✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तदेव कर्म कुर्वीत ह्येन आत्मा संप्रसीदति

स
सुबोध खरे यांनी
Wed, 05/05/2021 - 13:15  ·  लेख
लेख
तदेव कर्म कुर्वीत ह्येन आत्मा संप्रसीदति कोव्हीड काळातील तीन अनुभव १) आमचे एक कौटुंबिक परिवार( family friend) मित्र. नवरा आणि बायको उच्च शिक्षित आणि दोघेही बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर. माझी पत्नी त्यांची फॅमिली डॉक्टर. आमची मैत्री बऱ्याच वर्षांपासून १३-१४ पेक्षा जास्त. एक दिवस हि मैत्रीण माझ्या पत्नी कडे आली आणि सांगू लागली, आमच्या बाबांचे इच्छापत्र (will) केलेले आहे. त्यावर त्यांनी हे इच्छापत्र (will) मानसिक सुस्थितीत असताना केलेले आहे अशी डॉक्टर म्हणून तुझी सही पाहिजे. हिचे सासरे किमान १२ वर्षांपासून अंथरुणावर खिळून आहेत आणि नैराश्याच्या(depression) आजारासाठी मनोविकार तज्ञाकडून गेली ५-६ वर्षे औषध घेत आहेत. (हि गोष्ट त्यांनी पत्नीला सांगितली नव्हती पण मागे एकदा दोनदा पत्नी त्यांना घरी तपासण्यास गेली असता औषधे कोणती चालू आहेत हे विचारल्यावर ते समजून आले). पत्नी ने विचारले कि सासऱ्यांची मानसिक स्थिती पूर्ण सुदृढ आहे हे कसे लिहून देणार? कारण ते गेली काही वर्षे मानसिक सुस्थितीत नाहीत. मैत्रीण सांगू लागली कि आम्ही त्यांना सांगितले आहे कि इच्छापत्रात काय लिहिलंय ते आणि त्याला त्यांची संमती आहे. पत्नी म्हणाली पण तुझ्या नणंदेने आक्षेप घेतला तर? मैत्रीण म्हणाली नाही ती आक्षेप घेणार नाही, मला माहिती आहे. पत्नी म्हणाली, 'उद्या तुझ्या नणंदेने न्यायालयात सांगितले कि गेली ५-६ वर्षे आमचे बाबा नैराश्यावर उपचार घेत आहेत त्यामुळे त्यांनी केलेले इच्छापत्र कमकुवत मानसिक स्थितीत केलेलं आहे म्हणून अग्राह्य आहे तर मी तोंडघशी पडेन आणि खोटे प्रमाणपत्र दिल्याबद्दल उगाच कायद्याच्या कचाट्यात पडेन. मैत्रीण नाही असं काहीहि होणार नाही. पत्नी म्हणाली कि त्या मनोविकार तज्ज्ञाकडून जो गेले ५-६ वर्षे इलाज करतो आहे त्याच्याकडून तू ही सही घेऊ शकतेस. पत्नीने असे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. यानंतर गेले ७-८ महिने हे कुटुंब आमच्या संपर्कात नाही. त्यांनी आमच्याशी बोलणे बंद केले आहे. अन्यथा आठवड्यात एखादे वेळेस फोन तरी होत असे २) एक आमच्या वडिलांचे स्नेही अतिवरिष्ठ नागरिक (वय ८० च्यावर) .