अभियांत्रिकीचे दिवस-६.. 'जिव्हाळा' विशेष..!

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
26 Aug 2021 - 8:50 pm

[हॉटेल 'जिव्हाळा'
मेन्यूकार्ड: चिकनथाळी -- फक्त ६० रूपै]

त्या शहरातली नेहमीसारखीच एक मोकळी संध्याकाळ आणि त्यात कुंद कुंद पावसाळी हवाही फारच उदास पडलेली...! आणि शिवाय दुपारी बॅकलॉगचा एक पेपर देऊन दु:ख फारच अनावर झाल्यामुळे, आम्ही सगळे ताबडतोब 'मैफिल बार अँड रेस्टॉरंट' येथे जाऊन बसलो.

अर्थात, त्यावेळी व्हाईट मिसचीफ व्होडका, साधं पाणी आणि चकण्याला उदाहरणार्थ चणा-डाळ-कांदा वगैरे मिक्स करून, एवढंच परवडण्यासारखं होतं..!
शिवाय व्होडकाही समजा स्वस्तातलाच आणि पिण्याची पद्धतही समजा रानटी, घपाघप आणि 'टॉप टू बॉटम' वगैरे...!
कारण स्कॉच- सोडा-बर्फ आणि जोडीला उदाहरणार्थ उत्कृष्ट सुरमई फ्राय किंवा चायनीज आयटम्स, तसेच बटर, खारे काजू, काकडी, गाजर वगैरे सॅलाड्स.. असला ऐसपैस खानदानी सरंजाम आम्हा दुष्काळी जनतेस, त्यावेळी कोठून ठाऊक असणार..!

समजा एखाद्या राजकीय पक्षानं, 'कॉलेजचं आयकार्ड दाखवलं तर बारच्या बिलामध्ये थोडी सबसिडी मिळेल', अशी पॉलिसी आणली, तर त्या पक्षाला एक कायमस्वरूपी हक्काची सायलेंट व्होट बँक मिळून जाईल, हे माझं मत म्हणजे जरा जास्तच अवांतर होतंय, हे आपलं म्हणणं मला अगदी मान्य आहे.. असो.

तर त्या विशिष्ट संध्याकाळी मद्य मजबूत चढल्यानंतर आम्हाला नेहमीप्रमाणेच एकमेकांची भाषा समजायची बंद झाली आणि शिवाय अशा वेळी नेहमीच जे होतं ते म्हणजे वॉशरूमला जातानाही डुलत डुलत जायला लागणं वगैरे..

तर अशी टुन्न अवस्था गाठल्याचं लक्षात आल्यानंतर, आम्ही नियोजन केलं की ''फक्त ६० रूपैमध्ये चिकन थाळी'' देणाऱ्या आणि त्यामुळेच अतिआकर्षक वाटणाऱ्या, 'जिव्हाळा' ह्या ढाबाटाईप ठिकाणी जेवण्यासाठी जाऊ.

रस्सा, भाकरी, थोडंसं चिकन, कांदा, लिंबू आणि जोडीला पाणी पिण्यासाठी प्लॅस्टीकचा कळकट जग..!! व्वा ! क्या बात है..!

"चिकन समजा थोडंसं जुनाट रबरी वगैरे असलं तरी काय हरकत आहे ?? आणि ६० रूपैमध्ये आणखी काय काय पायजे रे तुला रांडीच्या ss??"
अशी आपापसांत व्यावहारिक चर्चा करत, आमचं जेवण चाललेलं.

इथपर्यंत सगळं नेहमीप्रमाणे आणि सुरळीत होतं...!

