Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मार्गी on गुरुवार, 12/02/2021 - 20:12
लेखनविषय (Tags)
प्रवास
भूगोल
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अनुभव
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना २६ ऑक्टोबरचा दिवस! अतिशय थकवणा-या प्रवासानंतर मस्त झोप झाली. अलार्म ऑफ केला असूनही लवकर जाग आली. पूर्ण उजाडलेलं नसताना खोलीच्या बाहेर आलो. अहा हा! समोर एका दृष्टीक्षेपामध्ये अक्षरश: हजारो झाडं आणि घनदाट हिरवा रंग! सत्गडवरून एका दृष्टीक्षेपामध्ये किमान तीन हजार देवदार झाडं सहज दिसत आहेत! आत्ता कुठे जाणीव होते आहे की आम्ही मध्यरात्री कुठे आलो आहोत. आणि ही जाणीवही होते आहे की, आम्ही किती नशीबवान आहोत. ह्या सगळ्या परिसराची व दृश्यांचा आनंद घेताना जाम हुडहुडी भरत होती. अक्षरश: तोंड धुणंही एक टास्क बनलं होतं. टास्क नव्हे, टॉर्चर! कधी एकदा सकाळचे अनिवार्य आन्हिक उरकतात असं झालं. थंड पाणी इतकं भयानक थंड की ते जणू भाजत आहे. दाहक वाटत आहे. दोन दिवसांचा प्रवास झाल्यामुळे आज तरी आंघोळ करणं भाग आहे. यथावकाश सूर्य उगवल्यावर बाहेरचं तपमान थोडं सुसह्य झाल्यावर आंघोळ केली. पण आंघोळीचं अतिशय उकळतं पाणीसुद्धा सौम्य नव्हे शीतल भासतंय! म्हणजे अतिशय थंड पाणी दाहक वाटतंय आणि उकळतं पाणी शीतल भासतंय!    तशीच गंमत चहा पिण्याची. इथे चहा हा केवळ प्यायचा नसतो. मुळात चहा इथे अतिशय महत्त्वाची गोष्ट ठरते! चहाचा कप आला की आधी दोन हातांनी त्याची उष्णता घ्यायची. थोडे हात पोळवून घ्यायचे. अहा हा! काय भारी वाटतं. नंतर चहाचा कप तोंडाजवळ आणून त्याची वाफ घ्यायची! अहा हा! आणि मग हळु हळु एक एक घोट घ्यायचा. आणि दिवसभरातले चहाचे राउंडस अजिबात मोजायचे नाहीत! इथे शक्यतो चहा बिनसाखरेचा बनवतात. बाहेरून गूळ किंवा खडीसाखर चहात बुडवून चहाचे घोट घ्यायचे असतात! सकाळी हळु हळु एक एक जण उठत गेले. आज मुख्यत: आराम करायचा आहे आणि एका अर्थाने इथे अक्लमटाईझ व्हायचं आहे. सत्गडची उंची १८५० मीटर आहे, अगदी विरळ हवेचा त्रास होईल अशी नाही. पण अतिशय थंड हवामान (पहाटेचं तपमान साधारण ५ अंश) आणि वेगळा प्रदेश. आणि इतक्या शुद्ध हवेची आपल्या शरीराला सवय कुठे असते! शिवाय दोन दिवसांचा थकवा, प्रवासात झालेले शरीराचे हाल. त्यामुळे आराम आवश्यकच आहे.  सत्गड!  