✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तदेव कर्म कुर्वीत ह्येन आत्मा संप्रसीदति

स
सुबोध खरे यांनी
Wed, 05/05/2021 - 13:15  ·  लेख
लेख
तदेव कर्म कुर्वीत ह्येन आत्मा संप्रसीदति कोव्हीड काळातील तीन अनुभव १) आमचे एक कौटुंबिक परिवार( family friend) मित्र. नवरा आणि बायको उच्च शिक्षित आणि दोघेही बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर. माझी पत्नी त्यांची फॅमिली डॉक्टर. आमची मैत्री बऱ्याच वर्षांपासून १३-१४ पेक्षा जास्त. एक दिवस हि मैत्रीण माझ्या पत्नी कडे आली आणि सांगू लागली, आमच्या बाबांचे इच्छापत्र (will) केलेले आहे. त्यावर त्यांनी हे इच्छापत्र (will) मानसिक सुस्थितीत असताना केलेले आहे अशी डॉक्टर म्हणून तुझी सही पाहिजे. हिचे सासरे किमान १२ वर्षांपासून अंथरुणावर खिळून आहेत आणि नैराश्याच्या(depression) आजारासाठी मनोविकार तज्ञाकडून गेली ५-६ वर्षे औषध घेत आहेत. (हि गोष्ट त्यांनी पत्नीला सांगितली नव्हती पण मागे एकदा दोनदा पत्नी त्यांना घरी तपासण्यास गेली असता औषधे कोणती चालू आहेत हे विचारल्यावर ते समजून आले). पत्नी ने विचारले कि सासऱ्यांची मानसिक स्थिती पूर्ण सुदृढ आहे हे कसे लिहून देणार? कारण ते गेली काही वर्षे मानसिक सुस्थितीत नाहीत. मैत्रीण सांगू लागली कि आम्ही त्यांना सांगितले आहे कि इच्छापत्रात काय लिहिलंय ते आणि त्याला त्यांची संमती आहे. पत्नी म्हणाली पण तुझ्या नणंदेने आक्षेप घेतला तर? मैत्रीण म्हणाली नाही ती आक्षेप घेणार नाही, मला माहिती आहे. पत्नी म्हणाली, 'उद्या तुझ्या नणंदेने न्यायालयात सांगितले कि गेली ५-६ वर्षे आमचे बाबा नैराश्यावर उपचार घेत आहेत त्यामुळे त्यांनी केलेले इच्छापत्र कमकुवत मानसिक स्थितीत केलेलं आहे म्हणून अग्राह्य आहे तर मी तोंडघशी पडेन आणि खोटे प्रमाणपत्र दिल्याबद्दल उगाच कायद्याच्या कचाट्यात पडेन. मैत्रीण नाही असं काहीहि होणार नाही. पत्नी म्हणाली कि त्या मनोविकार तज्ज्ञाकडून जो गेले ५-६ वर्षे इलाज करतो आहे त्याच्याकडून तू ही सही घेऊ शकतेस. पत्नीने असे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. यानंतर गेले ७-८ महिने हे कुटुंब आमच्या संपर्कात नाही. त्यांनी आमच्याशी बोलणे बंद केले आहे. अन्यथा आठवड्यात एखादे वेळेस फोन तरी होत असे २) एक आमच्या वडिलांचे स्नेही अतिवरिष्ठ नागरिक (वय ८० च्यावर) .अतिशय अहंमन्य आणि अतिशहाणा माणूस असे वडिलांचे मत. माझी पत्नी त्यांची फॅमिली डॉक्टर. याना बऱ्याच वर्षांपासून मधुमेह आहे. नियंत्रणात नाही म्हणून पत्नीने त्यांना अनेक वेळेस तज्ञ माणसाकडे दाखवा असे सांगितले होते पण हे महाशय स्वतः संस्कृतचे अभ्यासक असल्याने स्वतःच आयुर्वेदाची पुस्तके वाचून स्वतः वर उपचार करत होते. याना खोकला झाला. पत्नीने त्यांना कोव्हीडची चाचणी करायला सांगितली आणि त्यांना तुमचा मधुमेह पण नियंत्रणात आणा असे सांगितले. या महाशयांनी दर्पोक्ती केली कि मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयात यांचा एक विद्यार्थी तज्ञ आहे त्याला नुसता एक फोन केला कि तो घरी येऊन माझा इलाज करेल. त्यांनी पत्नीसमोर त्याला फोन लावला त्याने तो उचलला नाही म्हणून यांनी त्याला संदेश पाठवला. त्याने तो (पुढचे सात दिवस तरी) वाचलाही नव्हता त्यांनी कोव्हीडची चाचणी केली नाही. तीन दिवसांनी त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तेंव्हा यांच्या तोंडचे पाणी पळाले. त्यांच्या मुलाने पत्नीला सांगितले, त्यावर पत्नी म्हणाली त्यांची कोव्हीड चाचणी केलेली नसेल तर त्यांना रुग्णालयात घेणार नाहीत. मग त्यांनी चाचणी केली तिचा अहवाल संध्याकाळी आला त्यात तो पॉझिटिव्ह आला. ऑक्सिजनचे प्रमाण ९० च्या खाली आले होते. त्यांना रुग्णालयात भरती करायला सांगितले. यांचा मुलगा म्हणाला आम्ही फोर्टिस मध्ये भरती करतो. पत्नी म्हणाली तुम्हाला हवे तेथे पण लवकरात लवकर भरती करा. पण फोर्टिस मध्ये जागा नव्हतीच. मग हा मुलगा परत फोन करून फोर्टिस मध्ये खाट मिळवून द्या सांगू लागला. त्याला सांगितले कि सध्या तुम्हाला मिळेल तिथे भरती व्हा. याचि आणि याच्या वडिलांची तयारी नव्हती. पत्नीने कळकळीने सांगितले कि पहिल्याने भरती व्हा मग कुठे हलवता येईल का ते पाहू. यांनी काहीच केले नाही. मग रात्री १० वाजता श्वास घ्यायला अधिकच त्रास होऊ लागला.ऑक्सिजन ची पातळी ८५ च्या खाली आलेली म्हणून परत यांनी फोन केला. पत्नीने माझ्या मित्राला सांगून दुसऱ्या रुग्णालयात त्यांच्या भरतीची सोय केली. तेथले तज्ञ म्हणाले नाही तरी त्यांना तुम्ही हलवता आहात तर त्यांचा सीटी स्कॅन करूनच या. त्यासाठी रात्री १२ वाजताची सीटी स्कॅनची अपॉइंटमेंट घेतली. सी टी स्कॅन झाल्यावर रात्री साडे बारा वाजता त्याचा कच्चा रिपोर्टहि घेऊन हे भरती झाले. तेथे त्यांना ऑक्सिजन लावला गेला. डेक्सामेथासोन, रेम डेसीव्हीर, क्लेक्झेन इ सर्व उपचार सुरु झाले. रुग्णालयात केलेल्या चाचण्यांत यांच्या रक्तातील ग्लुकोज ३८० पर्यंत पोहोचलेली होती. एच बी १ सी १०.