Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by हेमंतकुमार on Mon, 12/07/2020 - 08:05
या विषयाचे आधीचे संदर्भ : १. हात, जंतू, पाणी आणि साबण २. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज ३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य ४. पूरक विषय: पल्स ऑक्सीमीटरचे गमभन मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ! ……………………………………….. करोना सार्स-२ या दुष्ट विषाणूने मानवजातीवर हल्ला केल्याला आता एक वर्ष झाले. त्यातून उदभवला कोविड१९ हा आजार. त्याची साथ आली आणि तिची व्याप्ती वाढत ती महासाथ झाली. त्यातून खूप लोक आजारी पडले. काहींचा आजार सौम्य राहिला तर काहींचा गंभीर होऊन ते मृत्युमुखी देखील पडले. महासाथ आटोक्यात आणण्यासाठी जगातील बहुतेक देशांना टाळेबंदीसारखे कठोर उपाय अमलात आणावे लागले. त्यातून अर्थव्यवस्थेची प्रचंड हानी झाली. अनेकांचे रोजगार बुडाल्याने सामाजिक मनस्वास्थ्य हरवले. पुढे काही देशांत आजाराचे प्रमाण कमी झाले आणि आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले. पण अन्य काहींत प्रमाण पुन्हा एकदा वाढल्याने ‘दुसरी लाट’ निर्माण झाली. या आजाराच्या वर्षपूर्ती निमित्ताने गेल्या वर्षातील त्यासंबंधीच्या ठळक घडामोडींचा हा मागोवा : डिसेंबर 2019 : चीनच्या वुहान प्रांतात न्युमोनिया या आजाराचे काही रुग्ण आढळले आणि त्याचे कारण अज्ञात होते. * 31 डिसेंबरला या नव्या आजाराची WHOच्या दप्तरी नोंद झाली. करोना-सार्स २ हा विषाणू तर कोविड-१९ हा त्याचा आजार, अशी अधिकृत नावे दिली गेली. जानेवारी 2020 : * या आजाराचे RT-PCR या चाचणीने निदान झालेला पहिला रुग्ण अमेरिकेत आढळला. * हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो हे स्पष्ट झाले. * WHOने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली. फेब्रुवारी : बहुतेक देशात आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर निर्बंध. परदेशातून आलेल्या व्यक्तीस 14 दिवसांचे विलगीकरण लागू. मार्च : * 11 मार्च रोजी WHO कडून कोविडची महासाथ जाहीर. * HCQ या पारंपरिक औषधाचा वापर सुरू. * संसर्ग साखळी रोखण्यासाठी बऱ्याच देशात टाळेबंदी जाहीर. * भारतीय रेल्वेच्या १६७ वर्षांच्या इतिहासात (संप वगळता) प्रथमच प्रवासी सेवा काही काळ पूर्ण बंद. एप्रिल-मे : * Remdesivir औषधाला तातडीच्या उपचारासाठी मान्यता. * रोगविरोधी लसनिर्मितीचे सूतोवाच. * अमेरिकेतील मृत्यूंची संख्या एक लाखांवर पोचली जुलै : हा आजार हवेतील सूक्ष्मकणांच्याद्वाराही पसरत असल्याचे WHOचे निवेदन. तसेच बाधित पण लक्षणविरहीत लोकांकडूनही त्याचा प्रसार होत असल्याचे निवेदन. ऑगस्ट : बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून काढलेल्या रक्तद्रवाच्या उपचारास मान्यता. सप्टेंबर : जागतिक कोविडमृत्यूंचा आकडा १० लाखांवर पोचला. ऑक्टोबर : * Remdesivir ला अमेरिकी औषध प्रशासनाकडून अधिकृत औषधाची मान्यता (पण पुढे याबाबत WHOने नकारात्मक शेरा दिला). • भारतात कोविडमृत्यूंचा आकडा १ लाखावर पोचला. नोव्हेंबर : दुहेरी अँटीबॉडी उपचारास तातडीच्या वापरासाठी मान्यता. डिसेंबर २०२० : • काही लसी प्रयोगसिद्ध होऊन मान्यताप्राप्त. वितरणास तयार. चीनमध्ये लाखो लोकांना त्यांची लस दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध. रशियाने पण सुरवात केली. इंग्लंडने ८ डिसेंबरला लसीकरण सुरु केले. • आज अखेरीस या आजारावर निर्विवाद असे प्रयोगसिद्ध रामबाण औषध उपलब्ध नाही. त्यामुळे रोगप्रतिबंधावर अधिक लक्ष केंद्रित. ............... ok समाजात या निव्वळ नैसर्गिक आजारातून पुरेशी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे लसीकरणाची कल्पना पुढे आली. वर उल्लेख केल्याप्रमाणे संबंधित लस नव्याने निर्माण करून त्याचे काहीसे घाईतच प्रयोग केले गेलेत. लसीच्या अनेक उत्पादनांपैकी काही आता प्रयोगसिद्ध होऊन वापरासाठी तयार आहेत. लस देताना अर्थातच सामाजिक प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. ती सर्व नागरिकांना द्यायची की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. RNA तंत्रज्ञानावर आधारित लसी या नव्यानेच निर्माण केलेल्या आहेत. त्यांची उपयुक्तता आणि दुष्परिणाम अनुभवातून समजतील. लसीकरणातून महासाथ कशी आटोक्यात येते हे यथावकाश समजेल. आपण तसे स्वप्न बघावे अशी WHOने इच्छा व्यक्त केली आहे ! लसीसंबंधी आणि संबंधित घडामोडीबाबाबत चर्चा करण्यासाठी हा नवा धागा. एव्हाना या आजारावर या धाग्यासह ५ धागे निर्माण झालेले आहेत. आता हा आजार लवकरात लवकर सामान्य होऊन आटोक्यात येवो ही इच्छा. जेव्हा तो सामान्य सर्दीपडशाप्रमाणे समाजात दखलपात्र राहणार नाही, तेव्हा अशा चर्चाधाग्यांचे प्रयोजनही संपेल. तसे लवकरात लवकर होवो आणि हे सर्व धागे इ-रद्दीत जावोत हीच आंतरिक इच्छा ! .............................................................................
  • Log in or register to post comments
  • 83320 views

प्रतिक्रिया

Submitted by मराठी_माणूस on Mon, 12/07/2020 - 08:55

Permalink

वर्षभराचा चांगला आढावा.

