ट्रम्प तात्या ह्यांचा अमेरिकन विलेक्शन मध्ये दारुण पराभव झाला. अर्थांत दारुण हे विशेषण इथे अनावश्यक होते पण तात्यांच्या हेकेखोर आणि असंतुलित व्यवहाराने तो पराभव दारुण ह्याच श्रेणीत गेला. तात्यांनी इलेक्शन तर घालवलेच पण रुडी सारख्या अतिवृद्ध आणि थकल्या वकिलाच्या नादी लागून सर्वत्र आपली शोभा वारंवार करून घेतली. तात्यांच्या नादात सिनेट सुद्धा रिपब्लिकन लोकांच्या हातून गेली.
तात्यां कडून बरीच अपेक्षा होती. त्यामानाने अनेक ठिकाणी त्यांचे अंदाज खूप बरोबर होते. उत्तर कोरिया बरोबर आणि इराण बरोबर त्यांनी युद्ध तर टाळलेच पण इराण ला जिथे हवा होता तेंव्हा हिसका सुद्धा दाखवला. पाकिस्तान ला त्यांनी अचूक पाने फ्रॉड म्हणून ओळखले आणि भारताची व्यापारी पद्धत सुद्धा मूर्खपणाची आहे हे त्यांनी ताडले. पण त्याच वेळी त्यांचे बोलणे हे बालिश पणाचे आणि असंतुलित वाटत होते. व्यापार, निर्वासित, चीन, इत्यादी अनेक विषयांवर एक तर त्यांच्या पॉलिसी मूर्खपणाच्या ठरल्या नाहीतर त्यांचे सर्व चमचे पूर्णपणे अकार्यक्षम ठरले. भारतीयांच्या इम्मीग्रेशन वर ट्रम्प ह्यांनी आपल्या मिलर ह्या हस्तका करावी खूप निर्बंध अनु पहिले पण त्यातील १००% निर्बंध शेवटी कोर्टाने बाहेर फेकले. शालभ कुमार ह्या संधी साधू तथाकथित हिंदुत्ववादी भारतीयांकडून ट्रम्प ह्यांनी ह्या नादात सुमारे १ मिलियन रुपये सुद्धा उकळले.
पण ट्रम्प ह्याच्या पराभवाचे कारण माझ्या मते वेगळेच आहे. आणि भाषा हा विषय घेऊन मी ते समजावणार आहे.
माझ्या मते ट्रम्प ह्यांच्या सर्व समस्यांचे मूळ हे त्यांच्या "डेकोरम" च्या अभावांत आहे. डेकोरम हा शब्द लॅटिन शब्दातून आला आहे. ग्रीक आणि रोमन तत्त्ववेत्त्यांनी ह्यावर विविध भाष्ये केली आहेत. मराठीत कदाचित ह्याचे भाषांतर तारतम्य असे केले जाऊ शकते. आपण कुठे उभे आहोत, कुणाशी बोलत आहोत हे लक्षांत घेऊन आपली वागणूक ठेवावी असे ग्रीक तत्ववेत्ता सिसेरो ह्याने लिहिले होते. आपण कितीही शक्तिशाली असलो आणि श्रीमंत असलो तरी समाजांत वावरायचे असेल तर डेकोरम अत्यंत महत्वाचा आहे. पण ह्याला काहीही फॉर्मुला नाही. उदाहरणार्थ आपण श्रीमंत असाल आणि कुना गरीबाच्या अंत्यविधीला जात असाल तर उगाच मोठे कपडे वगैरे घालून जाऊ नये, अत्यंत साधे कपडे घालून इतर लोकांप्रमाणेच जावे. पण आपण विद्वान असाल आणि मुर्खांच्या सोबतीत असाल तर मात्र आपण मूर्खां प्रमाणे वागू नये, इथे आपण आपली विद्वता सांभाळून राहणे आवश्यक आहे.
रोमन व्हर्चू
रोमन तत्त्ववेत्त्यांनी काळाच्या ओघांत नेते मंडळींसाठी काही नियम लिहिले होते. अर्थांत ह्या प्रकारचे नियम "धर्म" ह्या स्वरूपांत भारतात सुद्धा होते. राजधर्म वगैरे. रोमन नियम हे फक्त राजकारणी किंवा धार्मिक नेत्यांसाठी नसून अगदी चोरांचे सरदार किंवा माफिया मंडळी साठी सुद्धा आहेत. हे नियम पळाले गेले नाहीत तर त्या नेत्याचा ह्रास होतो असे म्हटले जाते.
एकूण १२ रोमन वर्चू आहेत. त्यातील एक म्हणजे "ग्रॅव्हिट्स" ( गांभीर्य ). काही विषयांवर गांभीर्याने विचार करणे तसेच आपण गंभीर आहोत हे जनतेला दाखवून देणे आवश्यक आहे. आपण माफिया दोन सुद्धा असाल तर काही विषयांना आपण किती गांभीर्याने घेतो हे आपल्या कृतीतून आपल्या चमच्या लोकांना समजले पाहिजे.
ट्रम्प ह्यांच्या स्वभावांत गांभीर्य अजिबात नव्हते. कॉवीड विषयाला त्यांनी स्वतः गांभीर्याने घेतले नाही वर उडवा उडवीची उत्तरे दिली. एक राजकारणी म्हणून हे अत्यंत मूर्खपणाचे काम होते. ट्रम्प ह्यांचे स्वतःचे विचार काहीही असले तरी त्यांनी कोविड चा तात्काळ बाऊ करून चीन ला दोषी ठेवून युद्धा प्रमाणे तयारी करायला पाहिजे होती. हे होऊन सुद्धा जर लोक मेले असते तर "मी प्रयत्न करून अनेक जीव वाचवले" अशी ओरड ते करू शकले असते आणि समाज कोविड प्रकरण फुस्सस ठरले असते तर "मी तयारी केली म्हणून काहीही घडले नाही' म्हणून श्रेय आपल्या पदरांत पडून घेऊ शकले असते.
ह्या उलट मोदी ह्यांचा स्वभाव आहे. कोविड चे भारतांत काहीही झाले तर मोदी ह्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे हे दाखवून दिले.
व्हेरिटास : सत्यवादी पणा
अर्थांत राजकारणी मंडळी सतत खोटे बोलत असली तरी सत्यवादी पणाचा आव आणणे हे खूप महत्वाचे आहे. किमान हा मनुष्य १००% काहीही बोलूस शकतो असे आपल्या समर्थकांना तरी वाटू नये ह्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
ट्रम्प ह्यांची भाषणे पूर्णपणे असंतुलित प्रकारची होती. अनेक विषयावर त्यांनी धांदात पणे खोटारडे पणा केलाच पण तो खोटारडेपणा वारंवार लोकांच्या समोर सिद्ध सुद्धा झाला. ट्रम्प ह्यांनी आपले आर्थिक व्यवहार सार्वजनिक करण्याचे वचन दिले होते ते त्यांनी शेवट पर्यंत केले नाही. त्यांच्या कट्टर समर्थकांना सुद्धा त्यांचा हा खोटारडे पणा सहज दिसून येत होता.
क्लेमेंशिया : मृदुपणा
योग्य त्या वेळी नेत्याच्या स्वभावांतून मवाळपणा लोकांना जाणवला पाहिजे. हा दयाभाव आणि मृदूलता वाजपेयी ह्यांच्या स्वभावांतून वारंवार जाणवायची आणि मोदी ह्यांच्या स्वभावांतून सुद्धा जाणवते. बाळ ठाकरे ह्यांनी सुद्धा सुनील दत्तना मदत करून असाच दयाभाव दाखविला होता. कट्टर विरोधक असलेले विविध नेते अनेकदा एकमेकांची मदत करताना दिसून येतात.
ट्रम्प ह्यांच्या स्वभावांत हा गुण अजिबात नव्हता. आपल्या पत्नीबरोबर सुद्धा त्यांचा व्यवहार तुसडे पानाचा होता. आपल्या लठ्ठ मुलीबरोबर ती लठ्ठ आहे म्हणून सार्वजनिक ठिकाणी दिसून येणे ते टाळत होते. त्यांचा बरोबर जे सहकारी होते त्यांना सुद्धा त्यांनी वारंवार नावे ठेवली. त्याशिवाय मेक्सिकन निर्वासितांची मुलें आईवडिलांपासून त्यांनी हिरावून तर घेतलीच पण वरून अश्या गोष्टींचे उघड पणे समर्थन सुद्धा केले.
ओबामा ह्यांनी सुद्धा अश्याच प्रकारे निर्वासित मुलांना छळले होते पण त्यांनी आपल्या स्वभावातून कधीही ते जाणवू दिले नाही त्यामुळे त्यांचा स्वभाव लोकांना मृदू पणाचा वाटत होता.
Humanitas : माणूसपण
म्हणजे संस्कृती. आपल्या नेत्याला चांगली आवड आहे. काव्य शास्त्र विनोद आणि अध्यात्मात ते रुची दाखवतात हे जनतेला दाखवणे आवश्यक आहे. म्हणूनच स्मग्लर किंवा माफिया लोक चांगला पांढरा सूट वगैरे घालून सिगार ओढतात. आपल्या नेत्याला संगीत, चित्रपट, वाचन इत्यादीत रुची आहे हे लोक पाहतात तेंव्हा त्यांना त्या माणसावर विश्वास ठेवावा स वाटतो.
मोदी हे योग करताना, ध्यान करताना किंवा गंगा आरती करताना जे फोटो दाखवले जातात त्यातून हेच जनतेच्या मनावर बिंबवले जाते. किंवा मोदी हे जेंव्हा अतिशय छानपणे पोशाख करून फोटो काढून घेतात तेंव्हा सुद्धा त्यांची माणुसकी त्यातून दिसते.
ट्रम्प ह्या दृष्टीने अत्यंत भिकार दर्जाचे माणूस होते ह्यांत शंकाच नाही. गोल्फ (आणि परस्त्री) सोडून त्यांना इतर काहीही आवड होती असे दिसून आले नाही. ते भिकार दर्जाचे फास्टफूड खाताना दिसून यायचे. त्यांची प्रॉपर्टी वर अत्यंत निकृष्ट दर्जाचे आर्ट असायचे आणि मागील १०० वर्षातील ते पहिले असे राष्ट्राध्यक्ष होते ज्यांच्याकडे कुत्रा नव्हता.
--
रोमन लोकांनी तसेच भारतीयांनी आणखीन एक महत्वाची गोष्ट ओळखली होती. ती म्हणजे चिन्हे. राजदंड, मुकुट, कमंडलु, मंगळसूत्र, काळे कपडे इत्यादी गोष्टी काही महत्वाच्या गोष्टीचे द्योतक आहेत. राजाला फक्त राजा असून चालत नाही तर डोक्यावर मुकुट घालून कारभार पाहावा लागतो. आपण शंकराचार्य असून चालत नाही सोवळे आणि दंड हातांत असला पाहिजे. सौभयवतीने मंगळसूत्र धारण केले पाहिजे तर जे लोक शोक व्यक्त करीत आहेत त्यांनी पांढरे किसून काळे कपडे घालणे आवश्यक आहे. ब्राम्हणाने यज्ञोपवीत तर शीख माणसाला पगडी हि पाहिजेच. ह्या सर्व गोष्टी एक प्रतीक आहेत पण त्या प्रतीकांच्या मागील अर्थ सुद्धा त्या प्रतीकांचा मालकांना समजून घेणे आवश्यक आहे. इंग्लंड मध्ये आजही जज मंडळी विग घालतात, पोप आजही ती विचित्र टोपी घालतात आणि सरदार लोक आजही कृपाण बाळगतात, अनेक मठांचे स्वामी एकभुक्त आहेत आणि अनेक भारतीय राजनेते खादीचे जॅकेट घालतात.
हि प्रतीके नसेल आणि माणूस लायक असेल सुद्धा तरी जास्त काळ त्या पदांत टिकून राहू शकणार नाही असे रोमन लोकांचे म्हणजे होते आणि माझ्या मते भारतीयांचे अनुभव सुद्धा असेच असतील ( पहा : राम रहीम, ४ किलो सोने घालणारे नेते, राखी सावंत इत्यादी).
ह्या उलट आपण शिवाजी महाराजांचे उदाहरण घ्या माझ्या मते रोमन वर्चू च्या १२ पैकी १२ गुणात महाराज सहज पणे प्रवीण होते असे किमान कथांवरून तरी वाटते. इतर नेते जसे संभाजी महाराज असो व बाजीराव पेशवे किंवा महाराणा प्रताप, ते सुद्धा १२ पैकी किमान ६-७ गुण आत्मसात करणारे आहेत असे वाटते.
--
ट्रम्प हे नक्की राष्ट्राध्यक्ष म्हणून कसे होते हे काळाच्या ओघांत जास्त स्पष्ट होईल. पण माणूस म्हणून ते आदरास प्राप्त होतील असे मला तरी वाटत नाही. मी स्वतः लिबरटेरिअन असल्याने ट्रम्प किँवा बायडन ह्यांचा भांडणात माझा काहीही कुत्रा नाही.
महत्वाच्या स्थानात असण्यासाठी डेकोरम हा अत्यावश्यक आहे आणि अनेक वेळा हा डेकोरम कर्मठपणा, रीतिरिवाज, कर्मकांडे ह्यातून येतो. ह्यांच्याशिवाय माणूस जास्त काळ लोकांच्या प्रेमाला आणि समर्थनाला प्राप्त होत नाही. ट्रम्प ह्यांचा दारुण पराभवातून हेच स्पष्ट झाले आहे असे मला वाटते.
टीप : वर्चू जनतेला दाखवणे आणि प्रत्यक्षात असणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, माझ्या लेखांत मी वर्चू चा दिखावा असणे जास्त महत्वाचे आहे असे म्हणत आहे.
[१] http://www2.hawaii.edu/~lanning/maximus.html

संकल्पना