Skip to main content

भात

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 24/07/2015 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
भात हां तर झाले असे की गणेशा म्हणाला "समाधान हॉटेल , रावेत ला जाऊ , मस्त चुलीवरील मटन भाकरी खाऊ , कोणी आले तर आले नाही तर आपले आपण! " . 'आपले हाल होणार' हे स्पष्ट दिसत असल्याने आमच्या शाकाहारी मित्राने टांग दिली , आणि मग दुसर्‍या शाकाहारी मित्राला बोलावण्यात काही पॉईंट नाही असे वाटल्याने त्यांन्ना फोन करण्याचे टाळेल पण अस्मादिकांन्नी विचार केला की हे अत्ता लगेचच चातुर्मास सुरु होत आहे त्या आधी एकदा जोरदार बेत होऊनच जाऊदे ! मग काय , अप्रतिम मटन भाकरी खाल्ल्या नंतर पाना मध्ये आला

भात

... आई शप्पथ ! काय चव होती म्हणुन सांगु ! लगेच वेटर कडुन माहीती कळाली की हा "इंद्रायणी" आहे , गणेशा आधी म्हणालाच होता की इथे अप्रतिम भात मिळतो म्हणुन ! खरेतर मी अजिबात म्हणजे अजिबात भात न खाणारा माणुस पण चक्क मागुन मागुन भात खल्ला ! घरी येवुन विचारले की आपण कोणता भात खातो तर उत्तर आले "आपण ? तु तर हातही लावत नाहीस भाताला :-\ " मी : ":-\ बरं तुम्ही कोणता भात खाता ? " " बासमती आणि आंबेमोहोर " माझ्या डोक्यात एकदम ट्युब पेटली !! हायला , आपण ह्या बासमतीच्या नादाने भाताच्या कित्येक व्हरायटीज ला मुकतोय ! इंद्रायणी सारख्याच अशा कित्येक व्हरायटीज असतील वेगवेगळ्या चवीच्या ! इथेच मावळातच कित्येक व्हरायटीज आसतील !! एकदा तेजस होटेल ला खल्ला होता तोही हातसडीचा भात अप्रतिम लागला होता ! तुम्हाला भाताच्या अशा अजुन व्हरायटीज माहीत आहेत का ? त्या चवीला अ‍ॅपीयरंसला स्वादाला कशा असतात ? विकत कूठे मिळतील ? इंटरनेटवर आणि आजुबाजुला चिंचवडात माहीती शोधत आहेच मी , पण मिपाकरांच्या माहीतीत असे काही खास असेल तर सांगा ! अवांतर : १)गणेशाने त्या हॉटेल मालकाला तो इंद्रायणी तांदुळ मागितला पण त्याने ह्याना त्या निमित्ताने टाळले ...ल्ल्ल्लूऊऊऊउ २) मुंबईत असताना , हेल्ठ कॉन्शस असल्याने ब्राऊन राईस खायचो पण त्याला भात म्हणवत नाही हो . ३) आणि ह्यावरुन आठवले , आमच्या सातार्‍यातील तांदुळाअळी मधील एका दुकानातील पाटी "एकदा घेतलेला माल कोणत्याही सबबीवर ताबडतोब बदलुन मिळेल ! "आता एकदा तांदुळ आळीत चक्कर टाकायलाच हवी !! ४)https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/…
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 46226
प्रतिक्रिया 97

प्रतिक्रिया

In reply to by ब़जरबट्टू

डांगे चौकातून रावेत कडे निघा बास्केट ब्रिज च्या अलीकडेच आहे. एकदम गावाकडचा फिल येईल. जमीन सारवलेली वगैरे वगैरे.

In reply to by सत्याचे प्रयोग

दोन वेळा गेलो होतो तिथे पण सांगूनही मटणाची भाजी कमी तिखट नाही केली, मटकीची उसळ पण एवढी तिखट कि खावत नाही. राहिला प्रश्न इंद्रायणी भाताचा तर तो हॉटेल वाला नविन इंद्रायणी वापरतो, त्यामुळे भात खूपच चिकट होतो. हॉटेलचा दिखावा चांगला आहे पण चव मात्र खूप बेकार ….

इंद्रायणी कूकरमध्ये न टाकता, पातेल्यात शिजायला ठेवायचा. शिजत असताना घरभर वास पसरतो, आणि मग तो मऊ भात वरून तुपाची धार सोडून दुध-साखरेबरोबर खायचा. भन्नाट चव लागते!!

