इंग्रजी भाषेचा अन्य भाषांवर प्रभाव
लेखनप्रकार
भाषा शिकण्याचा अनुभव कथन करताना मराठी आणि जर्मन संभाषणात इंग्रजी शब्दांचा वापर यावर एक निरीक्षण नोंदवले होते आणि तो विषय थोडक्यात आवरला होता. मात्र त्यानंतर अधिक शोध घेतला असता परिस्थिती जरा वेगळी असल्याचे जाणवले.
१) जगातील भाषांची आकडेवारी
एखादी भाषा बोलणाऱ्या व्यक्तींची संख्या किमान १० करोड आहे अशा केवळ १३ भाषा जगात आहेत [१]. इंग्रजी १३४ करोड ते जपानी १२ करोड अशी एक ते तेरा क्रमवारी आहे. चिनी भाषा दुसऱ्या क्रमांकावर ११२ करोड आणि हिंदी ६० करोड तिसऱ्या क्रमांकावर आहे. चीनची लोकसंख्या शंभर करोडच्या पुढे असल्याने चिनी भाषा वगळता दुसरी कुठलीही भाषा इंग्रजीच्या जवळपासही येत नाही. या संख्या मातृभाषा आणि नंतर शिकलेली भाषा अशा दोन्हींच्या मिळून आहेत. केवळ मातृभाषेचा विचार केला तर चिनी, स्पॅनिश, आणि इंग्रजी असा क्रम लागेल पहिल्या तीन भाषांचा. मातृभाषा म्हणून स्पॅनिश आणि इंग्रजी शिकलेल्या व्यक्तींची संख्या जवळपास सारखी असली तरी एकूण संख्येत इंग्रजी सर्वांनाच मागे टाकते हे आपण वर पहिले आहे. तरीही स्पॅनिश, फ्रेंच, आणि पोर्तुगीज या भाषांचा प्रसार त्या त्या देशांच्या बाहेर बराच झालेला आहे.
फ्रान्स, स्पेन, आणि पोर्तुगाल हे देश जर अनुक्रमे फ्रेंच, स्पॅनिश, आणि पोर्तुगीज भाषांचे घर समजले, तर या भाषा बोलणाऱ्या व्यक्तींची संख्या या देशांच्या आजच्या लोकसंख्येच्या ४ पट, १० पट, आणि २५ पट आहे. युरोपातील राज्यांचे वसाहतवादी धोरण या सर्वच भाषांच्या प्रसारास कारणीभूत आहे. त्या भाषा बोलणारे लोक मुळातले देश सोडून आणखी कुठे आहेत हे पाहिल्यास ते सहज लक्षात येईल. एकूणच इंग्रजीने जगभर आपले हातपाय पसरले आहेत हे खरेच. २०११च्या जनगणनेनुसार भारतात ०.०२५ करोड लोकांची इंग्रजी मातृभाषा आहे; आणि द्वितीय आणि तृतीय भाषा इंग्रजी असणारे एकूण लोक १३ करोड आहेत अधिक उत्पन्न आणि दहावी इयत्तेच्या पुढे शिक्षण असणाऱ्या लोकात इंग्रजी बोलण्याचे प्रमाण इतरांपेक्षा जास्त आहे [२].
२) एक प्रयोग
मराठी भाषेतील पुढील दोन मुलाखती ऐकून इंग्रजी शब्दांच्या वापराच्या नोंदी केल्या. यातील सहभागी लोकांवर वैयक्तिक टीका करण्याचा अजिबात उद्देश नाही. पहिल्या मुलाखतीत सहभागी झालेले कलाकार वृद्ध आहेत तर दुसऱ्यात तरुण कलाकार आहे.
https://www.youtube.com/watch?v=7owWiu-15vg&t=1264s
वर्ष - २००९ पूर्वी, सह्याद्री वाहिनी, पहिल्या २१ मिनिटात १५ इंग्रजी शब्द
https://www.youtube.com/watch?v=ANPR9bpjpZM&t=1002s
वर्ष - २०२०, कलर्स मराठी वाहिनी, पहिल्या १६ मिनिटात ५६ इंग्रजी शब्द
तरुण कलाकारांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत इंग्रजी शब्दांचे प्रमाण वाढले आहे. पहिली मुलाखत जरा गंभीर आहे, पण सामान्य विषय बोलताना मराठी शब्द वापरता येत नाहीत असे नाही. दुसऱ्या मुलाखतीत अनेक असे इंग्रजी शब्द वापरले ज्यांच्यासाठी मराठी पर्याय सहज उपलब्ध आहे.
Insecure, Jealous, Feeling, National level, experience, cockroaches, shopping, as usual, I’m proud of her, image, serial, wow, always, completely, singer, struggle.
पहिल्या मुलाखतीत कलाकार म्हणतो की अमुक ठिकाणी आमचं बिर्हाड होतं तर दुसर्या मुलाखतीत कलाकार हे Paying guests असतात किंवा त्यांचा rented place असतो.
