Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by हेमंतकुमार on Mon, 11/29/2021 - 14:48
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
गेल्या २५-३० वर्षांत आपल्यापैकी अनेक जणांच्या कुटुंबात वा नात्यात कोणी ना कोणी परदेशी गेलेले किंवा जाऊन आलेले आहे. पर्यटन, शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय अशा अनेक हेतूंनी लोक परदेशात जातात. त्यामुळे अनेक कुटुंबांच्या गाठीशी परदेश प्रवासाचे विविध अनुभव साठलेले असतात. जेव्हा विविध कारणांमुळे होणाऱ्या कौटुंबिक मेळाव्यांना लोक एकत्र जमतात तेव्हा हटकून परदेशातील अनुभवांची देवाणघेवाण होते. असाच एक मेळावा एकदा आमच्या घरी भरला होता. त्या समूहातील ६ जण विविध देशांमध्ये जाऊन आलेले होते. अमेरिका कॅनडापासून ते ऑस्ट्रेलिया जपानपर्यंत अनेक देशांच्या अनुभवांवर गप्पा चालू होत्या. सांगणाऱ्यांच्या अनुभवांचे धबधबे कोसळत होते आणि ऐकणारे त्यात न्हाऊन निघत होते ! मला एकदम लहर आली आणि म्हटलं, आता जरा यांची फिरकी घेऊ. मग मी सर्वांना म्हणालो, “तुम्ही बरेच जण जगातील अनेक प्रगत व सधन देशांमध्ये जाऊन आलेले आहात. पण माझे एक वैशिष्ट्य आहे. मी अशा एका देशामध्ये जाऊन आलेलो आहे की जिथे तुमच्यापैकीच काय पण माझ्या माहितीतील अन्य कोणीही तिथे गेलेले नाही. मी ९९.९% खात्रीपूर्वक सांगू शकतो की तुमच्यापैकी कोणीही त्या देशाला आयुष्यात भेट देण्याची शक्यता नाही. तर आता माझा प्रश्न असा आहे की तुम्ही तो देश ओळखा” ! इतका वेळ हसत खिदळत गप्पा चालल्या होत्या. माझ्या या निवेदनानंतर एकदम सन्नाटा पसरला. अनेकांना आश्चर्य वाटले की मी एवढे छातीठोक कसे सांगू शकतोय. सगळ्यांचे चेहरे आश्चर्यचकित झालेले. मग मी म्हणालो, “प्रयत्न करा, सुरुवात तर करा ओळखायला, पाहिजे तर मी पैज लावतो”! मग आशिया, युरोप, दक्षिण अमेरिका व आफ्रिका या खंडांतील अनेक आणि काही अतिपूर्वेकडील देशांची नावे लोकांनी सांगितली. तरीपण अद्याप त्यांनी माझे उत्तर काही ओळखले नव्हते. मग मी थोडी भर घातली, “देश आपल्यासारखाच आहे. प्रगत किंवा सधन म्हणता येणार नाही. मग अजून काही न ऐकलेल्या देशांची नावे पुढे आली. तरीसुद्धा अजून उत्तर सापडत नव्हते. शेवटी एकमुखाने सगळे म्हणले, आम्ही हरलो बुवा. मग मी जाहीर केले, “मी ज्या देशाला भेट देऊन आलेलो आहे तो म्हणजे पाकिस्तान” ! माझे उत्तर ऐकल्याबरोबर मागच्यापेक्षाही अधिक सन्नाटा पसरला. अनेकांचे चेहरे वाकडे झाले. काहींच्या कपाळावर आठ्या उमटल्या. मग एक जण म्हणाले, “तुम्ही काही सरकारी अधिकारी, खेळाडू, सैनिक, कलाकार किंवा पत्रकार असे काही नाहीत ते माहित आहे. तसेच तुम्ही इतिहास संशोधक, राजकीय अभ्यासक किंवा गेला बाजार, जातिवंत पर्यटक देखील नाही. मग असं वाटतंय की कशाला मरायला हा माणूस गेला होता पाकिस्तानात ? तुम्ही तिम्बक्तूला गेलो असे म्हटला असतात तरी आमचा विश्वास बसला असता ! पण पाकिस्तान, छे, काहीतरीच काय“ ! मी हसलो आणि म्हणालो, “बरोबर आहे तुमचा तर्क. पण मी तिथे जाऊन आलोय हे वास्तव आहे. आता तिथे मी का जाऊन आलो ते मी तुम्हाला सांगतो”. .. वाचकमित्रहो, असा हा आमच्या आप्तस्वकीयांसमवेत घडलेला संवाद होता. थोडे पुढे जाऊन मी म्हणतो की, हा लेख जे वाचक वाचणार आहेत त्यांच्यापैकीही कोणी पाकिस्तानला गेले असण्याची शक्यता जवळजवळ नाही. पुन्हा एकदा मी हे विधान ९९% खात्रीने करतोय. अर्थात उरलेला १ टक्का मी बाकी ठेवतोय याचे कारण असे : ध्यानीमनी नसताना मी नाही का गेलो त्या देशात? तसा चुकून एखादा इथेसुद्धा सापडू शकतो. तर मग आता तुमच्याही मनात प्रश्न आला असेल, की कशाला उठून गेला हा बाबा तिकडे पाकिस्तानात ? 😀 तर आता ती कथा सांगतो. सुरुवातीला एक स्पष्ट करतो, की मी काही कामासाठी तिथे गेलो होतो आणि अगदी अल्पकाळ म्हणजे जेमतेम ३ दिवस वास्तव्य करून लगेच भारतात परतलो होतो. त्यामुळे रूढ अर्थाने हे पर्यटन नाही याची नोंद घ्यावी. आपल्याकडील ज्या लोकांचे नातेवाईक पाकिस्तानात आहेत असे लोक (व अन्य काही अपवाद) वगळता, सामान्य भारतीय नागरिक पाकिस्तानला हौसेने जाण्याचा विचार स्वप्नात देखील करत नाही. म्हणून माझा हा एक वेगळा अनुभव लिहिणे असा या लेखाचा हेतू आहे. ….. तर मग सुरुवात करतो. घटना आहे १९८० च्या दशकातल्या पूर्वार्धातील. तेव्हा मी नुकताच एमबीबीएस झालो होतो. आता पुढे काय करावे या विचारात एक गोष्ट अशी ठरवली, की अमेरिकेत जाण्याच्या डॉक्टरांसाठीच्या स्पर्धात्मक परीक्षेला बसावे. ही स्पर्धात्मक परीक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांमध्ये होते पण त्याकाळी भारतात मात्र त्याची केंद्रे नव्हती. १९६० च्या दशकामध्ये भारतात ती केंद्रे होती पण पुढे ती बंद करण्यात आली. त्यामागील हेतू हा असावा की जर आपल्या देशात केंद्रच ठेवले नाही तर परीक्षेला बसणाऱ्या लोकांची संख्या आपोआपच मर्यादित राहते. आपले डॉक्टर्स शक्‍यतो आपल्याच देशात राहावेत हा या सगळ्या मागचा उद्देश असावा. ज्या देशांचे धोरण असे नव्हते, त्यांनी आपापल्या देशांमध्ये अमेरिकेच्या परीक्षेसाठी केंद्रे ठेवली होती. माझे एक नातेवाईक सिलोनला (आताच्या श्रीलंकेला) जाऊन ही परीक्षा देऊन आल्याचे मला माहित होते. तेव्हाची आमची कौटुंबिक आर्थिक स्थिती सामान्य होती. परीक्षेसाठी लागणारे डॉलर्समधील शुल्क अमेरिकेतील नातेवाईकांच्या मेहेरबानीने मिळाले. आता प्रत्यक्ष परीक्षेस जाऊन बसण्याचा खर्च एवढी बाजू आम्ही सांभाळायची होती. त्यामुळे जो काही प्रवासखर्च होईल तो कमीत कमी असावा असेच ठरवणे भाग होते. त्या काळी जे विद्यार्थी पुरेसे सधन होते ते अशा निमित्ताने सिंगापूर, फिलिपिन्स आणि तत्सम देशांनाही भेट देऊन परीक्षेच्या जोडीने सहल व मौजमजा करून येत. आम्ही जेव्हा परीक्षा केंद्रांच्या तक्त्यावर नजर टाकली तेव्हा लक्षात आले, की आपल्याला परवडण्यासारखी केंद्रे दोनच असून ती पाकिस्तानात आहेत. त्यापैकी एक म्हणजे कराची आणि दुसरे लाहोर. मग जरा आजूबाजूला चौकशी करून आम्ही अधिक माहिती काढली तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली. भारतातील बरेच डॉक्टर्स या कामासाठी पाकिस्तानला जायचे. सर्वसाधारण आपल्या भौगोलिक प्रांतानुसार केंद्र निवडीची विभागणी झालेली होती. संपूर्ण उत्तर आणि मध्य भारतातील डॉक्टर्स लाहोरला जात. तेव्हा अमृतसर ते लाहोर ही रेल्वेसेवा सुद्धा उपलब्ध होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा प्रवास तर अगदी स्वस्तातला. तर पश्चिम आणि दक्षिण भारतातील विद्यार्थी कराची केंद्र निवडायचे. माझ्यासाठी मुंबई ते कराची हा विमानप्रवास हाच मार्ग सगळ्यात स्वस्त ठरणार होता. मग अर्ज भरला आणि कराचीची निवड केली. आता पुढचा टप्पा होता पाकिस्तानचा व्हिसा मिळवणे. तेव्हा काहीतरी कारणामुळे मुंबईतील पाकिस्तानी दूतावासाचे उपकेंद्र बंद होते. त्यामुळे दिल्लीला जाणे हाच एकमेव पर्याय शिल्लक होता. त्या आधी सांगितले पाहिजे, की मी नुकताच पदवीधर झालेला असल्याने माझ्या जवळ कुठल्याही प्रकारची आर्थिक बचत वगैरे नव्हती. किंबहुना पासपोर्ट म्हणजे काय हे फक्त ऐकून माहित होते. मग तातडीने मुंबईला जाऊन आयुष्यातील पहिला पासपोर्ट काढला. तेव्हाच्या पासपोर्टच्या पहिल्या पानाच्या मागच्या बाजूस एक ठळक सूचना दिलेली असायची : “ सदर पारपत्रधारकाला दक्षिण आफ्रिका सोडून जगातील अन्य सर्व देशांना जाण्यास परवानगी दिलेली आहे”. ok याचे कारण म्हणजे तेव्हा दक्षिण आफ्रिकेचे वर्णद्वेषी धोरण चालू होते. म्हणून भारताने त्यांच्याशी राजनैतिक संबंध ठेवलेले नव्हते. मग दिल्लीला जायचे ठरले. अशा तऱ्हेने आयुष्यातील पहिली दिल्लीवारी या कामाच्या निमित्ताने झाली. दिल्लीमध्ये त्यांच्या दूतावासात गेलो आणि परीक्षेसंबंधी माहिती दाखवल्यावर त्यांनी ७ दिवसांसाठी फक्त कराचीचा व्हिसा मंजूर केला (व्हिसावर तसे वाक्य बॉलपेनने लिहून त्यावर सेलोटेप लावला होता ते आठवते). आम्ही व्हिसा मिळवण्यासाठी जेव्हा दिल्लीला गेलो होतो तेव्हा तिथे कडाक्याची थंडी होती. तोपर्यंत महाराष्ट्र न सोडलेल्या मला उत्तरेतील मरणाची थंडी म्हणजे काय असते ते समजले. हे सर्व तांत्रिक सोपस्कार पूर्ण झाले. एकीकडे जमेल तसा अभ्यास चालू होता. अखेर परीक्षा जवळ आली. आता पहिला प्रश्न होता तो म्हणजे तिथे कराचीमध्ये राहायचे ठिकाण ठरवणे. त्याकाळी आपल्याकडे आंतरजाल तर जाऊद्या पण संगणक सुद्धा नव्हते. मग काही ओळखीच्या लोकांना कामाला लावले आणि थोडीफार माहिती काढली. आमची परीक्षा होती ‘ताज इंटरनॅशनल’मध्ये. नावावरुनच लक्षात आले की तिथे राहणे काही आपल्याला परवडायचं नाही. मग थोडेफार नकाशे पाहिल्यावर असे लक्षात आले की या परीक्षेच्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर ‘मेहरान’ नावाचे एक हॉटेल आहे जे आपल्या खिशाला परवडू शकेल. आणि मुख्य म्हणजे तिथे मिश्राहारी भोजन व्यवस्था होती. मग मेहरान हॉटेल मोजून ३ दिवसांसाठी फोनद्वारा आरक्षित केले. आता परीक्षा एक दिवसावर येऊन ठेपली होती. मुंबई ते कराची विमान प्रवासाचे तिकीट काढले होते. म्हटलं, चला या निमित्ताने आयुष्यातला पहिला विमान प्रवास घडतो आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी मुंबईमध्ये विमानात बसलो. कुठलीही गोष्ट प्रथम अनुभवताना माणूस हरखून जातो तसे माझेही झाले. साधारण एक तास वीस मिनिटात कराचीला पोहोचलो. जेव्हा आपण भारतातून श्रीमंत देशांमध्ये जातो तेव्हाची प्रवासवर्णने वाचली की एक गोष्ट लक्षात येते. मुंबईतून जेव्हा विमान उडते तेव्हा आपल्याला सुंदर इमारतींच्या जोडीने झोपडपट्ट्यांचा महासागरही दिसतो आणि परदेशात विमान उतरत असताना मात्र एकदम सगळेच चकचकीत, लखलखीत, परीराज्यासमान दृश्य वगैरे दिसते. माझ्या या परदेश प्रवासात मात्र हा फरक उद्भवणार नव्हता. इथून उडताना आणि तिथे उतरताना दोन्हीकडे समानच दृश्य नजरेस पडले. अखेर कराचीमध्ये उतरलो. तेव्हा त्या विमानतळावर नूतनीकरणाचे वगैरे काम चालू होते. तसा तो सामान्य दर्जाचा वाटला. (पुढे काही वर्षांनी मात्र पाकिस्तानने त्यांचे सर्व विमानतळ अत्यंत शाही रीतीने सजवले होते. ते भारतापेक्षा अधिक डामडौलाचे आहेत असे वर्णन मी खुशवंतसिंग यांच्या एका पुस्तकात नंतर वाचले होते). विमानतळापासून हॉटेलकडे जाताना रस्त्यावर नजर टाकली. थोडा परिसर बघितला आणि लक्षात आले की या शहराचा तोंडवळा आणि रचना साधारण मुंबईप्रमाणेच आहे. एक प्रकारे ही पाकिस्तानची मुंबई म्हणता येईल. गरीबी -श्रीमंतीचा निकट सहवास हे दोन्ही शहरांचे समान वैशिष्ट्य. आम्ही ज्या टॅक्सीत बसलो होतो ती जपानमधून आयात केलेली कार होती तोपर्यंत भारतात मारुती कार सामान्य माणसाच्या हातात फारशी दिसत नव्हती. पाकिस्तानात बहुतेक कार उद्योग यथातथाच असावा. त्यामुळे तेव्हा ते परदेशी गाड्या थेट आयात करत होते. आमचे हॉटेल आल्यावर टॅक्सीतून उतरलो व आपल्या फियाटच्या सवयीनुसार धाडकन ते दार लावले ! तो मोठा आवाज ऐकल्यावर ड्रायव्हर माझ्यावर चांगलेच डाफरले. यावरून ही नाजूक प्रकारची गाडी आहे आणि दार हळुवार लावायचे असते हा धडा प्रथम मिळाला. मग हॉटेलच्या खोलीत पोचलो. दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्याने फार काही करायला वाव नव्हता. अभ्यास करणे भाग होते. परीक्षेचा दिवस उजाडला. परीक्षा एकूण दोन दिवस होती रोज सहा तास. त्यापैकी दर दोन तासांनी थोडावेळ विश्रांतीचा असे. परीक्षेच्या २ सत्रांमध्ये त्यांनी दुपारच्या खाण्याची किरकोळ व्यवस्था केली होती. ही परीक्षा संपूर्ण वस्तुनिष्ठ स्वरूपाची होती उत्तरपत्रिकेवर योग्य त्या पर्यायांच्या पुढे पेन्सिलने खूण करायची होती. संपूर्ण परीक्षेत कुठेही पेन लागणार नव्हते. परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून स्कर्ट परिधान केलेल्या दोन जाडजूड अमेरिकी बायका आलेल्या होत्या. त्यांच्या देहबोलीवरूनच त्या कडक असल्याचे लक्षात आले. त्यांनी सुरुवातीला महत्वाची सूचना केली, “जेव्हा परीक्षेचा वेळ संपल्याची घोषणा होईल तेव्हा सर्वांनी आपापल्या पेन्सिली ताबडतोब खाली ठेवल्या पाहिजेत. या शिस्तीचे पालन न केल्यास तुमची उत्तरपत्रिका रद्द ठरवण्यात येईल”. ही सूचना ऐकल्यावर लगेच काही त्याचे गांभीर्य जाणवले नाही. दुपारच्या सत्रात वेळ संपल्याचे जाहीर झाल्यावरही (पेपर गोळा करेपर्यंत) तीन विद्यार्थी लिहीतच होते. हे त्या बायकांच्या लक्षात आल्यावर त्या तातडीने पळत त्या विद्यार्थ्यांकडे गेल्या. त्यांनी त्या मुलांना तुम्ही नियम मोडल्याचे सांगून लगेचच त्यांच्या उत्तरपत्रिकांवर काट मारून त्या रद्दबादल ठरवल्या. इतकी करडी शिस्त मी आयुष्यात प्रथमच पाहिली. परीक्षेच्या शुल्कामध्ये त्यांनी खाण्यासाठीचे पैसे घेतलेले होते. त्यातून त्यांनी एका कागदी खोक्यामध्ये आम्हाला अल्पोपहार दिला. ते खोके उघडून पाहिल्यावर त्यात फक्त एक केळ व एक कबाबचा तुकडा असे खाद्य होते. मला केळ अजिबात आवडत नाही. पण आता करतो काय ? थोड्याशा वेळात काहीतरी खाणे भागच होते. तेव्हा मी मिश्राहारी होतो ते एका दृष्टीने बरेच झाले. भुकेच्या वेळी जे अन्न समोर येईल ते खाण्यात शहाणपण असते. पुढे माझ्या मुलांना मी हा किस्सा सांगितला आणि एक सल्ला दिला, “जरी परंपरेने आपण घरी शाकाहारी असलो तरी जगाच्या पाठीवर कुठेही वेळप्रसंगी तरुन जायचे असेल तर सर्व काही खायची सवय असलेली बरी असते”. पहिल्या दिवशीचा पेपर संपल्यानंतर ताजमधून बाहेर पडलो आणि चालतच मुक्कामाच्या हॉटेलकडे जायचे ठरवले. तेवढेच टॅक्सीच्या पैशांची बचत आणि थोडेफार काहीतरी बघता यावे हा उद्देश. सहज रस्त्यावरील एक-दोन दुकानांमध्ये डोकावलो. दुकानाची रचना अगदी आपल्यासारखीच होती. दुकानदारांनी, “आप इंडियासे आये है ना” असे म्हणून स्वागत केले व आदराने बोलले. चहा मागवला. आपल्या व त्यांच्या प्रमाणवेळेत अर्ध्या तासांचा फरक असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. एकंदरीत पाहता पाकिस्तानी माणूस आपल्या कुठल्याही उत्तर भारतीय माणसाप्रमाणे दिसतो. तिथून भ्रमंती करीत हॉटेलात पोचलो. रात्री हॉटेलमध्ये अगदी पोटभर वरण-भात खाऊन घेतला तेव्हा कुठे जीव शांत झाला. परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी सर्वसाधारण पहिल्या दिवसाप्रमाणे सर्व काही झाले. आता कालच्या प्रकारानंतर विद्यार्थ्यांना कडक शिस्तीची कल्पना आलेली होती. त्यामुळे आज कोणीही वेळ संपल्यानंतर लिहित बसायची आगळीक केली नाही. अखेर पूर्ण परीक्षा संपली. एकंदरीत ही वस्तुनिष्ठ परीक्षा म्हणजे बुद्धीला खुराक होता. वस्तुनिष्ठ प्रश्नांचे अनेक अवघड आणि गोंधळात टाकणारे प्रकार इथे अनुभवायला मिळाले. एखाद्या विषयाचे सखोल वाचन असल्यासच आपण अचूक उत्तर देऊ शकतो हे लक्षात आले. परीक्षा केंद्राला टाटा केल्यावर पुन्हा एकदा चालतच रस्त्याने निघालो. साधारणपणे आपण भारतातच आहोत अशीच भावना होती. काही खास वेगळे असे त्या भागात तरी जाणवले नाही. रस्त्यांवरील अ/स्वच्छता आणि बे/शिस्त अगदी आपल्याप्रमाणेच. एकेकाळचे आपण भाऊ भाऊच आहोत हा विचार मनात बरेचदा येऊन गेला. आता उरलेल्या वेळात ओळखीने एकच कार्यक्रम ठेवलेला होता तो म्हणजे तिथल्या एका रूग्णालयाला भेट देणे. मग घाईत तिकडे पोचलो. दोन-तीन डॉक्टरांशी गप्पा झाल्या. त्यापैकी एक डॉक्टर मुकेश हा सिंधी होता. त्याने आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्याच्या कुटुंबामध्ये फाळणीच्या वेळेस बऱ्याच हत्या झालेल्या होत्या. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर कायमस्वरूपी खिन्नतेचे सावट होते. त्याचे काही नातेवाईक भारतात येऊन स्थायिक झाले होते. त्यापैकी काही तर पिंपरी-चिंचवडला असल्याचे त्याने सांगितले. त्यासंदर्भात 1947 साली एक एकतर्फी करार दोन्ही देशांदरम्यान झाल्याचे त्याच्याकडून समजले. या करारातील तरतूद अशी आहे : जर पाकिस्तानातील एखाद्या व्यक्तीला भारतात येऊन वास्तव्य करावेसे वाटले तर भारत सरकार विचार करून त्या व्यक्तीला एक वर्षाचा व्हिसा देते. पुढे दरवर्षी त्याचे नूतनीकरण काही अटींवर होऊ शकते. याला अनुसरून मुकेशचे काही नातेवाईक भारतात आले. त्यापैकी काहींना येथे स्थिरस्थावर होणे जमले व कालांतराने त्यांनी भारताच्या नागरिकत्वासाठी अर्ज केलेला होता. परंतु त्याच्या अन्य काही नातेवाईकांना इथे काही जम बसवता आला नाही. त्यातून निराश होऊन पुन्हा पाकिस्तानात परतही जावे लागले होते. हे सर्व पाहता मुकेशची मनस्थिती द्विधा होती. त्याच्या मनात आज ना उद्या मध्यपूर्वेतील देशांमध्ये दीर्घकाळ रहावे असे होते व तेथून जमल्यास पाश्चिमात्य देशांमध्ये जायचा त्याला प्रयत्न करायचा होता. मुकेशला मनापासून शुभेच्छा देत आम्ही ती रुग्णालय भेट आटोपती घेतली. आता लगेचच हॉटेलवर जाऊन सामानाची बांधाबांध करून परतीच्या प्रवासास निघायचे होते. त्यांनी व्हिसा जरी ७ दिवसांचा दिलेला असला तरी मला तिथे उगाच भटकणे परवडणारे नव्हते. मग काही तासातच आम्ही परीक्षेला बसलेले काही जण परतीच्या प्रवासासाठी कराची विमानतळावर हजर झालो. तिथे एकमेकांना आलिंगन देत निरोप घेतला. आमच्या सर्वांच्या बोलण्यात एक समान मुद्दा होता. भविष्यात आम्ही मनाप्रमाणे विविध देशांचे पर्यटन करू शकू. पण त्या पर्यटनाच्या यादीमध्ये एरवी पाकिस्तानचा समावेश चुकूनही झाला नसता. या परीक्षेच्या निमित्ताने आपण एकेकाळी अखंड भारताचाच भाग असलेल्या प्रदेशाला भेट दिली एवढे साध्य झाले होते. तसेच खुद्द परीक्षेचा अनुभवही अविस्मरणीय होता.(यथावकाश त्या परीक्षेचा निकाल लागून मी त्या परीक्षेत ८० पर्सेंटाइल गुणांनी उत्तीर्ण झालो). जेमतेम तीन दिवसाच्या या छोट्या मुक्कामात माझ्या मनात कराची म्हणजे दुसरी मुंबई एवढीच भावना निर्माण झाली. त्या काळी भारतात सिंधी लोकांनी चालवलेली ‘कराची स्वीट मार्ट’ अशी मिठाईची प्रसिद्ध दुकाने असायची. त्या दुकानांमधून आम्ही वेफर्स वगैरे आवडीने आणायचो. त्या दुकानांचे नाव ज्या गावावरून आले ती कराची आपण पाहिली असे एक मानसिक समाधान लाभले. तिथल्या सामान्य माणसांवर नजर टाकता ते आणि आपण सामाजिक वावरात तसे सारखेच आहोत हे दिसून आले. दोन राष्ट्रांमध्ये स्वातंत्र्यापासूनच वैरभाव निर्माण झालेला आहे खरा. परंतु तिथल्या काही सामान्य नागरिकांशी गप्पा मारताना तो काही जाणवला नाही. भविष्यात जर दोन देशांदरम्यानचे राजनैतिक संबंध कधी सुधारलेच तर निदान दोन्हीकडच्या नागरिकांना मुक्तपणे एकमेकांच्या देशात पर्यटनासाठी जाता येईल का, असा एक भाबडा विचार तेव्हाच्या तरुण मनामध्ये येऊन गेला. परंतु आजचे अजूनच बिघडलेले वास्तव आपण जाणतोच. असो. लेखातील घटनेनंतर पुढील आयुष्यभरासाठी पाकिस्तानला जाणे हा विषय मी बाद करून टाकलेला आहे. परदेश पर्यटन करायचे ठरल्यास कुटुंबाकडून अर्थातच अन्य देशांना पसंती मिळेल. पण, आयुष्यातील पहिला विमान व परदेशप्रवास आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय परीक्षेचा अनुभव या कारणांसाठी का होईना पाकिस्तान माझ्या आठवणीत राहील. ........................................................................................................................................................
  • Log in or register to post comments
  • 54577 views