अतिशय अहंमन्य आणि अतिशहाणा माणूस असे वडिलांचे मत. माझी पत्नी त्यांची फॅमिली डॉक्टर. याना बऱ्याच वर्षांपासून मधुमेह आहे. नियंत्रणात नाही म्हणून पत्नीने त्यांना अनेक वेळेस तज्ञ माणसाकडे दाखवा असे सांगितले होते पण हे महाशय स्वतः संस्कृतचे अभ्यासक असल्याने स्वतःच आयुर्वेदाची पुस्तके वाचून स्वतः वर उपचार करत होते. याना खोकला झाला. पत्नीने त्यांना कोव्हीडची चाचणी करायला सांगितली आणि त्यांना तुमचा मधुमेह पण नियंत्रणात आणा असे सांगितले. या महाशयांनी दर्पोक्ती केली कि मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयात यांचा एक विद्यार्थी तज्ञ आहे त्याला नुसता एक फोन केला कि तो घरी येऊन माझा इलाज करेल. त्यांनी पत्नीसमोर त्याला फोन लावला त्याने तो उचलला नाही म्हणून यांनी त्याला संदेश पाठवला. त्याने तो (पुढचे सात दिवस तरी) वाचलाही नव्हता त्यांनी कोव्हीडची चाचणी केली नाही. तीन दिवसांनी त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तेंव्हा यांच्या तोंडचे पाणी पळाले. त्यांच्या मुलाने पत्नीला सांगितले, त्यावर पत्नी म्हणाली त्यांची कोव्हीड चाचणी केलेली नसेल तर त्यांना रुग्णालयात घेणार नाहीत. मग त्यांनी चाचणी केली तिचा अहवाल संध्याकाळी आला त्यात तो पॉझिटिव्ह आला. ऑक्सिजनचे प्रमाण ९० च्या खाली आले होते. त्यांना रुग्णालयात भरती करायला सांगितले. यांचा मुलगा म्हणाला आम्ही फोर्टिस मध्ये भरती करतो. पत्नी म्हणाली तुम्हाला हवे तेथे पण लवकरात लवकर भरती करा. पण फोर्टिस मध्ये जागा नव्हतीच. मग हा मुलगा परत फोन करून फोर्टिस मध्ये खाट मिळवून द्या सांगू लागला. त्याला सांगितले कि सध्या तुम्हाला मिळेल तिथे भरती व्हा. याचि आणि याच्या वडिलांची तयारी नव्हती. पत्नीने कळकळीने सांगितले कि पहिल्याने भरती व्हा मग कुठे हलवता येईल का ते पाहू. यांनी काहीच केले नाही. मग रात्री १० वाजता श्वास घ्यायला अधिकच त्रास होऊ लागला.ऑक्सिजन ची पातळी ८५ च्या खाली आलेली म्हणून परत यांनी फोन केला. पत्नीने माझ्या मित्राला सांगून दुसऱ्या रुग्णालयात त्यांच्या भरतीची सोय केली. तेथले तज्ञ म्हणाले नाही तरी त्यांना तुम्ही हलवता आहात तर त्यांचा सीटी स्कॅन करूनच या. त्यासाठी रात्री १२ वाजताची सीटी स्कॅनची अपॉइंटमेंट घेतली. सी टी स्कॅन झाल्यावर रात्री साडे बारा वाजता त्याचा कच्चा रिपोर्टहि घेऊन हे भरती झाले. तेथे त्यांना ऑक्सिजन लावला गेला. डेक्सामेथासोन, रेम डेसीव्हीर, क्लेक्झेन इ सर्व उपचार सुरु झाले. रुग्णालयात केलेल्या चाचण्यांत यांच्या रक्तातील ग्लुकोज ३८० पर्यंत पोहोचलेली होती. एच बी १ सी १०.५ होते (म्हणजेच गेल्या तीन महिन्यातील सरासरी रक्तातील ग्लुकोज २५० च्या वर होती). दुसऱ्या दिवशी त्यांना थोडा आराम वाटू लागला. तेंव्हा हे महाशय तेथे आरडा ओरडा करू लागले. सिस्टर माझ्याकडे लक्ष देत नाहीत. काल रात्रीची चादर अजून बदलली नाही. रुग्णालय स्वच्छ नाही. मला घरी पाठवा मी तेथे आपोआप ठीक होईन. यावर यांच्या चिरंजीवांनी मला फोन केला आणि म्हणाले त्यांना तेथून फोर्टिस मध्ये हलवा. मी