जयामावशी गेली!!

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
6 Jan 2021 - 2:31 pm

सुचना- नुकत्याच आलेला अनुभव जसाच्या तसा मांडला आहे. मिपाच्या धोरणात बसत नसेल तर लेख उडवुन टाकावा.
--------------------------------------------------------------

तसा अंदाज आला होताच सगळ्यांना हळुहळु. गेले ६ महिने डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या वार्‍या चालु होत्या. लिव्हर् वर २ गाठी झाल्या होत्या आणि जास्त वय व अशक्त प्रकृतीमुळे फार स्ट्राँग औषधे देता येत नव्हती. शुक्रवारी फोन आलाच मावसभावाचा की आईला पुन्हा हॉस्पिटलमध्ये भरती करायला लागत आहे आणि लक्षणे काही ठिक दिसत नाहित तेव्हा फेरी मारुन जा.
शनिवारी सकाळी पुण्याहुन निघालो आणि दुपारपर्यंत ठाण्याला पोचलो. सामान ठेवुन तडक हॉस्पिटलमध्येच गेलो. आधीच अशक्त असलेली मावशी. लहानपणीच पोलिओने एक पाय कमजोर झालेला. तिच्या वडीलांना तिची कोण काळजी की हिचे कसे होईल? अनेक वेळा धडपडली, आजारी पडली,तरी ७२ वर्षे तग धरुन राहिली, एव्हढे सगळे प्रॉब्लेम्स असुनही आनंदात आयुष्य जगली. स्वतःची आणि आमच्यासारख्या लहान भाचे,पुतणे मंडळींचीही जमेल तितकी हौसमौज केली. लग्न झाले,मुलगा झाला,सरकारी नोकरी पार पाडली,पेन्शन घेतले म्हणजे डोक्यावरुन पाणीच की.

आता मात्र अवस्था बघवत नव्हती. नाकातोंडात नळ्या,ऑक्सीजन्,सलाईनमधुन औषधे,काय काय मोजणारी मीटर्स आजुबाजुला, तोंडाने श्वास जोरात चालु होता. हाक मारली किवा सुई टोचली तरी काही प्रतिक्रिया नाही. रात्री डॉक्टर राउंड्ला आले तेव्हा सगळी परिस्थिती बघुन म्हणालेच की सगळ्या नातेवाईकांना कळवा. अजुन काही करता येण्यासारखे नाही आणि सपोर्ट सिस्टीम् वर अजुन किती दिवस तग धरेल माहित नाहि.सुन्न अवस्थेतच मी आणी भाऊ घरी गेलो.रात्री उशिरापर्यंत घरचे लोक जागुन गप्पा मारत बसलो होतो,पण हळुहळु सगळे आडवे झाले. आणि सकाळी साडेपाचच्या सुमारास फोन वाजलाच. पेशंटचे आणि तुमचे पॅन् कार्ड्,आधार कार्ड घेउन हॉस्पिटलमध्ये या. मी आणि भाऊ धावतपळत हॉस्पिटलमध्ये गेलो पण खेळ खलास झाला होता. काल धपापणारी कुडी आज शांत झाली होती.वॉर्ड्मध्ये विचित्र शांतता पसरली होती. ईतर पेशंट जागे होते पण कोणी आवाज करत नव्हते. रात्रपाळीच्या नर्स् ने आमच्याकडुन कागदपत्रे घेतली आणि भरायला एक फॉर्म दिला. फॉर्म भरल्यावर एक रिसीट फाडुन दिली. तिचे काय करायचे असते विचारल्यावर म्हणाली स्मशानात दाखवायला लागेल. पुढचा प्रश्न- बॉडी घरी कशी नेणार? तिलाच सांगुन रुग्णवाहिकेची सोय केली. तोवर घरी जाउन हॉलमधली जागा वगैरे मोकळी करुन घेतली. मावशी सवाष्ण गेली होती त्यामुळे घरी आणल्यावर काही विधी करावे लागतील का विचारले. पण घरी फालतुमध्ये काही नातेवाईक येउन बसले होते त्यांना काहीच माहित नव्हते. नुसतीच वये वाढतात काहि जणांची.

तोपर्यंत भावाचे काही मित्र जमले होते. सुदैवाने त्यातील एकाला पुढील सरकारी सोपस्कारांची चांगलीच माहिती होती. त्यामुळे तिथेच चर्चा सुरु झाली. हॉस्पिटलने दिलेली चिट्ठी घेउन पहिले स्मशानभुमीत जायचे. तिकडे नोंद केली की ते आपल्याला अंत्यविधी कधी करणार ते विचारतील, त्याप्रमाणे जवाहर बाग्,वागळे ईस्टेट, किवा बाळकुम पैकी एका ठिकाणी विधी होतील असे कळली. सध्या करोनामुळे डिझेल दाहिन्या करोनावाल्यांसाठी राखीव असतात आणि जनरल वाल्यांसाठी जुनी लाकडे जाळायची पद्धत आहे असेही समजले. त्यावर दुसर्‍या एकाने लेटेस्ट माहितीनुसार आता डिझेल दाहिनी सर्वांसाठी वापरतात असे सांगितले. एकाने स्मशानभुमी ऑफिसात जाउन ते कन्फर्म केले . त्यांचा पहिला प्रश्न कोविड केस आहे का? शिवाय जवाहर बागेत ६ पैकी २ दाहिन्याच कार्यरत आहेत त्यामुळे दिलेल्या वेळेतच बॉडी घेउन या शिवाय मध्येच करोना बॉडी आली तर त्यांना प्रेफरन्स मिळेल हे ही समजले. गाडीपण तेच पाठवणार होते.

आता गुरुजींची शोधाशोध सुरु झाली. यातही आता पॅकेज सिस्टीम आली आहे असे या मित्राने सांगितले. म्हणजे जे गुरुजी पहिल्या दिवशी दहनास येणार तेच पुढचे १३ दिवसांचे विधी करणार. काहिजण तर वर्ष श्राद्ध पॅकेज सांगतात अशी अतिशयोक्ती सुद्धा कळली. शेवटी एका गुरुजींना फोन करुन पक्के करुन टाकले.

यथावकाश रुग्णवाहिका आली आणि बॉडी घेउन घरी आलो. तोवर अजुन लोक जमले होते. काहिजणांनी पुढे होउन तिरडीचे सामान्,साडी,चोळी वगैरे आणले होते. आता एकच गडबड सुरु झाली. कोणीतरी अनुभवी जोशीकाकाना बोलवले. बाहेर मडके, तिरडी बांधणे वगैरे काम त्यांच्या मार्गदर्शना खाली सुरु झाले. आत बायका मंडळी काही सवाष्णीचे विधी पुर्ण करत होत्या. काहिजण नुसतेच बसुन होते तर कहिजण दर थोड्या वेळाने गुरुजी काय? म्हणाले? स्मशानवाले काय म्हणाले? हर्स कधी येणारे? असे बिनकामाचे प्रश्न विचारत होते. तीच तीच माहिती सांगुन सांगुन वीट आला. जमल्यास तीच त्यांच्या डोक्यात घालावी असा एक हिन्स्त्र विचारही येउन गेला.
दुसर्‍या एका कोपर्‍यात एक अनुभवी सरकारी नोकरीवाला मामा पेन्शनचे कसे करणार? बँक लॉकरचे काय? मृत्यु प्रमाण्पत्राच्या जास्त कॉपीज घेउन ठेव बाकी सांगायला मी येईनच वगैरे मौलिक सुचना देत होता. एक चांगली गोष्ट म्हणजे एका कॅटरर्स चा धंदा असणार्‍या नातेवाईक काकांनी न सांगता चहा उपम्याची सोय केली होती(नंतर त्यांनीच जेवणाचीही सोय केली) त्यामुळे पोटात थोडे अन्न गेले होते.

आतले विधी पुर्ण झाले आणि हर्स वाल्यांना फोन केला.सर्वानी एकवार नमस्कार केला आणि जयराम श्रीराम करत बॉडी उचलुन बाहेर आणली. कोणीतरी भरपुर हार वगैरे आणुन ठेवले होते ते एक एक करुन घातले. हळद कुंकु वाहिले. तोवर दोन चार शेण्या मडक्यात पेटवुन ते कोणीतरी भावाच्या हातात धरायला दिले. अश्मा घेतला.तोवर हर्स आलीच आणि पुन्हा एकदा जयराम श्रीराम च्या घोषात मंडळी निघाली. जास्त करुन तरुण लोकच तिकडे येणार होते. स्मशानात पोचलो तोवर गुरुजीही तिकडेच पोचले होते. त्यांनी सुत्रे हातात घेतली. पंचा नेसा, कणीक मळुन घ्या, मड्क्यात पाणी आणा, मृतदेहावरच्या सगळ्या गाठी सोडवा, पोस्ट मार्टेम केस आहे का एक ना अनेक. भावाच्या डोळ्यातील अश्रु थांबत नव्हते. बधिर वातावरणात एक एक विधी पार पडले आणि बॉडी डिझेल दाहिनीत नेणार तोवर एक कोविड केस आली. तिथे तर अवस्था अजुनच वाईट. बॉडी हर्स् मधुन थेट दाहिनीत, सगळे वाहक लोक पी.पी.ई. किट घातलेले, आणि नातेवाईक स्मशानाच्या दारातच थांबवलेले. सुदैवाने दुसरीही दाहिनी होती त्यामुळे थांबावे लागले नाही. ढकलगाडीसदृश गाडीवरुन बॉडी सरळ दाहिनीत गेली आणि लोखंडी दरवाजे बंद झाले आणि मावशी अनंताच्या प्रवासाला निघाली.

धर्मअनुभव

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

6 Jan 2021 - 2:51 pm | सौंदाळा

धोरणात न बसण्यासारखे काही वाटत नाही.
द. मा. मिरसदारांची अशीच एक कथा आहे त्याची आठवण झाली.

नीलकंठ देशमुख's picture

6 Jan 2021 - 3:08 pm | नीलकंठ देशमुख

घटना दुखःदच आहे. पण तटस्थतेने तपशीलवार हवे तेथे हवे तेवढे व्यंग दाखवत ओघवत्या शैलीत लिहिले आहे.

कपिलमुनी's picture

6 Jan 2021 - 3:47 pm | कपिलमुनी

स्थळ काळ बदलता सगळीकडेच असेच असते.

अजुन काही वर्षांनी हे सर्व विधि माहिती असणारी , तिरडी बांधता येणारी माणसे नसतील तेव्हा आहे त्या कपड्यानिशी डायरेक्ट नेउन जाळतील किंवा

हे सर्व करायचे काम आउटसोर्स होइल.

चौथा कोनाडा's picture

6 Jan 2021 - 5:48 pm | चौथा कोनाडा

साधे सरळ छान लिहिले आहे. आवडले.
अचेतन देह घरी आणल्या नंतर करायचे विधी माहिती असणारे उपस्थितांमध्ये फार कमी असतात, आणि आग्रह धरणारे जवळजवळ नसतातच. कालमाना प्रमाणे आजकाल कमीकमी होत चाललेत. महत्वाचा भाग असतो तो देह तिरडीला बांधून गाडीत नेणे आणि स्मशानभुमीत योग्य ते विधी करणे. याची माहिती साधारण कोणाला तरी असते त्यानुसार पुढील कार्ये पार पाडली जातात. आजकाल लोकांनाही वेळ नसतोच. औपचारिकता म्हणुन सहभागी होतात, उपस्थिती लावतात.

दुर्गविहारी's picture

8 Jan 2021 - 11:39 pm | दुर्गविहारी

सुन्न झालो. नुकतेच सासरे गेले. तेव्हा याचं अनुभवातून गेलो. त्याची आठवण झाली.

राजेंद्र मेहेंदळे,

अनुभव विदित केल्याबद्दल धन्यवाद. दिवंगतास शांती व सद्गती लाभो. त्याकरिता 'श्री गुरुदेव दत्त' हा नामजप उपयोगी पडतो. शक्यतो एखादी व्यक्ती नेमून तिला मोठ्याने नामजप करावयास सांगावे. ते न जमल्यास फोन वा ध्वनीकारक उपकरणावर चालू ठेवावा. लोकांनी मनातल्या मनांत केला तरी चालतो. पण प्रसंगाचं गांभीर्य लक्षांत न घेता काहीजण निरर्थक गप्पा छाटीत बसतात. अशांना जाणीव करून द्यायला मोठ्याने चाललेला नामजप बरा पडतो.

आ.न.,
-गा.पै.

सुबोध खरे's picture

9 Jan 2021 - 10:56 am | सुबोध खरे

जर व्यक्ती आजारी असेल तर आणि अत्यंत जवळचे लोक भेटून गेले असतील तर पार्थिव देह रुग्णालयातून सरळ स्मशानभूमीस न्यावा.

जे अंत्यसंस्कार असतील ते तेथेच करता येतात. फापट पसारा नातेवाईकांनी अंत्यदर्शन केले नाही तरी चालू शकते. (नाही तरी त्यांना त्यात रस नसतोच).

प्रमाणपत्रे आणि सरकारी कागद कसे मिळवावे असे सांगणारा एखादा माणूस असतोच. अन्यथा रुग्णालयातील माणसांना माहिती असते.

जितक्या कमी वेळात अंत्यविधी उरकता येईल तितका उरकावे. अन्यथा काही लोकांना प्रसंगाचे गांभीर्य आणि औचित्य नसल्याने अंत्यसंस्काराची वेळेस सुद्धा व्हॉट्स अँप पाहणारे किंवा धंद्याचे फोन करणारे लोक सर्रास दिसतात.

जवळचे नातेवाईक सोडल्यास इतरांना मृत्यूचे फारसे घेणे देणे नसते. ( यासाठीच "सोयर सुतक नाही" हा वाक्प्रचार आहे)

मुक्त विहारि's picture

12 Jan 2021 - 7:12 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

अभिजीत अवलिया's picture

14 Jan 2021 - 7:22 pm | अभिजीत अवलिया

"अत्यंत जवळचे लोक भेटून गेले असतील तर पार्थिव देह रुग्णालयातून सरळ स्मशानभूमीस न्यावा." -->
हे कितीही म्हटले तरी शक्य नाही. म्हणजे असे केलेच तर नातेवाईक (जे अगोदर भेटून गेलेत ते सुध्दा ) नंतर फार बोंब मारतील अंत्यदर्शन घेऊ दिले नाही म्हणून.

शा वि कु's picture

9 Jan 2021 - 3:05 pm | शा वि कु

लेख आवडला.

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Jan 2021 - 7:10 pm | राजेंद्र मेहेंदळे

सर्व वाचकांना धन्यवाद

छान लिहिलं आहेत. सगळे विधी सगळ्यांना माहिती नसतातच. अशावेळी गर्दीमधे कोणीतरी माहितगार हवाच. पण आजकाल हे ही कमी झालय. आउटसोर्सींग ला स्कोप आहे यातही.

अजिंक्यराव पाटील's picture

26 Jan 2021 - 10:06 am | अजिंक्यराव पाटील

माझीही मावशी वारली, त्यांच्या गावी म्हणजे मराठवाड्यातल्या एका साध्याश्या जिल्ह्यातल्या दुर्गम तालुक्यातल्या अतिदुर्गम गावी. सुदैवाने म्हणा वा दुर्दैवाने त्यांना शेवटची घरघर लागली तेव्हापासून मी सोबत होतो. त्यांना शेवटची ३० मिनिटे दुर्गम तालुक्याच्या ढिसाळ सरकारी दवाखान्यात आणलं होतं, पण उपयोग झाला नाही. दवाखान्यातून घरी नेताना गाडीत त्यांचा देह ठेवणे, घरी गेल्यावर अंत्यदर्शनासाठी भिंतीला टेकून बसवणे, मान सरळ ठेवण्यासाठी भिंतीवर आजूबाजूला खिळे ठोकून रुमाल बांधणे, रात्रभर ठेवायचे असल्याने सांध्यांना तूप लावणे, दुसऱ्या दिवशी सवाष्णीची अंघोळ, साडी बदलणे, मळवट भरणे, आरती वगैरे सगळे सोपस्कार केले. नंतर तिरडी, मुलाच्या खांद्यावर कुर्हाड, आणि हातात मडके.. श्रीदत्तांच्या पायथ्याशी असलेल्या गावात अग्निसंस्कार करत नाहीत, आपापल्या जमिनीत पुरतात. म्हणून त्या कामासाठीची स्पेशल मंडळी प्रत्येक गावातून असतात. L आकाराचा खड्डा साधारण सहाफुट खोल आणि आतून ३फूट खोल खोबण खणल्या जाते. मृतदेहाला त्या खोबणीत मंडी घालून बसवतात. खोबणीत एक देवळी करून त्यात दिवा लावला जातो. हार फुले वगैरे टाकून नंतर मीठ टाकतात. आणि बुजतात. सगळे सोपस्कार करणारे दुःखी असतात. आताही माझ्या डोळ्यात पाणी आहेच. अजून फार वय झालेलं नाही, पण पुण्यात असलो तरी गाव जोडलेला आहे, आणि राहीलच. जेव्हा मरण येईल तेव्हा येईल, पण हे सारे सोपस्कार व्हावे अशी सोय नक्की करून ठेवणार. शहरातून झटक्यात बटन दाबून फटक्यात काम तमाम होतं, फार वाईट वाटतं.. असो..

आपली जमीन असल्याने नंतर त्यावर ओटा बांधून पूजेची सोयही होते. शेतकऱ्यालाच हे सुख. अग्निसंस्कारही केले तरी त्या जागेवर ओटा बांधला जातोच. नंतर येणाऱ्या सर्व पिढ्या त्या ओट्याला नमस्कार करतात. गावी येणारा जाणारा माणूस, २ क्षण तिथं उभं राहून त्या व्यक्तीची एखादी आठवण काढतं.. नाव राहतं.. म्हणून, जमीन कधी सोडू नये.