भारतवारीत इंद्रायणी नक्की बघणार. जितका आणाता येईल तितका आणणार. आम्ही सोना मसूरी वापरतो. खरंतर हा भात साम्बाराबरोबर मस्त लागतो. सध्या एक नवीन तांदूळ दिसलाय. म्हणजे तो आधीपासून असेल, मला आत्ता दिसलाय. बासमती पण कमी पॉलिशचा, जरा काळपट! त्याचा पुलाव बरा होतो. आंबेमोहर आमच्यायेथे फार महाग मिळतो. एकाच दुकानात पहायला मिळाला. जास्मिन तांदूळ जरा चिकट व ढब्बू असतो. तो थाई फूडबरोबरच जमतो. कितीही चांगली आमटी केली तरी त्याची चव बरी लागत नाही.

कोल्हापुरात दरवर्षी डिसेंबरमध्ये तांदूळ महोत्सव होतो (मेरी वेदर ग्राउंड, न्यू पॅलेस जवळ). डायरेक्ट शेतकरी तांदूळ आणून विकतात तेथे. तुलनेने स्वस्त तांदूळ मिळतो. आजरा भागातले बरेच शेतकरी घनसाळ, साधा जिरगा, काळा जिरगा (खरंच तांदूळ थोडा काळा असतो), जोंधळा जिरगा (किंचित जोंधळ्या सारखा गोल आकार), आंबेमोहोर, इंद्रायणी (इथे मिळणाऱ्या इंद्रायणीपेक्षा पुण्यात मिळणारा इंद्रायणी वासाला थोडा सरस आहे) आणि अनेक इतर वासाचे तांदूळ आणि बिनवासाचे पण चवीला उत्तम असे दफ्तरी, रत्नागिरी २४ आणि माहीत नसलेले अनेक प्रकार घेऊन येतात. हे तांदूळ साठवणुकीसाठीपण खूप चांगले, जिरगा तांदूळ तर जसा जुना होईल तसा जास्त चवीला लागतो. ह्यापूर्वी मला घमघमाट वास असणारा आंबेमोहोर क्वचित मिळाला होता, तो ह्या महोत्सवात मिळतोच. तसेच इडली, डोसा यासाठी लागणारा मोठा जाडा तांदूळही स्वस्त असतो. सारखा सारखा एक प्रकारचा तांदूळ खाऊन कंटाळा येतो तेंव्हा असे दोन चार प्रकारचे वेगळे तांदूळ बरे वाटतात.

In reply to by प्रसाद प्रसाद

इथे मिळणाऱ्या इंद्रायणीपेक्षा पुण्यात मिळणारा इंद्रायणी वासाला थोडा सरस आहे माहितीबद्दल धन्यवाद. स्नेहा, ऐकतियेस ना! ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

येस्स!

नुकतेच वल्ली सरांसोबत मावळात एक उनाड भटकंती झाली ! येता येता कामशेत मध्ये चांगला इंद्रायणी शोधत होतो . एका मिल मध्ये गेलो , ३८ रु किलो म्हणाला नवीन इंद्रायणी पण इंद्रायणी ला जसा अपेक्शित आहे तसा घमघमाट अजिबात नव्हता म्हणुन घेतला नाही . ( नंतर जाणवले की बेंचमार्क म्हणुन घ्यायला हरक्त नव्हती !) नंतर मामाभांचे नावाची अजुन एक राईस मिल दिसली बेबडहोळ रस्तावर . तिथुन ३ वेगवेगळे भात घेतले - नवीन इंद्रायणी , कोलम आणि हात्सडीचा इंद्रायणी ! पण हाही इंद्रायणी आमच्या अपेक्षांना पुर्ण करु शकला नाही , चव आणि टेक्ष्चर उत्तम आहे , टिपिकल आपल्या आवडतो तसा गिजगा भात होतो पण इंद्रायणीचा सुगंध अपेक्षे येवढा नाही ! बाकी कोलम ओके. हातसडीचा इंद्रायणी चक्क आवडला नाही , त्याचे तेक्ष्चर एकदमच ब्राऊन राईस सारखे वाटले . थोडक्यात सांगायचे तर वल्ली सर म्हणाले तसे - आपल्या कंपु मध्ये सगळ्यांचे खाण्याचे जिभेचे चोचले वाढले आहेत ! अजुन उत्तम भाताचा शोध सुरु आहे ! एखाद्या वीकेन्डला राजगड तोरणा ट्रेक करावा अन नरसापुर वेल्हा भागातुन मधुन काही चांगला आंबेमोहोर मिळतो का ते पहावा असा विचार आहे !~ तुमच्या माहीतीत असलेली ठिकाणे सुचवा ! ( लगेच आजरा घनसाळ सुचवु नका , तुर्तास तरी कोल्लापुरला जाण्याचा योग नाही , काही दिवसांनी लोलयेच्या वेताळाला भेटायला जायचा प्लॅन आहे तेव्हा जाता जाता तिकडे चक्कर टाकु :ड )

