मनोरंजक किस्से

Primary tabs

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amमनोरंजक किस्से

क्रिकेट मैदानात अत्यंत गांभिर्याने खेळले जात असले तरी मैदानात अनेक विचित्र व हास्यास्पद प्रसंग घडत असतात. काही वेळा नियमांचा गैरवापर किंवा स्पष्ट नियम नसल्यामुळे खेळाडूंनी गैरफायदा घेतलेला आहे. असेच काही मनोरंजक प्रसंग . . .


प्रेशरचा परीणाम

१९८८ मध्ये न्यूझीलंडचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला होता. बंगळुर कसोटीच्या आदल्या दिवशी न्यूझीलंडच्या ५ खेळाडूंना भारतीय जेवण बाधल्याने ते आजारी पडले होते. तरीसुद्धा ते खेळत होते. परंतु सामना सुरू असताना काही जणांना अस्वस्थ वाटत असल्याने शेवटी पूर्वीच निवृत्त झालेला व समालोचन करणारा जेरमी कोनी व अजून एक समालोचक केन निकोल्सन राखीव खेळाडू म्हणून मैदानात आले. काही वेळानंतर इवेन चॅटफिल्ड गोलंदाजीला आला. तो चेंडू घेऊन धावत स्टंपापर्यंत आला व चेंडू न टाकता तसाच धावत पुढे गेला. नंतर फलंदाज व यष्टीरक्षकाला ओलांडून तो धावत जाऊन पॅव्हिलियन मध्ये गेला. सर्व खेळाडू व प्रेक्षक पूर्ण गोंधळून पहात होते. नंतर समजले की त्याला पोटात कळा येऊन जोरदार प्रेशर आले होते. त्यामुळे चेंडू न टाकता तो धावत जाऊन थेट टॉयलेट मध्ये घुसला.

missing
इवेन चॅटफिल्ड

याचीच पुनरावृत्ती २०१७ मध्ये गहुंजे कसोटीत झाली. ऑस्ट्रेलियाने फलंदाजी सुरू केल्यानंतर वॉर्नर व रेनशॉ सलामीला आले. जवळपास दीड तास फलंदाजी करून वॉर्नर बाद झाल्यानंतर वॉर्नर बरोबर रेनशॉ सुद्धा पॅव्हिलियन मध्ये गेला कारण त्याला जोरदार प्रेशर आले होते.

missing
मॅट रेनशॉ

नियम नसल्याचा गैरफायदा

४० वर्षापूर्वी म्हणजे १५ डिसेम्बर १९७९ मध्ये इंग्लंड ऑस्ट्रेलिया यांच्यातील पर्थ येथे खेळल्या गेलेल्या अ‍ॅशेस सिरीज सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डेनिस लिली बॅटिंग करत होता तेव्हा त्याने आयन बोथमचा एक बॉल एक्स्ट्रा कव्हरला तडकावला आणि एक मोठा आवाज झाला. यावेळी ऑस्ट्रेलियाची अवस्था ८ विकेटवर २१९ अशी होती. आवाज कसला झाला याचा तपास केला गेला तेव्हा लिली लाकडाऐवजी अल्युमिनीयम पासून बनविलेल्या बॅटचा वापर करत असल्याचे लक्षात आले. लिलीने ही बॅट १२ दिवस अगोदर झालेल्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात वापरली होती पण तेव्हा कुणी आक्षेप घेतला नव्हता.

इंग्लंड विरुद्ध सामन्यात मात्र इंग्लंडचा कप्तान माईक ब्रियर्ली याने या बॅटमुळे चेंडूचा आकार बदलू शकतो असा आक्षेप घेतला आणि अम्पायरनी लिलीला ही बॅट वापरता येणार नाही असे सांगितले. लिलीने त्यावर क्रिकेट रूल बुक मध्ये लाकडाचीच बॅट वापरली पाहिजे असा कुठेही नियम नसल्याचे निदर्शनास आणून दिले आणि रागाने बॅट फेकून दिली. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा कप्तान ग्रेग चॅपलने त्याची समजूत घालून लाकडी बॅट वापर असे समजावले. मात्र तेव्हाचा क्रिकेट रूल बुक मध्ये लाकडी बॅटचाच वापर केला पाहिजे असा नियम बदल केला गेला.

missing
डेनिस लिली

१५ जानेवारी १८९४ रोजी व्हिक्टोरिया आणि ऑस्ट्रेलियाच्या स्क्रॅच ११ या दोन संघांमध्ये बॉनबरी मैदानावर एक क्रिकेट सामना खेळवण्यात आला. सामन्याच्या पहिल्या चेंडूवरच फलंदाजाने जोरदार उंच फटका मारला. फलंदाजाने मारलेला चेंडू मैदानातच असणाऱ्या एका निलगिरीच्या उंच झाडावर जाऊन अडकला. इकडे खेळपट्टीवर दोन्ही फलंदाज न थांबता धावा घेत राहिले. जोपर्यंत चेंडू झाडावरून खाली उतरवला जातोय तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी २८६ धावा काढल्या होत्या. या दरम्यान फलंदाजांनी खेळपट्टीमध्ये जवळपास ६ किलोमीटरचे अंतर धावले होते.

निलगिरीचे झाड मैदानाच्या मध्येच होते. त्यावर चेंडू अडकल्याने गोलंदाजी करणार्‍या संघाने एकामागोमाग एक धावा काढणाऱ्या फलंदाजांना रोखण्यासाठी पंचांना चेंडू हरवला म्हणून घोषित करण्याची विनंती केली. मात्र झाडावर अडकलेला चेंडू स्पष्ट दिसत असल्याने त्याला हरवला म्हणून घोषित करता येणार नाही, असे सांगून पंचांनी विनंती धुडकावून लावली. त्यानंतर कुणालातरी कुऱ्हाड आणण्यासाठी पाठवले, मात्र त्यालाही कुऱ्हाड मिळाली नाही असे सांगण्यात येते.

इकडे झाडावर चेंडू अडकला आहे आणि तिकडे फलंदाज धावा काढत आहेत, यामुले चिंतीत असणाऱ्या गोलंदाजी करणार्‍या संघाने शेवटी कुणाच्यातरी घरून बंदूक मागवली आणि नेम धरून चेंडू झाडावरून खाली पाडला. चेंडू खाली पाडतेवेळी क्षेत्ररक्षण करणारे इतके हताश झाले होते की, त्यांच्यापैकी कुणीही चेंडू झेलायचा प्रयत्न केला नाही. चेंडू जर झेललाअसता तर फलंदाजांनी धावलेल्या सर्व धावा शून्य झाल्या असत्या. चेंडू खाली आल्यावर फलंदाजी करणार्‍या संघाने एका चेंडूत २८६ धावा काढून आपला डाव घोषित केला. हा एक विक्रम आहे.

क्रिकेटबद्दल माहिती देणाऱ्या विश्वसनीय अशा ESPNcricinfo वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या एका ब्लॉगमध्ये केईकेत लेखक मायकल जोन्स यांनी सांगितले आहे की, या बातमीचा एकमात्र संदर्भ इंग्रजी वर्तमानपत्र Pall Mall Gazette असल्याचे मानले जाते. त्याच वर्तमानपत्राच्या खेळविषयक पानावर याची बातमी छापण्यात आली होती. त्यानंतर ती बातमी इंग्लंड, ऑस्ट्रेलियासहित अमेरिकेतील वर्तमानपत्रातही छापण्यात आली होती.

एका दगडात दोन पक्षी

२००३-०४ मध्ये वेस्ट इंडीज दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेले होते. मालिकेतील पहिले तीनही कसोटी सामने जिंकून आफ्रिकेने आधीच मालिका जिंकली होती.

त्या मालिकेत आंद्रे नेलने पहिल्या ३ कसोटीत एकूण १७ फलंदाज बाद केले होते. चौथा कसोटी सामना १६ जानेवारी २००४ पासून सेंच्युरियन मैदानावर खेळला जाणार होता. तेथील पाटा खेळपट्टीमुळे चौथ्या कसोटी सामन्यात आपला समावेश संघात होणार नाही असा नेलचा अंदाज होता. त्यामुळे नेल व त्याची प्रेयसी जीन विट्झने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी १७ जानेवारीस आपले लग्न करायचे ठरविले. आमंत्रणे गेली व लग्नासाठी बेनोनी गावातील चर्चही निश्चित झाले.

परंतु सामन्याच्या आदल्या दिवशी नेलचा संघात समावेश जाहीर झाला. आता आली का पंचाईत.

सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ अपुऱ्या प्रकाशामुळे थोडा आधी थांबविण्यात आला. नेल दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताक्षणी हेलिकॉप्टरने बेनोनीला पोहोचला. त्याच दिवशी संध्याकाळी लग्न पार पडले.

नेल परत येऊन तिसऱ्या दिवशी सकाळी मैदानात उतरला. तिसऱ्या दिवशी त्याने दोन वेळा ब्रायन लाराला बाद करून लग्न साजरे केले.

missing
आंद्रे नेल

हा द्वारकानाथ संझगिरींनी सांगितलेला किस्सा -

२००७ मधील विश्वचषक स्पर्धेत एक फलंदाज एका वेगवान गोलंदाजासमोर चाचपडत होता. त्याला धावा करता येत नव्हत्या, पण तो बादही होत नव्हता. मी प्रेक्षकात बसलो होतो. इतक्यात एक बाई उठून गोलंदाजाला हाक मारून मोठ्या आवाजात ओरडली, "Enough of foreplay. Now we want some penetration." (तिचं वाक्य मी इंग्रजीतच ठेवलं कारण काही विनोद इंग्रजीतच चांगले वाटतात. मुख्य म्हणजे चावट वाटत नाहीत). ते ऐकून प्रेक्षकांना हसू आवरले नाही.

कालातीत कसोटी सामना (Timeless Test Match)

दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी २ फलंदाजांच्या शतके आणि ३ फलंदाजांच्या अर्धशतकांच्या मदतीने ५३० धावा केल्या. दक्षिण आफ्रिका संघाचा पहिला डाव तीन दिवस चालला. तिसऱ्या दिवशी इंग्लंडने आपला पहिला डाव खेळण्यास सुरुवात केली. परंतु ते केवळ ३१६ धावांवरच गारद झाले होते. इंग्लंडच्या कोणत्याच फलंदाजाला पहिल्या डावात शतक साजरे करता आले नाही. इंग्लंडने ३१६ धावा जोडण्यासाठी २ दिवस घेतले. पाचव्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंदाजांना त्रास द्यायला सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव ४८१ धावांवर संपला.

इंग्लंड संघाला विजयासाठी मिळाले होते ६९६ धावांचे आव्हान.

दुसऱ्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी तुफान फलंदाजी करत ५ विकेटच्या मोबदल्यात ६५४ धावा केल्या. इंग्लंड संघाच्या दुसऱ्या डावात एका फलंदाजाने द्विशतक ठोकले, तर दोन फलंदाजांनी शतक साजरे केले. हा कसोटी सामन्याचा १२ वा दिवस होता. जेव्हा १२ वा दिवस संपला, तेव्हा इंग्लंडला विजयासाठी ४२ धावांची आवश्यकता होती. परंतु वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंड संघाने सर्वांच्या परवानगीने सामना पंचांना अनिर्णित घोषित करण्याची अपील केली. खरंतर इंग्लंडच्या खेळाडूंना जहाजामार्फत समुद्रमार्गाने आपल्या देशात परतायचे होते. अशामध्ये इंग्लंडने १४ मार्चला खेळ संपल्यानंतर सामना मध्येच सोडत पुन्हा परतण्याचा निर्णय घेतला. कारण इंग्लंड संघाला सामना जिंकायचा असता, तर त्यांना दुसऱ्या दिवशीही फलंदाजी करावी लागली असती. अशामध्ये त्यांना आपल्या जहाजाचा त्याग करावा लागला असता. शेवटी हा ‘टाईम लेस कसोटी सामना’ संपला. परंतु या सामन्याला कसोटी इतिहासातील सर्वात मोठा सामना म्हणून कायमची ओळख मिळाली.