त्यांना स्वच्छपणे सांगितले कि फोर्टिस मध्ये अजिबात जागा नाही. पण तुम्हाला जायचे असेल तर "तुम्ही तेथे जागा मिळवा" आणि खुशाल जा. त्यावर ते मला दोष द्यायला लागले कि हे रुग्णालय चांगले नाही तुम्ही कशाला इथे पाठवले? यात तुमचा निष्काळजीपणा आहे. तुम्ही त्यांना ऑक्सिजन लावून घरी पाठवा. मग मात्र माझा संयम सुटला. मी त्या चिरंजीवांना स्पष्टपणे म्हणालो कि एकतर तुमच्या वडलांना रक्तातील साखर अफाट वाढलेली असताना तज्ञ माणसाला दाखवायला सांगून तुम्ही दाखवले नाही. त्यावर तो म्हणाला "एकच दिवस झाला. त्यांनी संदेश पाहिला नाही". मी आवाज चढवून म्हटले कि तीन महिन्याची साखर २५० च्या वर आहे याचा अर्थ तुमच्या वडिलांनीच नव्हे तर तुम्ही पण निष्काळजीपणा दाखवला आहे आणि उगाच आमच्यावर दोष टाकू नका. वडिलांना ऑक्सिजन वर घरी पाठवले तर त्यांची काळजी कोण घेणार आहे आणि तुम्हाला सर्वाना क्वारंटाईन केलेले आहे.तुमच्या आईचा पण rtpcr पॉसिटीव्ह आहे म्हणू तिचा घरी उपचार चालू आहे. बाहेरचा कोण माणूस येउन त्यांची काळजी घेणार आहे? उगाच उंटावरून शेळ्या हाकू नका. आणि त्यातून तुम्हाला त्या रुग्णालयातून डिस्चार्ज घययचा असेल तर वैद्यकीय सल्ल्याविरुद्ध( against medical advice) घ्या आणि जेथे उपचार करायचेत ते करा. मला काहीही घेणं देणं नाही. मग यांचा आवाज खाली आला. पुढचे चार दिवस अक्षरशः दिवस रात्री अपरात्री केंव्हाही फोन करून त्यांनी आम्हाला सळो कि पळो करून सोडले. आठवड्याभराने जेंव्हा वडील डिस्चार्ज घेऊन घरी आले. तेंव्हा या महाशयांचे चिरंजीव मोठ्या आढ्यतेने म्हणाले कि तुम्हाला फोनवर त्रास दिला त्याबद्दल मी तुम्हाला ३ हजार रुपये देणार आहे. त्यावर माझ्या पत्नीने सांगितले कि तुमचे पाच दिवसात ३५ फोन कॉल झाले आहेत. इतर वेळेस मी ३०० रुपये घेते पण ते माझे जुने पेशंट आहेत म्हणून २०० रुपये प्रमाणे तुम्ही मला सात हजार रुपये द्यायचे. यावर हे महाशय एवढे पैसे होतात कसे होतात म्हणून विचारत होते? पत्नी म्हणाली रात्री बारा वाजता तुमची सीटी स्कॅन ची अपॉइंटमेंट घेऊन त्याचा अहवाल रात्री साडे बारा वाजता तुम्हाला माझे मिस्टर रेडिओलॉजिस्ट आहेत म्हणून मिळाला. रुगालयात अपरात्री एक वाजता त्यांनी माझ्या शब्दामुळे बेड रिकामा ठेवला होता. रुग्णालयात तुमचे बिल किती झाले हे तुम्हाला माहिती आहे. माझे वाजवी दर सुद्धा तुम्हाला जास्त वाटत आहेत? दुसऱ्या दिवशी त्यांनी ७ हजाराचा चेक आणून दिला. वडिलांच्या प्रकृतीबद्दल किंवा तुमच्या मुळे गोष्टी सुसह्य झाल्या याबद्दल एक शब्द नाही. याला आता ६ महिने होऊन गेले यांनतर हे महाशय पत्नीकडे परत आलेले नाहीत. मी तर पत्नीला म्हणालो कि असला रुग्ण नाही आला म्हणून आपणच आनंद साजरा करायला