पण मग समजा अतिमद्यप्राशनामुळे आमच्यापैकी काहीजणांचं धाडस वाढलेलं असेल...
त्यामुळे थट्टामस्करी वगैरे करण्याची उबळ आली असेल..
त्यामुळे समजा त्यांनी स्वतःच्या ताटातल्या रश्शामध्ये लिंबू पिळून, उरलेला लिंबू एकमेकांना फेकून मारण्याचा एक्साइटींग खेळ चालू केला असेल..
आणि त्याहीपुढं जाऊन समजा, ते लिंबाचे चोथे फेकताना नेम चुकला असेल आणि तिथं आजूबाजूला जेवायला बसलेल्या अनोळखी मनुष्यांस लागला असेल, तर ह्यात कुणी एवढं मनाला लावून घेण्याचं काही कारण होतं काय ??
त्यांनी समजून घ्यायला हवं होतं की आम्ही निष्पाप निरागस मुलं जरासं रिलॅक्स होत आहोत ते..!
पण नाही..!! त्या अनोळखी मनुष्यांनी आमच्यासोबत वाद उकरून काढला..!!

अर्थात, मी जेवणात गुंग असल्याने, ह्या सगळ्याची सुरूवात नेमकी कधी झाली, हे माझ्या लक्षात आले नाही.
पण एका क्षणी मला दिसले की माझ्यासमोर बसलेले श्री. लातूरकर अत्यंत चपळाईने दरवाजातून बाहेर पळत गेले आहेत.. ते पाहताच मला शंका आली की काहीतरी गडबड झालेली आहे..!!
म्हणून मी मागे वळून पाहिले असता मला दिसले की आमचा एक जोडीदार, त्या अनोळखी मनुष्यांस
आरडून ओरडून विचारत आहे की,"तुला लय मस्ती आलीय का?? तुला म्हाईत नाय का मी कोन हाय ते??", वगैरे वगैरे...

नंतर मला दिसले की श्री.औरंगाबादकर आणि एक अनोळखी मनुष्य ह्यांच्यामध्ये माफक शारीरिक झोंबाझोंबी सुरू आहे..!!
पण श्री. औरंगाबादकर ह्यांनी नंतर फार वर्षांनी मला पटवून दिले की, स्वत:च्या पायांतल्या ब्रॅंडेड शूजचा वापर करून, त्यांनी त्या अनोळखी मनुष्यास जोरदार फाईट मारली होती...!!

खरे खोटे ईश्वरच जाणे..!
कारण सत्याची स्वतःला सोयीस्कर असणारी आवृत्ती पेश करण्याबद्दल श्री. औरंगाबादकर प्रसिद्ध होते.. !

मग ह्यानंतर त्या मनुष्याने त्याच्या साथीदारांना फोन लावला आणि त्यांना अर्जंट घटनास्थळी येण्यासाठी पटवू लागला..! आणि शिवाय त्याने आम्हांस इशारा दिला की "हितंच थांबा ***...!! आता मी तुमाला सगळ्यान्ला चांगलेच ** लावनार हाय...!"

ही गर्जना ऐकताच माझ्यावरचा मद्याचा अंमल झटक्यात अर्ध्याने कमी झाला..!!
पण माझ्या शेजारी परममित्र श्री. कुलकर्णीदेव बसले होते, ते अजूनही बऱ्यापैकी धुंद अवस्थेत आहेत, हे माझ्या लक्षात आले..
श्री. कुलकर्णीदेव निवांतपणे रस्सा भुरकत होते, चिकनची हाडं चापत होते.. त्यांस मी म्हणालो की "अहो देवा, आता उशीर करण्यात काहीच अर्थ नाही..उरका लवकर..!"

मग आम्ही सगळे जेवण तसेच सोडून बाहेर आलो,
तेव्हा श्री. औरंगाबादकरही फोनवर आरोळ्या ठोकत होते आणि कुणालातरी तिथं येण्यासाठी कळकळीचं आमंत्रण देत होते..!
समरप्रसंगाची चाहूल लागली की माझे हातपाय लगेच गार पडतात...! असतो एकेकाचा प्रॉब्लेम..!!

त्यामुळे मी श्री.औरंगाबादकरांना सहजच सल्ला दिला की "समजा त्यांची टोळी लगेच इथं आली, तर त्यांच्याशी लढणार कोण?? रात्रही फार झालीय आणि आता कुठं मारामारी वगैरे करता?? आता पळा..!!!"