५ होते (म्हणजेच गेल्या तीन महिन्यातील सरासरी रक्तातील ग्लुकोज २५० च्या वर होती). दुसऱ्या दिवशी त्यांना थोडा आराम वाटू लागला. तेंव्हा हे महाशय तेथे आरडा ओरडा करू लागले. सिस्टर माझ्याकडे लक्ष देत नाहीत. काल रात्रीची चादर अजून बदलली नाही. रुग्णालय स्वच्छ नाही. मला घरी पाठवा मी तेथे आपोआप ठीक होईन. यावर यांच्या चिरंजीवांनी मला फोन केला आणि म्हणाले त्यांना तेथून फोर्टिस मध्ये हलवा. मी त्यांना स्वच्छपणे सांगितले कि फोर्टिस मध्ये अजिबात जागा नाही. पण तुम्हाला जायचे असेल तर "तुम्ही तेथे जागा मिळवा" आणि खुशाल जा. त्यावर ते मला दोष द्यायला लागले कि हे रुग्णालय चांगले नाही तुम्ही कशाला इथे पाठवले? यात तुमचा निष्काळजीपणा आहे. तुम्ही त्यांना ऑक्सिजन लावून घरी पाठवा. मग मात्र माझा संयम सुटला. मी त्या चिरंजीवांना स्पष्टपणे म्हणालो कि एकतर तुमच्या वडलांना रक्तातील साखर अफाट वाढलेली असताना तज्ञ माणसाला दाखवायला सांगून तुम्ही दाखवले नाही. त्यावर तो म्हणाला "एकच दिवस झाला. त्यांनी संदेश पाहिला नाही". मी आवाज चढवून म्हटले कि तीन महिन्याची साखर २५० च्या वर आहे याचा अर्थ तुमच्या वडिलांनीच नव्हे तर तुम्ही पण निष्काळजीपणा दाखवला आहे आणि उगाच आमच्यावर दोष टाकू नका. वडिलांना ऑक्सिजन वर घरी पाठवले तर त्यांची काळजी कोण घेणार आहे आणि तुम्हाला सर्वाना क्वारंटाईन केलेले आहे.तुमच्या आईचा पण rtpcr पॉसिटीव्ह आहे म्हणू तिचा घरी उपचार चालू आहे. बाहेरचा कोण माणूस येउन त्यांची काळजी घेणार आहे? उगाच उंटावरून शेळ्या हाकू नका. आणि त्यातून तुम्हाला त्या रुग्णालयातून डिस्चार्ज घययचा असेल तर वैद्यकीय सल्ल्याविरुद्ध( against medical advice) घ्या आणि जेथे उपचार करायचेत ते करा. मला काहीही घेणं देणं नाही. मग यांचा आवाज खाली आला. पुढचे चार दिवस अक्षरशः दिवस रात्री अपरात्री केंव्हाही फोन करून त्यांनी आम्हाला सळो कि पळो करून सोडले. आठवड्याभराने जेंव्हा वडील डिस्चार्ज घेऊन घरी आले. तेंव्हा या महाशयांचे चिरंजीव मोठ्या आढ्यतेने म्हणाले कि तुम्हाला फोनवर त्रास दिला त्याबद्दल मी तुम्हाला ३ हजार रुपये देणार आहे. त्यावर माझ्या पत्नीने सांगितले कि तुमचे पाच दिवसात ३५ फोन कॉल झाले आहेत. इतर वेळेस मी ३०० रुपये घेते पण ते माझे जुने पेशंट आहेत म्हणून २०० रुपये प्रमाणे तुम्ही मला सात हजार रुपये द्यायचे. यावर हे महाशय एवढे पैसे होतात कसे होतात म्हणून विचारत होते? पत्नी म्हणाली रात्री बारा वाजता तुमची सीटी स्कॅन ची अपॉइंटमेंट घेऊन त्याचा अहवाल रात्री साडे बारा वाजता तुम्हाला माझे मिस्टर रेडिओलॉजिस्ट आहेत म्हणून मिळाला. रुगालयात अपरात्री एक वाजता त्यांनी माझ्या शब्दामुळे बेड रिकामा ठेवला होता. रुग्णालयात तुमचे बिल किती झाले हे तुम्हाला माहिती आहे. माझे वाजवी दर सुद्धा तुम्हाला जास्त वाटत आहेत? दुसऱ्या दिवशी त्यांनी ७ हजाराचा चेक आणून दिला. वडिलांच्या प्रकृतीबद्दल किंवा तुमच्या मुळे गोष्टी सुसह्य झाल्या याबद्दल एक शब्द नाही. याला आता ६ महिने होऊन गेले यांनतर हे महाशय पत्नीकडे परत आलेले नाहीत. मी तर पत्नीला म्हणालो कि असला रुग्ण नाही आला म्हणून आपणच आनंद साजरा करायला पाहिजे. ३) आमच्या घराच्या समोरच्या घरात राहणारे कुटुंब सख्खे शेजारी. आम्हाला सर्वाना ऑगस्ट मध्ये करोना झाला म्हणून आम्ही सर्व १७ दिवस क्वारंटाईन होतो. तेंव्हा यांनी एकदाही साधे विचारले नाही कि साधा एक फोनहि केला नाही कि तुम्हाला काही हवे आहे का? यानंतर यांची पत्नी गरोदर राहिली. त्यांच्या स्त्रीरोग तज्ञाने सोनोग्राफी साठी माझ्याकडे पाठवले. तेंव्हा बाळाची वाढ नीट होत नाहीये असे सोनोग्राफीत मला दिसून आले. यावर त्यांच्या स्त्रीरोग तज्ञाने संपूर्णपणे विश्रांती( complete bed rest) घ्यायला सांगितले आहे. सध्या १८ एप्रिलपासून मुंबईत लॉकडाऊन लावले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सर्व घरकामाला येणारी मुलगी कळव्या वरुन येत असे तिला लोकल ने प्रवासास बंदी केली आहे. यासाठी हे महाराज आमच्या कडे येऊन विचारू लागले कि तुम्ही तिला सर्टिफिकेट द्याल का? पत्नीने विचारले कसले सर्टिफिकेट? त्यावर हे महाराज म्हणाले कि "ती तुमच्या दवाखान्यात काम करते आहे" म्हणून सर्टिफिकेट दिले तर तिला लोकल ने प्रवास करता येईल. पत्नी म्हणाली असे सर्टिफिकेट कसे देता येईल? एक तर माझ्या दवाखान्याच्या लेटरहेड वर ते सर्टिफिकेट द्यावे लागते त्यावर तिचा फोटो आधार कार्ड नंबर ती माझ्या कडे केंव्हा पासून कामाला आहे असे सर्व लिहून द्यावे लागते. त्यातून अशी खोटी सर्टिफिकेट घेऊन लोक प्रवास करतात यामुळे आठवड्यात दोन वेळेस रेल्वेत तपासणी होते तेथे हि मुलगी काय सांगणार? तिने खरे सांगितले कि पोलीस माझ्या दवाखान्यात येऊन खोटे सर्टिफिकेट दिल्याबद्दल मला जबाबदार धरुन कार्यवाही करणार आणि तुम्ही मात्र नामानिराळे राहणार. हे सर्व कशाला तर तिला बसप्रवासाचे पैसे द्यायला नकोत म्हणून? तो मान खाली घालून निघून गेला. पत्नी मला म्हणाली कि एक तर त्याने आपल्याला गरज होती तेंव्हा साधा फोन करण्याचे सौजन्य दाखवले नाही आणि असे खोटे सर्टिफिकेट द्या म्हणून बिनधास्तपणे आपल्याला विचारायला याची जीभ कशी रेटली? मी तिला म्हणालो चमडी जाये पर दमडी न जाये अशा मनोवृत्तीची हि माणसं आहेत. याना जनाचीच नाही तर मनाचीही लाज नसते. तिन्ही उदाहरणे गेल्या आठ महिन्यातील आहेत. लबाडी त्यांनी करायची आणि त्याची लाज किंवा टोचणी तुम्हालाच लावायची कि एवढी साधी गोष्ट तुम्हाला डॉक्टर म्हणून आमच्यासाठी करता येत नाही तदेव कर्म कुर्वीत ह्येन आत्मा संप्रसीदति आत्मानं पीडयेत यच्च तत्प्रयत्नेन वर्जयेत. म्हणजेच असेच काम करा ज्याने तुमच्या आत्म्याला संतोष पोचेल आणि ज्याने तुमच्या आत्म्याला क्लेश होईल असे काम प्रयत्नपूर्वक टाळावे
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
24833 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

सुशिक्षित भि***ट....अशी

टवाळ कार्टा
Wed, 05/05/2021 - 14:04 नवीन
सुशिक्षित भि***ट....अशी उदाहरणे कोविडकाळात जास्त दिसत आहेत
  • Log in or register to post comments

कशाला असे अनुभव लिहिता?

