नकार

सरिता बांदेकर's picture
सरिता बांदेकर in जनातलं, मनातलं
25 Mar 2021 - 6:11 pm

नकार
लेखिका सौ सरिता बांदेकर

“ए,शुक शुक,कुठे येतोयस?? चल जा इथून.”
“अगं,संडासाच्या दरवाज्यात ऊभं राहून कुणाला हाकलते आहेस????”

मला माझा नवरा विचारत होता.त्याच्याकडे दुर्लक्ष करून माझं आपलं घरात घूसू पाहणऱ्याला हूसकावून लावायचं काम चालू होतं.कितीही वेळा हाकललं,घरात घेण्यास नकार दिला तरी काही चेंगट घरात शिरण्याचा प्रयत्न करायचेच.माझा नकार ऐकला की त्यांना जोरात हसू यायचं.
“ काय यडपट आहे ही. हिनी नकार दिला म्हणून आम्ही घरात शिरायचे सोडणार आहे का??”
आम्ही तळमजल्यावर राहत होतो त्यामुळे काही जणांना वाटायचं की यांच्या घरात शिरणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे.
आता तुम्हाला कसं सांगू आमच्या घरावर हक्क दाखवणारे म्हणजे उंदीर, झुरळ आणि पाल.झुरळं येण्याचा रस्ता म्हणजे सिंकचा पाईप. यावर उपाय म्हणून मी त्यावर दगड ठेवायची, तो दगड काढला की कधी कधी झुरळ डोकवायचं पण मी ठामपणे त्याला नाही सांगायची.त्यामुळे तो प्रॅाब्लेम तेव्हढा गंभीर नव्हता. कधी स्प्रे मारला की ते पळून जायचे किंवा मेल्याचे सोंग करायचे.नंतर व्हॅक्यूम क्लीनर आल्यावर कळलं झुरळं घाबरतात याला.
पालीचं काय आहे खिडकी उघडी राहिली की घुसायची पटकन,तिने कधी होकार मिळण्याची वाट नाही बघितली. ती सर्रकन शिरायची आणि ट्यूबलाईटच्या मागे जाऊन लपायची. पण नंतर जशा खिडक्यांना जाळ्या लावल्या आणि दरवाजा पण जाळीचा लावला मग तो त्रास कमी झाला. म्हणजे कधीतरी एखादी पाल दरवाजा उघडायची वाट बघत असायची पण तिला तिकडून हूसकावून लावणे तेव्हढे कठीण काम नव्हते.
पण आता राहिले कोण तर उंदीर मामा यांचे काही विचारू नका.त्यांना कितीही नाही म्हटलं तरी ते घुसायचेच.नकार त्यांनी कधीच मान्य केला नाही. किंबहुना माणसाचा नकार हा सुद्धा आपल्यासाठी होकारच आहे हा त्यांचा ठाम विश्वास असावा.
आमच्याकडे तेव्हा भारतीय पद्धतीचा संडास होता.त्यातून ये जा करणे उंदरांना कदाचित सहज शक्य होत असावं.
तर त्यादिवशी काय झालं मी संडासचा दरवाजा उघडला आणि दचकलेच. एक उंदीर त्या संडासच्या भांड्यातून टुकूटुकू बघत होता.
मी पटकन दरवाजा बंद केला आणि काठी घेऊन त्याला हुसकत होते.तेव्हा तो चुपचाप परत गेला पण नंतर दुसऱ्या दिवशी मी जेव्हा ॲाफिसमधून आले आणि दरवाजा उघडत होते तेव्हा पटकन दरवाजातून आत शिरला. आता आली का पंचाईत. त्यावेळी मी एकटीच होते म्हणजे हूसकून लावणे तेव्हढे सोपे नव्हते.खिंड लढवून त्याला हुसकायला २/३ जण तरी पाहिजे होती. नंतर सगळे आल्यावर त्याला हूसकून बाहेर काढले. पण हा नकार त्याच्या जिव्हारी लागला होता.
तो उंदीर मामा कुठून ना कुठून घरात घुसयचाच.मग कधी कधी संकष्टी असायची मग सासरे म्हणायचे अगं आज राहूदे त्याला. आज संकष्टी आहे गणपतीच्या वाहनाला काही करायला नको.
शेवटी माझा पेशन्स संपला आणि मी उंदीर मारायच्या गोळ्या आणल्या. दरवाज्याच्या बाहेर ठेवलेल्या गोळ्या खालेल्या बघितल्या.