खरं तर मला अंधूक आशा होती, की आमचे सेनापती श्री. औरंगाबादकर चिडतील आणि माझा 'पळण्याचा प्रस्ताव' ताबडतोब ठोकरून लावतील आणि शिवाय माझ्या पेद्रटपणाबद्दल मला शेलक्या शिव्या वगैरे देतील..!!

पण आश्चर्य..!!
आमच्या त्या युद्धकुशल सेनापतींनी लगेच ओरडून सर्वांना आदेश दिला की "पळाss..!!!"
आता खुद्द सेनापतीच पळण्याच्या दृष्टीने अतिजलद हालचाली करू लागल्यानंतर आमच्या सर्वांमध्ये खळबळ माजणे, हे मनुष्य स्वभावाला धरूनच होते, असे म्हणावे लागेल.

"पळाss!" हा शब्द ऐकताच, श्री. सांगलीकर ह्यांनी तातडीने बाईक स्टार्ट केली.. फक्त अर्ध्याच सेकंदात, त्या बाईकवर मी आणि श्री.कुलकर्णीदेव उड्या मारून बसलो आणि निघालो.
थोडं पुढे जाताच आम्हांस दिसले की श्री.‌जळगावकर एका वाळूच्या ढीगापाठीमागं लपून बसण्याचा विनोदी प्रयत्न करत आहेत..!

आम्ही ओरडून त्यांस सांगितले की "इथं एकट्यानं लपून बसण्यात काहीच पॉइंट नाही... आपल्या सेनापतींनी ऑलरेडी रान कातरलेलं आहे.. त्यामुळे आता सगळ्यांनी ढुंगणाला पाय लावून पळणं, हेच सद्यपरिस्थितीत योग्य धोरण आहे...! "

एवढं बोलून आम्ही ट्रिपलसीट होस्टेलच्या दिशेने निघालो.. वाटेत श्री.कुलकर्णीदेव, मला विचारले की, "मागे राहिलेले आपले वर्गबंधू आता मार खातील काय रे?"

ह्यावर मी त्यांस प्रवचन देत आश्वस्त केले की,
"तुम्ही मुळीच चिंता करू नका देवा...आपले वर्गबंधू जातिवंत बेवडे आहेत.. आणि जातिवंत बेवडे सदासुखी असतात हे जगजाहीर आहे..! कारण अशा अस्सल बेवड्यांच्या भल्याबुऱ्याची चिंता साक्षात परमेश्वरच वहात असतो.. !!"
श्री.कुलकर्णीदेव ह्यांनाही ते लगेच पटले आणि त्यांनी मला टाळीही दिली.

आम्ही तिघं कँपसमध्ये पोचलो तेव्हा थोडासा आडोसा बघून, आम्ही झालेल्या घटनेचं मुक्त विश्लेषण करत होतो,
तेवढ्यात माझा फोन वाजला.. फोन उचलल्यावर
सुरूवातीला लक्षात येत नव्हते की नक्की कोण बोलत आहे.. कारण पलीकडचा मनुष्य अतिशय घाबऱ्याघुबऱ्या आणि उत्तेजित स्वरात बोलत होता..

मग जेव्हा काळजीपूर्वक ऐकलं तेव्हा लक्षात आलं की ते श्री. लातूरकर होते, जे धोक्याची जाणीव होताच सर्वात आधी तिथून सटकले होते...
पण प्रॉब्लेम असा झाला होता की ते चपळाईने 'जिव्हाळा'मधून बाहेर पडले आणि घाई गडबडीत एका टमटममध्ये बसून भलत्याच ठिकाणी जाऊन पोचले होते.
आणि तिथं गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की "अरेच्चा..!! इथं तर काहीच ओळखीचं वाटत नाहीये..!!आपण नेमकं कुठं आलोय..!"

त्यामुळे आता ते मला फोन करून विनवत होते की,
"मी असा असा इथं इथं आहे आणि ह्या भयाण मध्यानरात्री मला होस्टेलवर यायला वाहन भेटत नसल्यामुळे आणि तूच माझा एकमेव जिवलग मित्र वगैरे असल्यामुळे मला घेऊन जाणं, हे तुझं कर्तव्यच आहे."