तुषार काळभोर
Wed, 05/05/2021 - 14:18 नवीन
एकेका ओळीने संताप वाढत होता. सर्वाधिक डोक्यात जातात, तज्ञांपेक्षा आपल्याला जास्त कळत असल्याचा आविर्भाव मिरवणारे आणि निर्लज्जपणे तोंडावर पडूनपण मीच कसा खरा हे दाखवणारे गेंड्याच्या कातडीचे लोक. तिसऱ्या अनुभवातील उदाहरणासारखे दमडी चा विचार करणारे ... यांची फार कीव येते. वाचताना मनस्ताप होत होता, तुम्हाला अनुभवताना कसं वाटलं असेल कल्पना करवत नाही.
  • Log in or register to post comments

तज्ञांपेक्षा आपल्याला जास्त

सुबोध खरे
Wed, 05/05/2021 - 20:05 नवीन
तज्ञांपेक्षा आपल्याला जास्त कळत असल्याचा असल्याचा आविर्भाव मिरवणारे हे तर रोजचेच आहे. गणपती उत्सवाच्या वेळेस वहिनीला पाळी पुढे ढकलण्यासाठी दिलेली गोळी नवरात्रात स्वतः पाळी पुढे ढकलण्यासाठी घेतली आणि नंतर तीन महिने पाळी आली नाही म्हणून माझ्याकडे सोनोग्राफी करायला आलेली अशीच एक स्त्री. तिला मी सांगितले कि तुम्ही गरोदर आहात. तर त्याच मला उलट तपासणी करत विचारत होत्या असं कसं झालं? मी शांतपणे त्यांना विचारलं कि हि गोळी तुम्हाला लागू पडेल असं तुम्हाला कसं वाटलं. स्त्रीरोगतज्ञाकडे जाण्यासाठी लागणारे थोडे पैसे वाचवण्यासाठी स्वतः इलाज करताय तर आता त्याचा दुष्परिणाम पण भोगायला तयार व्हा. तुमच्या पोटात गर्भ आहे जे मला दिसते आहे तेच तुम्हाला दिसते आहे. काही केलं नाही तर गर्भ मात्र मोठा होत जाईल. वेळेत इलाज करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

अनुभव शेअर केल्याबद्दल

कॉमी
Wed, 05/05/2021 - 14:27 नवीन
अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद. आपापल्या ओळखीच्या अतिशहाण्यांना लेखाची लिंक पाठवायला पाहिजे.
  • Log in or register to post comments

खरंच काय विचित्र लोकं असतात

यश राज
Wed, 05/05/2021 - 14:29 नवीन
डॉ. लोकांना कोविड काळात सगळ्यात जास्त ताण आणि त्रास आहेच व असल्या ### लोकांपाई मनस्ताप पण सहन करावा लागतोय. काय एकेक नमुने असतात.. हद्द आहे. माझा चुलत भाऊ आणि त्याची पत्नी हे दोघेही डॉक्टर आहेत आणि त्यांचे ही अनुभव जवळपास आपल्यासारखेच आहेत.
  • Log in or register to post comments

तुमचे अनुभव नेहमीच, विचारांना वेगळी दिशा देतात ....

मुक्त विहारि
Wed, 05/05/2021 - 15:34 नवीन
रुग्ण म्हणून डाॅक्टरांशी कसे वागले पाहिजे? ह्यावर मेंदूची जळमटे काढणारा लेख .... एक विनंती आहे, अशीच उदाहरणे अजून येऊ द्या...
  • Log in or register to post comments

अचाट

स्मिता.
Wed, 05/05/2021 - 16:35 नवीन
जगात असेही लोक असू शकतात याचं फार म्हणजे फारच आश्चर्य वाटतं. अश्या लोकांवर काय संस्कार झालेले असतात देव जाणे! तिसर्‍या उदाहरणातल्यासारखे कवडीचुंबक मात्र ठिकठिकाणी भेटत असतात. चांगल्या सधन घरातले, मासिक गलेलठ्ठ पगार, इ. असलेले लोक चिंधीचोरीकरता अनेक बेकायदेशीर कृत्य करतांना दिसतात.
  • Log in or register to post comments

सुंभ जळला तरी पिळ जात नाहीत

सुरसंगम
Wed, 05/05/2021 - 17:06 नवीन
सुंभ जळला तरी पिळ जात नाहीत अशी हे माणसे. यांना कितीही बोला पुन्हा ये रे माझ्या मागल्या.
  • Log in or register to post comments

सुशिक्षित अडाणी लोकं.. यांना

बापूसाहेब
Wed, 05/05/2021 - 17:21 नवीन
सुशिक्षित अडाणी लोकं.. यांना कितीही समजवून सांगितले तरी हि लोक सुधारणार नाहीत.. माझ्या आयुष्यात अश्या माणसांना मी काडीचाही थारा देत नाही. एकदा अश्या प्रकारचा अनुभव आला की फोन सुध्दा उचलणे बंद करून टाकतो.. किंवा फोन त्यावेळी न उचलता नंतर करतो. . यात काही फार जवळचे नातेवाईक सुध्दा आहेत ज्यांनी अर्थिकदृष्ट्या वडिलांना अक्षरशः लुटले आहे पण अजूनही मला किंवा माझ्या कुटुंबाला थोडीशी जरी आर्थिक मदत लागली तर हीच लोकं वासाला सुध्दा जवळ येणार नाहीत...!!
  • Log in or register to post comments

आपण खरोखर खरे आहात

गॉडजिला
Wed, 05/05/2021 - 17:49 नवीन
आपण खरोखर खरे नसता तर लोकांनी तुम्हाला असे गृहीत धरायचे साहस केले नसते. तुमचे काम, अनुभव, हुशारी, जेष्ठता व तरीही असलेला साधेपणा, हे लोक कधीही समजु शकणार नाहीत. देव करो आणी त्या लोकांनीही हा लेख वाचो...
  • Log in or register to post comments

कसोटी पाहणारे गंभीर अनुभव .

सिरुसेरि
Wed, 05/05/2021 - 17:51 नवीन
कसोटी पाहणारे गंभीर अनुभव .
  • Log in or register to post comments

तुम्हाला मी त्रास दिला

सरिता बांदेकर
Wed, 05/05/2021 - 17:55 नवीन
तुम्हाला मी त्रास दिला म्हणून ३०००₹ देत आहे हे वाचताना तर माझे हात शिवशिवत होते.एक कानाखाली द्यावीशी वाटत होती. डॅा म्हणजे काय वाटतं? जेव्हा डॅा. सांगतात तेव्हा दुर्लक्श करायचं. का तर म्हणे यांचं रॅकेट असतं.आणि गळ्याशी आलं तरी कृतद्यता नाहीच. असे अनुभव नक्की लिहा... जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा लेख पोचला पाहिजे.
  • Log in or register to post comments

बापरे...