हां आता आपला त्रास संपला असं वाटलं.पण परत त्या रात्री तो संडासातून आत यायचा प्रयत्न करताना दिसला.
मग माझ्या सासऱ्यांनी पिंजरा आणला. पिंजऱ्यात पोळी ठेवली आणि दरवाजाच्या बाहेर ठेवला. त्यानी पोळी खाल्ली आणि आरामात पिंजऱ्यातून बाहेर पडून गेला.
मग कळलं की जर त्या विषारी गोळ्या खाल्या आणि त्याला पाणी मिळालं की त्या विषाचं प्रभाव कमी होतो. पिंजरा कितीही लहान असला तरी उंदीर आरामात बाहेर पडू शकतो कारण त्याची हाडं लवचिक असतात.
म्हणजे आता जवळ जवळ उंदरांवर पीएच डी मिळावी एव्हढी माहिती जमा झाली होती.पण उंदरांचा नायनाट कसा करावा हा प्रश्न आ वासून उभा होताच.मग सासऱ्यांना कुणी तरी सापळा दिला. परत प्रयोग करायचा म्हणून लावला बाहेर.
पण अरे देवा तो सापळ्याचा परिणाम एव्हढा भयानक झाला की मी त्यांना सांगितलं की परत हे करायला नको.
त्या सापळ्यामुळे त्या उंदराचा खून झाला होता , सगळीकडे रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या आणि ते साफ करताना माझा जीव गेला होता.
काही दिवस चांगले गेले. आणि एक दिवस मुलीचा अभ्यास घेताना काहीतरी गेल्यासारखे वाटले. असं २/३ वेळा झालं पण काही कळलं नाही.तिला पण भास होत होता आणि ..........दिसला............
एक पिटुकला उंदीर होता तो.अंगठ्या एव्हढाच असेल जेमतेम आणि वेगाने इकडून तिकडे बागडत होता.
आता आली का पंचाईत. यांना नाही म्हटलेले कळत नाही का??कितीही उपाय केले पण तरी हे उंदीर कुठून तरी घूसतातच.
आता मी ठरवले की एक्सपर्ट ॲडव्हाईसची गरज आहे. म्हणजे स्पेशालिस्ट पाहिजे.मग इकडे तिकडे चौकशी केल्यावर लक्षात आलं की गिरगावात चाळीत उंदरांचा त्रास खूप असतो.तिकडच्या लोकांना उंदीर पकडण्याचे किंवा मारण्याचे अनेक प्रकार माहित असतात.मुंबई महानगरपालिकावाले उंदीर पकडून दिला तर पैसे पण देतात.त्यामुळे पुष्कळ उपाय कळले.
मग ॲाफिसमधल्या एकांना विचारले की काय करावं. ते गिरगावातले होते.
मग त्यांच्या प्रश्नांची सरबत्ती सूरू झाली.
“केव्हढा मोठा आहे ?काही खाल्लं का त्याने घरातलं का वायरी कुरतडल्या?”
मी म्हटलं” त्याने काय फरक पडतो? “
तर म्हणे खूप फरक पडतो. जर छोटा उंदीर असेल तर तो नुसताच बागडतो.मोठे उंदीर एखादी गोष्ट खाल्ली की दुसऱ्या दिवशी परत तेच खातात दुसऱ्या कशात तोंड घालत नाहीत.
ही माहिती पण उपयुक्त होती. म्हणजे उंदीर घरात आला की त्याचे वागणे कसे आहे ते बघायचे.मग नंतर त्याप्रमाणे उपाय करायचा.
मग मी म्हटलं छोटाच आहे मामा.
त्यांनी बरं म्हटलं आणि म्हणाले,
“उद्या देतो आणून औषध .”
दुसऱ्या दिवशी त्यांनी एक पुठ्ठा आणून दिला त्यावर काहीतरी चिकट पदार्थ लावला होता.तो चिकट पदार्थ एव्हढा चिकट होता की त्यावर काही चिकटलं तर निघणं मुश्कीलच.त्याला चिकटा असे म्हणायचे.आता तो पुठ्ठा त्यांनी गिरगांव ते फोर्ट आणला होता ,आता तो पुठ्ठा मला घेऊन ठाण्याला जायचं होतं.
मी तो पुठ्ठा नेला घरी आणि त्या उंदराच्या मार्गावर ठेवला. बरोबर मध्यभागी पोळीचा तुकडा ठेवला. तो उंदीर आला त्याने तो पुठ्ठा बघितला आणि त्याच्या भोवती ३/४ फेऱ्या मारल्या.पण खायचे काही नांव नाही. कदाचित त्याच्या लक्षात आले असेल की हा सापळा आहे.
दुसऱ्या दिवशी कुणीतरी सांगितल्याप्रमाणे कांदा भजी ठेवली पण ती पण मामांना काही खावीशी वाटली नाही.
मुलगी म्हणाली ,”आई मी तुला सांगितलेच होते तुला कांदा भजी नीट जमत नाहीत आपण त्या श्रद्धा वडेवाल्याकडून आणूया. पण तुला पटलं नाही.बघ आता त्याने प्रदक्षिणा घालून पलायन केलंय.”
झालं ...उंदराच्या निमित्ताने माझ्या पाककौशल्याचा उद्धार झाला होता.
तिसऱ्या दिवशी मात्र मी एक आयडिया केली आणि पोळीच्या तुकड्याला मस्त पैकी साजूक तुपात भिजवलं आणि ठेवली.
आता मात्र तुपाच्या वासानी त्याला रहावलं नाही आणि त्यांनी तूरूतूरू धावत पोळीचा तुकडा गाठला आणि .........
माझा जीव भांड्यात पडला.उंदीरमामा अडकले.......
पण आता मुख्य प्रश्न की त्यांना तिकडून काढणार कसे?नवरा घरी नाही,सासरे झोपलेले. आता सकाळपर्यंत वाट बघायला पाहिजे.
सकाळ झाली सासऱ्यांनी बघितलं उंदीरमामा अडकले आहेत पण रात्रभर बाहेर पडण्याचा त्यांनी चांगलाच प्रयत्न केला होता. त्यामुळे सगळे केस सर्व पुठ्ठाभर चिकटले होते. आणि त्यांना खेचून काढता पण येत नव्हतं.मग त्यांनी तो पुठ्ठाच फेकून दिला.
रात्री मुलीचा अभ्यास घेत असताना परत तोच सावलीचा भास झाला. मुलगी म्हणाली ‘आई,उंदीरमामांचं भूत आलंय बहुतेक. राम,राम, राम म्हण.काल आपण त्या उंदराला मारायला नको होतं.आता हे उंदराचं भूत आपल्या मानेवर बसणार”
आता काय करावं कळत नव्हतं. आज पण उंदराच्या भीतीने जागत बसावं लागणार.
दुसऱ्या दिवशी ॲाफिसला गेल्यावर त्या गिरगांवकरांना सांगायचं मग ते पुठ्ठा आणणार.
तोपर्यंत उंदीरक्रिडा बघत बसणे.आणि परत ते ट्रेनमधून पुठ्ठा आणण्याचा कठीण काम होतंच.
पुठ्ठा आणला आणि यावेळी परत पोळीचा तुकडा साजूक तुपात मस्तपैकी भिजवून ठेवला.आणि परत मामा फसलेच. मला वाटतं त्यांना तूप खूपच आवडत असावे.त्यामुळेच मामा फसले.
पण गोष्ट एव्हढ्यात संपणार नव्हतीच.हा सिलसिला जवळ जवळ ५ दिवस चालला. म्हणजे??????
अहो म्हणजे असे आम्ही ७ उंदीरमामा त्या पुठ्यामुळे पकडले.आमचे गिरगांवकर एक्सपर्ट म्हणाले की तुमच्या घरांत उंदीरीणीने पिल्लं घातली असणार.
पण माझं आणि माझ्या मुलीचे ठाम मत आहे की ते उंदीर मामांचे भूतच असणार किंवा तो पहिला उंदीर होता ना त्याचे सवंगडी त्याला शोधत आले असणार.
मग मात्र आम्ही दरवाजाला एक फळी लावून घेतली. म्हणजे लहान मुलं असतात त्या घरांत लावतात ना तशी .
मग मात्र उंदीर मामांना पण कळलं आम्ही जेव्हा नाही यायचं म्हणतो त्याचा अर्थ पक्का नाही असाच असतो. आणि या नकाराचा कधी होकार होणार नाही.
त्यामुळे आता मी आपल्या घरांत आगंतुकपणे शिरणाऱ्या या सर्वांना नकार कसा द्यायचा हे शिकवायचे क्लासेस काढले आहेत. आणि ते तुफान चालतात.कधी कधी लोकांना बॅच फूल्ल म्हणून पण सांगावं लागतं.
तर मंडळी तुम्हाला जर आमच्या या कोचिंग क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचे असेल तर त्वरा करा आणि निर्धास्त व्हा.

सौ सरिता सुभाष बांदेकर

कथा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

25 Mar 2021 - 8:07 pm | मुक्त विहारि

छान लिहिले आहे...

सरिता बांदेकर's picture

25 Mar 2021 - 9:45 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद

सरिता बांदेकर's picture

25 Mar 2021 - 9:45 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद

सौंदाळा's picture

25 Mar 2021 - 8:16 pm | सौंदाळा

मजेशीर
पण तेव्हा खुपच तापदायक झाले असेल

सरिता बांदेकर's picture

25 Mar 2021 - 9:47 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद,
होय मिस्टरांना शिफ्ट असली आणि सासरे झोपल्यावर दिसला तर मग रात्रभर बसून काढायचो दोघी जणी

गणेशा's picture

25 Mar 2021 - 10:01 pm | गणेशा

छान लिहिले आहे

सरिता बांदेकर's picture

27 Mar 2021 - 10:34 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद

सरिता बांदेकर's picture

27 Mar 2021 - 10:34 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद

सौन्दर्य's picture

25 Mar 2021 - 10:59 pm | सौन्दर्य

उंदराला 'मामा' म्हणा की 'इटुकला, पिटुकला' म्हणा, किंवा अगदी गणपतीचे वाहन म्हणून त्याला मान द्या, हा अतिशय उपद्रवी जीव आहे. एकदा घरात शिरकाव झाला की बाहेर पडायचे नावच घेत नाही. जर नार आणि मादी असले की मग आपले हाल कुत्राही खाणार नाही. त्यांची वीण इतकी असते की वेळीच त्यांचा नायनाट नाही केला तर घरभर उंदीर फिरताना दिसतील. त्यांच्या अंगावरच्या पिसवा अनेक रोगराईंना निमंत्रण देतात. विष खाऊन एखादा उंदीर मेलाच तर तो अश्या जागी जाऊन मरतो की त्याची कुजण्याची प्रक्रिया सुरु झाल्यावरच कळतं आणि मग त्याला शोधणे हा आणखी एक व्याप होऊन बसतो.

त्यांची हाडं लवचिक असतात ह्याचा आम्हाला प्रत्यय अतिशय वाईट प्रकारे आला. आमच्या घरी दोन लव्हबर्ड्सच्या जोड्या आम्ही पिंजऱ्यात पाळल्या होत्या. पिंजरा वर खिडकीला टांगून ठेवला होता. एकदा मध्यरात्री अचानक लव्हबर्ड्सच्या फडफडण्याच्या आवाज झाला म्हणून दिवा लावला आणि बघतो तो काय, एक बऱ्यापैकी गलेलठ्ठ उंदीर पिंजऱ्यात शिरला होता, त्याने दोन लव्हबर्ड्सचा फन्ना उडवला होता व उरलेल्या दोघांच्या मागे पळत होता. ते दोघेही बऱ्यापैकी जखमी झाले होते. मी ते लव्ह बर्ड्स बाहेर काढून पिंजरा त्या उंदराकट पाण्यात बुडवला होता. उरलेले दोन्ही लव्हबर्ड्स देखील गेले.