वर्षभराचा चांगला आढावा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 12/07/2020 - 09:07

Permalink

कोवीशील्ड...

पुणे येथील सीरम इंस्ट्यूट ऑफ़ इंडियाने तयार केलेली कोविशील्ड लस पुढील महिन्यात अनुक्रमे डॉक्टर्स, कर्मचारी आणि सामान्य जनता असे यांना मिळणार आहे, असे बातम्या वगैरे वरुन समजते. बाकी वर्षभरापूर्वी सुरुवातीच्या करोनाच्या कहर आणि बातम्यांनी जग किती शील्लक राहील अशी भीती वाटून गेली होती, आज मागे वळून पाहिल्यावर करोना काळ भयंकरच होता, पण तो काळ काळजी घेतली तर तितका भयंकरही नव्हता असे वाटते. असो. सर्वांना लस मिळावी, सर्व लोक ठणठणीत व्हावेत. लोकांचे प्रवास, नोक-या, पार्टी, लफडी, पर्यटन सर्व पूर्वीप्रमाणे व्हावे हीच विज्ञानेश्वराला प्रार्थना. बाय द वे, एक व्हीडीयो पाहण्यात आला होता. वाट्सपयुनवर्सिटीतच आला होतो who च्या नावावर की करोना एक सीजनल फ्लू होता वगैरे. असेच काही तरी व्हावे असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by अनिंद्य on Mon, 12/07/2020 - 09:22

Permalink

एक वर्ष झालं सुद्धा !

एक वर्ष झालं सुद्धा ! हे म्हणजे जागतिक महायुद्धासारखेच - फक्त शत्रू समोर सहज न दिसणारा विषाणू. ...सर्व लोक ठणठणीत व्हावेत. लोकांचे प्रवास, नोक-या, पार्टी, लफडी, पर्यटन सर्व पूर्वीप्रमाणे व्हावे हीच विज्ञानेश्वराला प्रार्थना...... याला तथास्तु !
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Mon, 12/07/2020 - 10:06

Permalink

वरील सर्व

सहकारी बंधूंचे आभार !
लोकांचे प्रवास, नोक-या, पार्टी, लफडी, पर्यटन सर्व पूर्वीप्रमाणे व्हावे
>>> +१११११ 😎 😈
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on Mon, 12/07/2020 - 10:19

Permalink

छान आढावा!

छान आढावा!
लस देताना अर्थातच सामाजिक प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. ती सर्व नागरिकांना द्यायची की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही.
पोलिओचा डोस द्यायला जेसे घरोघरी येतात तसे तुमच्या घरात कोणी लस घ्यायचे बाकी राहिलंय का? असे विचारायला आरोग्यसेवक येत नाहीत तो पर्यंत कोविड साठीची लस घ्यायची नाही असा ठाम निर्धार केला आहे 😀 विनोदाचा भाग बाजूला ठेऊ, पण खरोखर लसीकरणाला सुरुवात झाल्यावर किती लोकं लस टोचून घेण्यासाठी गर्दी करतील/झुंबड उडेल ह्याची कल्पना करवत नाही! लवकरात लवकर ह्या आजाराचे पृथ्वीतलावरून समूळ उच्चाटन होवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
  • Log in or register to post comments

Submitted by बाप्पू on Mon, 12/07/2020 - 14:27

Permalink

कोविड लसीकरण लवकर सुरु होईल

कोविड लसीकरण लवकर सुरु होईल असे वाटतेय. मे बी जानेवारी पासून. व्यक्तिशः मला लस टोचून घेण्यास थोडं अंकफर्टेबल वाटतेय. लस फार च घाई गडबडीत तयार केलेली आहे. तिची विश्वासार्हता किती हा नक्कीच वादाचा विषय होईल. आणि लॉन्ग टर्म ( उशिरा दिसून येणारे ) साईड इफेक्ट काय असतील ते अजुन नेमके क्लिअर नाहीये. त्यामुळे शक्यतो जितक्या उशिरा लस घेता येईल तितक्या उशिरा घेईल. तोवर मास्क, सोशल डिस्टन्स, साबण, सैनिटायझर हेच करेल. अर्थात हे माझे वयक्तिक मत ( आजच्या घडीला ) आहे आणि ते नंतर बदलू शकते.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 12/08/2020 - 10:48

In reply to कोविड लसीकरण लवकर सुरु होईल by बाप्पू

Permalink

लस फार च घाई गडबडीत तयार

लस फार च घाई गडबडीत तयार केलेली आहे. काही गोष्टी काही गोष्टीत आजच्या तंत्रज्ञानाने फरक झाला आहे . उदा पूर्वी डेटा गोळा करणे, त्याचे पृथक्करण करणे यात प्रचंड वेळ जात असे. हा वेळ आंतरजाल आणि वेगवान संगणक यामुळे अतिशय सोपे झाले आहे. याशिवाय बहुसंख्य लसी या पूर्ण विषाणूंमुळे तयार झालेल्या नसून त्याच्या अर्ध्या पाव भागापासून बनलेल्या आहेत त्यामुळे या लसींमुळे कोव्हीड होण्याची शक्यता खूप कमी आहे. अर्थात लसीमध्ये जैविक कच्चा माल वापरला आहे त्याची ऍलर्जी किंवा त्याचा शरीरावर आणि शरीराची त्याला प्रतिक्रिया काय असेल हे लगेच सांगणे कठीण आहे. परंतु आज जर कोव्हीड चा मृत्यू दर १ टक्का ( शंभरात एक)असेल तर लसीमुळे होणारे मृत्यू दहा हजारात एक( कदाचित १० लाखात एक असेल. तेंव्हा वयाच्या ६० वरील वृद्ध माणसे, मधुमेह रक्तदाब हृदयविकार मूत्रपिंड विकार सारखे रोग असलेले वृद्धच नव्हे तर ४० वयावरचे मध्यमवयीन आणि आरोग्य कर्मचारी यांनी उपलब्ध झाल्याबरोबर लस घ्यावी असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मास्क, सोशल डिस्टन्स याबद्दल आपण काळजी घेतली तरी जनतेची बेफिकिरी आपल्याला महाग पडू शकेलच. ( मी अशाच बेफिकीर रुग्णांचा बळी आहे) साबण, सैनिटायझर हे एकंदर आरोग्यासाठी कायम चालू ठेवावेच (कोव्हीड गेल्यावर) सुद्धा यात शंकाच नाही
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Mon, 12/07/2020 - 14:48

Permalink

+११

विचारायला आरोग्यसेवक येत नाहीत तो पर्यंत कोविड साठीची लस घ्यायची नाही शक्यतो जितक्या उशिरा लस घेता येईल तितक्या उशिरा घेईल.
एक सामान्य नागरिक म्हणून हे योग्य विचार आहेत. +११ लशी घाईत केलेल्या आहेत. अधिक धोकावाल्या गटांना शिफारस असावी. सामान्यांना सक्ती नको .
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Tue, 12/08/2020 - 09:49

In reply to +११ by हेमंतकुमार

Permalink

अधिक धोकावाल्या गटांना

अधिक धोकावाल्या गटांना
म्हणजे कोण ?
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Tue, 12/08/2020 - 10:14

In reply to अधिक धोकावाल्या गटांना by मराठी_माणूस

Permalink

म मा ,

अधिक धोकावाल्या गटांना म्हणजे उदाहरणार्थ खालील गटातले लोक : १. वय 70 वरील २. मधुमेह आदी दीर् कालीन आजार असलेले ३. वृद्धाश्रमात राहणारे आणि ४. सर्व प्रकारचे आरोग्यसेवक
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Tue, 12/08/2020 - 11:50

In reply to म मा , by हेमंतकुमार

Permalink

जसा कोवीड चा संसर्ग ह्या

जसा कोवीड चा संसर्ग ह्या लोकांना होण्याचा जास्त धोका असतो तसाच त्यांना लसीचा धोका (अजुन माहीत नसलेला ) ही अधिक असु शकतो ना ? म्हणजे ह्या लोकांनी नेहमीपेक्षा अधिक काळजी (त्रिसुत्री, वेळच्या वेळी औषधे, आहार, तपसण्या इत्यादी) घेणे हे लस घेण्या पेक्षा जास्त चांगले नाही का ?
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Tue, 12/08/2020 - 12:25

In reply to जसा कोवीड चा संसर्ग ह्या by मराठी_माणूस

Permalink

म मा ,

दीर्घकालीन आजार असलेल्या वृद्ध व्यक्तीला समजा संसर्गातून कोविड झाला, तर या गटात मृत्यूचे प्रमाणही तुलनेने जास्त असते. त्या तुलनेत अशा व्यक्तींना लसीचा धोका कमी स्वरूपाचा राहतो - म्हणजे मर्यादित स्वरूपाची अलर्जिक प्रक्रिया इत्यादी. त्याचे एकूण प्रमाणही तसे कमी असते. म्हणून इथे फायदा/ तोटा याची याची तुलना करता त्रिसूत्री अधिक लस हे फायदेशीर ठरावे. अर्थात असा निर्णय घेताना संबंधित रुग्णाचा वंश, सद्य आजाराची तीव्रता किंवा स्थिती आणि डॉक्टरांचे मत या सगळ्यांची सांगड घालावी लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Tue, 12/08/2020 - 14:27

In reply to म मा , by हेमंतकुमार

Permalink

लस न घेता बाकीच्या गोष्टी नीट

लस न घेता बाकीच्या गोष्टी नीट पाळल्या आणि संसर्ग होउच न देण्याची काळजी घेतली तर लस टाळु शकतो असे वाटते
  • Log in or register to post comments

Submitted by गोंधळी on Mon, 12/07/2020 - 14:59

Permalink

सहमत

संबंधित लस नव्याने निर्माण करून त्याचे काहीसे घाईतच प्रयोग केले गेलेत सहमत. “...If we are able to vaccinate a critical mass of people, and break that virus transmission, then we may not have to vaccinate the entire population,” सगळ्यांना लस देण्याची गरज नाही ईती ICMR. पहील वाटायच हं.. काहीही दाखवतात. पण आता झोम्बी फिल्मस बघायला लागलो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by MipaPremiYogesh on Mon, 12/07/2020 - 21:25

Permalink

नेहेमी सारखा छान लेख डॉक.

नेहेमी सारखा छान लेख डॉक. तुमचा अभ्यास काय सांगतो ह्या लसी बद्दल ?
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Mon, 12/07/2020 - 21:56

Permalink

धन्यवाद !

गोंधळी , झोंबीचा संदर्भ नाही समजला. .................... योगेश, लसींचा हा तक्ता : Image removed. प्रत्यक्ष उपयुक्तता वापरानंतरच कळेल.
  • Log in or register to post comments

Submitted by गोंधळी on Mon, 12/07/2020 - 22:41

In reply to धन्यवाद ! by हेमंतकुमार

Permalink

झोंबीचा संदर्भ

करोना सद्रुश्य व्हायरसवर एक फिल्म आली होति. पण झोंबी व्हायरसवर खुप फिल्म्स आहेत. त्यामुळे कुतूहल वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Tue, 12/08/2020 - 07:45

In reply to धन्यवाद ! by हेमंतकुमार

Permalink

एक शंका ..

वरील तक्ता वर्ड मधून जे-पेग करताना मराठी अक्षरांचे रफार का विस्कटतात ? कुणी तंत्रद्न्य सांगेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on Tue, 12/08/2020 - 09:25

In reply to एक शंका .. by हेमंतकुमार

Permalink

font embed न झाल्याने असे होते.

त्यावर उपाय म्हणजे तक्ते jpeg format मधे न देता html table मधे द्यावेत. नमुन्यादाखल वरील तक्ता html table अगदी बेसिक स्वरुपात खाली देत आहे. table, th, td { border: 1px solid #333;; border-collapse: collapse; padding:4px; } औषधोद्योग निर्मिती व तांत्रिक मुद्दे लस वाहतूक व वितरण माणशी डोस शेरा Pfizer शुद्ध लस, टिकाऊ, रसायन विरहित, उत्पादन वेगात. उणे ७० C तापमान आवश्यक २:२१ दिवसांच्या अंतराने. दुसरा डोस त्याच उत्पादकाकडून घेणे, पाठपुरावा लागेल. मॉडर्ना वरील प्रमाणेच उणे ४ C तापमान आवश्यक २:२८ दिवसांच्या अंतराने. वरील प्रमाणेच Astra Z उत्पादन वेळखाऊ, लस साठवण सोपी. अतिशीत तापमानाची गरज नाही. २ वरील प्रमाणेच J & J वरील प्रमाणेच वरील प्रमाणेच फक्त १ निरंक
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Tue, 12/08/2020 - 09:41

In reply to font embed न झाल्याने असे होते. by टर्मीनेटर

Permalink

टर्मि.

वा ! धन्यवाद. पण त्यासाठी html table शिकावे लागेल मला. बघू एकदा सवडीने. जे पेग जालावर स्वयं करून मिळते.
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on Tue, 12/08/2020 - 10:03

In reply to टर्मि. by हेमंतकुमार

Permalink

पण त्यासाठी html table शिकावे

पण त्यासाठी html table शिकावे लागेल मला.
हो, कुमार साहेब पण ते शिकणे अतिशय सोपे आहे. किंवा अजून एक सोपा online उपाय आहे त्यासाठी. वर्ड मध्ये टेबल बनवण्यापेक्षा गुगल ड्राईव्ह वर एक नवीन google doc तयार करून (फायर फॉक्स ब्राउझर वापरून) त्यात टेबल बनवायचे, आणि फायर फॉक्स देत असलेल्या 'Take a Screenshot' पर्यायाचा वापर करून png format मधली इमेज मिळवायची. (कुठलेही 3rd पार्टी app वापरायची गरज भासत नाही). चला त्या निमित्ताने मला एक लेखन विषय मिळाला, आता ह्यावर तंत्रजगत विभागात लवकरच एक धागा काढतो 😀
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Tue, 12/08/2020 - 10:16

In reply to पण त्यासाठी html table शिकावे by टर्मीनेटर

Permalink

टर्मि.

ह्यावर तंत्रजगत विभागात लवकरच एक धागा काढतो
नक्की काढा. आवडेल
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on गुरुवार, 12/10/2020 - 05:17

In reply to एक शंका .. by हेमंतकुमार

Permalink

jpeg format फाईल बनवण्यासाठी

jpeg format फाईल बनवण्यासाठी विन्डोज चे स्निपिंग टूल वापरता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Tue, 12/08/2020 - 00:12

Permalink

प्राधान्यक्रमाने...

यापुढे अपत्यप्राप्ती करण्याचा कुठलाही प्लॅन / गरज / इच्छा उरलली नसलेल्या लोकांनी लस टोचुन घ्यावी. विशेषतः ३०-४० वयोगटातल्या लोकांनी. असं केल्याने लशीचे काहि दुष्परीणाम असतीलच तर ते पुढील पिढीत संक्रेमीत होण्याचं टाळता येईल.. शिवाय पुढच्या ४०-५० वर्षात या लस घेतलेल्या लोकांचा डाटा तपासता येईल...
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Tue, 12/08/2020 - 07:46

Permalink

होय,

गोंधळी, अर्ध.राव समजले मुद्दे . धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by अथांग आकाश on Tue, 12/08/2020 - 15:22

Permalink

उद्बोधक चर्चा!!

उद्बोधक चर्चा!! मलाही लस टोचून घेण्यात इंटरेस्ट नाही!!! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Wed, 12/09/2020 - 08:31

Permalink

अ आ,

अ आ, नेहमीप्रमाणेच सुरेख चित्र. तुमच्या चित्रातील पिस्तुलामुळे आता मिपावरुन या विषाणूचा नायनाट झाला आहे ! तेव्हा सर्व मिपाकरांनी निर्धास्त राहावे 😀 😀 😀
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Wed, 12/09/2020 - 10:43

Permalink

माझा आपला एक अन्दाज.