योगी९००
Wed, 05/05/2021 - 18:15 नवीन
बापरे... फार वाईट अनुभव. अशी लोकं केवळ तुम्ही डॉ. आहात म्हणून संबंध ठेवतात. माझी पत्नी पण डॉ. आहे आणि तिलाही असे बरेच अनुभव आलेत. थोडक्यात सांगायचे झाले तर एरवी समोरून मुद्दामओळखसुद्धा न दाखवणारी माणसे कोवीड काळात रात्री अपरात्री कधीही अगदी साध्या कारणांसाठी फोन करायची. डॉ. फी विचारणे तर नाहीच (तशी आम्हाला असल्या लोकांकडून फी नकोच होती. उगाच मग आम्हाला विकत घेतल्यासारखे वागतील मग...).
  • Log in or register to post comments

:(

उपयोजक
Wed, 05/05/2021 - 18:49 नवीन
कृतघ्न आणि स्वार्थी
  • Log in or register to post comments

काय बोलावे समजत नाही.

पिनाक
Wed, 05/05/2021 - 19:38 नवीन
काय बोलावे समजत नाही. परदेशातील लोक नॉर्मली अशा बाबतीत चांगले वागणारे असतात. भारतातच असे हरामखोर कसे काय मोठ्या संख्येने असतात कळत नाही. कोव्हीड मध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर कमी होऊन असे लोक कमी होतील अशी मला आशा होती. पण हे लोक मरत ही नाहीत लवकर.
  • Log in or register to post comments

सरसकटी करण नको ....

मुक्त विहारि
Wed, 05/05/2021 - 19:44 नवीन
एक उदाहरण देतो ... आपल्या कडे, शुगर आणि हीमोग्लोबिन चेक करायला काहीच त्रास पडत नाही .... 250 ते 300 रुपयांत आणि एका दिवसांत होते आणि त्यासाठी डाॅक्टरचे नांव सांगीतले तरी पुरते .... परदेशांत ही रिस्क कुणीही घेत नाही .... आपल्या देशांत अजूनही डाॅक्टरला देव मानणारी माणसे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिनाक

मी आणि माझे काम कसेही झालेच पाहिजे ही वृत्ती

कंजूस
Wed, 05/05/2021 - 20:00 नवीन
ठेवणारे लोक आहेत. १) बिलं घेणे. हा प्रकार इतका वाईट आहे की ते एक कमाईचे साधन म्हणून पाहतात. जेव्हा जागा बदलतात तेव्हा नवीन ठिकाणी बिले देणारे कोण आहेत ही शोधाशोध सुरू करतात. ( त्यांनी जुन्या ठिकाणी काही फिक्सींग केलेले होते.) तर ते माझ्या भागात आल्यावर मला असं कोणी आहे का विचारले. मी त्यांना तीन नावे सांगितली आणि यांच्याकडे जाऊ नको सांगितले तरीही ते गेलेच. तिघांनीही हाकलले . "तुम्ही चुकीच्या जागी आला आहात" हे सांगितले. एक डॉक्टर कायम वेळच्या वेळी दवाखाना उघडून बसायचा पण एकही पेशंट नसायचा. त्याला याने स्पष्टच विचारले की असेही पेशंटस दिसतच नाहीत तर काही कमाई होईल तुम्हाला आणि मलाही. यावर तो डॉक्टर म्हणाला की मी डॉक्टर आहे पण माझा व्यवसाय वेगळा आहे तो इथे बसून करतो.
  • Log in or register to post comments

केवळ वैद्यकच नाही तर इतर कामांतही हीच बोंब असते.

कंजूस
Wed, 05/05/2021 - 20:06 नवीन
कुठे काही ओळखीने बिनबोभाट काम होईल ही अपेक्षा राखून असतात. आणि नाही म्हटलं की संबंध तोडून टाकतात.
  • Log in or register to post comments

हाच सर्वात मोठा प्रश्न आहे.

सुबोध खरे
Fri, 05/07/2021 - 20:05 नवीन
हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. डॉक्टरकडे अवाजवी मागण्या केल्या जातात. यात माझे स्वतःचे वर्गमित्र आहेत. शेजारचे लोक आहेत. ज्यांनी मला लहानपणापासून पहिले आहेत असे अनेक वरिष्ठ नागरिक आहेत. जेंव्हा मी लष्करात होतो तेंव्हा मी लहानपणी राहत असलेल्या सोसायटीत शेजारी पाजारी याना फुकट सल्ला देत होतो. परंतु जेंव्हा मी माझ्या ४० महिन्यांचा पगार टाकून एक १५० चौ फुटांचा दवाखाना याच सोसायटीत विकत घेतला तेंव्हा मला सोसायटीने एक रुपया सवलत दिली नाही. आणि दवाखाना सुरु केल्यावर याच लोकांची अपेक्षा होती कि मी याना फुकट तपासावे. तसे न केल्यानंतर आता सुबोध पैशाच्या मागे लागला आहे असेही माझ्या पाठीमागे बोलताना ऐकले आहे. यानंतर अनेकांनी खोटे मेडिकल सर्टिफिकेट देण्यासाठी मागणी केली होती. असे कोणतेही खोटे सर्टिफिकेट मी देत नसल्याने जेथे लहानाचा मोठा झालो अशा ५६ फ्लॅटच्या सोसायटीत माझी पत्नी फार तर ६-७ फ्लॅटच्या कुटुंबाची फॅमिली डॉक्टर आहे. यासाठी लष्करातील माणसे तिरसट असतात या समाजातील साधारण समजुतीचा मी फायदा घेतो. कोव्हीड काळात तर लोकांच्या कोत्या आणि अत्यंत स्वार्थी मनोवृत्तीचे इतके अनुभव आले आहेत कि तेच तेच परत परत उगाळून आपला मूड खराब करण्यात मला रस वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

कोणताही डॉक्टर आणि शिक्षक असो

बोलघेवडा
Wed, 05/05/2021 - 20:25 नवीन
कोणताही डॉक्टर आणि शिक्षक असो मला त्याच्याविषयी नितांत आदर आहे. लोक अस कसं वागू शकतात हा प्रश्न पडतो. मी नुकताच हॉस्पिटल मधून बरा होऊन बाहेर पडलो. त्या वेळी उपचार करत असलेल्या डॉक्टर ला सर्वांसमोर वाकून नमस्कार केला. दुसरा देवच तो!!
  • Log in or register to post comments

दुसरा देवच तो!!

