आरण्यक :

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
21 Feb 2021 - 7:00 pm

आरण्यक

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

मित्र आणि मैत्रिणींनो,

आज एक नवीन पुस्तक घेऊन येत आहे. या पुस्तकाचा मी अनुवाद करणार आहे हे मी पूर्वीच सांगितले होते. त्याप्रमाणे हे पुस्तक आपल्यापुढे सादर करण्यास मला आनंद होतोय. माझ्या आवडत्या पुस्तकापैकी हे एक पुस्तक.
ज्यांना हे घेण्यात रस असेल त्यांनी कृपया मला मेसेज करावा.

खाली त्यातील प्रस्तावना देत आहे...

आरण्यक
कार्यालयात दिवसभर मान मोडून काम केल्यावर मी संध्याकाळी किल्ल्याच्या मैदानात जरा आरामात बसलो होतो.

शेजारीच एक बदामाचे झाड होते. माझी नजर त्या झाडापलिकडे असलेल्या अोक्याबोक्या जमिनीकडे गेली. पाण्यावर उठलेल्या लहरींप्रमाणे खालीवर असलेले ते मैदान पाहताना मला क्षणभर असे वाटले की मी लवटोलियातील सरस्वतीकुंडाच्या काठी बसलोय. माझे मन त्यात गुंगून गेले पण तेवढ्यात पलाशी गेटच्या रस्त्यावर एका मोटारीचा भोंगा वाजला आणि मी भानावर आलो.
फार पूर्वीची गोष्ट आहे, पण असे वाटतंय की काल परवाच घडलीय. कलकत्यातील या गोंधळात मला लवटोलिया बैहर किंवा आजमाबादचा प्रदेश आठवतो.

- ती निर्बीड जंगले, आकाशातील चमचम करणाऱ्या चांदण्या, झगझगीत चंद्रप्रकाश, स्तब्ध काळ्याकुट्ट अंधाराच्या रात्री, कसाळ आणि झाऊची जंगले, त्यातून येणारा वाऱ्याचा घूंऽऽ घूंऽ आवाज, क्षितिजावर अंधुक होत जाणाऱ्या पर्वतराशी, गहिऱ्या रात्री दौडणाऱ्या नीलगायींच्या टापांचे तालबद्ध आवाज, तप्त दुपारच्या उन्हात सरस्वतीकुंडाच्या काठावर, तृषेने व्याकूळ झालेल्या जंगली गव्याच्या झुंडी, त्या अनोख्या खडकाळ जमिनीवर दगडांच्या आडून उगवलेली झुडुपे व त्यावर उमललेली रानटी पण अतिसुंदर रंगीगबेरंगी फुले, फुललेल्या पळसाची रक्तवर्णी जंगले हे सगळे आठवले की असे वाटते की एखाद्या सुट्टीच्या दिवशी डुलकी काढताना मी सौंदर्याने भारलेल्या या जगाचे स्वप्न पाहात आहे की काय! असे जग आता या पृथ्वीतलावर असेल की नाही याची शंकाच आहे. मला वाटते नसेलच.

आणि तेथे नुसती वने, जंगले आणि निसर्गच होता असे नाही तर तेथे मी कितीतरी
प्रकारची माणसे पाहिली.

कुंता...मुसम्मात कुंता, मला ती अजूनही आठवते. ती बिचारी आजही जंगलात तिच्या मुलांबरोबर सुंगठिया बैहरच्या जंगलात करवंदे वेचण्यास जात असेल. तिच्या चेहऱ्यावरची उद्याची काळजी आजही मला स्पष्ट दिसते आहे. गारठलेली चांदणी रात्र आहे, माझ्या कचेरीतल्या विहिरीजवळ माझे उरलेले अन्न तिच्या बाळांसाठी घेण्यासाठी ती उभी आहे. तेही मला आठवते.

धतुरियाची आठवण येते... बाल नर्तक, नटुआ धतुरिया...
दक्षिणेला धर्मापुरी जिल्ह्यात दुष्काळ पडला होता. नाचून आणि गाणी म्हणून पोट भरण्यासाठी धतुरिया लवटोलियाला आला होता. या भागात मनुष्यवस्ती विरळ आहे, पण त्याला गूळ आणि चीनाचे दाणे मिळाले की त्याच्या चेहऱ्यावर कसे निर्मळ हसू उमटायचे! कुरळे केस, मोठे मोठे डोळे, थोडासा बायकी चालणारा हा मुलगा बारा तेरा वर्षांचा असेल. त्याला आर्इबाप नव्हते, खरंतर त्याला या जगात कोणीच नव्हते. या लहान वयात त्याची जबाबदारी त्याच्यावरच पडली होती. काळाच्या या ओघात तो कुठे वाहून गेला कोणास ठाऊक..