पण तरीही आंघोळीचा मुख्य कार्यक्रम एकदाचा उरकल्यावर वाटलं की, चला, फिरून यावं. आणि मग सुरू झाला पहिला ट्रेक! सत्गड हे ध्वज मंदिराच्या पायथ्याशी वसलेलं एक पर्वतीय गांव! उतारावरची घरं व त्यातून पाय-या असलेली पायवाट. ही पायवाट अनेकांच्या अंगणातून- घरातून जाते! इथली घरी तशी शहरासारखी पक्की आहेत. घरामध्ये डिश टीव्हीच्या तबकड्याही दिसतात. भेटलेल्यावर एकमेकांना नमस्कार करण्याची इथे पद्धत. सकाळी सगळ्या घरातले लोक उठून आपल्या कामाला लागलेले आहेत. गायी- गुरांची- शेळ्या- मेंढ्या व कोंबड्यांची कामं. कोणी शेतात जात आहेत. कोणी गवताचे भारे नेत आहेत. हे लिहीतानाही वाटतं की, नको लिहायला! परत तो सगळा नजारा डोळ्यांपुढे उभा राहतो आणि विरहाची तीव्र कळ मनात येते! शब्द थिजतात.  .  . सूर्याने कृपा केल्यावर आणि शरीर जरा गरम झाल्यावर सत्गडच्या पायवाटेने खाली उतरायला निघालो. चार वर्षांपूर्वी इथे राहून गेल्यामुळे परिसर तसा ओळखीचा आहे. इथून रस्ता तसा दहा मिनिटांवर आहे, पण वाट तीव्र उताराची आहे. उतरताना खरं नीट कळालं की, मध्यरात्री अंधारात किती चढलो होतो. उतरताना भरभर उतरत होतो. पण नजारे इतके सुंदर की, फोटो किती काढू असं होत आहे. दहा मिनिटांमध्ये रस्त्यावर आलो. इथे राष्ट्रीय महामार्ग ०९ (टनकपूर- पिथौरागढ़- धारचुला) हा मुख्य रस्ता आहे. खाली उतरल्यावर चांगलं नेटवर्क मिळालं. ह्या रस्त्यावर थोडा वेळ पिथौरागढ़च्या दिशेला फिरलो. अहा हा! काय अद्भुत नजारे दिसत आहेत! वळत वळत जाणारा घाटाचा रस्ता आणि दूरवर दरीमधली गावं! काही अंतर गेल्यावर डोंगरामागून डोकावणारी बर्फाची शिखरंही दिसली! अंगावर रोमांच उठत आहेत! हिमालय! काही अंतर मस्त वॉक केला. ते वातावरण आणि तो अनुभव हृदयामध्ये साठवून घेतला आणि परत निघालो. फिरताना शरीरामध्ये चांगली ऊब आली. सत्गडची पायवाट चढताना किंचितसा दम लागला. फोटो घेत जात राहिलो. एक- दोनदा पायवाटेवरील वळण चुकलं. तितकंच तिथल्या लोकांशी बोलता आलं. नातेवाईकांच्या घरी पोहचेपर्यंत चांगला घाम आला होता. इतकं मस्त वाटलं घामामुळे! पण हा आनंद थोडा वेळच टिकला. अर्ध्या तासाच्या आत परत थंडी सुरू झाली!    नंतरचा दिवस नातेवाईकांसोबत आणि सोबत आलेल्या मित्रांसोबत गप्पा, ऊन खात गच्चीतून दिसणारी हजारो वृक्षांचं दृश्य बघत आणि हिमालयाचा सत्संग व ऊब देणारा चहा ह्यामध्ये गेला. सत्गड डोंगराच्या मधोमध आहे, त्यामुळे इथे सूर्य उगवल्यानंतर एक तासाने प्रकट होतो आणि मावळण्याच्या एक तास आधी डोंगरात गुडूप होतो! सूर्य असताना मात्र गरम वाटतंय. इथलं आकाश खूप निरभ्र असल्यामुळे सूर्याचं ऊन थोडं प्रखर वाटतंय. पण सूर्य ढगात गेला तर लगेचच थंडी वाजू लागते! कोई मिल गया मधल्या "जादूला" सूर्य जितका हवाहवासा होता, तसा सूर्य इथे सर्वांना हवाहवासा आहे! दुपारी खालचं सामान आणायला म्हणून आणखी एकदा रोडवर जाऊन आलो. जेमतेम पाऊण किलोमीटर अंतर आहे, पण त्यामध्ये ६० मीटरचा तुलनेने घाटासारखा चढ आहे. इथे असताना रोज ट्रेक्स होत राहणार! उरलेली दुपार मुलांसोबत क्रिकेट खेळलो. तेवढीच थंडी कमी वाजत होती. संध्याकाळी अंधार पडायच्या आधी परत एक