सुक्या
Wed, 05/05/2021 - 23:25 नवीन
दुसरा देवच तो!! सहमत ... माझ्या गावात एक मंदीर आहे. लॉकडाउन मधे ते बंद होते. तिथे लिहिलेली एक पाटी खुप छान होती .. "मंदीर बंद आहे कारण देव आत नाही. तो जवळच्या रुग्णालयात कोविड वर उपचार करतो आहे"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोलघेवडा

कृपया डॉक्टरना देव समजू नका

सुबोध खरे
गुरुवार, 05/06/2021 - 10:46 नवीन
कृपया डॉक्टरना देव समजू नका कारण त्यांच्याकडून अवास्तव अपेक्षा निर्माण होतात. ती पण तुमच्या सारखीच हाडा मांसाची भावना असणारी माणसेच आहेत. केवळ शरीरशास्त्राबद्दल अभ्यास केल्यामुळे ते या विषयात तज्ञ म्हणून काम करतात आणि त्यांना मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग ते आजार बरा करण्यासाठी करतात. प्रत्येक बरा न होऊ शकलेल्या रुग्णाचा त्यांनाही तितकाच मानसिक त्रास आणि ताण होत असतो. काही जण तो व्यक्त करतात आणि काही जण ते ओझे मनात बाळगल्यामुळे नैराश्य रक्तदाब हृदयविकारासारख्या आजाराला बळी पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

ती तुमची भुमिका आहे ..

मुक्त विहारि
गुरुवार, 05/06/2021 - 11:24 नवीन
डाॅक्टरला देव समजल्यामुळे, रोग्याची मानसिक ताकद वाढत जाते. (वैद्यकीय भाषेत, प्लासिबो इफेक्ट) काही काही रुग्णांना विशिष्ट डाॅक्टरच हवा असतो ... ---------' दुसरा मुद्दा म्हणजे, डाॅक्टरांना देव समजल्या मुळे, सर्वसामान्य माणूस, डाॅक्टरांना मारहाण करत नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

डाॅक्टरांना देव समजल्या मुळे,

सुबोध खरे
गुरुवार, 05/06/2021 - 11:54 नवीन
डाॅक्टरांना देव समजल्या मुळे, सर्वसामान्य माणूस, डाॅक्टरांना मारहाण करत नाही हे अजिबात मान्य नाही देवावर श्रद्धा असलेलं लोक जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर देवाच्या मूर्ती विहिरीत टाकण्याची अनेक उदाहरणे आहेत. जेंव्हा श्रद्धेला ठेच लागते तेंव्हा माणसे अविवेकी वागतात हे सर्वत्र दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ह्याची साधारण टक्केवारी किती?

मुक्त विहारि
गुरुवार, 05/06/2021 - 18:30 नवीन
ही टक्केवारी, जास्तीत जास्त, 5% टक्क्यांच्या वर नसेल ... असो, तुम्ही आधी स्वतःला माणूस समजता आणि मग डाॅक्टर तर आम्ही तुमच्या सारख्या मंडळींना आधी डाॅक्टर समजतो आणि मग माणूस ---------- माझे मेहुणे डाॅक्टर आहेत आणि त्यांचे पण मत, तुमच्या सारखेच आहे. दोघांचेही दृष्टिकोण आपापल्या जागी परस्पर विरोधी आणि योग्यच आहेत... त्यामुळे मी थांबतो ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

खरे सर बरोबर

गुल्लू दादा
Fri, 05/21/2021 - 07:02 नवीन
डॉ.ना देव समजणे चूक. अवाजवी अपेक्षा खरंच तयार होतात. शिकत असताना अनेकदा वरिष्ठांना मारहाण झालेली बघितलेली आहे. 'हा कसला देव याला तर चपलाने मारलं पाहिजे. नुसते पैसे पाहिजेत ह्यांना.' आता तुम्हीच सांगा सरकारी रुग्णालयात लोकांना चार्जे पडतो फक्त 10 रु. आणि डॉ. चा पगार सुद्धा फिक्स असतो मग पैसे पाहिजेत हा विषय आला कुठून. आणि आपण म्हणता की डॉक्टरांना देव समजल्याने मारहाण होत नाही...अहो साहेब काही लोक तर देवांना मानतच नाहीत..काही तर धर्म असे आहेत जे देवाला शिव्या घालतात. मग त्यांनी डॉ. दिसला की शिव्या चालू कराव्यात कारण तो देव आहे. अवाजवी अपेक्षा म्हणजे काय हे डॉ. म्हणून काम केल्याशिवाय समजणे अवघड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तुमचे म्हणने ही बरोबर आहे ...

सुक्या
गुरुवार, 05/06/2021 - 21:49 नवीन
तुमचे म्हणने ही बरोबर आहे ... परंतु आमच्या सारख्या लोकांना डॉक्टर हे देवासारखेच असतात. खरं सांगायचे तर नोबेल प्रोफेशन म्हटले की डोळ्यासमोर डॉक्टर / शि़क्षक / सैनिक हेच उभे राहतात .. राहीली गोष्ट अवास्तव अपेक्षा निर्माण होण्याची. ती साधारण्पणे तुम्ही वर्णन केलेल्या लोकांकडुन होते. बहुसंख्य लोक डॉक्टरही माणुस आहे त्यालाही मर्यादा आहेत, सर्व काही त्यांच्या हातात नाही हे जाणुन असतात. खाली लिहिल्याप्रमाणे मारहाण किंवा त्रास देणे असले प्रकार माजुरड्या लोकांकडुन होतात ज्यांना मंदीरातही स्पेशल ट्रीटमेंट हवी असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ठीक..

योगी९००
Fri, 05/07/2021 - 09:15 नवीन
डॉक्टरांना देव म्हणावे तरी प्रॉब्लेम, माणूस म्हणावे तरी प्रॉब्लेम.... आता तर देवमाणूस म्हणावे तरीही प्रॉब्लेम.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

माणूस म्हणावे तरी प्रॉब्लेम

सुबोध खरे
Fri, 05/07/2021 - 09:28 नवीन
माणूस म्हणावे तरी प्रॉब्लेम ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

माणूस म्हणावे तरी प्रॉब्लेम... हा पण छोटासा काळा ठिपका आहे...

मुक्त विहारि
Fri, 05/07/2021 - 09:38 नवीन
भृणहत्या करणारे, किडनीचा व्यापार करणारे आणि इतरही अवैध धंदे करणारे काही डाॅक्टर आहेतच.... अशा डाॅक्टरांच्या बाबतीत बोलत आहेत ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ते नराधम

सुबोध खरे
Fri, 05/07/2021 - 09:44 नवीन
ते नराधम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

माणूस म्हटले कि त्याला येणारे

सुबोध खरे
Fri, 05/07/2021 - 09:45 नवीन
माणूस म्हटले कि त्याला येणारे सर्व गुण दुर्गुण त्याबरोबर आलेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

म्हणूनच तर देवपण द्यायचे

गॉडजिला
Fri, 05/07/2021 - 21:24 नवीन
म्हणजे प्रसंगी माणसाचे दुर्गुणही प्दरी घ्यावे हीच अपेक्शा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

माजुरडे मस्तवाल लोक... हल्ली

मदनबाण
Wed, 05/05/2021 - 20:48 नवीन
माजुरडे मस्तवाल लोक... हल्ली यांची देशात संख्या देशात जरा जास्तच झाली आहे ! ते कोण तरी सांगुन गेलय ना... समाजा मध्ये मुर्खांना किंमत आल्याने सज्जनांना त्रास झाला.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Unna Paartha Naeram... :- All in All Azhagu Raja
  • Log in or register to post comments

पैशाची सुज आलेले माजुरडे लोक

सुक्या
Wed, 05/05/2021 - 23:19 नवीन
पैशाची सुज आलेले माजुरडे लोक हे असले भिकारी धंदे करतात.. असल्यांचा चार चौघात मस्त अपमान केला पाहिजे ... माझ्या ओळखीतले एक प्रकरण आहे .. हे साहेब आनी त्यांचे कुटुंब दिल्लीत राहातात. पैशाचा प्रचंड गर्व. घरात करोना घुसला आणी पैसे घेउन रुग्णालये फिरले. पंचतारांकीत / तीन तारांकीत रुग्णालये भरलेली. नाइलाजाने सरकारी रुग्णालयात जावे लागले ते त्यांच्या प्रतिष्ठेला साजेसे नव्हते ... या सार्‍या प्रकारात मुलीची (वय ३२ फक्त) प्रक्रुती नाजुक झाली. सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन लाउन डॉक्टरांनी तिला स्थीर केले ... लगेच ये क्य हॉस्पिटल है .. यहा तो कुच है ही नही .. एसी भी नही .... वगेरे तक्रारी सुरु ... डॉक्टरांविषयी चांगला शब्द नाही . . . कुठेतरी पैसे देउन खाट मिळवली ... सरकारी दवाखाण्यातुन निघाले ... तिथे जाइपर्यंत दुसरा सिरियस रुग्ण तिथे भरती झाला ... पैसे परत दिले हॉस्पिटल ने... आता ? पुन्हा सरकारी दवाखाना ... तिथेही जागा नाही ... ६ तास पुन्हा इकडे तिकडे खाटा शोधायला धावाधाव ... त्या सार्‍यात मुलगी ऑक्सिजन न मिळाल्याने पुन्हा सिरियस झाली ... आनी त्यातच दगावली ... आता काय करणार त्या पैशाचे?? वाईट वाटले ... फुकाच्या स्टेटस पायी एक जीव गेला ... तो ही उने पुरे फक्त ३२ वर्षे जगुन ...
  • Log in or register to post comments

काय बोलणार?

मुक्त विहारि
गुरुवार, 05/06/2021 - 10:41 नवीन
जाऊ दे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

अरेरे

Bhakti
गुरुवार, 05/06/2021 - 10:59 नवीन
सुशिक्षित अडाणीपेक्षा , अशिक्षित माणूसकी असणारे बरे !
  • Log in or register to post comments

सुशिक्षित अडाणीपेक्षा ,

सुबोध खरे
गुरुवार, 05/06/2021 - 11:56 नवीन
सुशिक्षित अडाणीपेक्षा , अशिक्षित माणूसकी असणारे बरे ! माणुसकी चा आणि शिक्षणाचा अजिबात संबंध नाही. उलट अशिक्षित माणसे अत्यंत टोकाची भूमिका सहज घेऊ शकतात. काही विशिष्ट समाजाची मसने याचे उत्तम उदाहरण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

अजून एक हलकटपणा पाहण्यात आला

अनुप ढेरे
गुरुवार, 05/06/2021 - 11:59 नवीन
अजून एक हलकटपणा पाहण्यात आला आहे. घरातील कोणी व्यक्ती पोझिटिव्ह असल्यास कामवाल्या बायकांना ते न सांगणे. का तर त्या कामाला यायला नाही म्हणाल्या तर काय!
  • Log in or register to post comments

लिहिते राहा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 05/06/2021 - 18:12 नवीन
डॉक्टरसाहेब, अनुभव वाचत आहे. लिहिते राहा. पुलेशु. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

+१

प्रचेतस
गुरुवार, 05/06/2021 - 21:53 नवीन
एकापेक्षा एक अनोखे अनुभव आहेत तुमच्याकडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे इच्छापत्र (will) मानसिक

प्रकाश घाटपांडे
Fri, 05/07/2021 - 11:41 नवीन
हे इच्छापत्र (will) मानसिक सुस्थितीत असताना केलेले आहे
याचे वैद्यकीय निकष काय आहेत? ते मानसोपचार तज्ञाव्यतिरिक्त अन्य डॉक्टर कसे देऊ शकतात?
  • Log in or register to post comments

mental status examination and

सुबोध खरे
Fri, 05/07/2021 - 13:35 नवीन
mental status examination and neurological examination. या चाचण्या एम बी बी एस च्या पातळीवर शिकवल्या जातात आणि केल्या जातात. त्यासाठी मनोविकार तज्ज्ञाची अजिबात गरज नाही. उदा गुढघ्यावर एक छोटी हातोडी मारून रिफ़्लेक्स तपासले जातात. तुमच्या हाताला आणि त्याच्या स्वतःच्या नाकाला आलटून पालटून स्पर्श करताना त्याचे स्नायूंचे संतुलन पाहता येते. साधी पंधरा अधिक सत्तावीसची बेरीज करता येते कि नाही. माणसाला स्वतःची सही व्यवस्थित करता येते का? आज तारीख वार काय आहे. सद्यस्थिती काय आहे? आपले मुख्यमंत्री कोण? असे साधे प्रश्न विचारून त्या माणसाची मानसिक स्थिती तपासता येते. वर उल्लेख केलेले सद्गृहस्थ गेली काही वर्षे अंथरुणावर पडून आहेत आणि बहुतेक वेळेस ग्लानीतच असतात. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती सक्षम नाही हे कोणीही सांगू शकले असते आणि त्यांच्या मूला सुनेलाही माहिती होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

निगरगट्ट असतात लोक !

चौथा कोनाडा
Fri, 05/07/2021 - 11:53 नवीन
निगरगट्ट असतात लोक !
  • Log in or register to post comments

वाईट अनुभव आहेत. डोकंच फिरतं.

राघव
Fri, 05/07/2021 - 14:21 नवीन
वाईट अनुभव आहेत. डोकंच फिरतं. :-( डॉक, कोविडमधले काही चांगले अनुभव लिहा हो. सध्या सर्वत्र होत असणार्‍या घटनांमुळे मन अगदी विटून गेलेले आहे. त्याला जरा उभारी येईल.
  • Log in or register to post comments

त्रासदायक!