तर अशा ह्या श्री. लातूरकर ह्यांचा अतिचंचल स्वभाव पाहता, मला तिकडे जाणे भागच होते...
पण त्यांस घेऊन परत येत असताना वाटेतच आम्ही नेमकं दुष्मनांच्या तावडीत सापडलो..!!

ह्याला शुद्ध दुर्दैवच म्हणावे लागेल..!!

शिव्यांची बौछार करत दुष्मन रिक्षातून उतरले..!
मी अर्थातच सवयीप्रमाणे "दादा दादा" वगैरे म्हणून त्या टोळक्याशी कौटुंबिक नातं जोडण्याचा प्रयत्न करू लागलो... पण त्यांनी असे नातेसंबंध जोडून घेण्याकडे साफ दुर्लक्ष करून आम्हांस डायरेक्ट फटकवण्यास सुरूवात केली.

"थांबा थांबाss.. चष्मा तरी काढू द्या की ओss" "अय्योयोयोआयायायाsss.. चूकी झालीss एवड्या बार सोडा आमालाss...लय लागतंय गी ओssss.!"
(त्यावेळी आमच्या तोंडून अशा स्वरूपाचे विव्हळ उद्गार निघाल्याचे आठवते..! )

शेवटी बऱ्यापैकी काडता काढल्यावर त्या टोळक्याने, आम्हास तिथून हुसकावून लावले.
पण त्या भानगडीत माझा मोबाईल तिथं कुठंतरी पडला.
तशातच पाऊस चांगलाच चालू झालेला.. मोबाईलची काळजी होती.. पण परत माघारी जाऊन मोबाईल आणायची हिंमत कोठून आणावी...!
पण मग लक्षात आले, की ह्या कामात परममित्र तडफदार सरदार श्री. वीरेंद्रसिंह घाटगे-देशमुख ह्यांची मदत घेता येईल.

म्हणून मी श्री.घाटगे-देशमुख यांच्या रूमच्या खाली जाऊन त्यांस जोरजोरात हाका मारू लागलो..!!
एव्हाना शरीरातलं मद्याचं प्रमाण झिरोवर आल्यामुळे आणि हुडहुडी भरल्यामुळे माझा आवाज पूर्णपणे फाटत असणार त्यावेळी..
पावसात भिजून लगदा झालेलं रस्त्यावरचं एखादं बेवारस कुत्र्याचं पिल्लू जसं केकाटतं, डिट्टो तसाच माझा आवाज निघत होता, असं काही प्रत्यक्षदर्शींनी मला नंतर सांगितलं..!! पण ती नंतरची गोष्ट..

तर माझ्या आवाजातली निकड लक्षात घेऊन सरदार श्री. घाटगे-देशमुख तातडीने खाली आले.
मी त्यांस थोडक्यात परिस्थितीची कल्पना दिली आणि माझ्या येण्याचा मर्यादित उद्देशही स्पष्ट केला..
श्री.घाटगे-देशमुख सरदार हे एक अत्यंत उमदे मनुष्य आहेत, हे मला मान्यच करावे लागेल...!!
त्यांनी बुलेटला दणदणीत किक मारली आणि बोलले की "चल बस म्हागं... कोन भो*डीचा आडवा येतो तेच बगतोss.. ना*डी वरात काडू त्येंची..!!!" असे वीरश्रीयुक्त उद्गगार काढले त्यांनी..!!

पण ते उद्गार ऐकून मी लगेच 'सावध' झालो कारण मला संशय आला की श्री. घाटगे देशमुखसुद्धा नेहमीप्रमाणे मॅकडोवेल-नाईंटी मारून बसले आहेत की काय...!

म्हणून मी त्यांस अदबीने बोललो की "मालक, आत्ता थोड्या वेळापूर्वीच माझी कणीक पुरेपूर तिंबली गेल्यामुळे माझी हौस बऱ्याच अंशी भागलेली आहे.. त्यामुळं आता कुणीच आडवं येऊ नये, अशी माझी इच्छा आहे..!"
अर्थात घटनास्थळी जाऊनही फारसा उपयोग झाला नाही.. तो मोबाईल पावसामुळे पूर्ण कामातून गेला होता... पण तेही एक असोच..

** काही ठळक परिणाम:
१. धो धो पावसातून, शेतांतून, ऊसांतून आणि गुडघाभर चिखलातून पळत येताना श्री.औरंगाबादकर सेनापती ह्यांचे ब्रँडेड शूज निसटून गेले..
पण त्यांनी हार मानली नाही.. ते तसेच अनवाणी पायांनी एका चिवट जिद्दीनं, एका अविचल निष्ठेनं डीपीपर्यंत पळत आले...!!
२. सदर घटनेमुळे श्री. जळगावकर ह्यांच्यात अध्यात्मिक स्वरूपाचे परिवर्तन झाले आणि त्यांनी आयुष्यभर मद्याचा त्याग करण्याचा संकल्प सोडला, जो नेहमीप्रमाणेच आठवडाभरात कोसळला.
३. पुढचे दोन-तीन दिवस श्री.लातूरकर ह्यांची मनस्थिती नाजूक झाली..!! ते रात्री झोपले असता त्यांस स्वप्न पडायचे की रिक्षावाले टोळके त्यांस आणखी चोप देण्यासाठी येत आहे..!! मग ते रात्री बेरात्री 'मेलो मेलो' म्हणत दचकून उठायचे आणि आम्हास खिदळण्याची संधी उपलब्ध करून द्यायचे... रिक्षाचा आवाज ऐकताच श्री. लातूरकर दिवसाढवळ्या घाबरेघुबरे होतात, असा एक प्रवाद सदर घटनेमुळे पुढे रूढ झाला...!!

तर आम्ही जिला 'जिव्हाळा'च्या रणांगणातली ऐतिहासिक धुमश्चक्री वगैरे म्हणतो, त्याचा हा इतिवृत्तांत..!!

## थोडंसं अवांतरः-

नंतर बऱ्याच वर्षांनी असंच एकदा पुणे मुक्कामी एका बारमध्ये बसलो असताना, 'पानिपत' आणि मराठ्यांचे गनिमी काव्याचे युद्धतंत्र ह्याबद्दलचे माझे विश्लेषण मी
श्री.औरंगाबादकरांना सांगत होतो..
(श्री.औरंगाबादकरांचा आणि 'इतिहास' ह्या विषयाचा संबंध इयत्ता दहावीतच संपुष्टात आलेला होता.. त्यामुळे मी काहीही ज्ञान पाजळले असते तरी खपण्यासारखे होते..)

पण माझे विस्तृत भाषण ऐकून श्री. औरंगाबादकरांनी उत्कटतेने माझा हात हातात घेतला आणि म्हणाले की,
"श्री.सोलापूरकर, तुम्ही तर अगदी माझ्या मनातलं बोललात हो..! मी गनिमी काव्याचंच युद्धतंत्र 'जिव्हाळ्याच्या लढाईत' वापरलं होतं.. पण दुर्दैवाने थोडंसं नियोजन फसलं..!!
त्यामुळे आपल्या पोरांनी मला खलनायक ठरवलं..
आता कदाचित तुमच्यासारखा साक्षेपी इतिहासकार तरी मला योग्य न्याय देईल, अशी मी आशा लावून बसलो आहे...!!
तुम्ही तो सगळा इतिहास माझ्या बाजूने लिहिण्याचे काम कराल काय?? माझ्यासाठी एवढं कराच प्लीज..!"

आणि अर्थातच, श्री. औरंगाबादकरांच्या गौरवशाली कारकिर्दीवरचा तो भलामोठा डाग पुसणं, हे माझं कर्तव्यच आहे...!
नाहीतर मग एवढे पुरातन मैत्र जोपासून काय उपेग...!!
म्हणून हा लेखनप्रपंच..!

विडंबनविनोदव्यक्तिचित्रमौजमजाप्रकटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

गुल्लू दादा's picture

26 Aug 2021 - 10:11 pm | गुल्लू दादा

खूप हसलो. मस्त लिहिता. लिहित रहा.

पाटिल's picture

26 Aug 2021 - 10:28 pm | पाटिल

_/\_ धन्यवाद गुल्लू दादा :-))

सुक्या's picture

26 Aug 2021 - 11:17 pm | सुक्या

अरारारा .... लई खतरनाक ...
दंडवत घ्या पाटील साहेब ..

रच्याकने : तुमची लेखनशैली ओघवती आहे. पुलेशु.

पाटिल's picture

27 Aug 2021 - 8:13 pm | पाटिल

@ सुक्या,
पाटलांकडून तुम्हांसही सप्रेम धन्यवाद ..!
:-))

गॉडजिला's picture

26 Aug 2021 - 11:25 pm | गॉडजिला

असेच एकदा बाहेरील ढाब्यावर पार्टीला गेलो होतो शेजारी टेबलावर एक भयानक ग्रूप अर्वाच्य शिव्या देत त्यांच्याच मस्तीत रंगला होता. कोणीतरी मोठी असामी होती.

आम्ही आपले बरेच सभ्य, ढगात विहाराचा अनुभव घेत आमच्या गप्पात रंगलो... अन् तितक्यात शेजारील टेबलावर एक जण आऊट होऊन भडाभडा ओकू लागला...

ते पाहून आमच्या टेबलावरून एक जण विक्राळ आवाजात गडगडाटी हास्य करत त्याच्याच नादात बराळला चायला झेपत नाही तर पितात कशाला हे साले...

झालं सर्वत्र भयाण शांतता अगदी कामगार वर्गही जागेवर उभा राहून श्वास रोखून नेमकं काय झालं याचा अंदाज घेऊ लागला शेजारील टेबलावर सर्वजण आमच्याकडे रोखून बघू लागले...

मी देखील टुंन अवस्थेत होतो पन आतून मनोदेवता माझ्या रक्षणास तत्पर निघाली काही कळायच्या आत मी ओरडलो सच्या पळ गाडी काढ त्याच वेळीं शेजारील टेबल प्रमूख धर त्या आय**ला, गां* फाडा त्यांची ओरडला...

बस, सुदैवाने आम्हीं कमी ढगात निघालो परिस्थितीचे भान ओळखून धडपडत गाडीपर्यंत पोचलो, आमच्या सुदैवाने शेजारील ग्रूप लवंडायच्या अवस्थेत असल्याने त्यांची धाव कमी पडली जेवण, बील, ढाब्यावरील लोकं कसलीही तमा न बाळगता गाडी सुसाट सोडुन वेगाने चांदणी चौकात आलो तेंव्हा थोडा धीर आला कोणीही पाठलाग केला नव्हता... आम्ही पूर्ण सुरक्षीत होतो याची खात्री झाली. त्यानंतर जो ओरडला त्याला सर्वांनी शक्य त्या ताकतीने व प्रेमाने बुकलून काढले पण त्याला आपण ओरडलो हेच आठवत नाही असाच बचाव तो शेवटपर्यंत करत राहिला...

थोडा वेळ तिथे तसाच घालवला व आता जेवायचे कूठे हा प्रश्नच नव्हता कारण बराच उशीर झाला होता व बऱ्यापैकी उतरू लागली होती भूक तर लागली होती पण पर्याय सुचत नव्हते म्हणून शेवटी तसेच गाडी हायवेने खेड शिवापूरकडे रेटली रात्रीचा दीड वाजून गेला होता कुठेही पूर्ण जेवण उपलब्ध नव्हते अन टोलनाक्याच्या अलीकडे एक टपरीवाला दिसला जो अंडा भुर्जी चहा कॉफी विकत होता, तिथेच ऑर्डर सोडली व गाडीतच बसून गप्पा मारत वेड्या सारखे थोड्या थोड्या वेळाने चहा, कॉफी, आम्लेट, भुर्जी, सिगारेटच्या ऑर्डर पहाटे पर्यंत सोडत राहिलो... नक्की काय घडले यावर बरीच चर्चा झाली अन सूर्यनारायणाची चाहूल लागता आम्हीही तेथून काढता पाय घेतला

रंगीला रतन's picture

27 Aug 2021 - 12:45 am | रंगीला रतन

भारी चालू आहे मालिका.
पुलेशु.