ट्रेक करावासा वाटला. इथून पायवाटेने अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर डोंगरावर एक ग्राउंडसारखी जागा आहे. सगळे मिळून तिकडे फिरायला गेलो. सोप्या पायवाटेचा छोटा ट्रेक! तिथून खूप दूरवरचे डोंगर दिसत होते. ढगामध्ये लपलेली हिमशिखरंही दिसली. इतकं जबरदस्त वातावरण! अशा वातावरणामध्ये आपसूकच ध्यान लागतं. फक्त आपल्याला एक गोष्ट करावी लागते, ती म्हणजे आपल्या मनातले नेहमीचे उपद्व्याप बंद ठेवून जे समोर आहे, त्यासाठी मन आणि डोळे उघडे ठेवावे लागतात! आपली ओंजळ जर रिकामी असेल तर ती नक्की भरली जाते! काही क्षण इथे आनंदामध्ये डुबकी घेऊन अंधार पडण्याच्या आधी परत निघालो. उतरताना मुलांनी आणखी एका वेगळ्या वाटेने नेलं. अप्रतिम नजारे असलेला हा मस्त ट्रेक झाला. इथे रोज वेगवेगळ्या ठिकाणी असे ट्रेक्स होतच राहणार आहेत!    सहा वाजताच अंधार पडल्यावर थंडी आणखी तीव्र झाली. पण नजारे अजून संपले नाहीत! हिमालयाचा नजारा अंधारामध्ये गुडूप झाल्यावर आकाशातला अविष्कार सुरू झाला! अक्षरश: ता-यांचा चमचमाट! दिवसा डोळ्यांपुढे अक्षरश: हजारो वृक्ष दिसत होते, तर रात्रीही कमीत कमी तीन हजार तारे आकाशात दिसत आहेत! बायनॅक्युलरशिवाय न दिसणारे किती तरी तारकागुच्छ, तेजोमेघ आणि मंद तारे सहज दिसत आहेत! सोबत मोनोक्युलर त्यामुळेच आणला आहे. आकाशातल्या ता-यांचं दृश्य अगदी ही आठवण करून देत होतं- झगमगाती हुई जागती रात है रात है या सितारों की बारात है मोनोक्युलरमधून तर अक्षरश: ता-यांचा खच पडलेला दिसत होता! आकाशात चंद्र नसल्यामुळे खूप मंद तारे दिसत होते. इतके तारे आकाशात नुसत्या डोळ्यांनी दिसतात, ही आपण शहरामधून कल्पनाही करू शकत नाही. महाराष्ट्रापेक्षा उत्तर अक्षांश १२ अंश जास्त असल्यामुळे तारेही वेगळ्या ठिकाणी दिसत आहेत! हे सगळं जबरदस्त आहे, पण ह्या ता-यांच्या मेजवानीमध्ये थंडीचा जबरदस्त अडथळा आहे! थंडी अक्षरश: मोकळ्या हवेत थांबू देत नाहीय. तरीही काही वेळ थंडीला सहन करत ह्या ता-यांच्या मेजवानीचा आनंद घेतला. त्यानंतर लवकर जेवण करून अक्षरश: साडेसातपर्यंत झोपण्याची वेळ झाली. आणि इथे सगळी घरंही अंधार पडल्यावर काही वेळात गुडुप होतात. सगळे लोक खूप कष्ट करणारे आहेत आणि रात्री थंडी वाढते. शिवाय इथे घनदाट जंगल जवळ असल्यामुळे वाघ व अन्य प्राण्यांचा वावरही आहे... पण काय जबरदस्त दिवस होता!   पुढील भाग: हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ३: अग्न्या व बुंगाछीना गावामधील ट्रेक माझे हिमालय भ्रमंती, सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग व इतर विषयांवरचे लेख इथे उपलब्ध: www.niranjan-vichar.blogspot.com
  • Log in or register to post comments
  • 7766 views

प्रतिक्रिया

Submitted by रात्रीचे चांदणे on गुरुवार, 12/02/2021 - 20:23

Permalink

मार्गी, अतिशय मस्त प्रवास

मार्गी, अतिशय मस्त प्रवास वर्णनं लिहिताय तुम्ही. पुढचे भाग लवकर येऊ द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त्_यात्री on गुरुवार, 12/02/2021 - 20:33

Permalink

अप्रतिम

लेखन व प्रचि. पुभाप्र
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त्_यात्री on गुरुवार, 12/02/2021 - 20:34

Permalink

अप्रतिम

लेखन व प्रचि. पुभाप्र
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 12/03/2021 - 07:22

Permalink

आहा...! सुरेख लिहिलंय,

आहा...! सुरेख लिहिलंय, छायाचित्रेही उत्तम.
  • Log in or register to post comments

Submitted by नचिकेत जवखेडकर on Fri, 12/03/2021 - 09:00

Permalink

अत्यंत सुंदर वर्णन आणि

अत्यंत सुंदर वर्णन आणि छायाचित्रे! वाचकांना पण तुमच्याबरोबर घेऊन जात आहात हिमालयामध्ये :)
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 12/03/2021 - 13:27

Permalink

वाचताना फोटो पाहिल्यावर कळतंय

की शब्दांत धरणे अवघड आहे. या वेळेस साइकल नाही? तो रूट ट्रेस OSmAnd+ app ने केलाय का open street mapने?
  • Log in or register to post comments

Submitted by मार्गी on Sat, 12/04/2021 - 11:25

Permalink

धन्यवाद!

सर्वांना खूप खूप धन्यवाद! :) @ कंजूस जी, तो स्ट्राव्हा वर रेकॉर्ड केलेल्या वॉकचा मॅप आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 12/05/2021 - 10:49

In reply to धन्यवाद! by मार्गी

Permalink

रूट ट्रेस - स्ट्रावा

@निरंजन, हे मी करत असे. ज्या भागात फिरायचे त्याचा map google map app वरून >> offline map download करून ठेवत असे. मग ट्रेक करताना फोनचे डेटा बंद ठेवून स्ट्रावा सुरू केले की गूगल map वर रूट ट्रेस व्हायचा. आता स्ट्रावावर "mapbox" ही खूण दिसते. तर openstreetmap वरचा map तिथे कसा वापरायचा?
  • Log in or register to post comments

Submitted by मार्गी on Mon, 12/06/2021 - 11:23

In reply to रूट ट्रेस - स्ट्रावा by कंजूस

Permalink

@ कंजूसजी, मला वाटतं

@ कंजूसजी, मला वाटतं स्ट्राव्हावर हा मॅप प्रकार आता उपलब्ध नाही आहे. पण त्यामुळे काही अडचण येत नाही. मॅप सेव्ह नसेल तरीही तुम्ही स्ट्राव्हावर ऑफलाईन रेकॉर्ड करू शकता.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Wed, 12/08/2021 - 18:17

In reply to @ कंजूसजी, मला वाटतं by मार्गी

Permalink

Map बदल

तुमच्या एका धाग्यात ( http://www.misalpav.com/node/41277 ) Strata map होता का? तेव्हा google map दिसतंय. त्यांनी हल्लीच mailbox चालू केलंय बहुतेक. मी रूट ट्रेस करून पाहिले ओफलाईन. mapbox map येतो.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Mon, 12/06/2021 - 13:42

Permalink

आता करून पाहतो.

पण माझ्या माहितीप्रमाणे तिथला offline map activate होतो. बऱ्याच रूट ट्रेसिंगमध्ये गूगलmap असतो. उदाहरणार्थ endomondo ( बंद होणार होते.) My tracks ( मी हे वापरतो.) OsmAnd+ ( हे नवीन open street map वापरते. पण सेवड फाईल obf आहे ती दुसरीकडे चालत नाही.)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 12/06/2021 - 15:09

Permalink

हा पण भाग आवडला

......अशा वातावरणामध्ये आपसूकच ध्यान लागतं. फक्त आपल्याला एक गोष्ट करावी लागते, ती म्हणजे आपल्या मनातले नेहमीचे उपद्व्याप बंद ठेवून जे समोर आहे, त्यासाठी मन आणि डोळे उघडे ठेवावे लागतात! आपली ओंजळ जर रिकामी असेल तर ती नक्की भरली जाते!..... अगदी अगदी .... स्वानुभव आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on Mon, 12/06/2021 - 16:23

Permalink

अजुन एक मस्त लेख

दोन्ही लेख आवडले. फोटोही मस्तच आहेत. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

Submitted by सिरुसेरि on गुरुवार, 12/09/2021 - 13:56

Permalink

प्रवास लेखमालेचा हा भागही

प्रवास लेखमालेचा हा भागही माहितीपुर्ण आहे. छान फोटो .
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on गुरुवार, 12/09/2021 - 17:06

Permalink

प्रचि

प्रचि आणि लेखन +१

💖

  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on गुरुवार, 12/09/2021 - 17:06

Permalink

प्रचि

प्रचि आणि लेखन +१

💖

  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com