ही साथ सुरू झाल्यापासून अनेकानी ( त्यात अनेक मेडिकल प्रोफेशनल ही आले ) आपले ज्ञान पाजळले ! १९१८ साली साथीचे रोग कसे पसरतात ,त्यात नैर्सर्गिक प्रतिकारशक्तीचा किती वाटा ? याबद्द्ल आजच्या इतके ज्ञान कुणालाही असेल असे वाटत नाही. तरीही अनेक लोक त्यातून रोग न होताही वाचले याला त्यावेळी जागतिक पातळीवर माणूस आजच्या इतका सम्पर्कात नव्हता असेही कारण कोणी देतील .पण सारी काळजी देवाला असे मानले तर विषाणू व जीवाणू चा अभ्यास करून प्रतिपिन्डे निर्माण करण्याची अजब देणगी काहीना जन्मतःच मिळाली असावी असा तर्क अवाजवी ठरू नये. आज देखील काही टक्के शरीरामध्ये प्रतिपिन्डे सापडली आहेत. जसे एखाद्या तीन वर्षाच्या मुलाला अगदी लहान वयातही स्वर व तालाची समज असते तसे प्रतिपिंड निर्मितीची केस असू शकेल की नाही ? यावरून असे वाटते की .. ( जरी माझ्या सारख्या सामान्य माणसाला ते सिद्ध करता येत नसले तरी ) सर्व वयो गटातील अनेकाना हा रोग होऊन गेलेला असून त्यातील सुमारे ५० टक्के लोकानी त्यावर स्वतः निसर्गाच्या क्रुपेने मात केली आहे ! त्याना लसीची गरज नाही ! मग हे कसे ओळखायचे की त्याना गरज नाही ? तर सर्वाना एक पर्याय द्यावा की अँटिबॉडी टेस्ट तरी करून सिद्ध करा की तुम्ही रोगप्रतिकारक्षम आहात नाहीतर सक्तीने लस घ्या ! या माझ्या तर्कटात काही गफलत असेल तर सन्माननीय अभ्यासू लोकांनी माझा तर्क खोडून काढला तरी मला आनंद आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 12/10/2020 - 10:24

In reply to माझा आपला एक अन्दाज. by चौकटराजा

Permalink

अँटिबॉडी टेस्ट तरी करून सिद्ध

अँटिबॉडी टेस्ट तरी करून सिद्ध करा की तुम्ही रोगप्रतिकारक्षम आहात नाहीतर सक्तीने लस घ्या ! लस फुकट दिली तरच सरकार ती घेण्यासाठी सक्ती करू शकते. बाकी अँटिबॉडी असल्या तर तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती असेलच असे नाही आणि अँटीबॉडी नसल्या म्हणून तुमची प्रतिकारशक्ती नाही असेही सिद्ध झालेले नाही. (टी सेल प्रतिकारशक्ती असू शकते) बाकी अँटीबॉडी टेस्ट करून तुम्हाला फक्त कोव्हीड झालेला होता एवढेच सिद्ध होऊ शकते. एकंदर काय सगळाच गोंधळ आहे सध्या अँटीबॉडी टेस्टची रुग्णांना पडणारी किंमत ७००-८०० रुपये आहे तेंव्हा येणारी लस अँटीबॉडी टेस्टपेक्षा स्वस्त असण्याची शक्यता जास्त आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by kool.amol on Wed, 12/09/2020 - 11:09

Permalink

ह्याची काही मदत होईल

कोरोना लस नेमकी काय आहे ह्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न, ह्या लिंकवर वाचू शकता किंवा koolamol.wordpress.com इथे पण वाचता येईल https://bit.ly/39AW3xb
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 12/09/2020 - 13:33

In reply to ह्याची काही मदत होईल by kool.amol

Permalink

माहितीपूर्ण....

दुव्यावरील लेखन माहितीपूर्ण आहे, आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by kool.amol on Wed, 12/09/2020 - 14:04

In reply to माहितीपूर्ण.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

धन्यवाद

धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on गुरुवार, 12/10/2020 - 17:20

In reply to ह्याची काही मदत होईल by kool.amol

Permalink

धन्यवाद ! आदाब !

सदर लेख पूर्णपणे वाचला काही स्पष्टीकरणे अगदी इम्युनॉलोजिस्ट लोकाना समजतील अशी आहेत. अर्थात ते कोणत्याही ज्ञान शाखेत होत असते ! या लेखाप्रमाणे मानव एक जैविक " ब्रेक थ्रू " वर येऊन ठेपला आहे असे वाटत आहे. आपण अशा करू की ही सनातन लढाई मानव जिंकेल. मी जन्माला आलो त्यावेळी डी एन ए चा शोध लागला आता मरण्यापूर्वी काहीतरी भन्नाट बातमी ऐकावी म्हणतो ! धन्यवाद या लेखाबद्दल !
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on गुरुवार, 12/10/2020 - 17:44

In reply to धन्यवाद ! आदाब ! by चौकटराजा

Permalink

चौरा,

अहो, शतायुषी व्हाल तुम्ही. तेव्हा बऱ्याच भन्नाट बातम्या ऐकायला मिळणार आहेत. काळजी नसावी. शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Wed, 12/09/2020 - 11:31

Permalink

गुंतागुंत....

चौरा,
एक पर्याय द्यावा की अँटिबॉडी टेस्ट तरी करून सिद्ध करा की तुम्ही रोगप्रतिकारक्षम आहात
विषय इतका सरळ नसून गुंतागुंतीचा आहे. नेहमीच्या ‘फ्लू’ विषाणूंच्या तुलनेत सध्याच्या विषाणू संदर्भात शरीराचा अँटीबॉडीज प्रतिसाद बराच वेगळा व काही वेळेस विचित्र आलेला आहे. काही ठळक मुद्दे : १. सहसा संसर्गनंतर तीन आठवड्यांनी अँटीबॉडीची पातळी चांगली असते. सध्याच्या संसर्गात अगदी 10 ते 12 व्या दिवसापासून देखील अँटीबॉडीची पातळी मोजण्याइतकी दिसून आली. २. अँटीबॉडी चाचणी ++ असतानाही काही रुग्ण RT-PCR + दाखवत आहेत. ३. शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीजपैकी काही ठराविकच विषाणूमारक प्रकारच्या आहेत. पण त्यामुळे प्रत्येक रुग्णाला भावी संरक्षण मिळेलच असे नाही. काहींच्या बाबतीत तर त्यांनी शरीराला अधिक इजा घडवली. त्यामुळेच मूळ आजार वाढत गेला. ४. एखाद्या व्यक्तीत अँटीबॉडीज असल्या तरीही तो इतरांसाठी रोगप्रसारक ठरू शकतो. त्यामुळे या चाचणीकडे ‘सुरक्षा चाचणी’ म्हणून पाहता येणार नाही. (काही लोक कामवाल्या व्यक्तींना बोलावण्यासाठी याचा आधार घेत आहेत). या चाचणीतून आपण सुरक्षेबाबत खात्रीशीर काही बोलू शकत नाही. **** लस घ्यावी की नाही हा वेगळा मुद्दा राहील. ................................................ अमोल, चांगला दुवा.
  • Log in or register to post comments

Submitted by kool.amol on Wed, 12/09/2020 - 14:06

In reply to गुंतागुंत.... by हेमंतकुमार

Permalink

धन्यवाद

ह्या शंकाबद्दल आता लिहिणार आहे. ह्यावर सध्या सर्वत्र चांगली चर्चा सुरू आहे. त्यातल्या काही शंकांची उत्तरं देता आली तर प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments

Submitted by kool.amol on Wed, 12/09/2020 - 14:06

In reply to गुंतागुंत.... by हेमंतकुमार

Permalink

धन्यवाद

ह्या शंकाबद्दल आता लिहिणार आहे. ह्यावर सध्या सर्वत्र चांगली चर्चा सुरू आहे. त्यातल्या काही शंकांची उत्तरं देता आली तर प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Wed, 12/09/2020 - 12:30

Permalink

हे महत्वाचे

२. अँटीबॉडी चाचणी ++ असतानाही काही रुग्ण RT-PCR + दाखवत आहेत. . एखाद्या व्यक्तीत अँटीबॉडीज असल्या तरीही तो इतरांसाठी रोगप्रसारक ठरू शकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Wed, 12/09/2020 - 14:36

Permalink

रच्याकने...

"लसीची सक्ती नको; प्रबोधन हवे " असे दस्तुरखुद्द जागतिक आरोग्य संघटनाच म्हणते आहे . काळजी नसावी !
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Wed, 12/09/2020 - 15:49

Permalink

हे काय असावे ...?

In most people, this innate response slows down the infection and controls it, allowing the final immune layer – your adaptive immune system – to come into play. Adaptive immunity consists of antibodies made by B cells and antiviral cell-killing T cells. Both B and T cells develop to fight specific threats, learning on the job during an infection. This response usually takes a bit of time to kick in but has the added benefit that when it is there it can stay around for years, developing a memory of past infections.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Wed, 12/09/2020 - 15:59

In reply to हे काय असावे ...? by चौकटराजा

Permalink

ता क

वरील लेखात लेखक म्हणतो की जरी काही माणसात " बरे झाले " असण्याची पात्रता असली तरी त्याना हे कवच किती काल पर्यन्त उपयुक्त ठरेल हा प्रश्न शिल्लक रहातोच ! सबब म्हातारे कोतारे , पोटुशा स्त्रिया यांच्यासाठी तरी लस हाच उपाय आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Wed, 12/09/2020 - 16:10

Permalink

चौरा,

आपल्या प्रतिकारशक्तीचे दोन मोठे विभाग आहेत; १. अँटीबॉडीज आणि २. विशिष्ट प्रकारच्या पांढऱ्या पेशी ( T cells). 1.antibodies : ही प्रथिने दोन प्रकारची असतात : a.. मारक (Neutralizing) b.. अ-मारक यापैकी फक्त पहिल्याच प्रकारची प्रथिने त्या विषाणूने पुन्हा हल्ला केल्यास उपयुक्त ठरतात. ज्या रुग्णांत/ व्यक्तीत ही प्रथिने भरपूर तयार झाली असतील, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असेल. (अर्थात अशी प्रथिने किती काळ रक्तात टिकू शकतील, हे अद्याप निर्विवाद स्पष्ट झालेले नाही). पण ज्यांच्यात दुसऱ्या प्रकारची प्रथिने जास्त असतील, त्यांना हा फायदा होणार नाही. कारण ही प्रथिने त्या विषाणूचा (पुढच्या संसर्गात) नाश करू शकत नाहीत. २. अँटीबॉडीज आणि T पेशींची मोजणी वेगवेगळ्या पद्धतीने करावी लागते. अँटीबॉडीजची मोजणी तुलनेने सोपी असल्याने नेहमीच्या प्रयोगशाळेत होते. याउलट पेशींची मोजणी संशोधन पातळीवर करावे लागते. ती गुंतागुंतीची असते. तसेच त्या पेशी नेहमीच रक्तप्रवाहात सापडत नाहीत. ज्या रुग्णांमध्ये अँटीबॉडीज आहेत त्यांच्यात T सेल्सची निर्मिती नेहमीच झालेली असेल असे मात्र नाही. विविध रुग्णांमध्ये वेगवेगळे प्रतिसाद आढळलेले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर कांदळकर on गुरुवार, 12/10/2020 - 06:54

Permalink

छान समयोचित लेख ........

तोही तज्ञ व्यक्तीकडून. छान वाटले. अनेक अनेक धन्यवाद. रच्याकने -७० तापमानात साठवणे, वाहून नेणे भारतात कसे काय जमणार आहे कोण जाणे. शहरात ठीक, गावात कठीण दिसते. वीज गायब होणे, निष्काळजीपणा, दुर्लक्ष वगैरे व्यत्यय येतीलच. किंमतीत प्रचंड वाढ होईल. सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता. सबसिडीतून भ्रष्टाचार उद्भवेल. आईस क्रीम ट्रक वाहनांसारखी पण छोटीदेखील शीतवाहने वापरात येतील. रुग्ण इतिहासाबरोबर साठवण, वाहतूक याचाही इतिहास नोंद करावा लागेल. त्यातून -७० तापमानाची लस जास्त परिणामकारक ठरली आणि सर्व लसी उपलब्ध असतील तर निवडीचा निर्णय घेणे कठीण जाणार.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 12/10/2020 - 09:55

Permalink

जशी कोव्हीड होऊन बरे झालेल्या

जशी कोव्हीड होऊन बरे झालेल्या लोकांमध्ये प्रतिपिंडे किती दिवस राहतात आणि मूळ रोगाविरुद्ध निर्माण झालेल्या प्रतिकारशक्ती मुळे किती संरक्षण मिळते याबद्दल लस तयार करणाऱ्या कंपन्या ठणाणा करत आहेत ( धंद्याचा भाग ) पण आज पर्यंत एकही वैद्यकीय तज्ञ लसीमुळे निर्माण होणारी प्रतिपिंडे किती दिवस राहतात आणि लसीमुळे निर्माण झालेल्या प्रतिकारशक्ती मुळे किती संरक्षण मिळते आणि लस घेतल्या मुले आयुष्यभर कोव्हीड पासून संरक्षण मिळते का याबद्दल एक अक्षरही बोलताना आढळत नाही. याचे कारण जगात आतापर्यंत कोव्हीड झालेले रुग्ण जवळ जवळ ६ कोटी ९२ लाख आहेत आणि त्यातून नैसर्गिक रित्या/ औषधोपचाराने पूर्ण बरे झालेले लोक जगात जवळ जवळ ५ कोटी आहेत. १५ लाख मृत्यू मुखी पडले आहेत आणि बाकी अजून पॉझिटिव्ह आहेत. आणि याचा गेल्या ८ महिन्याचा अनुभव आता जमेस आहे. याउलट लस हि फक्त काही हजार लोकात चाचणी झालेली आहे आणि ती सुद्धा फार तर २ महिने. त्यामुळे लस हि नैसर्गिक प्रतिकारशक्ती पेक्षा जास्त चांगली आहे असे सिद्ध करणारा एकही पुरावा कुणाकडेही नाही. असे असले तरी कोव्हीड रोगापासून आपले संरक्षण करण्यासाठी आपल्याकडे दुसरा कोणताही उपाय नाही. वारंवार हात धुणे हि सवय आयुष्यभरासाठी चांगलीच ठरेल पण महिनोन्महिने मुखवटा लावणे आणि योग्य अंतर बाळगणे हा अनैसर्गिक उपाय आहे आणि तो अनंत काळापर्यंत करत राहणे अशक्य आहे. लोकांनी आताच ते करणे सोडून दिलेले आहे. त्यामुळे ज्यांना मधुमेह हृदय किंवा मूत्रपिंडाचा विकार आहे आणि वयोवृद्ध व्यक्ती यांनी बाहेर पडण्यास सुरुवात करण्या अगोदर प्राधान्याने लस टोचून घेणे हे शहाणपणाचे ठरेल. सुदृढ आणि तरुण व्यक्ती नि लस सार्वत्रिकपणे उपलब्ध होईपर्यंत थांबणे ( इतर वृद्ध आणि आजारी व्यक्तींसाठी) हे इष्ट ठरेल. ज्यांना कोव्हीड आजार झाला आहे त्यांनी लस स्वस्तात उपलब्ध होईपर्यंत थांबले तरी चालेल. कारण अशा लोकांना लस घ्यायची वेळ येईपर्यंत हि साथ बहुधा संपलेली असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on गुरुवार, 12/10/2020 - 10:17

Permalink

चांगल्या चर्चेबद्दल वरील

चांगल्या चर्चेबद्दल वरील सर्वांना धन्यवाद. सुधीर, लसीकरणासाठीच्या ग्रामीण भागातील अडचणी तुम्ही योग्यपणे दाखवून दिल्या आहेत. सुबोध, समतोल प्रतिसाद आवडला.
ज्यांना मधुमेह हृदय किंवा मूत्रपिंडाचा विकार आहे आणि वयोवृद्ध व्यक्ती यांनी बाहेर पडण्यास सुरुवात करण्या अगोदर प्राधान्याने लस टोचून घेणे हे शहाणपणाचे ठरेल.
>>>> + 111111
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on गुरुवार, 12/10/2020 - 14:01

Permalink

चे फायदे, मर्यादा ,इ....

सध्या इंग्लंडमध्ये फायझर कंपनीची वापरून लसीकरण सुरू झालेले आहे. ही लस mRNA या नव्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. तिचे फायदे, मर्यादा आणि संभाव्य दुष्परिणाम याबद्दल काही माहिती: फायदे १. शरीरात टोचल्यानंतर ही पेशींमध्ये सहज पोचते. २. ती उत्पादन करताना त्यात प्रत्यक्ष विषाणू वापरत नाहीत. त्यामुळे ती काही पारंपरिक लसिपेक्षा अधिक सुरक्षित असते. या लसीचे दोन डोस द्यावयाचे असल्यामुळे हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. ३. तिचे उत्पादनही निर्धोकपणे करता येत असल्याने ते मोठ्या प्रमाणात व वेगात करता येते. ४. मान्यता मिळण्याआधीच्या प्रयोगांमध्ये ही लस टोचल्यानंतर संबंधित लोकांमध्ये अँटीबॉडीज आणि टी- सेल्स असे दोन्ही प्रतिसाद चांगले आलेले आहेत. मर्यादा १.तंत्रज्ञान नवीन आहे त्यामुळे या लसीपासून मिळणारी सुरक्षा किती काळ असेल हे आज सांगता येणार नाही. २. ही लस प्रत्यक्ष श्वसनमार्गामध्ये स्थानिक प्रतिकारशक्ती कितपत देईल याबाबत शंका आहे. दुष्परिणाम कुठलीही लस टोचल्यानंतर टोचलेल्या ठिकाणी वेदना, लाल होणे थोडाबहुत ताप येणे या गोष्टी काही लोकांमध्ये होऊ शकतात. सध्या या लसी संदर्भात अशी सूचना देण्यात आलेली आहे, की ज्यांना कुठलेही औषध, अन्नपदार्थ अथवा अन्य एखाद्या लसीची पूर्वी तीव्र एलर्जी आली असेल, तर त्यांनी ही लस घेऊ नये.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on गुरुवार, 12/10/2020 - 16:31

Permalink

असे आहे काय ...?

विशिष्ट विषाणूच्या काटेरी मुकुटाचा अभ्यास केल्यानन्तर तो काटा बधीर -गुळगुळीत करण्याचे कार्य करणारे अतिविशिष्ट केमिकल शरीर तयार करते त्यामुळे विषाणूचा पेशीप्रवेश अवघड होऊन बसतो. तसेच हे कार्य काही प्रमाणात सनिटायझर व ह्न्डवॉश शरीराच्या बाहेर देखील करतात. म्हणजे धुताना गळून पडलेला विषाणू आत जेनेटिक मटेरिअल असून तसा विद्धच होतो. हे झाले विषाणू विरोधी केमिकल युद्ध ! शरीरात जेंव्हा बाह्य जैविक वस्तूचा प्रवेश होतो त्यावेळी विशिष्ट पेशी त्याना ओळखतात व तसा सन्देश टी सेल ना देतात ज्यायोगे टी सेल त्या जैविक अगान्तुकाला जैविक युद्ध ( चक्क मारामारी ) करून मारतात. ट्रान्स्प्लान्ट ऑपरेशन चे वेळी यासाठीच टी सेल ना पुरते ( पण तात्पुरते) नामोहरम करावे लागते ना ? ( इम्युनो सप्रेशन ???).मात्र बीजफलनाचे चे अगोदर असाच एक अगांतुक स्त्री चे शरीरात आल्यावर मात्र टी सेल त्याला काहीही करत हे या सृष्टीचे कवतिक म्हणावे काय ? शेवटी --- शरीरात कितीही टी सेल चे सैन्य असले तरी शत्रू सैन्य जबर असेल ( क्रिटिकल व्हायरल लोड ) तर माणूस हरतो किंवा थोडे शत्रू सैन्य जरी आले तरी टी सेल चे प्रमाण त्यापेक्शाही कमी झाल्याने ( वय , मधुमेह , मुत्रपिन्ड विकार ई ???? ) माणूस हरतो असे असावे !
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 12/10/2020 - 16:46

Permalink

लशीला उशीर....

भारतात लशीच्या सुरक्षितता याबाबत अजून काही तपशील हवे असल्यामुळे लशीला अजून दोनेक महिने लागतील अशी काही तरी पाहण्यात आली. संदर्भ विसरलो. -दिलीप बिरुटे (विसरभोळे प्राध्यापक)
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on गुरुवार, 12/10/2020 - 17:58

Permalink

मला वाटतय ज्या दिवशी इंग्लंड

मला वाटतय ज्या दिवशी इंग्लंड किंवा अमेरिका Oxford च्या लशी ला मान्यता देईल त्या नंतरच आपल्या हिथे लसीकरणाची ची मान्यता मिळेल. तो पर्यंत चल ढकल चालू राहील.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on गुरुवार, 12/10/2020 - 18:59

Permalink

+१ १

प्रा डॉ.>> +११ रा चा,
ज्या दिवशी इंग्लंड किंवा अमेरिका Oxford च्या लशी ला मान्यता देईल
>>> मुद्दा बरोबर आहे सध्या ऑक्सफर्ड लसीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात असून पहिल्या दोन टप्प्यांचे निष्कर्ष समाधानकारक आहेत. शेवटच्या टप्प्यातील निष्कर्ष नाताळपर्यंत येणे अपेक्षित आहे. या लसीची साठवण सोपी असून त्यासाठी नेहमीचे सामान्य फ्रीजचे तापमान पुरते. त्यामुळे भारतात तिला मान्यता मिळाल्यास ते बरेच होईल.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com