पिशाच्च वाॅक..
ही सत्य घटना आहे. विश्वास ठेवा अगर ठेवू नका असं म्हणत नाही. विश्वास ठेवाच.
त्यावेळी मी एका निमशहरात नोकरी करत होते. त्यावेळी मी आणि माझी एक मैत्रीण रोज पहाटे चांगलं चार, पाच किलोमीटर फिरुन यायचो. व्यायाम म्हणून. पहाटे पाच वाजता जायचो आणि सव्वासहा साडेसहा वाजता परत यायचो. दोघींची वयं पस्तिशीची. घरात नवरा, मुलं.
एकदा अशीच मी रात्री झोपले. गाढ झोप लागली. नेहमीप्रमाणे अलार्मशिवाय जाग आली. सवयच पडलेली. बाथरुमला जाऊन आले. एक चुकार कावळा ओरडत होता. परत जरा लोळावं वाटलं, पण निग्रहाने मोह टाळला. म्हटलं, उगीच थोडक्या आळसापायी फिरण्याचा नेम मोडायला नको. पटकन उठून फिरुन येऊया. उठले. दात घासले. केस नीट केले. नॅपकिन घेतला. पाण्याची छोटी बाटली भरून घेतली. पायांत चपला सरकवल्या. अजिबात आवाज न करता दार हलकेच उघडून बाहेर पडले. दार पुन्हा लावलं. मैत्रीण शेजारच्या कंपाऊंडमध्ये राहात होती. तिच्या दारावर टकटक केलं. ती झोपेतून उठली. मला बघून म्हणाली,"आलेच दात घासून."ती तीन, चार मिनिटात बाहेर आली. म्हणाली,"अगबाई, एवढ्यात पाच वाजले?कळलंच नाही."
"चल पटकन", मी म्हणाले.
मग आम्ही दोघीही बाहेर पडलो. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. कुठंही,कसलेही आवाज येत नव्हते. माझं ऑफिस वाटेत लागलं. तिथंही सामसूम होती. दूरवर वाॅचमन हातात काठी घेऊन पाठमोरा दिसला, किंवा तसा भास झाला.
आम्ही झपाझप पावलं टाकत पुढं चालायला लागलो. चालताना आम्ही एकमेकींशी शक्यतो बोलायचो नाही. त्यामुळे चूपचाप चालत होतो. सगळीकडे अंधार होता आणि चिडीचूप शांतता पसरली होती. मग डावीकडे वळलो. रस्त्याला उतार लागला. उतारावरून आमची पावलं आणखी वेगानं पडायला लागली. वाटेत मेंटल हॉस्पिटल लागलं. तिथं आत कुणी पेशंट भेसूर ओरडत, रडत होता. तिथल्या गेटला भलं मोठ्ठं कुलूप लटकत होतं. आत आवारात गूढ अंधार पसरला होता. तुरळक दिवे अंधाराला अधिकच भीषण बनवत होते.
मग आणखी थोडं पुढे गेलो. पाय थोडे जास्तच दुखत होते. पण म्हटलं, नेहमीच्या टप्प्यापर्यंत जायचंच. एस टी स्टॅंडवर गेलो. तिथं सगळा अंधार होता. एका एसटीतले दिवे मंद जळत होते. ड्रायव्हर, कंडक्टर कुणीच दिसत नव्हतं. स्टॅंडवरुन आम्ही परत फिरलो. दोघींनी नॅपकिनने घाम पुसला. थोडं पाणी प्यायलो. तिथल्या रस्त्याकडेच्या आमच्या नेहमीच्या बाकावर पाच मिनिटे बसलो. अजून माणसांची वर्दळ सुरू झाली नव्हती. इतक्यात एक सायकलवाला आमच्या समोरुन गेला. पण जाताना घाबरलेल्या चेहऱ्याने घाम पुसत पुसत गेला. खरं तर थंडीचे दिवस होते. त्याला काय आम्ही हडळी वाटलो की काय! आमच्या अंगावर पांढऱ्या साड्या, मोकळे केस, कुंकवाचा मळवट असा हडळीचा खास ड्रेसकोड ही नव्हता. का घाबरला आणि चमत्कारिक नजरेनं पाहात होता कुणास ठाऊक!