अशा प्रकारे इंग्रजी शब्द गरज नसताना माझ्याही संभाषणात येत असतात हे मान्य करावे लागेल. खरोखरच इंग्रजी शब्द गरज नसताना वापरले जात आहेत का हे पाहण्यास आणखी मोठा अभ्यास करावा लागेल. पण माझा वैयक्तिक अनुभव मात्र इंग्रजी शब्दांचा वाढत वापर असाच आहे. अर्थात, गरज नसताना वापर (वरती उदाहरणे दिल्याप्रमाणे) हे पुन्हा अधोरेखित करू इच्छितो. Machine Learning, Additive Manufacturing या सारख्या संकल्पनांसाठी मराठी शब्द तयार करून त्यांचा वापर करावा असे अजिबात सुचवायचे नाही.
३) इंग्रजीचा अन्य भाषांवर प्रभाव
युनाइटेड किंग्डम, अमेरिका, आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथील साधारण एकूण ४३ करोड लोक सोडले तर साधारण ९० करोड इंग्रजी बोलणारे लोक हे अन्य देशात (त्यातले पण किमान १० करोड फक्त भारतात) आहेत. त्यामुळे चांगल्या अगर वाईट प्रकारे दुसऱ्या भाषांवर प्रभाव टाकण्याचे सामर्थ्य इंग्रजीमध्ये सर्वाधिक असले पाहिजे. गार्डियन या इंग्रजी वृत्तपत्रात इंग्रजीच्या वाढत्या प्रभावाबद्दल एक दीर्घ लेख २०१८ मध्ये छापून आला [३]. त्यात इंग्रजी युरोपातील अन्य भाषांवर कसा प्रभाव टाकत आहे आणि जगात इंग्रजी शिकण्याकडे लोकांचा ओढा कसा आहे याचे अनेक दाखले दिले आहेत. अर्थात इंग्रजीनेही दुसऱ्या भाषांतील शब्द सामावून घेतले आहेतच मात्र सध्या इंग्रजी एकूण निर्यातदार झाली आहे. काही ठिकाणी शब्दांच्या पलीकडे थेट व्याकरणावर प्रभाव पडला आहे [४]. त्याचे उदाहरण पुढील प्रमाणे.
Erinnern - To remember हे जर्मन भाषेत आत्मवाचक क्रियापद (Reflexive Verb) आहे. त्यामुळे त्याला कर्त्याचे आत्मवाचक रूप गरजेचे आहे.
I don't remember - Ich erinnere mich nicht
इथे mich हे ich या कर्त्याचे आत्मवाचक रूप आहे. मात्र इंग्रजी भाषेत तसे काही आवश्यक नसल्याने जर्मन भाषक लोक ते विसरत असल्याचे म्हटले आहे.
Download या क्रियापदासाठी herunterladen असा नवीन शब्द काढूनही तो लोकप्रिय होत नाहीये आणि मग download यालाच व्याकरणाचे नियम कसे लावावे यावरून गोंधळ उडत आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर आंगेला मर्केल यांनी इंग्रजीच्या प्रभावाबद्दल चिंता व्यक्त केल्याची बातमी डॉइश वेल्ले या वाहिनीने दिली आहे [५].
४) मराठी भाषा
जगात अनेक भाषा लेखना अभावी किंवा बोलणाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे लोप पावत चालल्या आहेत. मराठी भाषेस तसा काही धोका असल्याची भीती नाही. मात्र मराठी भाषेवरही इंग्रजीचा प्रभाव हा वाढतच जाणार आहे. या पूर्वी परकीय आक्रमणातून फारसी भाषेतून अनेक शब्द मराठीत आलेले आहेत. अन्य भाषांतूनही थोड्या फार प्रमाणात आलेले आहेत. त्यामुळे आता इंग्रजी शब्दांचा बाऊ करू नये, भाषा प्रवाही असते, असेही मत व्यक्त होऊ शकते. मात्र असा प्रवाह हा एकतर्फी इंग्रजीकडून अन्य अनेक भाषांकडे असणे हे आजचे विशेष आहे.
[१] https://en.wikipedia.org/wiki/List_of_languages_by_total_number_of_speakers
[२] https://www.livemint.com/news/india/in-india-who-speaks-in-english-and-where-1557814101428.html
[३] https://www.theguardian.com/news/2018/jul/27/english-language-global-dominance
[४] https://www.economist.com/prospero/2015/07/16/deep-impact
[५] https://www.youtube.com/watch?v=pyqDd4FKLsg
वाचने
8575
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
दुसरा मुद्दा
योग्य निरी़क्षणे
लेखातली आणि प्रतिसादातली
In reply to लेखातली आणि प्रतिसादातली by टर्मीनेटर
३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to लेखातली आणि प्रतिसादातली by टर्मीनेटर
सांख्य
प्रभावशाली भाषा
In reply to प्रभावशाली भाषा by सुनील
अभ्यासपूर्ण प्रतिसाद आवडला
अभ्यासपुर्ण
In reply to अभ्यासपुर्ण by सांरा (verified= न पडताळणी केलेला)
योग्य मुद्दा
मस्त लेख. इंग्रजीमुळे भाषांचा
भाषा बदलत जाणार
ह्या गोष्टी घडल्या असत्या
In reply to ह्या गोष्टी घडल्या असत्या by Rajesh188
हे लै भारी बरं का !! लै
छान