लई भारी
Fri, 05/07/2021 - 21:27 नवीन
त्रासदायक अनुभव आहेत. बऱ्याच ठिकाणी असे बघितले आहे. एक जवळचा मित्र डॉक्टर आहे. छोटे हॉस्पिटल आहे. खूप सचोटीने करतो, म्हणजे गरीब पेशंटची फी राहू दे, औषधे सुद्धा मोफत द्यायची व्यवस्था करतो. त्याला आलेला एक अनुभव मांडतो इथे. ------------------------------------------------------------------------ पाच महिन्या पूर्वीची गोष्ट ... पहिल्या खेपेची बाई प्रसुती साठी दवाखान्यात admit झाली. पहिल्या खेपेच्या बाई ला काही धोके नसतील व नॉर्मल डिलिव्हरी होणे शक्य असेल तर नॉर्मल डिलिव्हरी साठी पूर्ण प्रयत्न केला जातो. मात्र कुठलीही सहज सोपी वाटणारी गोष्ट प्रसुती दरम्यान गुंतागुंतीची होऊ शकते. आणि अशा वेळी डॉक्टरांची बुद्धी व शक्ति हे दोन्ही पणाला लागतात. दवाखान्यात कुठलीही पेशंट डिलिव्हरी साठी admit hotana normal delivery साठी पूर्ण प्रयत्न करू मात्र काही अडचण उदाभवल्यास बाळाचे ठोके कमी होत असल्यास emergency Cesarean तात्काळ करावे लागू शकते याची कल्पना सर्वांना दिली जाते. तशी या ही पेशंट व सोबत असणाऱ्या नातेवाईकांना हि दिली होती. Admit झाल्या झाल्या नॉर्मल प्रसुती साठी जी काही उपचार पद्धती असते त्यानुसार तातडीने उपचार सुरू झाले. दुर्दैवाने चार तासानंतर बाळाने पोटात शी केली. हे निदान आम्हाला कसे समजते? डिलिव्हरी च्या वेदना सुटल्यावर कलेसोबत बाळा भोवतीचे आवरण छेदले जाऊन आतील पाणी बाहेर येते, बाळास काही त्रास नसेल तर हे पाणी पाण्यासारखे स्वच्छ दिसते. मात्र बाळाने शी केली असल्यास हे पाणी हिरवट बाहेर येते. नॉर्मली बाळ जन्मानंतर त्याची पहिली शी करते. मात्र प्रसुती कळa सुरू असताना बाळाला रक्तपुरवठा किंवा ऑक्सिजन पुरवठा यामध्ये अडथळा होत असेल व याचा बाळाच्या शरीरातील हृदय, मेंदू यंत्रणेवर ताण पडत असेल तर बाळ पोटात शी करते. व ते हिरवे पाणी म्हणून बाहेर येते. हे हिरवे असणारे पाणी अगदी पातळ पाण्यासारखे असेल, बाळाचे ठोके व्यवस्थित असतील,गर्भपिश्र्विचे तोंड पूर्ण उघडलेले असेल व प्रसुती लवकरात लवकर करणे शक्य असेल तर आम्ही डॉक्टर्स नॉर्मल प्रसुती करतो. मात्र शी घट्ट असेल, पिशवीचे तोंड उघडलेले नसेल व बाळाचे ठोके अनियमित किंवा कमी होत असतील तर emergency Cesarean section चा निर्णय घ्यावा लागतो. कारण बाळाला meconium aspiration syndrome होऊन मोठा धोका उदभवू शकतो. वरील नमूद केलेल्या रुग्णाच्या पिशवी चे तोंड केवळ २.५-३ cm इतकेच उघडलेले होते,( डिलिव्हरी होताना पिशवीचे तोंड पूर्ण म्हणजे १० सेमी इतके उघडे असावे लागते) बाळाने केलेली शी ही घट्ट होती. बाळाने पोटात शी केल्याचे निदान घरच्यांना सांगितल्यावर तिच्या आई स गेलेले हिरवे पाणी पेशंट जवळ नेवून (meconium) ही दाखवण्यात आले होते. बाळाचे ठोके अनियमित होत होते. Emergency Cesarean chi गरज लागणार असे सांगितल्यावर रुग्णाच्या भावाने वाद सुरू केला. त्यास शांतपणे समजावून बाळाला काय काय त्रास होऊ शकतो याची पूर्ण कल्पना दिली. तोपर्यंत बाळाचे ठोके नियमित राहावे म्हणून ऑक्सिजन, सलाईन infusion Ani तत्सम सर्व उपचार सुरू होतेच. बराच वेळ वाद करत नातेवाईक cesarean chi समती देईना. यादरम्यान नातेवाईकांचा कायम फोन सुरू होता व पलीकडील व्यक्ती डॉक्टर खोटे बोलत आहेत व meconium असेल तरी नॉर्मल होतेच हे सांगून भडकवत होती. इकडे बाळाचे ठोके प्रचंड अनियमित होऊ लागले. बाळास त्रास होतोय, ठोके अनियमित आहेत हे त्यांना बाळाचे कमी होणारे ठोके ऐकवून सुद्धा पटत नव्हते. बाळाचे कमी होणारे ठोके माझी अस्वस्थता वाढवत होती. वेळोवेळी सांगून काहीच उपयोग होईना, रुग्णाच्या भावाला भांडण्याशिवाय दुसरे काहीच बोलायचे नव्हते. एक दीड तास अविश्वास व वाद याने नको नको से झालेले. जर लवकरात लवकर बाळ गर्भाशयात तून बाहेर काढले नाही तर asphyxia किंवा दगावू सुद्धा शकते हे काही केल्या त्यांना कळेना. शेवटी " तुम्ही निर्णय देत नसाल तर होणाऱ्या संभाव्य बाळाच्या परी स्थितीस doctor किंवा हॉस्पिटल जबाबदार नसेल " अशी संमती घेतली गेली. तुम्ही नॉर्मल करणार नसाल तर patient आम्ही दुसरीकडे घेऊन जातो असे म्हणत त्या प्रसुती वेदनेने तळमळ नाऱ्या मुलीला घेऊन जाऊ लागले. बिचाऱ्या त्या मुलगी व आई चे त्या भावाच्या हट्टपुढे काही चालेना. refferal note देऊन रुग्ण व बाळाला पुढे अडचण नको म्हणून गेल्यावर तिथल्या डॉक्टर शी फोन वर बोलतो, काही गरज लागल्यास कळवा मदत करू असेही सांगितले. बाळाचे कमी होणारे ठोके या माणसाच्या हट्टापुढे हरणार याची मला भीती होती. दुर्दैवाने हॉस्पिटल मधून बाहेर पडताना पेशंट शुद्ध हरपून पडली. आम्ही पळत जाऊन तिला घेऊन आलो, बीपी कमी झालेला, तिला तातडीने योग्य ते उपचार सुरू केले. यावेळी तिची आई पाया पडून गयावया करू लागली. व cesarean घ्या अशी विनंती करू लागली. भावाने रागारागाने cesarean chi लेखी व तोंडी ( रेकॉर्डेड) संमती दिली. मात्र शी केल्याचा पुरावा हवा असे सांगितले. यानंतर ताबडतोब cesarean करण्यात आले. बाळ कसे असेल याबद्दल मला प्रचंड ताण होता. कारण मागच्या दोन तासापासून निरर्थक त्याच्या जीवाशी खेळ सुरू होता. बाळ बाहेर आल्यावर meconium aspiration झाले होते, बाळाच्या डॉक्टरानी शी केलेले तिच्या भावास आत बोलावून दाखवले सुद्धा. बाळ रडले परंतू श्वासास त्रास होत असल्याने बाळाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. पुढील तीन ते चार दिवसात बाळास NICU तून आई कडे देण्यात आले. मी व माझा हॉस्पिटल स्टाफ पेशंट व बाळ सुखरूप असल्याने खुश होतो. पेशंट व तिची आई झाल्या प्रकाराबद्दल क्षमस्व होती. बाळाला distress असताना सुद्धा योग्य वेळी निर्णय न दिल्याने काचेच्या पेटीत हलवावे लागले याबद्दल भावाला वाईट वाटत असेल असा आमचा समज होता.' माझ्या आई ची ऐपत नाही' म्हणत बिलातले बरेच पैसे आम्ही माफ केले. पेशंट सुखरूप discharge झाली. तिच्या सोबत आम्हाला झालेला मानसिक त्रास सुद्धा आम्ही विसरलो. मात्र पेशंट चा भाऊ व नवरा यांचा राग इतके दिवस धुमसत असेल याची कल्पना आम्हाला नव्हती. काल पाच महिन्यानंतर ते दोघे क्लेम संदर्भात भेटायचे म्हणून ओपीडी त आले. मात्र पुढील एक तास असंबंध आरोप करत धमकीवजा भाषेत वाद घालू लागले. बाळाने शी केल्याचे पुरावे मागत होते. तिचा नवरा मी तुम्हाला सोशल मीडिया वर बदनाम करणार व तत्सम नको त्या बऱ्याच गोष्टी माझी पोहोच वरपर्यंत आहे सांगत बरळत सुटला. आई व बाळ दोघे सुखरूप आहेत याचे धन्यवाद मानावे की विनाकारण डॉक्टर ना मानसिक त्रास द्यावा! ज्या भावाला बाळाच्या डॉक्टर ने meconium दाखवले होते. तो मजा घेत हसत बसला होता. या विक्षिप्त माणसाला ' बाळाने शी केल्याचे पुरावे तथा माझ्यासमोर विनाकारण घालत असलेला गोंधळ व धमकी याचे उत्तर मला ' कायदेशीर पद्धतीने ' सहज देता येणार आहे. भावाने त्या वेळी घातलेला दंगा पाहता त्याचे photos, recording ,paper notes cesarean veli ch व्यवस्थित मांडलेले आहेत. परंतु एकूण हा प्रकार पाहता, माझ्या सेवाभावी वृत्तीला नक्कीच प्रश्न पडणार ..झोप तहान भूक विसरून, मुल बाळ पाठी सारून, दिवस रात्र एक करून रुग्णांच्या सेवेसाठी आम्ही सतत झटत असतो. डॉक्टर वर इतका अविश्वास असेल आणि डोक्यात गैरसमज घट्ट रोवलेले असतील, तर रुग्णासाठी कितीही योग्य पद्धतीने उपचार सुरू असेल तरी असमाधानी वृत्तीचा अंधार कायम राहणार. शेवटी कावळा पांढराच असे जर यांचे न बदलणारे मत असेल तर अगदी धन्वंतरी देवता सुद्धा उपचारास अवतरली तरी तिला असे लोक अपमानित करतील... आपण समाजासाठी सेवाभावी काम करत आहोत याचा डॉक्टर झाल्यावर फार आनंद असायचा... पण आता समाजाचे हे असे चेहरे पाहून दुःख होते..
  • Log in or register to post comments