बाकावरुन उठून परत घरी जायला निघालो. वाटेत पुन्हा एकदा मेंटल हॉस्पिटल लागले. अजूनही तिथे अंधार होता. त्याच्यासमोरचा चढ चढताना रोज येतात तसे पायांत गोळे आले. म्हटलं,येऊ देत. त्याशिवाय पिंढऱ्यांना व्यायाम कसा होणार?
तो चढ चढताना रोजच्यासारखा श्वास फुलला. फुप्फुसं भरुन प्राणवायू आणि हो.. ओझोन सुद्धा आत घेतला. एकमेकींकडे बघत ,समाधानानं हसत तो चढ चढलो. पुन्हा ऑफिसजवळ आलो. तिथं अजूनही सामसूम होती. गेटला कुलूप होतं. वाॅचमन आता दिसत नव्हता. ऑफिसात गेल्यावर त्याला जाब विचारु असं ठरवलं. मग डावीकडे वळलो आणि घरी परत आलो. ती तिच्या घरी गेली. मी माझ्या. त्यावेळी लॅचच्या कुलुपांची पद्धत नव्हती. गाव सेफ होतं. त्यामुळे दार नुसतं पुढं करुनच आम्ही फिरायला जात असू. मी आत घरात गेले. चपला काढल्या. वाॅक करताना घालायचे स्पेशल बूट असली फॅडं तेव्हा नव्हती.
जरा वेळ बसले. मग म्हटलं,भाजी चिरायला घेऊया का? तिघांचे डबे व्हायचेत. पण आज एकदम जास्तच थकवा जाणवत होता. किती वाजले असतील? मी कपाटावरच्या घड्याळात पाहिलं तर पहाटेचे दोन वाजले होते. ओँ??!
ओ माय गाॅड! म्हणजे मी रात्री एक वाजताच उठून फिरायला बाहेर पडले होते. नेहमीप्रमाणे उठलो समजून घड्याळात न बघताच! मैत्रीणीला सव्वा वाजताच उठवलं. तीही नेहमीप्रमाणे घड्याळात न बघता सवयीने चुपचाप उठून आली. आम्ही तीनेक किलोमीटर माॅर्निंग वाॅक केला आणि पहाटे दोन वाजता परत आलो. रात्री दीड पावणेदोनला स्टॅंडजवळ बाकावर बसलो. तरीच तो सायकलवाला आमच्याकडं असा बघत होता. ऑफिसच्या आणि मेंटल हॉस्पिटलच्या आवारातील अंधार आणि मंद दिव्यांबद्दल आश्चर्य करत होतो. थंडीचे दिवस असल्याने पहाटे पाच वाजताचा अंधार आणि मध्यरात्रीचा अंधार यात फरकच वाटला नव्हता. अंगावर काटा उभा राहिला. हे कसलं माॅर्निंग वाॅक? हे तर पिशाच्च वाॅक! उठवल्यानंतर हे मी नवऱ्याला सांगितलं. माझ्या डोक्यात टपली मारत तो म्हणाला,"यडपट आहेस!"
आणि ते वाक्य नेहमीप्रमाणे रिटर्न न करता मी निमूटपणे ऐकून घेतलं.
मात्र यानंतर ताबडतोब आमच्या घरात दर्शनी भिंतीवर पहिल्यांदाच एक मोठ्ठं वॉल क्लॉक आलं..!!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अरे बापरे!
आजीबाई,
"यडपट आहेस!"
कथा मस्त आवडली
भुताटकीवर विश्वास बसला.
.
.
किती
हाहाहा.. . मजेशीर किस्सा..
भारी किस्सा आहे
पिशाच्च वॉकचा किस्सा आवडला...
ख्याक
ओझोन?
ओझोन पहाटे जमिनीलगत जास्त
ओझोन
नाही नाही. तशी "समजूत" अनेक
https://www.epa.gov/indoor
मला वाटते, आजी चढ चढत होत्या.
मस्त...
किस्सा आवडला.
ही खरेतर आपल्या कडील
मस्तच .. आवडला वॉक
भारी किस्सा!!
:D
100% विश्वास बसला
100% विश्वास बसला
सर्वानी ..
बघितली आत्ता. चांगली आहे :
हाहा
तुषार काळभोर- तुमचा अभिप्राय