In reply to by rain6100

आणी Agriculture department भोसलेनगर ground वर प्रदर्शन लावते तेंव्हा. तारखा बाबत न.ता. वाडी शि.नगर आॅफिस मध्ये चौकशी करा. ५० ते ६० रु किलो असतो. जुन्नर भागातील चांगला असतो

मी नुकताच जिरग्याची काळी साळ हस्तगत केली आहे. मागच्या वर्षी महत्प्रयासाने कोथमिरसाळ मिळाली होती. आंबेमोहोर आणि घनसाळ मित्राच्या शेतात पिकतो तेव्हा माझा शाळू आणि त्यांचा तांदूळ आम्ही बार्टर करतो. सध्या सुगंधी इंद्रायणी, तिबार बासमती, साधा जिरगा, सुरती कोलम आणि पिवळसर असा एचेमटी कोलम, दोन-तीन प्रकारच्या कण्या, आंबेमोहोर तुकडा, आणि जुना बासमती तुकडा इतके तांदूळ घरी आहेत. मी भातप्रेमी असल्याने आठवड्यात एक प्रकारचा भात रिपीट होता कामा नये असा स्पष्ट दंडक आहे.

सध्या पोळी खाणे पूर्णपणे बंद केले असुन हा देह सध्या फक्त भात प्रेमी झालेला आहे, तस्मात... चांगला तांदुळ शोधणे आले. वरती अनेकांनी त्यांचे अनुभव सांगितल्या प्रमाणे मी प्रथमच ऑनलाइन तांदळाची खरेदी केली.वाडा कोलम, सोना मसुरी आणि इंद्रायणी हे तांदुळ आणुन पाहिले. वाडा कोलम हा खाऊन खरं तर कंटाळाच आला होता,पण म्हंटल ऑनलाइन खरेदीत चांगला दर्जा मिळतो का ते पहावे...विशेष काही फरक जाणवला नाही उलट दर्जा तितका चांगला वाटला नाही. सोना मसुरी आणि इंद्रायणी हे दोन्ही पहिल्यांदाच खरेदी केले. इंद्रायणीचा सुगंध लयं भारी आहे,पण चिकट भात होतो आणि माझ्याच्याने तो तितका आवडीने खाववत नाही. यावेळी आता दोन वेगळ्या उत्पादकांकडुन केवळ सोना मसुरीच मागवले आहे. सोना मसुरी हा भात असा आहे जो अधिक खावा वाटतो आणि तो जातो सुद्धा. :) भात खाण्याचे / जेवण्याचे एक विलक्षण समाधान यामुळे मिळते हा माझा अनुभव सिद्ध झाला आहे.जालावर सोना मसुरीवर एक उत्तम माहितीपर व्हिडियो मिळाला आहे तो इथे देउन ठेवतो. [ या व्हिडियोमुळे यंदाच्या सोना मसुरी तांदुळ खरेदीत मला मदत झाली. ] जाता जाता :- तुम्हाला माहित असलेल्या उत्तम भात वाणाची इथे अधिक माहिती ध्या... कुठला वेगळा भात तुम्ही खाल्ला असेल तर त्याचे नाव आणि जमल्यास ऑनलाईन उपलब्ध असेल तर त्याची लिंक दिल्यास अजुन उत्तम ! मी आता काळा भात [ हो काळा भातच म्हणालोय ] उत्तम कुठला ते पाहतोय... मला हा देखील एकदा चाखुन पहायचा आहे. याची Forbidden Rice अशी देखील हटके आणि प्राचीन ओळख आहे. अती अवांतर :- मी पहिल्यांदाच भुत जोलोकिया / भूत झोलकिया या मिर्चीची चव [ मिर्ची पेस्ट स्वरुपात ] चाखली... गंध उग्र आहे या मिर्चीचा... ही पेस्ट मी घरी ठेचा करताना त्यात वापरली. चव आवडली. [ प्रमाण कमी वापरले आहे आणि अजुन अनुभव घेणे सुरुच आहे. ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jaane Kya Baat Hai Neend Nahi Aati... :- Sunny (1984)