फारच भयानक अनुभव..

योगी९००
Sat, 05/08/2021 - 01:06 नवीन
फारच भयानक अनुभव.. असल्या लोकांचे नाव देऊन अनुभव छापायला हवेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लई भारी

धन्यवाद

गुल्लू दादा
Fri, 05/21/2021 - 07:16 नवीन
अनुभव शेयर केल्याबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लई भारी

पहिल्या किश्श्यात लिहिलेल्या

सुबोध खरे
गुरुवार, 05/20/2021 - 18:48 नवीन
पहिल्या किश्श्यात लिहिलेल्या सद्गृहस्थाना स्वतःला रक्तदाब असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र हवे होते. ( अर्थात त्यांना रक्तदाब आहेच आणि त्यावर त्यांचा नियमित उपचार चालूआहेच, त्यामुळे प्रमाणपत्र देण्यात असे काही चूक नाही) त्याबद्दल त्यांनी अगोदर व्हॉट्स ऍप वर संदेश टाकून ठेवला होता आणि आज येऊन जसं काही अगोदर झालंच नाही या थाटात गप्पा मारून प्रमाणपत्र घेऊन गेले. माझ्या सारखा माणूस असता तर अगोदर असे वागल्याबद्दल मला भयंकर लाज वाटली असती आणि वैद्यकीय प्रमाणपत्र मागताना संकोचही वाटलं असता. पण लोकांना काहीच वाटत नाही आणि ते निःसंग असतात याबद्दल आश्चर्य वाटले (आणि थोडी असूया हि वाटली).
  • Log in or register to post comments

मी

गुल्लू दादा
Fri, 05/21/2021 - 07:52 नवीन
मला लहानपणापासून समाजसेवा करायची म्हणून डॉ. व्हायचे असे वाटायचे. वैद्यकीय शिक्षण झाल्यानंतर सुद्धा मनोभावे सेवा करायची हाच विचार होता. जसे जसे अनुभव येत जातात तसा डॉ. सुद्धा स्वतःमध्ये बदल करत जातो. हजारो रुग्ण सेवा केली आणि एक रुग्ण जरी मूर्खा सारखं वागून गेला तरी तो मूर्ख च लक्षात राहतो कारण त्याचा आपल्याला त्रास झालेला असतो. अर्थात आपण ते विसरून समोर कामाला लागायला हवं पण ते इतकं सोप्प नव्हे. डॉ.सुद्धा माणूस आहे त्याला देवाचा दर्जा देऊन तो सगळ्यांना माफ करेल आणि मार सुद्धा खाऊ शकेल ही अपेक्षा चूक. चूक माफी, पैसे माफी आणि मार देण्यासाठी जर तुम्ही त्याला देव करणार असाल तर नको ते देवपण. माणूस म्हणून वागवा त्यातही तो सुख मानेल. काही लोक तर घरून ठरवून आलेले असतात आज तमाशा करायचा हॉस्पिटलमध्ये म्हणून. अश्यांना काय करावे. पोलिस सुद्धा रुग्णाची बाजू घेताना पाहिलंय. कायद्या विषयी तर न बोललेले बरे. कठोर शिक्षेची अंमलबजावणी नसल्याने कायदाच नाव काढलं की गुन्हेगार निःस्वास टाकतो. त्याला माहित आहे कायद्याचे पुजारी च वाचवणार. घरी गडगंज संपत्ती असताना सुद्धा फीस माफीची अपेक्षा, त्याला कशी सूट दिली मग मला का नाही ही भावना. गरीब कोण? गरजू कोण? गरीब आणि गरजू तर सगळे हावरट लोक असतात त्याचा संपत्तीशी संबंध नसून तो नियतीशी असतो असे माझे मत. रात्री बे रात्री मदत मागणे नंतर आम्हाला गरज असताना दूर पळणे. खूप वाईट अनुभव आहेत. अश्या वेळी मग मन समाजसेवा म्हंटल की हे अनुभव डोळ्यासमोर येतात. सरकारी रुग्णालयात चांगल्या डॉ.ची कमतरता हे याच लोकांमुळे आहे. मी कितीही कमी पैश्यात सरकारी हॉस्पिटल मध्ये काम करण्यास तयार होतो पण लोकांची अरेरावी, तमुक पक्षाचे कार्यकर्ते, नेते, नातेवाईक सर्वांचा त्रास होतो. मग दिली सरकारी नोकरी सोडून. आता परत त्या वाटेला जाणार नाही असे सध्या तरी ठरवलंय. बघू समोर कधी निर्णय बदलालच तर...बाकी खरे सर लेख छान आहे चांगले अनुभव असतील ते सुद्धा जरूर लिहा. बरेच चांगले अनुभव सुद्धा येतात. आपली वाईट वेळ आल्यास चांगले लोक सुद्धा वाईट अनुभव देऊन जातात हा वेगळा विषय. कोविड काळात मी लोकांना फ्री सेवा दिली. नातेवाईकांना सुद्धा स्वतः जाऊन मदत केली. हे करत असताना मी सुद्धा कधी तरी पॉसिटीव्ही येणार हे माहीत असताना सुद्धा केली. घरचे ओरडायचे तरी केली, कारण मला समाजसेवा करायची होती ना. जेव्हा मी पॉसिटीव्ही आलो तेव्हा मला माझ्या जवळच्या नातेवाईकांनी डब्बा सुद्धा देण्यास चक्क मनाई केली. दुसऱ्यांनी मदत केली तर ते 2 वेळचा डब्बा एकदाच करून ठेवत. रुग्ण असताना सकस आहार लागतो म्हणे. अखेर मी समाजसेवा सोडून तसाच घरी आलो. आता नीट झालोय. अजून काय बघावे लागणार मला. बघूया कुठवर तग धरते आपली सहनशक्ती ते....बऱ्याच गोष्टी आहेत पण लिहायचा कंटाळा येतो. आणि लिहायचं कोणासाठी हा पण प्रश्न नाही का?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा