Skip to main content

उतरत्या संध्याकाळी....

लेखक प्राची अश्विनी यांनी सोमवार, 15/11/2021 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
उतरत्या संध्याकाळी खिडकीत बसू नये. हरवल्या नजरेला काही काही दिसू नये. चुलीपाशी दुधावर साय दाटे आठवांची, धुरकट कंदिलाची काच तेव्हा पुसू नये. उतरत्या संध्याकाळी नको ओवी गुणगुणू, उतू उतू जाईल गं काळजाचा मेघ जणू. सरेलही सांज बघ, नको भिजवूस वाणी. हूरहूर अंतरीची नको बघायला कुणी. उतरत्या संध्याकाळी वळ थोड्या फूलवाती. जपताना धागा धागा धर थोडी राख हाती. मिटुनिया डोळे हळू लाव दिवा अंगणात, इडा पिडा टळो सारी समईच्या प्रकाशात..
लेखनविषय:

वाचने 3150
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

उतरत्या संध्याकाळी वळ थोड्या फूलवाती. जपताना धागा धागा धर थोडी राख हाती. अचुक भावना पकडली आहे. किनखापी आभाळाच्या पार्श्वभूमीवर ही कविता एकदम चटका लावून गेली. पैजारबुवा,

कविता अतिशय भावली. 'उतरती संध्याकाळ' एवढ्याच दोनच शब्दात भावनांच्या अनेक छटा, अनेक आंदोलने, व्याकुळता, उदासी वगैरे निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे. माझ्या आवडीची अनेक अप्रतिम निसर्गचित्रेही 'उतरत्या संध्याकाळ'चीच आहेत. उदाहरणार्थ खालील चित्रे: . . .

In reply to by चित्रगुप्त

क्या बात! किती समर्पक चित्रं आहेत. धन्यवाद. ( खूप उशिराने दिलेल्या प्रतिसादाबद्दल माफी.)

In reply to by चित्रगुप्त

अप्रतीम चित्रे! खूप आवडलीत. :-) अवांतरः आपली इ-गॅलरी वगैरे काही नाही काय?

उतरती संध्याकाळ म्हणजे कातरवेळ ... छान वर्णन केलयं

आवडली.
उतू उतू जाईल गं काळजाचा मेघ जणू.
इथे 'काळजाचा' ऐवजी चुकून 'काजळाचा अस वाचलं मी. तेही चालेल असं वाटून गेल. बाकी कविता उत्तमच आहे. सं - दी - प