मला सावकार धौताल साहू आठवतो. हा साधासुधा, प्रेमळ सावकार माझ्या पानाने शाकारलेल्या बंगल्याच्या एका कोपऱ्यात अडकित्त्याने सुपारी कातरत बसलेला असे.

घनदाट रानात आपल्या झोपडीपाशी पांडे पंडतने आपल्या तीन म्हशीं चरायला सोडल्या असतील आणि त्यांच्याकडे पाहात तो भजन गुणगुणत असेल ‘‘दया होई जी...’’

महालिखारुप पर्वतरांगाच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलात वसंतऋतूने आगमन केले आहे आणि सारा प्रदेश गलगलीच्या पिवळ्या फुलांनी पिवळाधमक झालाय. दुपारी उठलेल्या वाळूच्या वादळाने तांब्याच्या रंगाचे क्षितिज धुळीने झाकाळून टाकले आहे तर रात्री गडद अंधारात महालिखारुपच्या पर्वतात शिखरांनी गळ्यात वणव्याच्या माळा घातल्या आहेत... कोणीतरी जमीन साफ करण्यासाठी साजऱ्याच्या जंगलात आग लावलेली दिसते. या मुक्कामात कितीतरी दारिद्य्रात खितपत पडलेल्या मुलांची, मुलींची ओळख झाली. त्यांचे आयुष्य मला जवळून पाहण्यास मिळाले. निर्दयी सावकार, गाणारे, नाचणारे, लाकुडतोडे, भिकारी यांच्याशी ओळखी झाल्या... माझ्या घराच्या पडवीत बसून कित्येक रात्री मी शिकाऱ्यांनी सांगितलेल्या अद्भूत आणि चित्रविचित्र कथा ऐकल्या... ते कसे रात्री मोहनपुराच्या राखीव जंगलात जंगली रेड्याच्या शिकारीला गेले आणि लावलेल्या सापळ्याजवळ त्यांना कसा एक विराट महिषासूर दिसला... महिषांचा देव!

याच लोकांबद्दल मला तुम्हाला सांगायचे आहे. आपल्या जगात अशा अनेक वाटा आहेत ज्यावर तथाकथित सुसंस्कृत माणसे क्वचितच पोहोचली असतील. या खडकाळ वाटांवर न जाणो किती अद्भूत जीवनधारा टिमकी न बडवता वाहात गेल्या असतील..ही माणसे आणि त्यांचे आयुष्य मी विसरू शकत नाही.
या आठवणी तशा क्लेषकारक आहेत; त्या दुःखाने ओतप्रोत भरल्या आहेत.

दुर्दैवाने या निसर्गांगणाच्या विनाशाला माझाही हातभार लागला आहे. त्यासाठी मला निसर्गदेवता क्षमा करणार नाही याची मला जाणीव आहे, पण म्हणतात ना, अपराधाची कबुली दिल्यावर त्याची बोच जराशी कमी होते.
...म्हणून हे पुस्तक जन्माला आले आहे...

मूळ लेखक : विभुतीषण बंदोपाध्याय
अनुवाद : जयंत कुलकर्णी.

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

21 Feb 2021 - 7:43 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

हे तुमचे कितवे पुस्तक?

जयंत कुलकर्णी's picture

21 Feb 2021 - 7:56 pm | जयंत कुलकर्णी

सोळावे...

तुषार काळभोर's picture

22 Feb 2021 - 2:51 pm | तुषार काळभोर

सादर प्रणाम!

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Feb 2021 - 8:27 am | ज्ञानोबाचे पैजार

मस्त बातमी आहे
अभिनंदन काका
पैजारबुवा,

प्रचेतस's picture

22 Feb 2021 - 9:13 am | प्रचेतस

मस्त.
अभिनंदन

माझ्याकडे ह्या पुस्तकाची मराठी अनुवादीत एक खूप जुनी प्रत आहे.निदान दहावेळा तरी ह्या पुस्तकाचे पारायण झाले असेल..खूप सुंदर पुस्तक आहे..अभिनंदन काका

मस्त वर्णन
शुभेच्छा!