सुखी's picture

27 Aug 2021 - 7:23 am | सुखी

लै हसलो राव... झकास

सोत्रि's picture

27 Aug 2021 - 7:34 am | सोत्रि

झक्कास!

-(गनिमी कावेबाज अभियांत्रिक) सोकाजी

टवाळ कार्टा's picture

27 Aug 2021 - 3:00 pm | टवाळ कार्टा

ख्याक

शानबा५१२'s picture

27 Aug 2021 - 4:19 pm | शानबा५१२

खुप आभार, खुप म्हणजे खुप, खदखदुन हसलो.

श्री. औरंगाबादकरांच्या गौरवशाली कारकिर्दीवरचा तो भलामोठा डाग पुसला गेला की नाही माहीत नाही. पण लेख मात्र झकास !! खूप विनोदी. मस्त लिहिलेय. तुमची लेखनशैली खत्राचा आहे.

पाटिल's picture

27 Aug 2021 - 8:22 pm | पाटिल

तांबे सरकार,
आमचे परममित्र श्री. औरंगाबादकर ह्यांच्या कारकीर्दीवर डागांची अशी लांबलचक रांगोळीच है..!! :-))
पण डागांचाही जल्लोष करणारं असलं नमुनेदार व्यक्तिमत्त्व दोस्ती खात्यात असलेलं एक बरं असतंय..!
अभिप्रायाबद्दल तुमचे आभार :-)

अभिजीत अवलिया's picture

27 Aug 2021 - 5:17 pm | अभिजीत अवलिया

छान चालू आहे लेखमाला

शानबा५१२'s picture

27 Aug 2021 - 7:27 pm | शानबा५१२

प्रतिसाद ही एकदम मजा आलेत.

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Aug 2021 - 8:03 pm | राजेंद्र मेहेंदळे

आणि लेखमाला सुद्धा मस्त चालु आहे. पु ले शु. येउंद्य अजुन

शानबा५१२'s picture

27 Aug 2021 - 8:17 pm | शानबा५१२

'विसोबा खेचर' ह्याम्चे लेख मी अजुनही शोधुन वाचतोय, तशी अनुक्रमणिका ह्या लेखकाच्या लेखांची करता येईल का? मिसळपावच्या सर्व नियमात बसत असेल तर मला ह्या लेखकाच्या सर्व लेखाम्ची लेखमाला अनुक्रमेणिके सकट डाउनलोड करायची आहे.
मला पहील्याचे मिसळपाव डॉट कॉम पुन्हा एकदा अनुभवायचे आहे, आता काही लेखक तसे आहेत त्यांना प्रोत्साहन द्यावे व मला अजुन चांगले वाचायला मिळेल म्हणुन बोलतोय.
मिसळपावचे मालक, तात्या.........कधी प्रत्यक्षात त्यांना भेटलो नाही, पण 'मिसळपाव डॉट कॉम व तात्या" हे आठवलं की होते साहीत्यिक मेजवानी!

पाटिल's picture

27 Aug 2021 - 8:34 pm | पाटिल

@ शानबा,
[मला ह्या लेखकाच्या सर्व लेखाम्ची लेखमाला अनुक्रमेणिके सकट डाउनलोड करायची आहे.],

माझ्या बाजूने काहीच हरकत नाही... तुम्हाला हे लिखाण आवडले, पटले ह्याचा मला आनंदच आहे...!
तुमच्या अभिप्रायाबद्दल मी आभारी आहे.. :-))

खरोखर! खदकदुन हसलो म्हणजे काय माहीतेय मी हसताना हलत होतो, खदाखदा हसणे, पोट धरुन हसणे बोलतात ना तसे!

