जयामावशी गेली!!
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
सुचना- नुकत्याच आलेला अनुभव जसाच्या तसा मांडला आहे. मिपाच्या धोरणात बसत नसेल तर लेख उडवुन टाकावा.
--------------------------------------------------------------
तसा अंदाज आला होताच सगळ्यांना हळुहळु. गेले ६ महिने डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या वार्या चालु होत्या. लिव्हर् वर २ गाठी झाल्या होत्या आणि जास्त वय व अशक्त प्रकृतीमुळे फार स्ट्राँग औषधे देता येत नव्हती. शुक्रवारी फोन आलाच मावसभावाचा की आईला पुन्हा हॉस्पिटलमध्ये भरती करायला लागत आहे आणि लक्षणे काही ठिक दिसत नाहित तेव्हा फेरी मारुन जा.
शनिवारी सकाळी पुण्याहुन निघालो आणि दुपारपर्यंत ठाण्याला पोचलो. सामान ठेवुन तडक हॉस्पिटलमध्येच गेलो. आधीच अशक्त असलेली मावशी. लहानपणीच पोलिओने एक पाय कमजोर झालेला. तिच्या वडीलांना तिची कोण काळजी की हिचे कसे होईल? अनेक वेळा धडपडली, आजारी पडली,तरी ७२ वर्षे तग धरुन राहिली, एव्हढे सगळे प्रॉब्लेम्स असुनही आनंदात आयुष्य जगली. स्वतःची आणि आमच्यासारख्या लहान भाचे,पुतणे मंडळींचीही जमेल तितकी हौसमौज केली. लग्न झाले,मुलगा झाला,सरकारी नोकरी पार पाडली,पेन्शन घेतले म्हणजे डोक्यावरुन पाणीच की.
आता मात्र अवस्था बघवत नव्हती. नाकातोंडात नळ्या,ऑक्सीजन्,सलाईनमधुन औषधे,काय काय मोजणारी मीटर्स आजुबाजुला, तोंडाने श्वास जोरात चालु होता. हाक मारली किवा सुई टोचली तरी काही प्रतिक्रिया नाही. रात्री डॉक्टर राउंड्ला आले तेव्हा सगळी परिस्थिती बघुन म्हणालेच की सगळ्या नातेवाईकांना कळवा. अजुन काही करता येण्यासारखे नाही आणि सपोर्ट सिस्टीम् वर अजुन किती दिवस तग धरेल माहित नाहि.सुन्न अवस्थेतच मी आणी भाऊ घरी गेलो.रात्री उशिरापर्यंत घरचे लोक जागुन गप्पा मारत बसलो होतो,पण हळुहळु सगळे आडवे झाले. आणि सकाळी साडेपाचच्या सुमारास फोन वाजलाच. पेशंटचे आणि तुमचे पॅन् कार्ड्,आधार कार्ड घेउन हॉस्पिटलमध्ये या. मी आणि भाऊ धावतपळत हॉस्पिटलमध्ये गेलो पण खेळ खलास झाला होता. काल धपापणारी कुडी आज शांत झाली होती.वॉर्ड्मध्ये विचित्र शांतता पसरली होती. ईतर पेशंट जागे होते पण कोणी आवाज करत नव्हते. रात्रपाळीच्या नर्स् ने आमच्याकडुन कागदपत्रे घेतली आणि भरायला एक फॉर्म दिला. फॉर्म भरल्यावर एक रिसीट फाडुन दिली. तिचे काय करायचे असते विचारल्यावर म्हणाली स्मशानात दाखवायला लागेल. पुढचा प्रश्न- बॉडी घरी कशी नेणार? तिलाच सांगुन रुग्णवाहिकेची सोय केली. तोवर घरी जाउन हॉलमधली जागा वगैरे मोकळी करुन घेतली. मावशी सवाष्ण गेली होती त्यामुळे घरी आणल्यावर काही विधी करावे लागतील का विचारले. पण घरी फालतुमध्ये काही नातेवाईक येउन बसले होते त्यांना काहीच माहित नव्हते. नुसतीच वये वाढतात काहि जणांची.
तोपर्यंत भावाचे काही मित्र जमले होते. सुदैवाने त्यातील एकाला पुढील सरकारी सोपस्कारांची चांगलीच माहिती होती. त्यामुळे तिथेच चर्चा सुरु झाली. हॉस्पिटलने दिलेली चिट्ठी घेउन पहिले स्मशानभुमीत जायचे. तिकडे नोंद केली की ते आपल्याला अंत्यविधी कधी करणार ते विचारतील, त्याप्रमाणे जवाहर बाग्,वागळे ईस्टेट, किवा बाळकुम पैकी एका ठिकाणी विधी होतील असे कळली. सध्या करोनामुळे डिझेल दाहिन्या करोनावाल्यांसाठी राखीव असतात आणि जनरल वाल्यांसाठी जुनी लाकडे जाळायची पद्धत आहे असेही समजले. त्यावर दुसर्या एकाने लेटेस्ट माहितीनुसार आता डिझेल दाहिनी सर्वांसाठी वापरतात असे सांगितले. एकाने स्मशानभुमी ऑफिसात जाउन ते कन्फर्म केले . त्यांचा पहिला प्रश्न कोविड केस आहे का? शिवाय जवाहर बागेत ६ पैकी २ दाहिन्याच कार्यरत आहेत त्यामुळे दिलेल्या वेळेतच बॉडी घेउन या शिवाय मध्येच करोना बॉडी आली तर त्यांना प्रेफरन्स मिळेल हे ही समजले. गाडीपण तेच पाठवणार होते.
आता गुरुजींची शोधाशोध सुरु झाली. यातही आता पॅकेज सिस्टीम आली आहे असे या मित्राने सांगितले. म्हणजे जे गुरुजी पहिल्या दिवशी दहनास येणार तेच पुढचे १३ दिवसांचे विधी करणार. काहिजण तर वर्ष श्राद्ध पॅकेज सांगतात अशी अतिशयोक्ती सुद्धा कळली. शेवटी एका गुरुजींना फोन करुन पक्के करुन टाकले.
यथावकाश रुग्णवाहिका आली आणि बॉडी घेउन घरी आलो. तोवर अजुन लोक जमले होते. काहिजणांनी पुढे होउन तिरडीचे सामान्,साडी,चोळी वगैरे आणले होते. आता एकच गडबड सुरु झाली. कोणीतरी अनुभवी जोशीकाकाना बोलवले. बाहेर मडके, तिरडी बांधणे वगैरे काम त्यांच्या मार्गदर्शना खाली सुरु झाले. आत बायका मंडळी काही सवाष्णीचे विधी पुर्ण करत होत्या. काहिजण नुसतेच बसुन होते तर कहिजण दर थोड्या वेळाने गुरुजी काय? म्हणाले? स्मशानवाले काय म्हणाले? हर्स कधी येणारे? असे बिनकामाचे प्रश्न विचारत होते. तीच तीच माहिती सांगुन सांगुन वीट आला. जमल्यास तीच त्यांच्या डोक्यात घालावी असा एक हिन्स्त्र विचारही येउन गेला.
दुसर्या एका कोपर्यात एक अनुभवी सरकारी नोकरीवाला मामा पेन्शनचे कसे करणार? बँक लॉकरचे काय? मृत्यु प्रमाण्पत्राच्या जास्त कॉपीज घेउन ठेव बाकी सांगायला मी येईनच वगैरे मौलिक सुचना देत होता. एक चांगली गोष्ट म्हणजे एका कॅटरर्स चा धंदा असणार्या नातेवाईक काकांनी न सांगता चहा उपम्याची सोय केली होती(नंतर त्यांनीच जेवणाचीही सोय केली) त्यामुळे पोटात थोडे अन्न गेले होते.
आतले विधी पुर्ण झाले आणि हर्स वाल्यांना फोन केला.सर्वानी एकवार नमस्कार केला आणि जयराम श्रीराम करत बॉडी उचलुन बाहेर आणली. कोणीतरी भरपुर हार वगैरे आणुन ठेवले होते ते एक एक करुन घातले. हळद कुंकु वाहिले. तोवर दोन चार शेण्या मडक्यात पेटवुन ते कोणीतरी भावाच्या हातात धरायला दिले. अश्मा घेतला.तोवर हर्स आलीच आणि पुन्हा एकदा जयराम श्रीराम च्या घोषात मंडळी निघाली. जास्त करुन तरुण लोकच तिकडे येणार होते. स्मशानात पोचलो तोवर गुरुजीही तिकडेच पोचले होते. त्यांनी सुत्रे हातात घेतली. पंचा नेसा, कणीक मळुन घ्या, मड्क्यात पाणी आणा, मृतदेहावरच्या सगळ्या गाठी सोडवा, पोस्ट मार्टेम केस आहे का एक ना अनेक. भावाच्या डोळ्यातील अश्रु थांबत नव्हते. बधिर वातावरणात एक एक विधी पार पडले आणि बॉडी डिझेल दाहिनीत नेणार तोवर एक कोविड केस आली. तिथे तर अवस्था अजुनच वाईट. बॉडी हर्स् मधुन थेट दाहिनीत, सगळे वाहक लोक पी.पी.ई. किट घातलेले, आणि नातेवाईक स्मशानाच्या दारातच थांबवलेले. सुदैवाने दुसरीही दाहिनी होती त्यामुळे थांबावे लागले नाही. ढकलगाडीसदृश गाडीवरुन बॉडी सरळ दाहिनीत गेली आणि लोखंडी दरवाजे बंद झाले आणि मावशी अनंताच्या प्रवासाला निघाली.
प्रतिक्रिया
धोरणात न बसण्यासारखे काही
घटना दुखःदच आहे. पण तटस्थतेने
सगळीकडे सारखेच असते
साधे सरळ छान लिहिले आहे.
सुन्न झालो. नुकतेच सासरे गेले
श्री गुरुदेव दत्त हा नामजप करावा
जर व्यक्ती आजारी असेल तर आणि
सहमत आहे...
"अत्यंत जवळचे लोक भेटून गेले
लेख आवडला.
सर्व वाचकांना धन्यवाद
छान लिहिलं आहेत. सगळे विधी
इतक्यातच डिसेम्बरमध्ये