पतंग....!!

Jayagandha Bhatkhande's picture
Jayagandha Bhat... in जनातलं, मनातलं
29 Jan 2021 - 10:40 pm

पतंग...!!

नऊ वाजले तसं भिकूशेठनं दुकान उघडलं. त्या छोट्याशा जागेत, एकदम प्रकाश पसरला. अरेच्च्या, सकाळ झाली वाटतं.. पण आळोखेपिळोखे द्यायची इथे सोयच नाही. खालच्या वरच्यांच्या हातापायांचे धक्के खात नुसतं दाटीवाटीनं महिनोन् महिने बसून रहायचं.... काय हे आपलं जीवन...!! तेवढ्यात कोणातरी
गि-हाइकाची चाहूल लागली. "शेठ पतंग आहे का हो तुमच्याकडे...?" माझे कान टवकारले. मनात गुदगुल्या झाल्या. चला जागा तरी बदलेल आज माझी... भिकूशेठ रॅकपाशी आले आणि पतंगाचा गठ्ठा टेबलावर गेला. थोडं पाहून झाल्यावर मुलाचे बाबा म्हणाले, "गोलू, तुला कोणता पतंग आवडला..?" अं..अं.. बाबा, मला लाल पतंग हवाय.. "लाल"....?? हो..इति गोलू. मला तर आनंदाच्या उकळ्या फुटल्या.. तो तर मीच आहे..!!
मला बघून लहानग्या गोलूचे डोळे लकाकले. तो खुदकन हसला. आसारी, मांजा, इत्यादी इतर खरेदी झाल्यावर, अस्मादिक गोलू बरोबर निघाले... काय मस्त वाटतंय..! मला असं वाटलं होतं की, इथून बाहेर तरी पडायला मिळेल की नाही... काय तर म्हणे लॉकडाऊन आहे. दुकानं, शाळा, ऑफिसं, सारं काही बंद..! पावसाळ्यात तर वाटत होतं, जरा पुराचं पाणी दुकानी शिरलं, तर आम्ही बुडूनच मरणार.. पण देवाच्या कृपेने आजचा दिवस दिसला.
आई, हा बघ माझा पतंग.... "लाल...? अरे काय हे गोलू ..?" अगं आई, आपला पतंग पटकन ओळखता यावा म्हणून असा आणलाय.. आणि हा रंग दुसऱ्यांकडे नसतोच. म्हणजे कोणी मित्र चोरणारही नाहीत. गोलूनं अभिमानानं सांगितलं... "आणि मी संध्याकाळी पतंग उडवणार आहे गं... हो ना हो बाबा...?" बाबांनी होकार दिला. माझ्या मनात धडधडलं. पक्षांच्या पिल्लाला प्रथम उडताना कसं वाटत असेल, याची मला कल्पना आली. सगळा धीर एकवटून पहिल्या गगन भरारीला सज्ज झालो. थोड्या प्रयत्नाने गोलूला टेक्निक जमलं, आणि मी निदान झाडांच्या वरपर्यंत तरी जाऊन आलो. बाबा घरी परतताना गोलूला सांगत होते... हळूहळू जमेल तुला. पण दुसऱ्याचा पतंग कापायची इच्छा धरु नकोस. आपला पतंग कटू देऊ नकोस. असं कौशल्य हवं. कारण दुसऱ्याचं हिरावण्याच्या नादात, स्वतःचंच हरवून बसतो आपण...!! मजा जरूर कर, पण दुसऱ्याचा आनंद लुबाडू नकोस. मदत कर.मदत घे.. पण भांडणं नकोत. नाहीतर माँसाहेबांची बोलणी बसतील हं....
आता आकाश सहलीचा छंदच जडला मला.. गोलूचं मित्र मंडळ जमलं आणि मलाही चार मित्र मिळाले. खूप उंच जायला मिळालं की छाती अभिमानाने फुलून यायची. खालच सारं अंधुक दिसायचं, आणि गोलू सुद्धा ठिपक्याएवढा दिसायचा. मलाही वर जाण्याची नशा चढली होती. उंचचउंच जाऊन, गिरक्या घेत खाली यायची, माझी स्टाईल झाली होती. पण "स्वतः भोवती घेता गिरक्या, अंधपणा की आला.." असंही झालं होतं. बेफिकिरी शिगेला पोहोचली होती. अन् "अति तिथे माती" याचा सोयीस्कर विसर पडला होता...
आणि शेवटी व्हायचं तेच झालं. एका पांढऱ्या लोभस ढगाकडे माझं लक्ष गेलं. शेजारचा पतंग तिकडे जायच्या आत, आपण जावं, या विचारात असताना... मला गोलू कडून ढील मिळाली की, मी आपल्यांशी असलेलं बंधन तोडून स्वैर झालो, हे कळलच नाही. मी माझ्याच मदहोशीत भरकटलो. पण कळलं तेव्हा उशीर झाला होता. गोलूशी संपर्क तुटला होता. त्याची आपलेपणाची ओढ जाणवत नव्हती. मी थोडा घाबरलो. इकडे-तिकडे, वर-खाली होऊन बघितलं. पण ताण जाणवलाच नाही. मनात असूनही स्वतःला सावरणं जमत नव्हतं.. अगदी दारुड्या माणसासारखं झालं होतं. अरे बापरे, ओळखीचा प्रदेश संपला होता. माझी घसरण चालू झाली होती. आता या मार्गावर भरकटलेले, माझे इतर बांधव दिसू लागले. काय दयनीय अवस्था होती त्यांची..! बघवेना म्हणून डोळे गच्च मिटले. देवाचा धावा सुरू केला. कठीण समय येता "तोच" कामास येतो.. देवा, यातून सोडव रे.. सुखरूपपणे जमिनीवर पोहोचव मला. नंतर काही काही मागणार नाही रे... वेग कमी झाला होता. डोळे किलकिले केले. तसं एक मैदान दिसलं. पण काय नशीब माझं, एका निलगिरीच्या झाडावर माझा दोरा अडकला, आणि मी त्रिशंकूसारखा लटकू लागलो. भविष्याचा विचार करून भोवळ यायचीच बाकी होतं. सुख एवढंच की, मला खरचटलं सुद्धा नव्हतं.. हळूहळू रात्र झाली आणि विचारांना पूर्णविराम दिला..
मुलांच्या गलक्यानं जाग आली. अरे, रविवार आहे वाटतं.. मैदानात मुलं क्रिकेट खेळत होती, आणि अचानक एक चेंडू माझ्या दिशेने उडाला. त्याला पकडण्याच्या नादात, मुलांनी मला पाहिलं. माझा रंग, असा संकटात उपयोगी पडला. पण त्यांचा हात माझ्यापर्यंत येत नव्हता. शेवटी दहीहंडीची आयडिया लढवून, त्यांनी मला झाडावरून अलगद सोडवलं. आता मी उत्कर्षच्या घरी आलो. जरा हायसं वाटलं. नवीन ठिकाणी स्थिरावायच्या आतच, दुसरं संकट आलं... उत्कर्षच्या आईनं, पतंग घरी नको. दुसऱ्या कुणालाही दे... असं फर्मान सोडलं. काय तर म्हणे.... ते उंच इमारतीत राहतात, आणि उत्कर्ष डोळा चुकवून गच्चीवर जाईल, आणि पतंग उडवताना अपघात घडू शकेल..!! स्त्री स्वभावानुसार तिनं वानगीदाखल चार उदाहरणंही सांगितली. "मी फक्त सुट्टीच्या दिवशी पतंग उडवीन." हे उत्कर्षचं प्रॉमिसही घरच्यांनी एकमताने अमान्य केलं. आता आपलं काय..? असा विचार करण्यात रात्र जागून काढली.
आई, मी वर्गातल्या सुजितला पतंग देतो.. असं सांगून उत्कर्षने मला लपवून शाळेत नेलं.. आणि पाच सुगंधी खोडरबरांच्या बदल्यात, सुजितकडे पाठवलं. आता काय समोर वाढून ठेवलयं, या विचाराने बेचैन झालो होतो. "आपल्या हातात कधीच काही नसतं", हे शहाणपण अनुभवातून निश्चितच आलं होतं. पण "होतं ते चांगल्यासाठीच".. असा सकारात्मक विचार करत बसलो होतो. सुजितचा बंगला खूपच मोठा होता. आवारही मोठं प्रशस्त होतं. दोन दिवस त्याच्या खोलीत, नुसता एका टेबलवर पडून होतो. कंटाळा आला होता. बाहेरच्या स्वैर जीवनाची चटक लागली होती. आठवणी दाटत होत्या. मात्र दैवा पुढे हतबल होतो..!! "सब्र का फल मीठा होता है।" असं उगाच मनात तरळून गेलं... भिकूशेठच्या दुकानात दहा बारा महिने काढले. तेव्हा हे असं सगळं बोलणं, अधून-मधून कानावर पडत असे. गिऱ्हाईकं, त्याचे इतर दुकानदार मित्र, गप्पा मारीत, तेव्हा मी हे मनात साठवत असे.. आज असं उपयोगी आलं.. असो..
सुजितला शोधत त्याची आई अचानक खोलीत आली, आणि मला पाहून जरा विचारात पडली. लाल रंगामुळे मी चटकन तिच्या नजरेस पडलो, असं मला वाटलं. "अरे सुजित, कराटे क्लासला उशीर होतोय..." आई, पण आज मी पतंग उडतो ना गं... इति सुजित... "श्शी...! हे काय दळभद्री लक्षण... फेकून दे तो पतंग.... हे फालतू खेळ गल्लीतली मुलं खेळतात." आई, पण परवा काईट फेस्टिव्हल आहे. तेव्हा खेळेन ना गं मी.... सुजित हट्ट सोडत नव्हता. बरं बेटा, तेव्हा नवीन, मोठ्ठा स्पेशल शेपचा आणू हं काईट.. हा किती जुना झालाय....
प्रथमच प्रकर्षानं म्हातारपणाची जाणीव झाली... अटळच होतं ते म्हणा.. नाखुशीने सुजित क्लासला गेला. रात्री झोपताना मात्र त्यानं हलकेच माझ्यावर हात फिरवला. एका अनामिक हळूवार प्रेमाने मी झपाटला गेलो. दुसऱ्या दिवशी त्याच्या आईने माशाच्या आकाराचा मोठा सुंदर पतंग आणला. आमची नवी पिढी पाहून, मी थोडा खूश झालो. उत्साहाने सुजित काईट फेस्टिव्हलला गेला... पण रडतच परत आला. त्याचा काईट झाडात अडकून फाटून गेला होता. "अरे, पतंगांचं असचं असतं." त्याची आई एकीकडे समजूत घालत होती... "बाळ, रडू नको. मी आहे ना..!" पण माझे हे शब्द, त्याच्यापर्यंत पोहोचतच नव्हते. शेवटी, "बास झालं हं आता.. आवर हे सगळं.." असं ओरडून, सुजितची आई निघून गेली.
सुजित उठला. माझ्यापाशी आला. भीतीने मला ब्रह्मांड आठवलं. पण.. पण त्यानं मला एका काचेच्या कपाटात अलगद ठेवलं. तिथे ताईची जुनी भातुकली होती, गोट्या होत्या, शिंपले होते, झालंच तर पक्ष्यांची रंगीबेरंगी पिसं होती. भावला-भावली होते. मी सुखावलो... मनोमन देवाचे शतशः आभार मानले. आज मला कळून चुकलं होतं.. "ठेविले अनंते तैसेची रहावे.. चित्ती असो द्यावे समाधान.....!!"

जयगंधा..
२७-१-२०२१

कलालेख

प्रतिक्रिया

वयस्क's picture

30 Jan 2021 - 8:36 pm | वयस्क

शाळेत असताना मराठीच्या तासाला अशाच प्रकारच्या गोष्टीवर निबंध लिहावा लागे याची आठवण झाली. लेख सुरेख जमला आहे.

Jayagandha Bhatkhande's picture

1 Feb 2021 - 3:02 pm | Jayagandha Bhat...

धन्यवाद

मुक्त विहारि's picture

30 Jan 2021 - 9:04 pm | मुक्त विहारि

छान जमलाय ....

Jayagandha Bhatkhande's picture

1 Feb 2021 - 3:02 pm | Jayagandha Bhat...

धन्यवाद

एका राजकीय पक्षाची शोकांतिका आहे ...

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची, सध्याच्या परिस्थितीत झालेली अवस्था, चांगली रंगवली आहे ....

Jayagandha Bhatkhande's picture

8 Feb 2021 - 5:48 pm | Jayagandha Bhat...

धन्यवाद