"चिकन समजा थोडंसं जुनाट रबरी वगैरे असलं तरी काय हरकत आहे ?? आणि ६० रूपैमध्ये आणखी काय काय पायजे रे तुला रांडीच्या ss??"
अशी आपापसांत व्यावहारिक चर्चा करत, आमचं जेवण चाललेलं.

इथपर्यंत सगळं नेहमीप्रमाणे आणि सुरळीत होतं...!

पण मग समजा अतिमद्यप्राशनामुळे आमच्यापैकी काहीजणांचं धाडस वाढलेलं असेल...
त्यामुळे थट्टामस्करी वगैरे करण्याची उबळ आली असेल..
त्यामुळे समजा त्यांनी स्वतःच्या ताटातल्या रश्शामध्ये लिंबू पिळून, उरलेला लिंबू एकमेकांना फेकून मारण्याचा एक्साइटींग खेळ चालू केला असेल..
आणि त्याहीपुढं जाऊन समजा, ते लिंबाचे चोथे फेकताना नेम चुकला असेल आणि तिथं आजूबाजूला जेवायला बसलेल्या अनोळखी मनुष्यांस लागला असेल, तर ह्यात कुणी एवढं मनाला लावून घेण्याचं काही कारण होतं काय ??

मी दीवसभर वाचीन व हसत राहीन अस लिहलय, हे नाही मिळत पुस्तकात!

Nitin Palkar's picture

27 Aug 2021 - 8:15 pm | Nitin Palkar

छान लिहिताय. लिहीत रहा.

सर्वांचे प्रतिसाद वाचून आम्हास गुदगुल्या झालेल्या आहेत, आणि त्याबद्दल पाटील सर्वांचे आभारी आहेत.. :-))

मास्टरमाईन्ड's picture

27 Aug 2021 - 10:06 pm | मास्टरमाईन्ड

"मालक, आत्ता थोड्या वेळापूर्वीच माझी कणीक पुरेपूर तिंबली गेल्यामुळे माझी हौस बऱ्याच अंशी भागलेली आहे.. त्यामुळं आता कुणीच आडवं येऊ नये, अशी माझी इच्छा आहे..!"

हे एकदम जबराट !!
विशेषतः

आणि शिवाय दुपारी बॅकलॉगचा एक पेपर देऊन दु:ख फारच अनावर झाल्यामुळे, आम्ही सगळे ताबडतोब 'मैफिल बार अँड रेस्टॉरंट' येथे जाऊन बसलो.

हे वाचून एकदम relate झालं.
आमच्या इंजिनियरिंग चे दिवस आठवले.

मस्त! असेच पुढचे भाग पण येऊ द्यात.

कासव's picture

28 Aug 2021 - 12:56 am | कासव

स्थळ आणि हॉटेल ची नावे वाचून वाटतंय की कराड ची गोष्ट आहे. त्या दिवशी आम्ही पण जिव्हाळा वर असू बहुतेक

भीमराव's picture

5 Sep 2021 - 9:32 pm | भीमराव

कामती रोडला समाधान नावाचा ढाबा आहे, आमचा स्वर्ग होता राव तो. आपल्याला हवं तेवढं चिकन घेऊन जावं, मालकाला द्यावं आणि पोट दुखायला लगेपर्यंत सुक्क, रस्सा आणि रोट्या खाव्या. बेवडे दारु ढोसत बसत, आपण मात्र पोटभर घ्यावं, झालं की पोरं गोळा करुन बाळुला (रेक्टर) समजायच्या आत होस्टेलमध्ये परत यावं. भांडणं झाली तर मालक स्वतः मध्ये पडुन मिटवायचा, आणि पोरं गाडीत भरून कॉलेजवर पोहोचवायचा. सोलापूर कर आहे म्हटल्यावर जा एकदा समाधान ला. :)