पाहिजे. ३) आमच्या घराच्या समोरच्या घरात राहणारे कुटुंब सख्खे शेजारी. आम्हाला सर्वाना ऑगस्ट मध्ये करोना झाला म्हणून आम्ही सर्व १७ दिवस क्वारंटाईन होतो. तेंव्हा यांनी एकदाही साधे विचारले नाही कि साधा एक फोनहि केला नाही कि तुम्हाला काही हवे आहे का? यानंतर यांची पत्नी गरोदर राहिली. त्यांच्या स्त्रीरोग तज्ञाने सोनोग्राफी साठी माझ्याकडे पाठवले. तेंव्हा बाळाची वाढ नीट होत नाहीये असे सोनोग्राफीत मला दिसून आले. यावर त्यांच्या स्त्रीरोग तज्ञाने संपूर्णपणे विश्रांती( complete bed rest) घ्यायला सांगितले आहे. सध्या १८ एप्रिलपासून मुंबईत लॉकडाऊन लावले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सर्व घरकामाला येणारी मुलगी कळव्या वरुन येत असे तिला लोकल ने प्रवासास बंदी केली आहे. यासाठी हे महाराज आमच्या कडे येऊन विचारू लागले कि तुम्ही तिला सर्टिफिकेट द्याल का? पत्नीने विचारले कसले सर्टिफिकेट? त्यावर हे महाराज म्हणाले कि "ती तुमच्या दवाखान्यात काम करते आहे" म्हणून सर्टिफिकेट दिले तर तिला लोकल ने प्रवास करता येईल. पत्नी म्हणाली असे सर्टिफिकेट कसे देता येईल? एक तर माझ्या दवाखान्याच्या लेटरहेड वर ते सर्टिफिकेट द्यावे लागते त्यावर तिचा फोटो आधार कार्ड नंबर ती माझ्या कडे केंव्हा पासून कामाला आहे असे सर्व लिहून द्यावे लागते. त्यातून अशी खोटी सर्टिफिकेट घेऊन लोक प्रवास करतात यामुळे आठवड्यात दोन वेळेस रेल्वेत तपासणी होते तेथे हि मुलगी काय सांगणार? तिने खरे सांगितले कि पोलीस माझ्या दवाखान्यात येऊन खोटे सर्टिफिकेट दिल्याबद्दल मला जबाबदार धरुन कार्यवाही करणार आणि तुम्ही मात्र नामानिराळे राहणार. हे सर्व कशाला तर तिला बसप्रवासाचे पैसे द्यायला नकोत म्हणून? तो मान खाली घालून निघून गेला. पत्नी मला म्हणाली कि एक तर त्याने आपल्याला गरज होती तेंव्हा साधा फोन करण्याचे सौजन्य दाखवले नाही आणि असे खोटे सर्टिफिकेट द्या म्हणून बिनधास्तपणे आपल्याला विचारायला याची जीभ कशी रेटली? मी तिला म्हणालो चमडी जाये पर दमडी न जाये अशा मनोवृत्तीची हि माणसं आहेत. याना जनाचीच नाही तर मनाचीही लाज नसते. तिन्ही उदाहरणे गेल्या आठ महिन्यातील आहेत. लबाडी त्यांनी करायची आणि त्याची लाज किंवा टोचणी तुम्हालाच लावायची कि एवढी साधी गोष्ट तुम्हाला डॉक्टर म्हणून आमच्यासाठी करता येत नाही तदेव कर्म कुर्वीत ह्येन आत्मा संप्रसीदति आत्मानं पीडयेत यच्च तत्प्रयत्नेन वर्जयेत. म्हणजेच असेच काम करा ज्याने तुमच्या आत्म्याला संतोष पोचेल आणि ज्याने तुमच्या आत्म्याला क्लेश होईल असे काम प्रयत्नपूर्वक टाळावे
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
24835 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

सगळ्याच क्षेत्रात

शाम भागवत
Fri, 05/21/2021 - 15:42 नवीन
सगळ्याच क्षेत्रात तुमच्यासारखी थोडी माणसं असतात म्हणून अजूनही बरच काही सुरळीत चालू आहे नाहीतर ......... 🙏
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुल्लू दादा

+१

शलभ
Fri, 05/21/2021 - 16:49 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

ऐ गुल्लु दिल ऐस्से छोटा नै करने का...

गॉडजिला
Fri, 05/21/2021 - 15:49 नवीन
देख तेरेको जैसा समाजका जरुरत है > .... वैसे समाजको भी तेरा जरुरत रेहता रे बाबा... पर दुनिया साली सप्लाय डिंमांडकी मोहताज हे रे... तु नाही तेरे जैसे कितने है ये मॅटर करता इधर... समजले बात को और चिल्ल मार.
  • Log in or register to post comments

डॉक्टरना समाजाची गरज आहे हि

सुबोध खरे
Sat, 05/22/2021 - 12:23 नवीन
डॉक्टरना समाजाची गरज आहे हि वस्तुस्थिती मान्य केली तरी आताशा स्वतःच्या शरीराला झीज लावून समाजसेवा करावी असे मला अजिबात वाटत नाही. सोसल तेवढीच सोशल सर्व्हिस करावी दोन आठवड्यापूर्वी माझ्या पत्नीला रात्री १० वाजता तिच्या शाळेतील मैत्रिणीचा फोन आला. मैत्रिणीच्या भावाला कोव्हीड साठी औरंगाबाद मध्ये रुग्णालयात भरती करण्यासाठी खाट मिळत नव्हती यासाठी फोन केला. ( माझ्या पत्नीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथून ( घाटी) एम बी बी एस केले आहे त्यामुळे तेथे तिचे बरेच वर्गमित्र व्यवसाय करत आहेत) त्यासाठी माझ्या पत्नीने आपल्या दोन तीन मित्रांना रात्री फोन करून बेड मिळवण्यासाठी खटपट केली. एकाने सांगितले कि मी सोय करतो. तिला मला फोन करायला सांग. पत्नीने तिला परत फोन केला तेंव्हा ती म्हणाली कि अग एक बेड मिळाला आहे पण तो चांगला नाही म्हणून मी तुला फोन लावला परंतु मी आपल्या वर्गातील अजून दोघा (डॉक्टरांना) ना फोन लावला त्यातील एकाने चांगल्या बेडची सोय केली आहे तेंव्हा आता मला बेड नकोय. रात्री साडे अकरा वाजता पत्नीने फोन करून आपल्या वर्गमित्रांची त्रास दिल्याबद्दल माफी मागितली माणसे वाईट परिस्थितीत हात पाय मारतात आणि मिळेल तेथून आणि मिळेल तशी मदत घेतात हे मान्य केले तरी ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये हे मात्र विसरतात. निदान बेड मिळाला आहे एवढा फोन करण्याचे सौजन्य असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