उंदरांमुळे होणारे अन्न धान्याचे वार्षिक आकडे पाहिले तर डोळेच पांढरे होतील. शेतकऱ्यांचा हा एक नंबरचा शत्रू आहे.

सरिता बांदेकर's picture

27 Mar 2021 - 10:33 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद
खरंच खूप भीतीदायक असतात मामा.
गावाकडे झोपलेल्या लोकांचे पाय कुरतडतात आणि शहरात वायरी कुरतडतात.

रंगीला रतन's picture

26 Mar 2021 - 12:43 am | रंगीला रतन

मी पेटा चा कार्यकर्ता आहे. आता तुमची तक्रार करतो :)

सौन्दर्य's picture

26 Mar 2021 - 11:25 pm | सौन्दर्य

थरथर कापणाऱ्याची इमोजी लावता आली नाही म्हणून लिहून कळवतोय. अहो, आपल्या पोटात अन्न गेलं पाहिजे म्हणून वरील उपाय केला, पेटाला कळवलत तर पोटाला काही राहू देणार नाहीत हे उंदीर.

सरिता बांदेकर's picture

27 Mar 2021 - 10:33 pm | सरिता बांदेकर

पेटावाल्यांना सलाम

धिटुकला उंदीर..छान लिहिलंय
थोडं माझं उंदीर पुराण..
महाविद्यालयात मला एक प्रयोग होता, ज्यासाठी आमच्या महाविद्यालयात पांढरे गोंडस उंदीर आणले होते, आम्ही त्यांना दिवसभर काही ना काही खायला द्यायचो.खेळायचो.मग एकदा दुपारी सरांनी उंदराला प्रयोगासाठी बाहेर काढलं,त्याची शेपटी धरून गर गरर त्याला फिरवलं आणि कटकन शेपटी ओढली ,त्याचा मणका मोडला...कट आवाज आला...टचकन डोळ्यात पाणी आलं..पुढचं काहीच समजलं नाही,तो प्रयोग लक्षात राहिला नाही,खरं तर आमच्या सारख्या हळव्या लोकांचं हे कामच नाही..पण हा उंदीर एक animal model म्हणून संशोधनात वापरला जातो, त्यानिमित्ताने त्याचे मानवजातीवर खुप खुप उपकार आहेत.

सरिता बांदेकर's picture

27 Mar 2021 - 10:31 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद,
पण ते प्रयोगाचे उंदीर पांढरे असतात.मी एका फार्मास्युटीकल कंपनीच्या लॅबमध्ये बघितले होते.
आणि हे काळे उंदीर असतात त्यांना सतत काहीतरी कुरतडत बसायची सवय असते.
गावाला झोपलेल्या लोकांचे पाय कुरतडलेले बघितले आहेत.
आणि शहरात गाड्यांचे किंवा इलेक्ट्रीकल वायरींग कुरतडत बसतात. म्हणून हल्ली गाड्या पेटतात.
त्यामुळे पेटावाल्यांची श्कमा मागून सांगते ते आपले शत्रूच आहेत.

बापूसाहेब's picture

27 Mar 2021 - 11:10 pm | बापूसाहेब

त्यामुळे पेटावाल्यांची श्कमा मागून सांगते ते आपले शत्रूच आहेत.

त्यात क्षमा काय मागायची.. त्यांना इतकीच उंदरांची काळजी असेल तर स्वतःच्या घरी घेऊन जाऊन पाळा म्हणावं..!! घ्या मुके हवे तेवढे.. करा लाडेलाडे त्यांचे..

माझ्या घरी असे घाणेरडे पाहुणे आले तर ठोकणार त्यांना. मग तो उंदीर असो वा भटका कुत्रा..

पेटा ही अत्यंत बायस्ड संस्था आहे असं माझं वयक्तिक मत.. काही पेटा कार्यकर्ते तर डोक्याचा भुगा करतात..!!

पेटा कार्यकर्त्यांना सल्ला.. xxx दम असेल तर आपले दुकान चीनमध्ये एकदा चालवून दाखवावे..

सरिता बांदेकर's picture

28 Mar 2021 - 10:46 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद,
मला वाटतं त्यांनी जोक म्हणून म्हटलंय मी पेटावाला आहे,
म्हणून मी श्कमा मागितली.

अभिजीत अवलिया's picture

27 Mar 2021 - 6:23 am | अभिजीत अवलिया

एक आठवड्यापासून कार मधे पाल शिरली आहे. कशी बाहेर काढावी हे माहीत असल्यास सांगावे. गाडीत नसलो की हळूच काचेतून डोकावते. एक दिवस ड्रायव्हिंग करत असताना अंगावर उडी मारेल अशी भिती वाटत राहतेय.

मुक्त विहारि's picture

27 Mar 2021 - 9:31 am | मुक्त विहारि

मांजर पालीला मारते...

किंवा मग, डास आणि झुरळ मारण्याचा स्प्रे फवारा...

सरिता बांदेकर's picture

27 Mar 2021 - 10:24 pm | सरिता बांदेकर

पालीसाठी हर्बल स्प्रे मिळतो.

सरिता बांदेकर's picture

27 Mar 2021 - 10:23 pm | सरिता बांदेकर

आमच्या ठाण्यात पाल घालवायचा एक स्प्रे मिळतो. त्याचा परिणाम बरेच दिवस राहतो. पण मग गाडीच्या काचा उघड्या ठेवाव्या लागतील.
किंवा आम्ही व्हॅक्यूम क्लीनरमध्ये पकडतो मग तिला सोडून देता येतं. पालिला मारायला गेलं तर ती शेपूट सोडते आणि लपून बसते.
त्यामुळे व्हॅक्यूम क्लीनर सगळ्यात बेस्ट.

सरिता बांदेकर's picture

27 Mar 2021 - 10:23 pm | सरिता बांदेकर

आमच्या ठाण्यात पाल घालवायचा एक स्प्रे मिळतो. त्याचा परिणाम बरेच दिवस राहतो. पण मग गाडीच्या काचा उघड्या ठेवाव्या लागतील.
किंवा आम्ही व्हॅक्यूम क्लीनरमध्ये पकडतो मग तिला सोडून देता येतं. पालिला मारायला गेलं तर ती शेपूट सोडते आणि लपून बसते.
त्यामुळे व्हॅक्यूम क्लीनर सगळ्यात बेस्ट.

आम्ही बारावीत असताना काळ्या उंदराचे dissection करायला मिळायचे, त्यात फार भयानक मजा यायची मला. शरीरातील आतील अवयव, वेगवेगळ्या रंगाचे इतके सुबक रीतीने एकत्र बसवलेले असतात, ते पहातानाच आश्चर्य वाटायचे. Practical परीक्षेत कवटी फोडून आतील मेंदू अलगद बाहेर काढण्याचे काम आले होते मला. त्यात फक्त आकृतीत पाहिलेले भाग प्रत्यक्ष पाहायला मिळाले.

नंतर ६ महिने अमेरिकेला गेल्याने घर बंद होते, तेंव्हा उंदराचा भयानक उपद्रव झाला. शेवटी जाळ्या लावून, दगड ठेवून, फळ्या लावून सगळे रस्ते बंद केले आहेत, त्यामुळे आमचा 'नकार' त्यांना चांगलाच कळेल अशी आशा आहे!

सरिता बांदेकर's picture

29 Mar 2021 - 5:04 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद
नक्कीच कळला असेल.आमचा नकार कळलाय मामांना.