Skip to main content

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 25/11/2020 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेला आहे. या दौर्‍यात भारत ३ एकदिवसीय सामने, ३ ट-२० सामने आणि ४ कसोटी सामने खेळेल. सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे (सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार) - एकदिवसीय सामने पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - शुक्रवार २७ नोव्हेंबर सकाळी ९:१० वाजता सिडने येथे दुसरा सामना (दिवस-रात्र सामना) - रविवार २९ नोव्हेंबर सकाळी ९:१० वाजता सिडने येथे तिसरा सामना (दिवस-रात्र सामना) - बुधवार २ डिसेंबर सकाळी ९:१० वाजता कॅनबेरा येथे ट-२० सामने पहिला सामना - शुक्रवार ४ डिसेंबर दुपारी १:४० वाजता कॅनबेरा येथे दुसरा सामना - रविवार ६ डिसेंबर दुपारी १:४० वाजता सिडने येथे तिसरा सामना - मंगळवार ८ डिसेंबर दुपारी १:४० वाजता सिडने येथे कसोटी सामने पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - गुरूवार १७ डिसेंबर सकाळी ९:३० वाजता अ‍ॅडलेड येथे दुसरा सामना - शनिवार २६ डिसेंबर पहाटे ५:०० वाजता मेलबर्न येथे तिसरा सामना - गुरूवार ७ जानेवारी पहाटे ५:०० वाजता सिडने येथे चौथा सामना - शुक्रवार १५ जानेवारी पहाटे ५:०० वाजता ब्रिस्बेन येथे या व्यतिरिक्त भारतीय दोन सराव सामने सुद्धा खेळणार आहे. या मालिकेत भारत प्रथमच गुलाबी चेंडूवर दिवस-रात्र चालणारा कसोटी सामना खेळेल. तसेच कॅनबेरा येथे कदाचित भारत प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. भारताने दोन वर्षांपूर्वी २०१८-१९ मध्ये प्रथमच कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती. परंतु त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघात प्रमुख फलंदाज स्टिव्हन स्मिथ व डेव्हिड वॉर्नर नसल्याने भारताला विजय काहीसा सोपा झाला होता. परंतु यावेळी दोघेही संघात आहेत. २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेतील सर्व ४ कसोटी सामन्यात स्मिथने शतक केले होते. नंतर २०१७ मध्ये भारतात झालेल्या मालिकेतील ४ पैकी ३ कसोटी सामन्यात स्मिथने शतक केले होते. यावेळीही स्मिथ व वॉर्नर भारताला त्रासदायक ठरणार हे नक्की. त्यांच्या जोडीला मागील वर्षीच पदार्पण केलेला जबरदस्त फलंदाज लाबूशेन व शॉन मार्श असतीलच. स्टार्क व फिरकी गोलंदाज नेथन लॉयन नेहमीच भारताविरूद्ध चांगली कामगिरी करतात. त्यांच्या बरोबर पॅट कमिन्स व हॅझलवूड हे दोन चांगले गोलंदाज आहेत. ऑस्ट्रेलिया संघ पूर्ण ताकदीनिशी असताना भारताची ताकद कमी असणार आहे. कोहली फक्त पहिल्या कसोटीपर्यंत असेल व नंतर तो भारतात परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत रहाणे कर्णधार असेल. रोहीत शर्मा व ईशांत शर्मा पहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर उपलब्ध असतील. त्यामुळे भारतीय संघाची ताकद कमी असणार आहे. फलंदाजीचा बहुतांशी भार मयंक, पुजारा व रहाणेवर असेल, तर बुमराह, शमी व चहलवर गोलंदाजीचा सर्वाधिक भार असेल. एकंदरीत भारताला हा दौरा सोपा नसणार हे नक्की. यापूर्वी १९७८ मध्ये, १९८६ मध्ये व २००४ मध्ये भारताला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची संधी आली होती. परंतु ते जमले नाही. २०१८-१९ मध्ये मात्र भारताने कसोटी मालिका जिंकून दाखविली. यावेळी सुद्धा भारत जिंकावा अशीच इच्छा आहे. २७ नोहेंबर पासूनच आफ्रिकेत इंग्लंडविरूद्ध व न्यूझीलंड मध्ये वेस्ट इंडीज विरूद्ध मालिका सुरू होत आहे.