थोडं समजुन घ्या डॉक्टर, साहेब लोकं सध्या पॅनिक मोडमधे आहेत

गॉडजिला
Sat, 05/22/2021 - 13:13 नवीन
मी एका कोवीड इमर्जन्सी संबंधीत व्हाट्सप गृपचा सदस्य आहे, जो अर्थातच लोकांनी लोकांसाठी चालवलेला लोकांचा ग्रुप आहे... रात्री ९.३० ला मला आत्ते भावाचा फोन आला आरे प्लास्मा आणी टोसीलीझुमॅब हवयं... त्याच्या मित्राच्या आइ साठी. अर्थातच लोक पॅनीक आहेत, साठेबाज अ‍ॅक्टीव आहेत हे मला माहीत होतं म्हणून मी त्याला आधी रिपोर्ट आणी आधारचा फोटो पाठव म्हणालो... १ तास काहीही रिप्लाय नाही. मग मिच विचारलं काय झालं ? तर त्याचे उत्तर मी तो मित्राच्या उत्तराची वाट बघतोय व आता तो स्वतःच फोन करुन बोलुन घेइल...झालं बोलुन फोनवर तर असे कळाले अजुन अधिक्रुत रिपोर्ट आलेला नाही पण एकंदर पेशंटची अवस्था बघता रिपोर्ट ही निव्वळ औपचारीकता असल्याने डोक्टरांनी औषधाची अरेंजमेंट करायला सांगीतले आहे. मला माहीत होतं हे वास्तव आहे पण तरीही मी ग्रुपवर विंनंतीचा रिक्वेस्ट टाकायला नकार दिला कारण रिपोर्ट ही ऑथेंटीसीटी मला तरी वाटली... दुसर्‍या दिवशी दुपारी मीच फोन केला काय झाले रिपोर्ट आला काय ? संध्याकाळी मला मेसेजमधे रिपोर्ट अन आधार चे फोटो आले... झालं मी ग्रुपवर मेसेज टाकला तातडीने गरज आहे प्लाज्मा अन औषधांची... एकाने मला फोन केला प्लाज्मा उपलबध आहे मी त्वरीत भावाला फोन करुन विचारले तर त्याने परत त्याच्या मित्राला फोन करुन मला कळवले अरे प्लाज्माची सोय झालीय औषधेच फक्त हवी आहेत. मी परत मेसेज टाकला प्लाज्मा मिळालाय औषधे हवी आहेत आहेत... त्यानंतर बराच वेळ फोनाफोनी या माणसाला फोन करा त्या मेडीकल वाल्याला फोन करा या फोनाफोनीच्या ढिगार्‍यात विवीध रेफरन्स घेत घेत आपल्या टारगेटवर पोचणे म्हणजे महान दिव्यच... मधेच नंबर एखाद्या भलत्याच शहरातील कोणी राजकीय वजनदार ( ?) व्यक्तीमत्व उचलणार (सुदैवाने सर्वाचे आवाजात मार्दव व मदतीची प्रामणीक इछ्चाही दिसली) मग तो आजुन दहा नंबर देउन माझा रेफरन्स द्या सांगणार व काय झाले ते मलाही कळवा म्हणणार मग एखादा औषधवाला आत्ताच औषध संपले हो पण याचे फलाना फलाना सब्स्ट्यीट्युट आहे ते पाठवु लगेच असे विचारणार सोबत त्याचे डिटेल्स त्याला कोणी पाठींबा दिला आहे त्याचे डिटेल्स पीडीएफ मधुन देणार व वरती लवकर सांगा स्टॉक संपत आलाय हे सुनवायलाही विसरणार नाही... मग मी ते परत भावाला देणार तो मित्राकडे विचारणा करणार मग रिप्लाय यायला दुसरा दिवस उजाडणार असा बराच घोळ झाला व शेवटी प्रत्यक्ष औषध उपलब्ध्द असलेल्या नेमक्या व्यक्तीशी फोनाफोनी झाल्यावर भावाने सांगीतले अरे सॉरी विनाकारण त्रास दिला औषध डोक्टरांच्या मदतीने मिळाले पण अजुन गरज लागली तर ऐनवेळी धावपळ नको म्हणून प्रयत्न चालु आहे... सुदैवाने पेशंटचे आरोग्य सुधारत आहे व बहुतेक चिंतेचे कारणही उरणार नाही... झालं.. माझं डोकं सरकलं व मी फोन कट केला. पहीलं म्हणजे त्याने शेवटपर्यंत त्याच्या मित्राशी मला बोलु दिले नाही ( का ते त्यालाच माहीत व कदाचीत औषध त्याने मिळवुन देणेही महत्वाचे असेल ) व पेशंट जर अत्यावस्थ न्हवता, औषध तर उपलब्ध्द होते तर कामाला का लावलं ? सगळ्या दुनियेच्या पाया पडून झाले माझ्या कडून ... पण मीच समजुन घेतले, एकुणच अनावस्था, सरकारी गाइड्लाइन्सचा आभाव यामुळे कोवीड रुग्णाला आभाळ फाटल्याचा भास होतो... म्हणून पॅनिक मोडमधे ते मिळेल तो रिसोर्स वापरु पाहतात त्या नादात ते अजुन मोठी अव्यवस्था निर्माण करत आहेत हे त्यांच्या गावीही नसते... सारासार विवेक कूठींत झालेला हुशार माणुस जर मुर्खपणा करु शकतो तर जग तर अज्ञान गावीही नसलेल्या मुर्ख न्हवे महामुर्खानी भरलेले आहे त्यांचे कडुन अशावेळी काय अपेक्षा ठेवायची ? म्हणूनच म्हणतो डॉक्टर साहेब आपला त्रास समजतो आहे, पण थोडं समजुन घ्या साहेब, लोकं सध्या पॅनिक मोडमधे आहेत त्यामुळे त्यांना नैतीकतेची भलीही चाड उरलेली नसेल तरी जसा धुरळा शांत होइल व आपण जर त्यावेळी उरलेलो असु तर सर्व गोष्टी सुरळीत होतीलच अनेकांना त्यांच्या कृतीचा पश्चातापही अवश्य होइल... तोपर्यंत होडोर(होल्ड द डॉर)... _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आपण म्हणताय ते मान्य केले

