,राज कपूर

कोणत्या देशात ? संपूर्ण युरोप

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 Jan 2022 - 5:00 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

संगमचे काही शूटिंग स्वित्झरलँडमध्ये झाल्याचे वाचलेले आठ्वते.

चौथा कोनाडा's picture

11 Jan 2022 - 5:24 pm | चौथा कोनाडा

*भारतीय चित्रपटात सर्वप्रथम*
*व्हॉटसअप कॉपीपेस्ट*

मीच लिहिले आहे , व्हाट्सअप ला ही , इथे ही

चौथा कोनाडा's picture

18 Jan 2022 - 10:28 pm | चौथा कोनाडा

मीच लिहिले आहे , व्हाट्सअप ला ही , इथे ही

भारीच की ! पण चांदण्या * काढून टाकल्या असत्या तर बरं झालं असतं !
आजकाल चांदण्या * दिसल्या की मिपावर व्हॉटसअप्प कॉपीपेस्ट घोषित करायची पद्धत आहे.
असो.
व्वा, खुप छान संकलन केले आहे ! आवडले.

पुढील लेखनास हार्दिक शुभेच्छा !

प्रचि जोडल्यास लेखांना चार चाँद लागतील !

srahul's picture

20 Jan 2022 - 1:01 pm | srahul

धन्यवाद

srahul's picture

20 Jan 2022 - 1:01 pm | srahul

धन्यवाद

उत्तम संकलन! चांगला उपक्रम आहे.

- (सिनेमाप्रेमी) सोकाजी

नगरी's picture

20 Jan 2022 - 2:32 pm | नगरी

खूप छान