वाचने 80680
प्रतिक्रिया 272

प्रतिक्रिया

सामना कसोशीने अनिर्णीत राखल्याबद्दल बक्कीच्या संघाचं अभिनंदन. पण ही वेळ यायला नको होती. खूप खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. आयपीएल पण खेळा, एकदिवशीय सामनेही खेळा वर पाचदिवशीय कसोटीही खेळा. पुरेशी विश्रांती कोणी घ्यायची? पाचव्या दिवशी अश्विनला तर सरळ उभंही राहता येत नव्हतं : https://www.loksatta.com/trending-news/india-vs-australia-3rd-test-ravi… काय म्हणणार यावर ....! -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ज्या निर्धाराने अश्विन व विहारी तब्बल ४३ षटके उसळते चेंडू अंगावर झेलत पाय रोवून खेळपट्टीवर उभे राहिले व पराभव वाचविला, त्या प्रयत्नांना तोड नाही. कालचा खेळ पाहून १९७६ मध्ये वेस्ट इंडीजमधील अंशुमन गायकवाडची खेळी आठवली.

ऑस्ट्रेलिया १० षटकात २/२२ वॉर्नर अन हॅरिस माघारी परतले. शार्दुल अन सिराज टिच्चून मारा करताहेत.

भालताचे प्रमुख गोलंदाज सैनी, सिराज, ठाकूर, नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर एकत्रित फक्त ६ कसोटी सामने खेळले आहेत. संपूर्ण गोलंदाजांचा चमू इतका नवोदित असणे बहुधा पहिल्यांंदाच घडले असावे (अपवाद म्हणजे १९३० च्या दशकातील भारतीय संघ).

In reply to by श्रीगुरुजी

खरं तर ४ कसोटी सामनेच खेळलेत. या सामन्यापूर्वी सिराज २, सैनी १, ठाकूर १ व नटराजन आणि सुंदर शून्य कसोटी सामने खेळलेत.

स्मिथ गेला. सुदैवाने! सुंदरची पहिली टेस्ट विकेट. दीड तासापूर्वी त्याने शार्दुलला लागोपाठ चौकार ठोकले तेव्हा वाटलं, आज शतक, उद्या द्विशतक करतो हा. ३६ षटके, ३/९३. लबुशन चालू आहे अजून.

७६ षटके ५/२३६ लबुशेन शतक झाल्यावर लगेच आउट झाला ही त्यातल्या त्यात बरी गोष्ट. सैनीने त्याच्या आठव्या षटकाच्या पाचव्या चेंडूनंतर गोलंदाजी थांबवली. त्याच्या मांडीमध्ये वेदना होत होत्या. रोहितने एक चेंडू टाकून ते षटक पूर्ण केले. शेवटचा फलंदाज टीम पेन खेळतोय. पण भारतीय संघाची गोलंदाजी कितीही भेदक झाली अन समोर कोणताही संघ असला तरी शेपूट वळवळतेच. २७५-३००?

पहिल्याच दिवशी क्षेत्ररक्षण खुप लुज वाटले. अनुभव बघता गोलंदाजांची कामगीरी चांगली झाली.३५० च्या आत थांबवले पाहीजे.

ऑस्ट्रेलिया सर्वबाद ३६९. भारत ११/१. गिल गेला. पुढच्या चेंडूवर पुजारा थोडक्यात वाचला. ३६९ ही धावसंख्या आपल्याला झेपेल असे वाटत नाही.

गिल व रोहित दोघेही स्व. चुका करुन आउट झाले. मानसिक कमकुवतपणा यात दिसुन येतो.

दुसऱ्या दिवसा अखेर पावसामुळे खेळ लवकर थांबवला. उद्या पुजारा आणि रहाणे वर प्रचंड मोठी जबाबदारी आहे. दुखापती वाढत चालल्या आहेत. सैनी पुन्हा खेळेल असं वाटत नाही. त्यामुळे ३६९ च्या शक्य तितकं जवळ जाणं गरजेचं आहे. मागच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया ने डाव घोषित करून सामना निकाली होईल हे पाहिलं. पण एक वेळ भारत जिंकतो की काय अशी स्थिती होती. यावेळी पुन्हा ते अशी रिस्क घेतील? त्यात आपल्याकडे एक गोलंदाज कमी. उद्या सर्वबाद न झाल्यास , हार होणार नाही अशी आशा आहे. नाहीतर ड्रॉ करण्यासाठी सुद्धा पावसाच्या धावा कराव्या लागतील. त्यापेक्षा फलंदाजांनी धावा करणं जास्त चांगलं.

In reply to by तुषार काळभोर

चौथ्या दिवशी सोमवारी दिवसभर पाऊस येण्याची शक्यता ६०% आहे, तर पाचव्या दिवशी मंगळवारी दिवसभर पावसाची शक्यता ५०% आहे. फक्त उद्याचा तिसरा दिवस संपूर्ण दिवस खेळून काढला पाहिजे. त्यामुळे भारत सामना वाचवू शकेल असं वाटतंय.

कालच्या दोन विकेट्स नंतर आज पुजारा, रहाणे, अगरवाल, पंत यांनी चांगल्या सुरुवातीनंतर मोठ्या खेळी केल्या नाहीत. १८६/६ असताना सगळं संपलं असं वाटलं. पण अनपेक्षित पद्धतीने शार्दुल आणि सुंदर यांनी अर्ध शतके करत १२३ धावांची भागीदारी केली. हा प्रतिसाद लिहीत असताना शार्दुल ६७वर आऊट झाला आहे. जिगरबाज भागीदारी. भारत ३०९/७ अजून फार धावा होतील असं वाटत नाही. भारत तीस चाळीस धावा पिछाडी वर असेल. ऑस्ट्रेलियाला रिस्क घ्यायची असेल (जे ते घेण्याची शक्यता जास्त आहे) तर अडीचशे च्या आसपास घोषित करून २८०-३०० लक्ष्य ठेवतील. पण त्यासाठी ७०-८० षटके खेळावी लागतील. आणि त्यानंतर भारतीय संघाला पाचव्या दिवशी चौथ्या डावात सर्वाबाद करावे लागेल. पावसावर बरच काही असेल. ऑस्ट्रेलिया बचावात्मक खेळेल असं वाटत नाही, पण सामना वाचवण्यासाठी खेळले तर ३५० च्या जवळ जातील, पण त्याला १२० षटके लागतील. तिसऱ्या डावात भारतीय गोलंदाज थकलेले आणि दुखापतग्रस्त असले तरी ऑस्ट्रेलिया ला ते कठीणच जाईल.

लंच ऑस्ट्रेलिया ४/१४९ स्मिथ २८. जम बसला तर अवघड आहे. एकूण आघाडी १८२. अजून ११८ झाले तरी टार्गेट ३००. अवघड असेल. पण आवाक्यात. ऑस्ट्रेलिया टार्गेट ३५० च्या आत असताना घोषित करणार नाहीत.

ब्रिस्बेनवर ४ थ्या डावात धावा करणे फारसे अवघड नसावे. पूर्वी याच मैदानावर धावांचा पाठलाग करताना ४ थ्या डावात भारताने ३५५, इंग्लंडने ३७० तर २०१६ मध्ये पाकड्यांनी ४५० धावा केल्या होत्या. अर्थात हे संघ सामना हरले होते. भारताने १९७७ मध्ये ४ थ्या डावात ३२४ धावा केल्या होत्या, परंतु पराभव झाला होता. या मैदानावर ४ थ्या डावात यशस्वी पाठलाग करून सामना जिंकलेली सर्वोच्च धावसंख्या २३६ आहे. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने २४३/७ धावा करून २७६ धावांची आघाडी घेतली आहे. परंतु आता पाऊस आला आहे.

तर अशा त-हेने आपल्याला पुन्हा एकदा जिंकण्यासाठी ३२४ धावांची आवश्यकता आहे. बीनबाद चार धावा झाल्या आहेत. रोहीत शर्मा चार धावांवर तर गील शुन्यांवर खेळत आहेत. आता आपल्याला सामना वाचवणेच हातात आहे. सामना जिंकू असे वाटावी अशी परिस्थिती नाही. पीच गोलंदाजांना साथ देईल अशीच आहे, त्यामुळे उद्या आपले फलंदाज पीचमधे किती रुतून राहतील त्यावर आपलं उद्याचा सामना वाचवणे हातात राहील असे वाटते. हे देवांनो, उद्या आपल्या भारतीय फलंदाजांना टीकून खेळण्याचं सामर्थ्य दे. आपली फलंदाजी तुझ्यासारखीच बेभरवशाची आहे तरीही काही चमत्कार होऊ दे अशी मनोमन प्रार्थना. -दिलीप बिरुटे

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात २९४ धावा, चौथ्या कसोटीत विजय मिळवण्यासाठी भारताला हव्यात ३२८ धावा. शक्य आहे का हे ? आज एकही विकेट न टाकता, उद्याचा संपूर्ण दिवस खेळून काढावा लागेल भारताला.

सामना ड्रॉ होइल पण रोहीत व गील हे १००/१५० पर्यंत टिकले आपण जिंकुही शकतो अस वाटतय. निदान रोहीत ने तरी उभ रहाव मग मागे पंत आहेच.

80-90 षटकांत, 320 धावा हव्या आहेत इतक्या रन्स तर आपण, 50 षटकांत काढतो हरलो तरी हरकत नाही, प्रयत्न जिंकण्यासाठीच करायचा

In reply to by मुक्त विहारि

कसोटी सामन्यात पॉवरप्ले, ३० यार्डांंच्या वर्तुळाबाहेरील क्षेत्ररक्षकांच्या संख्येवर मर्यादा, गोलंदाजांच्या षटकसंख्येवर मर्यादा असे फलंदाजांना अनुकुल असणारे नियम नसतात. वाईड चेंडूसाठी कडक नियम नसतो. नोबॉलवर मुक्त फटका मिळत नाही. त्यामुळे कसोटी सामन्यात इतक्या धावा करणे खूप अवघड असते.

In reply to by मुक्त विहारि

असहमत, या कसोटी मालिकेबद्दल बरोबर आहे तुमचे पण वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप चालु आहे. त्याचा विचार केला तर आपल्याला ही कसोटी अनिर्णित राहिली तरी चालेल (जिंकलो तर मस्तच होइल) पण हरलो तर फटका बसेल.

जवळपास ३.५ च्या रनरेटनं धावा कराव्या लागतील जिंकण्यासाठी. हे कसोटी सामन्यात अन् तेही चवथ्या डावात साधारणपणे कठीण असतं. जिंकण्यासाठी प्रयत्न करणे योग्यच आणि ते आपल्या टीमलाही नक्कीच समजत असेल. पण जोखीम किती आणि कोणी घ्यायची, पहिल्या चारनं किती रनरेटनं धावा गोळा करायच्या, पिचचा अंदाज... आणि जोडीला पाऊस. हे आणि असेच अनेक पैलू लक्षात घेऊन पुढची रणनीती राहील. अर्थात् जिंकलेले बघायला कधीही आवडेल, पण मॅच वाचवण्याची वेळ ६-७ व्या क्रमांकावर येणार्‍या फलंदाजांवर येऊ नये असं वाटतं.

In reply to by राघव

बरोबरै. आणि पहिल्या सामन्यातली नीचांकी धावसंख्या कसे बरे विसरु? एखादी दुसरी जम बसलेली विकिट पडली कि हगवण लागायची.

सामना जिंकणे अत्यंत अवघड आहे. भारत सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल असे वाटत नाही. सामना अनिर्णित ठेवण्यासाठीच भारत प्रयत्न करेल. सामना अनिर्णित राहण्यासाठी पावसाची सुद्धा मदत होईल. सामना हरू नये हीच इच्छा.

उद्या सकाळी पावसाची शक्यता जास्त आहे , दुपार नंतर हवेचा वेग वाढणार आहे . म्हणजे उद्या ७० षटकांचा खेळ होइल , ड्रॉ करावी लागणार आहे

लंच भारत १/८३ रोहित सकाळीच माघारी गेला. सध्या पुजारा आणि गिल टिकून आहेत. लक्ष्य साठ षटकात २४५. इथून जिंकण्याची शक्यता कमी आहे किंवा नाहीच. अनिर्णित राहण्याची शक्यता जास्त. पण शेवटच्या दिवशी पडझड होऊन साठ सत्तर धावात नऊ बाद होणे, सामान्य आहे.

In reply to by तुषार काळभोर

सामना अनिर्णीत राहील असेच डावपेच. पुजारा १०५ चेंडू १५ धावा तर गील १२८ चेंडूत ७३ धावा. गोलंदाजामधे काही ख़ास जादूही दिसली नाही. त्यामुळे विकेट्स पड़त नाही. चला ही मालिका चांगली झाली. मजा आली. उरलेला सामना बोल टू बोल पाहतोय धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारतीय फलंदाज सध्या आता आक्रमकपणे खेळत आहेत, शुभम गील ९१ वर बाद झाल्यानंतर आता १४५ धावा हव्या आहेत. धावांची गती पाहता टार्गेट जवळ जवळ पोहोचेल असे वाटत आहे. राहणे आणि पुजारा कितीकाळ उभे राहतात त्यावर निर्णय अवलंबून असेल. सामना अभीबी बाकी है. :) -दिलीप बिरुटे

काही चमत्कार घडला तरच सामना निकाली होईल. कोहली, राहुल, अश्विन, जडेजा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर, शमी, उमेश यादव व बुमराह असे ९ प्रमुख खेळाडू संघात नसताना सामना व मालिका न हरणे कौतुकास्पद आहे.

३७ षटकात हव्यात १४५ धावा. सात विकेट बाकी आहेत. विजय कठीण आहे मात्र अशक्य नाही. भारताने आता जिंकायसाठी खेळायला हवे.

२१ षटकांत १०४ धावा. जवळपास ५ चा रनरेट हवा जिंकण्यासाठी. ३० एक रन्स उरलेले असतांना रिस्क घेऊ शकतात. सध्या तरी नाहीच.

मंडळी, आता १५ षटकात केवळ ६३ धावा हव्या आहेत. एक मोठा रेकॉर्ड मला येथून दिसत आहे. २६५ वर चार फलंदाज बाद झालेले आहेत आणि ऋषभ पंत आणि मयंक अग्रवाल आता खेळत आहेत, देहबोली सामना जिंकू असाच वाटत आहे. मला वाटतं सामना जिंकण्याची संधी येथून दिसत आहे. धावसंख्या कठीण नाही. आता येथून फलंदाज बाद होऊ नये. मग सामना आपलाच आहे. सपना कुछ बुरा नही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मयंक अग्रवाल ९ धावांवर झेल देऊन परतला. आता वाशिंग्टन सुंदर वर भरवसा आहे. पण जिंकण्यासाठीच खेळावे. सामना अनिर्नित राखता येईल....पण जिंकण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, अशी संधी पुन्हा येणे नाही. -दिलीप बिरुटे

माय गॉड गोईंग टू अ न्यू रेकॉर्ड ! अरे बाप दिल की धडकने तेज. फक्त २४ धावा हव्या आहेत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता विजयासाठी केवळ दहा धावा हव्या आहेत, सुंदरचा बेजवाबदार फटका केला तरी २२ धावांच्या खेळीमुळे आपण विजयाच्या समीपजवळ आलो आहोत. आता शार्दुल आलाय खेळण्यासाठी.... जिंकणार नक्की. -दिलीप बिरुटे

जिंकण्यासाठी तीन धावा आहेत. शार्दुल ठाकूर दोन धावा काढून बाद झाला आहे. सोपा आहे सामना. आता येथून काही हाराकिरी करु नये. -दिलीप बिरुटे

हिपीप हुर्रे हिपीप हुर्रे.....! -दिलीप बिरुटे

३० धावांपर्यंत येईतोवर जिवात जीव नव्हता... मग मात्र जिंकणार असे वाटायला लागले. हॅट्स ऑफ् टीम ब्लू! मालिका विजयाचा आनंद काही औरच!! :-)

संस्मरणीय विजय आणि दीर्घकाळ लक्षात राहणारी मालिका. भारतीय संघाचे मनापासून अभिनंदन

पहिली एकदिवसीय मालिका गमावली. मग T 20 जिंकली. मग पहिल्या कसोटीत दारुण पराभव. मग दौऱ्याच्या शेवटच्या पंधरा मिनिटांत मालिका विजय. विराट नाही. साडेतीन गोलंदाज - एक सैनी जखमी. त्यांच्यात एकूण दहापेक्षा कसोटीचा अनुभव. बेभरवशाचा यष्टी रक्षक. ' अजिंक्य ' विजय.

इंग्लंड विरुध्द च्या कसोटी मालिके साठी सगळ्या सिनियर लोकांना नारळ द्यावा आणि पंतला टिम मधे ठेवून दुस्रा विकेट किपर घ्यावा पैजारबुवा,

पहिल्या डावात नवख्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला ४०० च्या आत रोखल. नंतर सुंदर व ठाकुर च्या १२१ रन्स च्या भागीदारीमुळे आव्हान कायम ठेवल. दुसर्या डावातही आपल्या गोलंदाजांनी जास्त धावा करु दिल्या नाहीत. ३२८ लक्ष्य गाठ्ण्यासाठी चांगली सुरुवात मिळणे गरजेचे होते. रोहीत लवकर बाद झाला पण गील व पुजारा यांच्या ११४ धावांच्या भागीदारीने विजयाचा पाया रचला. अखेर सुंदरच्या साथीने पंतने अपेक्षे प्रमाणे खेळुन विजय मिळवला. सुरुवातीला कोणालाही वाटले नव्हते की आपण ही मालिका जिंकु. पण युवा क्रिकेटपटुंनी चांगली कामगीरी करुन दाखवली.

याहू !!! लै म्हन्जी लैच खूष आज !! ऑस्ट्रेलिया दौरा म्हणल की अनेक वर्षे एकटा सचिन लढत आहे, अन बाकी सगळे आजु बाजुचे हजेरी लावुन जात आहेत असच चित्र असायचं... २००० पासुन बदलाला सुरुवात झालेली पण तेव्हाही कधी अटीतटीच्या सामन्यात आपण कमी पडायचो किंवा वादग्रस्त पंच निर्णयाने कमी पडलो... किती तास घालवले असतील हे सगळे पाहण्यात ह्याची काहीच गिनती नाही... अगदी पहाटे गजर लावुन ऊठुन मार खाल्लेले पाहिले आहे.... आज सगळा हिशोब परतरवुन दिला..... कमाल मजा आली... कप्तान अन बेस्ट बॅट्समन नाही, ६ ते ७ गोलंदाज जखमी.. तरी तिसर्‍या फळीतील गोलंदाज घेउन २० बळी घेण अन शेवटच्या दिवशी अन ४थ्या डावात ३०० + चेज करुन जिंकणे !!!! Cant get better than this !!! Hats off to Team India and especially Pant, Gill and the Rock of Gibraltar MR CHEPU for today's performance !!!

सुरूवातीचे २ एकदिवसीय सामने भारत हरल्याने दौऱ्याची सुरूवात वाईट झाली, परंतु शेवट गोड झाला. या धाग्याचे अवतारकार्य संपले. सर्व प्रतिसादकांचे आभार! ५ फेब्रुवारीपासून भारतात इंग्लंडविरूद्ध पहिला कसोटी सामना सुरू होतोय. त्या मालिकेसाठी कोणीतरी नवीन धागा काढा. कोणी न काढल्यास मी काढीन.