सुबोध खरे
Sat, 05/22/2021 - 20:06 नवीन
आपण म्हणताय ते मान्य केले तरीही डॉक्टर हा सुद्धा माणूस आहे हेच लोक विसरत आहेत. केंव्हाही उचलून फोन करा कारण कॉल फुकट आहे. ( पूर्वी जेंव्हा कॉल ला पैसे पडत असत तेंव्हा असेच महाभाग मिस्ड कॉल देत असत. लोकांनी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे कि जसे आपण फोन करतो तसेच इतर अनेक लोक डॉक्टरांना फोन करत असतीलच. पण "समे कामान काम कामाय मह्यम" म्हणजेच सर्व कामात माझेच काम महत्त्वाचे असे समजणारे लोक कमी नाहीत. माझ्या जवळच्या नातेवाईकांपैकी २८ जणांना कोव्हीड झाला होता आणि ते मला फोन करत असत. त्यातून अतिदक्षता विभागातील डॉक्टरांशी संवाद करून घेऊन त्याचा अहवाल आपल्या आप्तेष्टाना पाठवणे हे पण एक बरेच त्रासदायक काम असते. एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या इतर नातेवाईकांचा "असं कसं झालं" म्हणून सविस्तर माहिती घेण्यासाठी फोन येत राहतात. फोन उचलला तर लोक थोडक्यात आटपत नाहीत आणि त्या काळात दुसऱ्याचा फोन आला तर डॉक्टर आजकाल फोन उचलत नाहीत म्हणून आडून ऐकू सुद्धा येते. असेच फोन मला इतर अनेक जण स्वतःच्या शंका समाधानासाठी रोजच करत असतात. मग आपले काम झाले तर निदान एक धन्यवाद म्हणून फोन करावा कि आम्हीच उलट त्यांच्या कामासाठी त्यांना फोन करावा? याचे तारतम्य असू नये. मी येथे कोणतीही सहानुभूती मिळवण्यासाठी हे लिहीत नाहीये तर आपल्यापैकी काही जण उठसूट त्यांच्या डॉक्टरांना त्रास देत असतील तर त्या डॉक्टरांचा थोडा तरी त्रास कमी व्हावा यासाठी लिहीत आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

आपण म्हणताय ते मान्य केले तरीही

गॉडजिला
Sun, 05/23/2021 - 17:54 नवीन
आपण म्हणताय ते मान्य केले तरीही जया अंगे मोठेपण तवं यातना कठीण ही उक्तीच इथे युक्तीदायक आहे. अर्थात तुमच्या वास्तवतेची जाण सुज्ञ बाळगतीलच.. ते ही आपणावर लेख लिहायची वेळ न आणता _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

असेच असते

सुरिया
Fri, 05/21/2021 - 17:44 नवीन
पूर्वी लोक वर्तनाच्या समाधानासाठी शास्त्राधार हुडकत. आजकाल फक्त स्वतःची सोय कमीत कमी कष्टात, येन केन प्रकारेण करवून घेणे हेच साध्य बघतात. त्यासाठी एखादे नवीन तत्वज्ञानही तयार करण्याचा निर्लज्जपणा लोकांमध्ये आहे. अशांशी वागतानाच एकदा काय ते विचार करुन वागायचे आणी नंतर विसरुन जायचे. बस्स. कसे कसे लोक असतात ह्याच्या डेटाबेसमधे वाढ होते फक्त.
  • Log in or register to post comments

@डॉ खरे, तिन्ही घटनांमधली

वामन देशमुख
Fri, 05/21/2021 - 18:27 नवीन
@डॉ खरे, तिन्ही घटनांमधली तुमची भूमिका मला पटली. डॉक्टर हा माणूसच आहे, माणसातले गुणदोष डॉक्टरांतही असणार आणि पेशंट, नातेवाईक यांच्यातही असणार. एक वेगळ्या संदर्भातला किस्सा सांगतो. माझ्या अगदी समोरच फ्लॅट असलेले, एका सरकारी आस्थापनात उच्चपदस्थ नोकरी करणारे, सुमारे पन्नासवर्षीय तेलुगू सद्गृहस्थ. जवळचे शेजारी शक्यतो मित्र असावेत म्हणून इथे राहायला आल्यावर मी सुरुवातीला त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काही दाद दिली नाही. ते तसे माणूसघाणेच आहेत. (अर्थात हा काही तक्रारीचा मुद्दा नाही.) त्यांच्या पत्नीची आणि माझ्या पत्नीची मात्र बरीच चांगली मैत्री आहे. या अपार्टमेंटमध्ये माझे बरेच तेलुगू, मराठी आणि इतर मित्र आहेत. मागच्या वर्षी दसऱ्याच्या सुमारास, एकदा पहाटे चार-साडेचार वाजता आम्ही झोपेत असताना दाराची बेल वाजली. पत्नीने दार उघडले. या गृहस्थास तासाभरापासून अस्वस्थ वाटत होते. (हार्ट-अटॅक आला होता असे निदान नंतर झाले.) त्यांची पत्नी त्यांच्या ओळखीचे लोक, नातेवाईक, मित्र वगैरेंना फोन करून मदतीला बोलावत होती पण कुणीच आले नाही. मग मी माझ्या दोन मित्रांना ताबडतोब बोलावले. ते गृहस्थ व त्यांची मुलगी यांना घेऊन आम्ही एका मित्राच्या गाडीने त्यांनी सांगितलेल्या इस्पितळात गेलो. माझा दुसरा मित्र त्या गृहस्थाच्या पत्नीला घेऊन पाठोपाठ आला. आम्ही त्यांना तिथे दाखल केले आणि डॉक्टरांनी पुढील सोपस्कार केले. तिथली सुरुवातीची फी मीच भरली. चार दिवस उपचार घेऊन, बरे होऊन मग ते घरी आले. डॉक्टरांनी पंधरा दिवस आराम करायला सांगितलं. घरी आल्यानंतर, महिनाभराने, आठवण करून दिल्यानंतर, शेवटी मी फी भरलेले पैसे मला परत मिळाले. त्या चार दिवसांत त्यांच्या पत्नी आणि मुलीशिवाय इस्पितळात त्यांच्यापैकी कुणीही भेटायला आले नाही. मी आणि माझे मित्र दोन वेळा त्यांना भेटायला गेलो. त्यांच्या पत्नीची आणि माझ्या पत्नीची मैत्री नसती तर त्यांना ऐनवेळी मदत मिळाली असती का असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