In reply to by मदनबाण

इंद्रायणीचा सुगंध लयं भारी आहे,पण चिकट भात होतो आणि माझ्याच्याने तो तितका आवडीने खाववत नाही.
ह्यावर दोन तीन उपाय आहेत , सर्वात सोप्पा उपाय म्हणजे आमचे परममित्र नाखु ह्यांनी सुचवलेला : संपुर्ण इंद्रायणी घ्यायचा नाही , ५०% इंद्रायणी अन ५०% फडफड्या असा कोणातातरी वेगळा भात घ्यायचा शिजवायला , म्हणजे अगदीच गिजगा होत नाही अन सुगंधही येतो. दुसरा उपाय म्हणजे संपुर्ण इंद्रायणी भात घ्यायचा पण जमेल तितक्या कमी पाण्यात , अन बहुतांश करुन वाफेवर शिजवायचा तीसरा उपाय म्हणजे नवीन ताजा इंद्रायणी घायचा नाही कारण त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते, जुना एक दीड वर्ष जुना इंद्रायणी गिजगा होत नाही . चौथा उपाय म्हणजे आमचे मित्र पन्नास ह्यांनी सुचवलेला (हा उपाय मी करुन पाहिलेला नाही बट इट्स वर्स्थ अ ट्राय ) , वैदिक पधतीने भात शिजवायचा , म्हणजे कसे तर भात धुवायच्या आधीच पण रट रट उकळवुन घ्यायचे , अन भात धुतला कि लगेच उकळत्या पाण्यात घालायचा , कुकर बिकर शिट्टी वगैरे भानगडीत पडायचेच नाही ! आणी पाचवा उपाय - जो की सगळ्यात बेस्ट - गिजगा इंद्रायणी भात ही एक अ‍ॅक्वायर्ड टेस्ट आहे , तेव्हा आमच्या सारखे मित्र शोधुन , त्यांन्च्या सोबत मटण रस्सा असा गिजगा इंद्रायणी भातात कुस्करुन खाण्याची प्रॅक्टिस करणे ! =))

In reply to by प्रसाद गोडबोले

ओक्के, उपाय चांगले आहेत...करुन [ बायडीस सांगुन ] पहायला हवे ! आजच एक लेख वाचनात आला होता, तो इथे देऊन ठेवतो. पारंपरिक भात वाणांचे जतन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Muza - Noya Daman (ft. Tosiba & Meem Haque) | Official Lyric Video

नसरापुर, भोर येथील जुना आबेमोहोर खुप आवडतो कारण आजोबांच्या शेतातला. पुढे उत्तर भारतात काली मुंछ,शक्करचिनी सारख्या तांदूळाच्या जाती खायला मिळाल्या. आता पुन्हा एकदा आंबेमोहोर, केशरी भात याचा छान बनतो साखर कमी लागते. बाकी बिर्यानी, पुलाव करता बासमती.

श्रीमंत श्री रोमाधिपती, श्री मार्कस ऑरेलीयस महाराज एकदा पावशेर जिरेसाळी/ जिरासर तांदूळ आणून ट्राय करा बरं तुम्ही, महाराष्ट्र / गुजरात राज्यातील प्रॉडक्ट आहे, जिऱ्याच्या दाण्यासारखा बारीक अन नाजूक पण सुबक दाणा असतो, बेताचे पाणी घालून शिजवला तर एकदम गुरगुट्या नाही अन अगदी मोकळं शित नाही अश्या कंसिस्टंसीचा तयार होतो, तुफान लागतो एकदम, अंगभूत सुगंध आणि चव अतिशय लाईट असते, तूप मेतकूट भात, तूप मीठ भात लिंबाचे गोड/ तिखट लोणचे / रसलिंबू इत्यादी पेयरिंग मस्त होते, तांबड्या रश्यासोबत सुद्धा उत्तम पेयरिंग व्हावं (अनुभव नाही) शक्यतो अन-पॉलिश जिरेसाळी बघावा.

In reply to by जेम्स वांड

जिरेसाळ ट्राय केलेला आहे पण काही खास वाटला नाही. नुकताच आजरा घनसाळ देखील ट्राय केला आहे , तो छान वाटलं टेस्ट एकदम मस्त आहे ! पण आपले खरे प्रेम जडले आहे ते इंद्रायणीवरच ! आता लवकरच आमच्या पिंचिं मित्रमंडळासोबत मावळात चक्कर टाकु भात गिरण्यावर , गावांमध्ये जाऊन इंद्रायणीचे सॅम्पल्स आणणार आहे . पण तुर्तासतरी कोल्हापुरच्या काळभैरव ब्रॅन्ड चा इंद्रायणी अफलातुन आहे हे आवर्जुन सांगत आहे. . आय मीन इतका अफलातुन की मी मला भेटलेल्या प्रत्येक भातप्रेमी व्तक्तीला न विसरता सुचवत आहे तो ! i इंद्रायणी म्हणजे खरेतर मावळातील भात , पण त्याचा बेस्ट , मला आवडलेला बेस्ट ब्रँड कोल्हापुरचा आहे हे खरेच आश्चर्य आहे !

भाताच्या बाबतीत अगदी ढ आहे,तरी घरी बदलून बदलून तांदूळ आणला जातो.सध्या काली मूंछ आहे, मस्त आहे.मला इंडिया गेटचा बासमती आवडला होता.

परवाच यु ट्यूब वर एक व्हिडीओ पाहत होतो तेलंगणाच्या खाद्यसंस्कृती बद्दल. त्यात भात तूप आणि मलगापुडी चटणी घालून खाताना दाखवले होते. ते पाहून मला पण असेच करावे अशी जोरदार इच्छा झाली. सुदैवाने बायकोने त्याच दिवशी इंद्रायणी भात केला होता. मी फारसा भात खात नाही. पण दुपारचं लग्नाचं जेवण जास्त झालं होतं तेंव्हा फार काही खाण्याची इच्छा नव्हती त्या दिवशी गरम गरम भात, त्यात घरचं छान कढवलेलं साजूक तूप आणि मुलुंड मध्ये असलेलया एका मद्रासी दुकानातून ( सेल्वा विनायगर) आणलेली मलगापुडी चटणी असे घालून खाऊन पाहिला. अत्यंत अप्रतिम असे हे मिश्रण आहे. इंद्रायणी भाताची चव छानच होती पण लोकांनी वर्णन केला आहे तसा घट्ट गोळा झालेला नव्हता बऱ्यापैकी सुटा होता( बासमती सारखा नव्हे). आता परत कधी जेवण जास्तझाले तर हा बेत नक्की करणार.

नगर जिल्हा अकोले तालुका येथे राहिबाई पोपरे या देखील देशी वाणांच्या जपणूकीचे मोठे काम करत आहेत. त्यांना लोक प्रेमाने "बीजमाता" म्हणतात. नुकताच त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. माझ्या मामेभावाने त्यांची काही दिवसापुर्वी भेट घेतली होती तेव्हा त्याला सगळा जुना खजिना बघायला मिळाला.

नगर जिल्हा अकोले तालुका येथे राहिबाई पोपरे या देखील देशी वाणांच्या जपणूकीचे मोठे काम करत आहेत. त्यांना लोक प्रेमाने "बीजमाता" म्हणतात. नुकताच त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. होय. असे पुरस्कार सोहळ्यांचे क्षण पाहताना देखील मन उचंबळुन येते. असेच काही वेगळे क्षण इथे पाहता येतील. जाता जाता :- अ‍ॅमेझॉनवर सोना मसुरी महाग मिळत असल्याने यावेळी प्रथमच बिग बास्केट वरुन सोना मसुरी मागवला आहे. आत्ता पर्यंत अ‍ॅमेझॉनवरुन ३ वेगळ्या उत्पादकां कडुन तांदुळ मागुन पाहिले होते त्यातल्या २ उत्पादकांनी दिलेला तांदुळ सोना मसुरी होता, एकाने जो दिला तो सोना मसुरीच्या नावाखाली विकला तो तसा नव्हता. आता बिग बास्केटचा अनुभव काय येतो ते पहायचे आहे.ऑनलाईन रास्त दरात मागवण्याचा इतर कोणता उपाय / पर्याय माहित असल्यास इथे जरुर कळवावे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tere Jaisa Mukhda To Pehle Kahin Dekha Nahin... :- Pyar Ke Kabil