प्रतिक्रिया

Submitted by हेमंतकुमार on Wed, 12/01/2021 - 15:22

In reply to मस्त लेख कुमार१ साहेब by टर्मीनेटर

Permalink

टर्मी.,

टर्मी., आभार ! **मोहेंजोदडो-हडप्पा संस्कृतीचे अवशेष पहाण्यासाठी नाईलाजाने का होईन पण तिथे जायला नक्कीच आवडेल >>> तुम्ही अभ्यासू पर्यटक असल्याने हे स्वाभाविक आहे. व्हिसा साठी शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

Submitted by रंगीला रतन on Wed, 12/01/2021 - 21:14

Permalink

लेख आवडला. मला पण पाकिस्तानला

लेख आवडला. मला पण पाकिस्तानला जायचंय. फिरायला नाही तर इतकी लफडी करून त्यांनी काय मिळवले ते बघायला :=)
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Wed, 12/01/2021 - 21:19

In reply to लेख आवडला. मला पण पाकिस्तानला by रंगीला रतन

Permalink

रं र,

**इतकी लफडी करून त्यांनी काय मिळवले ते बघायला :=) >> ते मिळवण्यासाठी त्यांना फक्त एक टंकनयंत्र आणि एक टंकलेखक एवढेच सामुग्री पुरली होती असे म्हणतात !! :))
  • Log in or register to post comments

Submitted by मनो on गुरुवार, 12/02/2021 - 03:06

Permalink

इस्राईलचा व्हिसा काही

इस्राईलचा व्हिसा काही दशकांच्या आधी एक वेगळ्या कागदावर देत असत, जेणेकरून पासपोर्टमध्ये काही उल्लेख रहात नाही. ही पद्धत अजून चालू असेल तर वर उल्लेख झाला तशी काही काळजी करण्याचे कारण नाही, सुखाने जगप्रवास करून या सगळे :-D
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on गुरुवार, 12/02/2021 - 10:58

Permalink

नागरिकत्व मागणी...

नुकतीच केंद्रीय मंत्र्यांनी लोकसभेत सादर केलेली माहिती : गेल्या पाच वर्षात 87 देशातील 10646 लोकांनी भारताचे नागरिकत्व मागितलेले आहे . त्यामध्ये पाकिस्तानचा क्रमांक प्रथम आहे( 7782 लोकांनी) https://mahanews.live/24620/
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on गुरुवार, 12/02/2021 - 11:07

In reply to नागरिकत्व मागणी... by हेमंतकुमार

Permalink

भारतीय नागरिकत्व

भारतीय नागरिकत्व मागणाऱ्यांमध्ये बहुसंख्य हिंदू आणि शीख असतील. याच काळात 6 लाख भारतीयांनी पण भारतीय नागरिकत्व सोडले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on गुरुवार, 12/02/2021 - 11:19

In reply to भारतीय नागरिकत्व by रात्रीचे चांदणे

Permalink

रा चां

बरोबर या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे तिकडचे बरेच सिंधी लोक उत्सुक असतात
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on गुरुवार, 12/02/2021 - 13:03

Permalink

( ज्यू लोक एकंदर कर्मठ आहेत

( ज्यू लोक एकंदर कर्मठ आहेत यात शंका नाही परंतु त्यांच्या कर्मठपणाचा दुसर्यांना फारसा त्रास होत नाही)
कर्मठ ज्यूंचा न्यूयॉर्क शहरातील कोरोना पॅनडेमिक सेकंड वेव्ह मध्ये लावलेला हातभार, आपल्याकडे ज्या कारणांसाठी तब्लीग जमातची स्क्रुटीनी झाली जवळपास तसलीच कारणे आहेत ही पण. (अवांतर - लेखक स्वतः ज्युईश आहेत) जाता जाता : अमेरिकेतील ज्युईश गुन्हेगारी पारशी गुंड नसतात कारण पारशी मुळातच इथं अलसंख्याक आहेत (६८,०००) आणि ज्युईश तर एकंदरीत ५००० उरलेत त्यातलेही ३५०० मुंबईत असतात. इथं त्यांच्या "कर्मठपणाचे" दर्शन ते काय होणार, जिथं होईल तिथं आकडा जास्त असतो. अजूनही जाता जाता :- गूगल सर्च मजेशीर प्रकरण आहे, सहज सर्च करताना "ज्यू कसे चांगले आहेत" किंवा "ज्यू कसे वाईट आहेत" असे सर्च केले की आपल्याला आवडतात त्या विचारांच्या लिंक्स अन लेखन अन दुवे सहज सापडतात, त्यामुळे गूगल केलेल्या लिंक्स किंवा एकंदरीत इंटरनेटवर घातलेल्या वादांनी माणसे आपले विचार बदलू शकतात असे मला वाटत नाही त्यामुळे लेट्स एन्जॉय अवरसेल्स अँड नॉट टेक एनी टेन्शन ऍझ सच. ओव्हरऑल, एकंदरीत चंद्रसूर्यकुमार ह्यांनी जे ज्युईश लोकांचे विश्लेषण केले आहे तूर्तास तरी मी त्यालाच धरून असेन.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on गुरुवार, 12/02/2021 - 13:43

Permalink

छान !

छान ! ज्यूंचे विश्लेषण आवडले. रच्याकने …. आता 2023 मध्ये बहुधा सर्व प्रवास निर्बंध संपलेले असतील. तेव्हा इथल्या एखाद्या दर्दी पर्यटकाने छानशी इसराएल सफर करून यावे आणि इथे मस्तपैकी अनुभवांचा धागा काढावा अशी सूचना /विनंती करतो ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on गुरुवार, 12/02/2021 - 16:06

Permalink

वरची इसराईल व पाकिस्तानची

वरची इसराईल व पाकिस्तानची चर्चा वेगळ्या प्रतिसादात नेतो. पाकिस्तानने इजराईलला मान्यता दिलेली नाही. त्यांच्या लेखी तो देशच नाही. बहुतेक पाकिस्तानच्या पासपोर्टवर (व्हॅलिड फाॅर आॅल कंट्रीज एक्सेप्ट इजराईल) असे लिहीले जाते हे वाचल्याचे स्मरते. (इथे अनवधानाने का होईना असे लिहून पाकिस्तानने इजराईल हा वेगळा देश आहे हे मान्य केले आहे)
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on गुरुवार, 12/02/2021 - 16:12

Permalink

अ अ ,

सर्वप्रथम चर्चा नवीन स्वतंत्र प्रतिसादात आणल्याबद्दल धन्यवाद एखादी उपचर्चा जेव्हा प्रतिसादांची रांग लावते, तेव्हा ते मोबाईलवर सलग वाचताना खूप त्रास होतो. शेवटचे काही प्रतिसाद अगदी कोपर्‍यात जातात. ..
अनवधानाने का होईना असे लिहून पाकिस्तानने इजराईल हा वेगळा देश आहे हे मान्य केले आहे)
छान मुद्दा.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 12/02/2021 - 18:03

Permalink

ईस्राईल हा भारताचा खरा मित्र

ईस्राईल हा भारताचा खरा मित्र आहे. ईस्राईलवर भापतीयांचा गाढ विश्वास आहे. आता हेच पहा ना मित्र ईस्राईल ला चाललाय हे ऐकल्याबरोबर विश्वासराव सरपोतदारांसारख्या चिंगू माणसाने ७० रूपये लगेच काढून दिले.
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on गुरुवार, 12/02/2021 - 18:16

Permalink

अप्रतिम!

अप्रतिम! आपले लेख खूप समतोल आणि मनाला उभारी देणारे असतात. अनुभव मस्तच आहे! शेवटी ती तरी माणसेच! आपल्यासारखी! तो धागाच माणसाला जोडतो...बाकी सगळा निव्वळ फापटपसारा...
  • Log in or register to post comments

Submitted by Nitin Palkar on गुरुवार, 12/02/2021 - 20:08

Permalink

छान!

अतिशय रोचक लेख आणि त्यावरील माहितीपूर्ण प्रतिसाद. _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on गुरुवार, 12/02/2021 - 21:34

Permalink

संयत भाषेतला छान लेख आणि

संयत भाषेतला छान लेख आणि माहीतीपूर्ण प्रतिसादही उत्तम.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on गुरुवार, 12/02/2021 - 21:42

Permalink

आभार !

अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार ! ...
धागाच माणसाला जोडतो...बाकी सगळा निव्वळ फापटपसारा
>>> हे आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Fri, 12/03/2021 - 09:14

Permalink

भारताने जू धर्मियांना

भारताने जू धर्मियांना आसरा दिला म्हणून आज त्यांना भारताबद्दल प्रेम वाटत असले पण "धर्म सर्वात महत्वाचाच " हे त्यांचे तत्व आहे ..( याचाच अगदी साधं उदाहरण म्हणजे अलिबाग भागातील पिढयानपिढया अक्षरशः हिंदू वातवरणात वाढलेले मराठी भाषिक ज्यू इस्राएल मध्ये स्तहलन्तरित झाले .. केवळ धर्म हे कारण इस्राएल मध्ये अंतर्गत लोकशाही असली तरी तो धर्मावर बसवलेला देश आहे हे कोणी वसु नये .. तेवहा जजो पर्यंत भारताचाच फायदा तो पर्यंत इस्राएल मित्र हे ठीक .. उडतो उडतो नको पण हे हि खरे कि काह्ही करून अरबांची बाजू हे टोक पण अत्यतं चुकीचे होते
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 12/04/2021 - 09:32

In reply to भारताने जू धर्मियांना by चौकस२१२

Permalink

देशकारणात आणि राजकारणात

देशकारणात आणि राजकारणात कोणीही कायमचा मित्र नसतो कि कायमचा शत्रू नसतो. भारत आणि इस्रायल यांच्यातील मैत्री संबंध केवळ भारतात ज्यूंवर अत्याचार झाले नाहीत म्हणून आहेत असे नाही तर दोन्ही देशांना इस्लामिक दहशतवाद हि एक कायमची डोकेदुखी होऊन बसलेली आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना भारत सोडला तर थे इस्रायल पर्यंत कोणत्याही देशात लोकशाही नाही आणि हि सर्व राष्ट्रे इस्लामी आहेत ( मुळात इस्लामला लोकशाही मान्यच नाही). आणि इस्रायलच्या पश्चिमेस सुद्धा (इजिप्त, लिबिया अल्जेरिया मोरोक्को इ देश) हीच स्थिती आहे. यातल्या कोणत्याही देशाला इस्रायल मान्यच नाही. ( अधिकृतरीत्या मान्यता दिली असली तरी अशा स्थितीत दोन्ही देशांना परस्पर सामंजस्याचा फार मोठा फायदा होत असतो. त्यामुळे गुप्त माहितीची देवाण घेवाण आणि त्यावर केलेली प्रक्रिया विश्लेषण इ. मध्ये दोघांना होणारा फायदा फार मोठा आहे. याशिवाय इस्रायली तंत्रज्ञानासाठी भारताची प्रचंड बाजारपेठ आणि भारताला इस्रायल देत असलेले तंत्रज्ञाना चा भारताला होणार फायदा असे अनेक पैलू आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेंव्हा युद्धाला तोंड फुटले असताना अतिशय आवश्यक होते तेंव्हा इस्रायल ने भारताची केलेली मदत ( जसे अमेरिकेने पाकिस्तानची तळी उचललेली असताना रशियाने आपल्याला केलेली मदत) हे भारत कधीच विसरत नाही. आज अमेरिका त्यांच्या गरजेसाठी( चीनशी दोन हात करण्यासाठी) आपल्याला अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवण्यासाठी तयार झाला आहे. उद्या गरज संपली कि ते हात वर करणार हा अनुभव सार्वत्रीक आहे. फ्रांस, इस्रायल, रशिया यांच्याशी संबंध चांगले ठेवण्यामागे हेच राजकारण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शेखरमोघे on Fri, 12/03/2021 - 10:09

Permalink

छान चटकदार लेख - आवडला!

छान चटकदार लेख - आवडला! "कराची" नाव अजूनही वापरणारे मझ्या माहितीतले सगळ्या भारतातले लोकप्रिय ठिकाण म्हणजे हैदराबादमधील "कराची बेकरी" (हैदराबादमध्ये अनेक शाखा). यान्ची उत्पादने मी अमेरिकेत देखील पाहिली/वापरली आहेत. मी अनेक वेळा बान्गलादेशचा (कामानिमित्त) प्रवास केला आहे - ढाक्याचा श्रीमन्त भाग मुम्बईसारखा तर गरीब भाग कलकत्त्याहूनही बकाल वाटला होता.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Fri, 12/03/2021 - 11:35

In reply to छान चटकदार लेख - आवडला! by शेखरमोघे

Permalink

शेखर, धन्यवाद.

शेखर, धन्यवाद. हैदराबादी कराची रोचक. यावरून पुणे कॅम्प मधील दोन वेफर्सच्या प्रसिद्ध दुकानांची आठवण झाली. त्यातले एक म्हणजे बुधानी आणि दुसरे कराची. एकंदरीत बुधानीचा बोलबाला जास्त होता आणि तिकडे लोक रांग लावून वेफर्स घ्यायचे. कराचीचे वेफर्स तुलनेने कोरडे असायचे आणि त्यांची किंमत बुधानीच्या साधारण दीडपट होती. घरी काही विशेष प्रसंग असला की मुलांकडून कराचीच्या वेफर्सची मागणी होई आणि मग ते आम्ही आणत असू.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 12/03/2021 - 12:28

Permalink

मस्त लेख.

मस्त लेख. पिंपरीत कराची स्वीट मार्ट, हॉटेल कराची इत्यादी कराचीशी अनुबंध असलेली सिंधी बांधवांची दुकाने आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Fri, 12/03/2021 - 13:14

Permalink

एकाचे दोन दोनाचे तीन........

कुमार१ तुमचे अभिनंदन, लेखास ज्या प्रमाणात प्रतीसाद आलाय तो एक प्रकारे मर्यादित जनमत संग्रह बनू शकतो. ७९-८० मधे श्रीनगर मधे होतो तेथील जनमत मधे कमालीचे खरब होते.आमच्याबद्दल कमालीचा द्वेष व राग होता. काही दिवसानीं सीमावर्ती भागात ग़ेल्यानंतर आगदी उलटा अनुभव आला. नंतर मात्र परिस्थिती खराब होत गेली. १९९४ मधे श्याम बेनेगल यांची राष्ट्रीय फिल्म पुरस्कार विजेती " मोम्मो" हा सिनेमा दोन्ही देशांतील सामान्य माणूस कसा विचार करतो याचे सुदंर चित्रण. सुरेखा सिक्री फरीदा जलाल व रजत कपूर यानीं सुदर अभिनय केला आहे. व्यक्तीगत अनुभव आसाच काहीसा आहे. कालानुरूप सर्व काही बदलत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Fri, 12/03/2021 - 13:32

Permalink

आभार !

प्रचे., कर्नल पूरक माहितीसाठी धन्यवाद ! ..... @ क त, प्रतिसादांकडे पाहण्याचा तुमचा एक वेगळा दृष्टिकोन आवडला. " मोम्मो" ची माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. युट्यूबवर असल्यास सवडीने बघेन.
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Fri, 12/03/2021 - 14:21

In reply to आभार ! by हेमंतकुमार

Permalink

आहे

हा सिनेमा यु ट्युब वर आहे. मेडीकल कोअर मधे असल्याने स्थानिक जनतेशीं संवाद अनिवार्य.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Fri, 12/03/2021 - 21:26

Permalink

समारोप !

माझा एक साधारण अनुभव या लेखाद्वारे लिहिला. तो आपणा सर्वांना आवडला हे वाचून आनंद वाटला. त्यावरील चर्चेत आपल्यातील सहभागी अनेक लोकांनी चांगले योगदान दिले. भारत पाक दरम्यानचे आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि लष्करी संबंध याबाबतीत बरेच जणांनी अभ्यासू प्रतिसाद दिले. अशी अर्थपूर्ण चर्चा घडवून आणल्याबद्दल मी आपणा सर्वांचे कौतुक करतो. पाकिस्तान हा संवेदनशील आणि स्फोटक विषय असतानाही या चर्चेदरम्यान धाग्याचा काश्मिर झाला नाही हे विशेष. उलट आपण सर्वांनी चर्चेतून माहितीचे नंदनवन फुलवले असेच म्हणतो. :) या चर्चेदरम्यान इसराएल संबंधीही बरीच उपयुक्त माहिती आपल्यापैकी काही जणांनी दिली. अन्य देश आणि इसराएलचे संबंध यावरील उपचर्चाही छान रंगली. ज्यांना मनापासून पाकिस्तान पर्यटन करायची इच्छा आहे अशांना भविष्यात त्यासाठी व्हीसा मिळो ही सदिच्छा. आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे ! ….
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Sat, 12/04/2021 - 09:03

In reply to समारोप ! by हेमंतकुमार

Permalink

+१

एका नेहमीपेक्षा वेगळ्या अनुभवावर आधारीत लेखन करुन मिपावर उत्तम चर्चा घडवून आणल्याबद्दल आपले आभार. एकाहून एक माहितीपर प्रतिसादांसाठी इतर मिपाकरांनाही धन्यवाद. इस्राएलला भेट देण्याबाबत चर्चा निघालीच आहे तर काही वर्षांपूर्वी पाहिलेला लल्लनटॉप युट्यूब चॅनेलवरचा हा व्हिडिओ येथे डकवतो.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sat, 12/04/2021 - 18:19

Permalink

अभिनंदन.!

1971 च्या भारत-पाक युद्धात भारतीय नौदलाच्या २२ किलर किलर्स स्क्वॉड्रन’ने कराची बंदरावर केलेल्या हल्ल्याला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने या स्क्वॉड्रनला येत्या ८ डिसेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते समारंभपूर्वक गौरविण्यात येणार आहे. https://www.loksatta.com/desh-videsh/fifty-years-of-india-pakistan-1971-war-and-submarine-killer-squadron-kak-96-2704878/ भारतीय नौदलाचे अभिनंदन.!
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Sat, 12/04/2021 - 22:34

In reply to अभिनंदन.! by हेमंतकुमार

Permalink

संपूर्ण नौदलाला

नौसेना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Image removed. नंबर २२ किलर स्क्वाड्रनला विशेष शुभेच्छा आणि अभिनंदन प्रेसिडेंशियल स्टँडर्ड प्राप्त केल्याबद्दल.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sun, 12/05/2021 - 20:45

Permalink

युद्धाची पन्नाशी

यंदा 1971च्या भारत पाकिस्तान युद्धाची पन्नाशी आहे. 16 डिसेंबर चा 'विजय दिवस' जवळ येत आहे. त्यानिमित्ताने तेव्हाच्या काही आठवणींना इथे उजाळा दिलेला आहे : https://www.google.com/amp/s/www.news18.com/amp/news/india/vijay-diwas-11-important-facts-about-indias-victory-over-pakistan-in-the-1971-war-3181790.html बांगलादेश निर्मिती नंतर पाकिस्तानची लोकसंख्या निम्म्याहून अधिकने कमी झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by बेकार तरुण on गुरुवार, 12/09/2021 - 19:03

Permalink

लेख खूप आवडला...

लेख खूप आवडला... प्रतिक्रियाही छान आहेत. ईसराएल बद्दल विषय निघाला आहे म्हणुन माझा एक अनुभव... मी आखाती देशात काम करतो अन ईथे माझ्या ऑफिसमधे अनेक लोक मुळचे फिलिस्तानी निर्वासीत (आता जॉर्डन लेबेनान वगैरे पासपोर्ट होल्डर्स आहेत)... मी सुरुवातीला काही गुंतवणुकीसाठी "तेवा फार्मा" कंपनीबद्दल काही सुचवले होते... तेव्हा सर्वांनी मीटींगमधे एकदमच कडवट चेहरे केले होते.. नंतर माझा बॉस ( ज्याचे पूर्वज फिलिस्तानी आहेत अन ४८ साली जॉर्डनला पळुन गेले होते).... मला बाजुला घेउन गेला अन कसे आम्ही ईसराएलला स्वतंत्र देश मानतच नाही वगैरे ची माहिती दिली.. आता आखाती देशात ईसराएलला मान्यता दिल्याने हे लोक्स प्रचंड नाराज आहेत...
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Fri, 12/10/2021 - 10:07

Permalink

परवानगी

@बे त : आभार व सहमती. ……. लेखात, जे पासपोर्टवरील अमुक देशाला जायची परवानगी नाही, असे वाक्य आहे त्या संबंधात प्रश्न : समजा अ देशाचे ब देशाशी राजनैतिक संबंध नाहीत. म्हणून अ देश आपल्या नागरिकांना ब देशात जायला परवानगी देत नाही. इथे मला एक मूलभूत शंका आहे. समजा,अ देशातील एखाद्या अभ्यासू पर्यटकाला ब देशात कुतूहल म्हणून पर्यटन करायचे आहे. तरीसुद्धा अशा वेळेस परवानगी का मिळू शकत नाही ? अ देशाने तिकडे जाण्यासाठी का अडवावे ? ब ने व्हीसा नाकारला तर समजू शकतो. कुठेही पर्यटन करता येणे हा मूलभूत मानवी अधिकार नसतो का ? माहितगारांनी भर घालावी.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on Fri, 12/10/2021 - 13:03

In reply to परवानगी by हेमंतकुमार

Permalink

पाकिस्तानचे इजरायलशी राजनैतिक

पाकिस्तानचे इजरायलशी राजनैतिक संबंध नाहीत. म्हणून पाकिस्तान आपल्या नागरिकांना इजरायलमधे जायला परवानगी देत नाही. पण इजरायला पाकिस्तानी लोकांचे वावडे नाही. एखादा पाकिस्तानी व्यक्ती इजरायलच्या एअरपोर्टवर आल्यास पेपर व्हिसा दिला जातो.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Fri, 12/10/2021 - 15:08

In reply to पाकिस्तानचे इजरायलशी राजनैतिक by अभिजीत अवलिया

Permalink

अ अ ,

तुमचा मुद्दा समजला पण मी वेगळे म्हणतोय आमचे त्यांच्याशी राजनैतिक संबंध नसेनात का, आमच्या नागरिकाने तिकडे पर्यटनाला सुद्धा का जाऊ नये ? असे धोरण का असते ?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 12/11/2021 - 13:08

In reply to पाकिस्तानचे इजरायलशी राजनैतिक by अभिजीत अवलिया

Permalink

एखादा पाकिस्तानी व्यक्ती

एखादा पाकिस्तानी व्यक्ती इजरायलच्या एअरपोर्टवर आल्यास पेपर व्हिसा दिला जातो. हे फार अभावानेच होते आणि ते सुद्धा त्या नागरिकांची पार्श्वभूमी त्याचे सार्वजनिक जालावरील अस्तित्व इत्यादी बरंच कसून तपासल्यावर होतं. पाकिस्तानी नागरिकाने इस्रायल ला जाणे हेच मुळात बेकायदेशीर आहे त्यामुळे पाकिस्तानच्या पासपोर्टवर not valid for israel असे छापलेले असते. मूळ पाकिस्तानी असलेल्या पण इतर देशांचे नागरिक असणाऱ्या पाकिस्तानी माणसांना (कोणत्याही मुसलमान माणसाला- अगदी भारतीय मुसलमानास सुद्धा) सुद्धा व्हिसा देताना इस्रायल फार काळजी घेतं. देशाच्या जन्मापासून इस्लामी दहशतवादाने पोळलेल्या आणि सतत युद्धमान असलेल्या या देशाला इतकी काळजी कायमच घ्यावी लागते.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्कवादी on Fri, 12/10/2021 - 18:57

In reply to परवानगी by हेमंतकुमार

Permalink

याची काही कारणे असू शकतात

उदा: अ देशाचा नागरीक ब देशात गेला आणि तिथे काही अपत्तीत अडकला तर राजनैतिक संबंध, दूतावास व इतर सुविधा नसल्याने अ देश आपल्या नागरिकाला काहीच मदत करु शकणार नाही किंवा ते मदत करणे कठीण असेल. आणि "कुठेही पर्यटन करता येणे हा मूलभूत मानवी अधिकार" आहे की नाही माहित नाही पण आपल्या नागरिकाला आपत्तीतून बाहेर काढण्याकरिता प्रयत्न करणे हे मात्र प्रत्येक सरकारचे कर्तव्य असावे. येवू शकणार्‍या अडचणी - उदाहरणादाखल १) पासपोर्ट हरवणे २) गंभीर वैद्यकीय समस्या उद्भवणे (अपघात वा आजारपण) ३) मृत्यू
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Fri, 12/10/2021 - 19:15

In reply to याची काही कारणे असू शकतात by तर्कवादी

Permalink

+१

सहमत. समजा, त्यातून एखादा स्वतःच्या जबाबदारीवर गेलाच. जर काही आपत्ती ओढवली तर तो दुसरा देश अजिबात मदत करणार नाही हे गृहीत असावे.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on गुरुवार, 12/16/2021 - 15:14

In reply to परवानगी by हेमंतकुमार

Permalink

कुठेही पर्यटन करता येणे हा

कुठेही पर्यटन करता येणे हा मूलभूत मानवी अधिकार नसतो का ? असायला हवा पण प्रत्यक्षात कोणीच तो तसा मानत नाहित आणि समजा देश "अ " चे देश "ब" बरोबर एवढे वाकडे असेल तर आपलया नागरिकांना "ब" देशात जाण्यावर बंदी आणणे हा देश "अ " चा अधिकार असू शकतो (.अर्थात त्या त्या देशातील अंतर्गत शासन व्यवस्थेवर अवलंबून आहे म्हणा .. ) या शिवाय पुढे तर्कवादी यांनी ,मांडलेले मुद्दे लागू होतात
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sat, 12/11/2021 - 18:00

Permalink

अंतर्गत परवानगी

वरती विविध देशांचे पासपोर्ट, व्हिसा आणि प्रवास प्रतिबंध यासंदर्भात चर्चा झाली आहे. भारतातल्या भारतात आपल्याला काही भागांमध्ये प्रवेश करायचा असेल तरीसुद्धा अंतर्गत परवानगीची (ILP) गरज लागते. असे काही भाग इथे वाचनात आले ते असे : • अरुणाचल प्रदेश • लक्षद्वीप ,लडाख व सिक्कीमचे काही भाग • नागालँड आणि • मिझोराम
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on गुरुवार, 12/16/2021 - 15:32

In reply to अंतर्गत परवानगी by हेमंतकुमार

Permalink

अजून एक गोम

आंतरराष्ट्रीय प्रवासातील अजून एक गोम .. लक्षात ठेवावी धरून चला कि तुम्ही अश्या देशाचे नागरिक आहात "अ " कि ज्यांना बऱ्याच देशात " व्हिसा ऑन अराईवल" ची सोय उपलब्ध आहे, त्यामुळे खालील उदाहरणात व्हिसा हा प्रश्न नाहीये ... आणि समजा तुम्ही तात्पुरते कामासाठी किंवा फिरायला राहत्या ("अ " ) देशातून दुसरया एका देशात ("ब " ) गेला आहात आणि तुमच्या कडे अ ते ब असे परतीचे तिकीट आहे. थेतील वास्तव्यात तुम्ही ठरवलेत अजून तिसरया देशांत (" ड " ) थोडे दिवस जाऊयात आणि तुम्ही ब ते ड असे परतीचे तिकीट काढलेत ड मध्ये प्रवेश करताना तुमचे "अ " ते "ब" हे जे तिकीट आहे त्याची प्रत सोबत असणे महत्वाचे आहे कारण असे कि " ड " ला माहीत आहे कि तुम्ही "ब" चे कायमचे रहिवासी नाहीत त्यामुळे "ड " सोडताना तुम्ही "ब" पासून "अ" या मूलदेशी कसे जाणार याची विचारणा होऊ शकते माझ्य मित्राचं बाबतीत एकदा असे झाले आहे .. ऑस्ट्रेलयं नागरिक , इंडोनेशिया मध्ये कामास जायचा आणि तेथून सिंगापुर ला जाताना जकार्ता ते सिडने चे तिकीट बरोअबर ठेव्यायला विसरला
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on गुरुवार, 12/16/2021 - 17:15

In reply to अजून एक गोम by चौकस२१२

Permalink

चौकस,

**तुम्ही "ब" पासून "अ" या मूलदेशी कसे जाणार याची विचारणा होऊ शकते >महत्त्वाचा मुद्दा धन्यवाद.!
  • Log in or register to post comments

Submitted by नगरी on गुरुवार, 12/16/2021 - 14:48

Permalink

1980-2022 मोठा काळ

1980-2022 मोठा काळ
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on गुरुवार, 12/16/2021 - 15:29

In reply to 1980-2022 मोठा काळ by नगरी

Permalink

?

1980-2022 मोठा काळ
नक्की समजले नाही प्रतिसाद अर्धवट राहिला आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Fri, 12/17/2021 - 20:51

Permalink

लिंगनिरपेक्ष पारपत्र...

या धाग्यात पासपोर्ट-व्हिसा इत्यादींची माहितीपूर्ण चर्चा झालेली आहे. यासंदर्भात इंग्लंड मधील हा एक नवा दावा. एका व्यक्तीने आपल्या पासपोर्ट मध्ये लिंगनिरपेक्ष असा उल्लेख (जेंडर न्यूट्रल) करावा अशी मागणी केली होती. परंतु इंग्लंडच्या कायद्यानुसार व्यक्तीचे लिंग या सदरात पुरुष किंवा स्त्री लिहिणे हे सक्तीचे आहे. या व्यतिरिक्त काही लिहून त्यांचा पासपोर्ट दिला जात नाही. या नियमाविरुद्ध संबंधित व्यक्ती सर्वोच्च न्यायालयात गेली होती. परंतु तिथे तिच्या विरोधात निकाल लागलेला आहे. वास्तविक लिंगनिरपेक्ष अशी नोंद करून अनेक देशांमध्ये पासपोर्ट दिले जातात. या देशांमध्ये भारत, पाकिस्तान, अमेरिका कॅनडा, जर्मनी इत्यादींचा समावेश आहे. न्यायालयाचा वरील निर्णय दुर्दैवी असल्याचे फिर्यादीच्या वकिलाने म्हटले आहे. आता ते आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायालयाकडे दावा दाखल करतील. https://www.bbc.com/news/uk-59667786
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 12/24/2021 - 10:36

In reply to लिंगनिरपेक्ष पारपत्र... by हेमंतकुमार

Permalink

एकदा लिंग निरपेक्ष असे

एकदा लिंग निरपेक्ष असे कायद्यात मंजूर केले गेले कि त्यांना वेगळी प्रसाधन गृहे दिली गेली पाहिजेत रेल्वेत, बसमध्ये, शैक्षणिक संस्थात वेगळे आरक्षण या मागण्या चालू होतील आणि यासाठी मोठा मूलभूत बदल आणि खर्च करावा लागेल. कारण बऱ्याच लोकशाही देशात एकदा अधिकार दिला कि सरकारला त्याच्यासाठी कितीही खर्च करावा लागला तरी करावाच लागतो. यासाठी बरेच वेळेस सरकारे असे हक्क देण्याच्या विरोधात असतात
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Fri, 12/24/2021 - 10:51

In reply to एकदा लिंग निरपेक्ष असे by सुबोध खरे

Permalink

सहमत

त्या प्रकारची खास वेगळी स्वच्छतागृहे वापरताना येणाऱ्या अडचणी आणि एकंदरीतच विमानतळावर होणारे त्रास एका अमेरिकी प्रवाशाने इथे वर्णन केले आहेत: https://www.cntraveler.com/story/for-gender-nonconforming-travelers-airports-are-particularly-stressful-to-navigate
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Fri, 12/17/2021 - 20:53

Permalink

सुधारणा ..

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायालयाकडे >>> युरोपीय ....असे वाचावे.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Fri, 12/24/2021 - 10:14

Permalink

लिंगभावनिरपेक्ष

अमेरिकेतील पहिले लिंगभावनिरपेक्ष पारपत्र ऑक्टोबर २०२१ मध्ये देण्यात आले. संबंधित व्यक्ती 66 वर्षीय असून तिने 2015 पासून न्यायालयात दाद मागणे चालू केले होते. आता संबंधिताच्या पारपत्रावर लिंग या सदरात फुली मारण्याची (X) परवानगी मिळालेली आहे. https://www.reuters.com/world/us/us-issues-first-passport-with-x-gender-marker-2021-10-27/ …………………………………… भारतात पारपत्रावर ट्रान्सजेंडर हे तिसरे लिंग नोंदवायचा पर्याय आहे. पण त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र लागते. https://www.passportindia.gov.in/AppOnlineProject/pdf/ApplicationformInstructionBooklet-V3.0.pdf
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sat, 01/01/2022 - 20:14

Permalink

नागरिकत्व आणि गुंतागुंत

संगीता व अनिता या दोन मुली 33 वर्षांपूर्वी अज्ञान असताना पाकिस्तानातून भारतात आल्या. त्यांच्या आई-वडिलांना भारताचे नागरिकत्व आठ वर्षात मिळाले. पुढे या मुलींनी सज्ञान झाल्यावर भारतीय नागरिकांशीच विवाह केले. परंतु अद्यापही त्या मुलींना भारताचे नागरिकत्व मिळालेले नाही. ते मिळण्यासाठी पाकिस्तानने काहीतरी अहवाल पाठवणे अपेक्षित आहे, जो त्यांनी अद्याप पाठवलेला नाही. https://www.opindia.com/2022/01/2-hindu-sisters-pakistan-indian-citizenship-wait-investigation-report-33-years-details/amp/
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Wed, 01/05/2022 - 11:24

Permalink

इंदिरा गांधी व झिया

1980 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे हुकूमशहा झिया उल हक तेव्हाच्या ऱ्होडेशियात भेटले होते. तेव्हाचा दोघांमधला एक रोचक संवाद नुकताच वाचला. तो असा : भेटीच्या सुरुवातीसच झिया इंदिराजींना म्हणाले, “मॅडम, वृत्तपत्रात जे काही छापून येतं, ते तुम्ही सगळं खरं मानू नका बरं का” त्यावर इंदिराजीं उत्तरल्या, “अर्थातच नाही, तसही सगळी वृत्तपत्रे तुम्हाला लोकशहा आणि मला हुकूमशहा म्हणताहेत, नाही का ?” या शाब्दिक टोल्यावर झियाना निरुत्तर होण्याखेरीज गत्यंतर नव्हते !
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sun, 01/09/2022 - 19:27

Permalink

पुरातत्व संशोधन

आजच्या सकाळच्या सप्तरंग पुरवणीत ‘हडप्पा संस्कृतीमधील आंतरराष्ट्रीय व्यापार’ हा लेख आहे. त्यातली ही काही माहिती : हडप्पा संस्कृतीतील भारतात सापडलेली नगरे अशी : धोलावीरा, लोथल कालीबंगन, राखीगढी. ............................... आणि पाकिस्तानात सापडलेले हेही रोचक : 2300 वर्षे जुने बौद्ध मंदिर आणि २७०० मौल्यवान वस्तू https://indiadarpanlive.com/2300-year-old-temple-found-in-pakistan/
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com