काल रात्री साडे दहा वाजता एका

सुबोध खरे
Sat, 05/22/2021 - 12:08 नवीन
काल रात्री साडे दहा वाजता एका रुग्णाच्या नवऱ्याने माझ्या दवाखान्याच्या मोबाईल वर फोन केला. हा मोबाईल माझी स्वागत सहायिका घरी घेऊन जाते. तिला या महाशयांनी विचारले कि सर कन्सेशन देतील का? तिने सांगितले तुम्ही सरांशीच बोला. त्यावर तो म्हणाला कि सर आहेत का मी बोलतो. यावर स्वागत सहायिका म्हणाली आता वाजले किती आहेत हे पाहिले का? सर आता कसे असतील? आज हीच रुग्ण आली होती. हि मागच्याच वर्षी माझ्या कडे पूर्ण गरोदरपणात सोनोग्राफी साठी येत असे. नवरा उच्च शिक्षित असून आय टी कंपनीत बऱ्यापैकी पगारावर आहे. मी सवलत देत नाही हेही माहिती आहे, शिवाय कंपनीकडून वैद्यकीय उपचाराचा परतावा सुद्धा मिळतो पण काहीतरी सवलत मिळाली पाहिजे अशी विचित्र मनोवृत्ती आहे. अशीच विचित्र वृत्ती काही वरिष्ठ नागरिकांची आहे. मुलाला कंपनीकडून वैद्यकीय उपचाराचा संपूर्ण परतावा मिळतो पण तरी काहीतरी सवलत मिळेल का हे विचारतात. मागे मी मिपावर लिहिले होते कि एक वरिष्ठ नागरिक मला तुम्ही वरिष्ठ नागरिकांना सवलत हक्क म्हणून दिली पाहिजे असे सांगत होता. थोडा वेळ वाद झाल्यावर मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले कि तुम्ही माझ्यापेक्षा काही वर्षे अगोदर जन्माला आलात हे सोडलं तर तुमची अशी काय मोठी कामगिरी आहे कि मी तुम्हाला सवलत द्यावी? तो अवाक झाला कारण इतक्या थेट शब्दात त्याला कोणी असं सांगतलं नसावं.
  • Log in or register to post comments

तुम्ही माझ्यापेक्षा काही

अभिजीत अवलिया
Sat, 05/22/2021 - 12:32 नवीन
तुम्ही माझ्यापेक्षा काही वर्षे अगोदर जन्माला आलात हे सोडलं तर तुमची अशी काय मोठी कामगिरी आहे कि मी तुम्हाला सवलत द्यावी?
भारतात by default जो वयाने मोठा तो जास्त अनुभवी, जास्त दुनियादारी बघितलेला, खस्ता खाल्लेला वगैरे वगैरे असतो. वयाने मोठे असल्याने अनावश्यक प्रिव्हिलेजेस पण मिळतात. बरेच ज्येष्ठ नागरिक वयाचा गैरफायदा घेऊन प्रचंड हेकटपणा करतात. वर त्यांना उलट उत्तर दिले की तुमच्यावर कसे सो काॅल्ड संस्कार नाहीत वगैरे आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

चमत्कारीक लोक्स

खटपट्या
Mon, 06/14/2021 - 08:16 नवीन
चमत्कारीक लोक्स
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा