✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

वर्तन विपर्यास

च
चंद्रकांत यांनी
Sun, 08/15/2021 - 22:43  ·  लेख
लेख
विज्ञान-तंत्रज्ञानाने मंडित जगाने वर्तमानकाळी अनेक प्रश्न माणसासमोर उभे केले आहेत. अर्थात, तुम्ही म्हणाल या विधानात नावीन्य ते काय? प्रश्न माणसांसोबत कधी नव्हते? अगदी खरंय, ते आहेतच आणि असतीलही. समजा, तसे ते नसते तर प्रगतीच्या परिभाषा ना त्याने शोधल्या असत्या, ना परिमाणे वापरून परिणाम तपासले असते. एक मात्र खरंय की, काळाच्या ओघात अन् आयुष्याच्या प्रवासात पुढ्यात पडलेल्या प्रश्नांच्या व्याख्या बदलत असतात. कुणी म्हणेल की, बदल नावाचा प्रकार न बदलणारं वास्तव आहे. बदल हीच एक गोष्ट अशी असावी की, जी बदलता नाही येत कुणाला. बदलांना वेग असतो. चेहरा नसतो. तो द्यावा लागतो. मग तो माणूस असो की, अन्य कुणी. त्यासाठी मुखवटे काढून चेहरा शोधावा लागतो. चेहरा असेल तसा सापडेलही एकवेळ, पण माणूस...? तो गवसेलच याची शाश्वती नाही देता येत. पण तरीही एक मुद्दा शेष राहतो, तो म्हणजे माणूसपण सगळंच संपलं आहे असं सरसकट नाही म्हणता येत. पण आसपास सगळंच काही गोमटं आहे असंही नाही. हे सगळं निर्विवाद मान्य केलं, तरी एक वास्तव विसरता नाही येत की, माणूस माणसापासून सुटत अन् आपलेपणापासून तुटत चालला आहे. आसपास माणसं तर अनेक आहेत, पण गर्दीत केवळ आकृत्या दिसतात. चेहरे कधीच हरवले आहेत. अंतरी कोरलेल्या प्रतिमांना आकार देऊन माणूस नावाची आकृती माणूस उभी करू पाहतोय. खरं सांगायचं म्हणजे आभासी विश्वात आपलं ओंजळभर विश्व शोधू पाहतो आहे. ते हाती आहेही. पण सत्य अन् तथ्य यात अंतराय असतं, याचा विसर त्याला पडलाय. हाती लागलेल्या चतकोर विश्वाभोवती तो प्रदक्षिणा करतो आहे अन् त्यालाच प्रगती वगैरे समजतो आहे. व्हाटसअॅप, फेसबुक, इन्टरनेटने जगाशी कनेक्ट असणारी माणसं मात्र डिसकनेक्ट होत आहेत. ‘फेस टू फेस’ संवाद हरवतोय. सगळ्या जगाच्या वार्ता माहीत आहेत; पण आपल्या शेजारी कोण राहतो, हे माहीत नसणे, हा वर्तन विपर्यास नव्हे का? रोजच्या धावपळीत अनेक घटना घडतात. त्यातल्या सगळ्याच नाही अधोरेखित करता येत कुणाला अन् सगळ्यांचीच समर्पक उत्तरे नाही शोधता येत. खरं तर हेही आहे की, कुण्या एकाला जगाचं जगणं देखणं नाही करता येत. काळ कोणताही असो आसपास कुठेतरी, कोणावर तरी अन्याय होतच असतो. त्याचं प्रमाण कमी अधिक असलं म्हणून त्याच्या परिभाषा नाही बदलत. तो आपण पाहतो. दिसला तर घडू नये म्हणून काय करतो? स्व सुरक्षित राखणाऱ्या चौकटींनी बंदिस्त करून घेतलेलं जगणं, हे याचं उत्तर नाही. स्वतःला शोधण्यासाठी चौकटीनी निर्देशित केलेल्या सीमा सोडव्या लागतात. प्रतिरोधाच्या भिंती ध्वस्त कराव्या लागतात. बंधनांचे बुलंद बुरुज पार करावे लागतात. चौकटी मोडणाऱ्यांनाही व्यवस्थेकडून जाब विचारले जातात. कोण्या एखाद्याने कुंपण ओलांडून आपलं आकाश शोधण्यासाठी घेतली भरारी, तर पंख कापण्यासाठी हात अगत्याने पुढे येतात. शोषणाविरोधात आवाज बुलंद होतो, तेव्हा तो बंद करण्याचे पर्याय का शोधले जातात? अन्याय होतो आहे, म्हणून परिस्थितीला प्रश्न विचारून पाहतो का? निदान आपणच आपल्याला तरी विचारतो का? इतिहास प्रश्न विचारतो का? होय, विचारतो! एकदोनदा नाही अनेकवेळा विचारतो. पण प्रत्येकवेळी ते कळतातच असं नाही. त्याची उत्तरे शोधण्यासाठी विधायक विचारांच्या पणत्या हाती घेऊन पावलापुरता प्रकाश पेरीत चालावे लागते. तो योजकतेने अन् परिश्रमाने घडवावा लागतो. आपल्याकडे शतकांचा उज्ज्वल इतिहास असेल, तर त्यापासून आपण काय शिकलो? हा प्रश्न आपणच आपल्याला कितीदा विचारतो? इतिहासाकडून काहीच न शिकणे, हा वर्तन विपर्यास नाही का? माणूस नावाच्या जिवाभोवती विपुल व्यवधाने आहेत. आयुष्यात अनेक गुंते आहेत. ते असतातच. त्यांना टाळून कुणालाही पुढे नाही जाता येत अथवा टाकून पळूनही नाही जाता येत. एकतर त्यांना सामोरे तरी जावे लागते, नाहीतर निराकरण तरी करावे लागते. पण, ते व्हावे कसे? हाही एक जटिल प्रश्नच आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे माणसाने शोधली, तरीही त्यातून आणखी नवे प्रश्न निर्माण होतच आहेत. राहतील. प्रश्न कधी थांबत नाहीत अन् संपतही नाहीत. माणसांच्या आयुष्यातून प्रश्न वजा केले, तर मागे काय उरेल...? हाही एक प्रश्नच, नाही का? -चंद्रकांत चव्हाण ••
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
3241 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

दिवसभर आपण काय घेता... कहर

गॉडजिला
Sun, 08/15/2021 - 22:47 नवीन
दिवसभर आपण काय घेता... कहर लिखाण घेउन येता म्हणून उत्सुकता वाढली
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक आभार!

चंद्रकांत
Sun, 08/22/2021 - 20:09 नवीन
मनःपूर्वक आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

बरोबर.

कंजूस
Mon, 08/16/2021 - 08:23 नवीन
'यातून मला काय मिळेल' हे सध्याचं घोषवाक्य आहे. घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या?
  • Log in or register to post comments

प्रश्न कधी थांबत नाहीत अन्

चौथा कोनाडा
Mon, 08/23/2021 - 20:35 नवीन
प्रश्न कधी थांबत नाहीत अन् संपतही नाहीत. माणसांच्या आयुष्यातून प्रश्न वजा केले, तर मागे काय उरेल...? हाही एक प्रश्नच, नाही का?
प्रश्न, प्रश्न आणि ...... प्रश्नच ! (सहज मोजली तर तब्बल १९ प्रश्नचिन्हे सापडली धाग्यात) कधी तरी उत्तरं घेऊन पुढं यायला हवं !
  • Log in or register to post comments

(No subject)

गॉडजिला
Mon, 08/23/2021 - 21:34 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

मनःपूर्वक आभार!

चंद्रकांत
Sun, 08/29/2021 - 21:51 नवीन
मनःपूर्वक आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

माणसांच्या आयुष्यातून प्रश्न

गॉडजिला
Tue, 08/24/2021 - 03:46 नवीन
माणसांच्या आयुष्यातून प्रश्न वजा केले, तर मागे काय उरेल...? हाही एक प्रश्नच, नाही का?
कसे काय ? प्रश्न तर वजा केला आहे तर उरणार काय ? काहिच नाही... जेंव्हा जेंव्हा प्रश्न असेल काही तरी नक्की उरेल... पण प्रश्न वजा करता आले तर उरेल फक्त समाधान
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा