लघुकथा

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
18 Sep 2021 - 7:49 am

लघुकथा 1
महापुरात घर आणि दुकान दोन्ही उध्वस्त झालेल्या त्याचा जीव गणेश चतुर्थी जवळ आल्यावर तळमळू लागला. कर्ज काढून कसाबसा व्यवसाय नि घराची गाडी मार्गावर आणत होता तो. त्यात या लॉक डाऊन ने सगळं महाग करून ठेवलेलं. गणपतीच्या मूर्तीच्या किमतीत दोन दिवसांचा आपला घरखर्च भागेल असा विचार करून नाखुषीनेच त्याने सण साजरा न करायचे ठरवले. चतुर्थी च्या आदल्या दिवशी तर त्याची घालमेल होऊ लागली पण परिस्थितीने तो गप्प बसला.

संध्याकाळ झाली आणि मूर्तीशाळेचे मालक अचानक त्याची ठरलेली मूर्ती घेऊन दारात हजर झाले. तो अवाक झाला. मालकच म्हणाले," अरे,अशी संकटं आली म्हणून हरून जायचं नसतं. अरे हा विघ्नहर्ता आहे. आपला जीव वाचवून हाती पायी धड ठेवलं यापेक्षा आणि काय हवं? परत जोमाने उभा राहशील हा या विघ्नहर्त्याचा आशीर्वाद आहे तुला. आणि पैशांची काळजी अजिबात करू नको. दरवर्षी यायचास तेव्हा मूर्तीशाळेतल्या सगळ्या कामगारांना हातावर काही न काही ठेवून जायचास. यावर्षी तू आला नाहीस म्हणून त्यांनी या मूर्तीचे पैसे भरून इथे घेऊन आलेत हो!"

भरून आलेल्या डोळ्यातल्या पाण्यानी अभिषेक करतच बाप्पाला त्याने घरात घेतले आणि परत उत्साहाने कामाला तयार झाला.

लघुकथा 2
महापुराचा फटका सगळयांनाच बसला मग तो तरी कसा वाचेल. खरं तर जुलै महिना म्हणजे त्याच्या मूर्तीशाळेत लगबग. आकारास आलेल्या मूर्ती रंगवयाच काम जोशात सुरू असायचं.पण महापुरात मूर्तीशाळेचे खूपच नुकसान झाले. रंग, स्टँड, ब्रश, इतर कलाकुसरीची हत्यारं बरचसं वाहून गेलं.आता नवीन सामान घ्यायला देखील पुरेसे पैसे नाहीत.शिवाय सामान येऊन मूर्ती रंगवणार कधी,वाळणार कधी नि मग शेवटचा हात फिरवणार कधी. गणित काही केल्या जमेना.बिचारा हतबल होऊन बसला होता एका कोपऱ्यात.

एवढ्यात मूर्तीशाळेच्या दारापाशी गडबड ऐकू आली म्हणून हा उठून दाराशी गेला. दाराशी गावातले नेहमीचे ठराविक मुर्त्या घेऊन जाणारे लोक जमले होते. याने हात जोडले आणि बोलणार तोच त्यांच्यातला एकजण पुढे होऊन त्याचे हात हातात घेऊन म्हणाला," दादा यंदा खूप नुकसान झालं माहितेय. पण आमचा गणपती येईल तो तुमच्याचकडचा.अहो रंग नसला म्हणून काय झालं? ज्या मूर्ती तयार आहेत त्याच आम्हाला चालतील. तुमच्या हातून प्रत्यक्ष बाप्पा आकार घेतो. त्याच तेही रूप खूप मोहक असतं. भाव तिथे देव हेच खरं. विघ्नहर्ता आहे ना तो.मग तुम्हाला संकटात टाकून तो आमच्यावर खुश कसा राहील? तुम्ही काळजी करू नका. आम्ही आधी ठरल्याप्रमाणे आमच्या मूर्ती अशाच तुमच्याकडून नेणार."

त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. खरच नावाप्रमाणेच विघ्नहर्ता त्याच्या मदतीला धावून आला.

लघुकथा 3
मागच्या वर्षी अशीच गणपतीच्या आधी ही देवासमोर बसून मनातल्या मनात रडत होती. त्याच्या आवडत्या गणपतीची तो रोज मनापासून पूजा करत असे. तिथेच आसपास त्याला नियमित लागणारी सगळी पोथ्या, पुस्तक होती.तीच त्याच्या जीवनाचा अविभाज्य घटक होती.त्याच्यावरच त्याचा चरितार्थ चालायचा. त्यांच्या शहरातला तो नावाजलेला भटजी होता. त्याच पोथ्या,पुस्तकं मागे ठेवून तो मात्र त्याच्या लाडक्या बाप्पाकडे निघून गेला होता. त्या पुस्तकांवरून हात फिरवताना तिला अचानक एक जाणीव झाली. रडणं विसरून समोरच्या बाप्पाला नमस्कार करून ती बाहेर पडली.

आज बरोबर एक वर्षाने ती त्याच देवासमोर हात जोडून आशीर्वाद मागत होती. त्याच्या जाण्याने खचलेल्या तिला याच देवाने पोथ्या पुस्तकांच्या रुपात तिला मार्ग दाखवला होता आणि आज तीसुद्धा त्याच्यासारख पौरोहित्य शिकून गणपतीच्या पूजा सांगायला सिद्ध झाली होती. तिला तिच्या उत्पन्नाचा मार्ग तर सापडलाच होता पण जे काम नवरा निष्ठेने करत होता त्याच्या पश्चात आपण तेच काम पुढे तसेच करू याचा तिला मनापासून आनंद होत होता.

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

18 Sep 2021 - 7:55 am | गॉडजिला

Positivity makes life perfect...

तुषार काळभोर's picture

18 Sep 2021 - 9:30 am | तुषार काळभोर

आयुष्य सुंदर आहे. फक्त सगळ्या गोष्टी सकारात्मकतेने स्वीकारायला हव्या..

यश राज's picture

18 Sep 2021 - 7:59 am | यश राज

छान लिहिले आहे.

श्रीरंग_जोशी's picture

18 Sep 2021 - 9:04 am | श्रीरंग_जोशी

तीन्ही लघुकथा खूप भावल्या. इथे प्रकाशित केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

पाषाणभेद's picture

18 Sep 2021 - 11:41 pm | पाषाणभेद

छान आहेत कथा.

hrkorde's picture

19 Sep 2021 - 5:48 am | hrkorde

छान

कॉमी's picture

19 Sep 2021 - 8:37 am | कॉमी

वा. छान कथा.

ज्योति अळवणी's picture

19 Sep 2021 - 5:33 pm | ज्योति अळवणी

खूप सुंदर लघु कथा

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

19 Sep 2021 - 8:54 pm | सौ मृदुला धनंजय...

सुंदर लघुकथा.

सविता००१'s picture

27 Sep 2021 - 11:46 am | सविता००१

खूप आवडल्या तिन्ही कथा

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Sep 2021 - 12:35 pm | ज्ञानोबाचे पैजार

तिनही सकारात्मक लघुकथा आवडल्या.
पैजारबुवा,

श्वेता व्यास's picture

27 Sep 2021 - 1:40 pm | श्वेता व्यास

तिन्ही कथा आवडल्या

सौंदाळा's picture

27 Sep 2021 - 5:05 pm | सौंदाळा

हे वाचायचे राहूनच गेले.
सुंदर लिहिले आहे.