प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

14 Nov 2020 - 3:13 pm | अमरेंद्र बाहुबली

रोचक किस्से. आवडले

सौंदाळा's picture

14 Nov 2020 - 11:12 pm | सौंदाळा

मस्त किस्से
दिवाळी अंकात श्रीगुरुजींचा लेख बघून सुखद धक्का बसला

प्राची अश्विनी's picture

25 Nov 2020 - 11:11 am | प्राची अश्विनी

हेच म्हणायचंय.

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 2:09 pm | टर्मीनेटर

@श्रीगुरुजी

'मनोरंजक किस्से'

आवडले  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

सुधीर कांदळकर's picture

15 Nov 2020 - 5:12 pm | सुधीर कांदळकर

लिलीला ऑसी पंचांनी डोक्यावर चढवले होते. अ‍ॅल्यू बॅटची बातमी वाचल्याचे आठवते.

२८६ धावांचा आकडा ठाऊन नव्हता. बाकी बहुतेक कणेकरी मध्ये आहे. पुन्हा वाचायला मजा आली.

कालमर्यादा नसलेल्या सामन्याबद्दल फार पूर्वी कुठेतरी कधीतर वाचले होते पण इथे नेमकी तपश्गीलवार माहिती दिलीत त्यामुळे रंगत वाढली. सुरेख लेखाबद्दल धन्यवाद.

श्रीगुरुजी's picture

15 Nov 2020 - 10:41 pm | श्रीगुरुजी

अमरेंद्र बाहुबली, सौंदाळा, टर्मीनेटर, सुधीर कांदळकर,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

दुर्गविहारी's picture

15 Nov 2020 - 10:55 pm | दुर्गविहारी

मस्त ! मि.पा.वर पुनरागमनाबध्दल शुभेच्छा ! :-)
बाकी किस्से मस्तच आहेत हे वेगळे सांगायला नको.चिड्कु आंद्रे नेलचा किस्सा माहिती नव्हता.श्रीशांत आणि नेलमध्ये झालेला वाद नेहमी आठवतो.कधीहि हा खेळाडू आवडला नाही.
आणखी असेच धमाल किस्से येउ द्या.

श्रीगुरुजी's picture

15 Nov 2020 - 11:17 pm | श्रीगुरुजी

धन्यवाद दुर्गविहारी!

श्रीशांतचे दोन किस्से आहेत.

२००६-०७ मध्ये भारत आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला असताना आफ्रिकेचा फलंदाज जॅकस रूडॉल्फने श्रीशांतवर टीका केली होती. श्रीशांतचे वाजवीपेक्षा जास्त कौतुक झाले आहे व मी त्याला वेगवान गोलंदाज मानतच नाही असे तो बोलला होता. परंतु श्रीशांतने लगेच झालेल्या सराव सामन्यात रूडॉल्फला दोन्ही डावात पहिल्याच चेंडूवर शून्य धावात बाद करून आपला इंगा दाखविला होता.

त्याच मालिकेतील पहिल्या कसोटीत आंंद्रे नेल सातत्याने भारतीय खेळाडूंंना टोमणे मारत होता. श्रीशांत फलंदाजीस आल्यानंतर नेलच्या एका चेंडूवर श्रीशांतने उत्तुंग षटकार मारला व नंतर खेळपट्टीवरच नेलला खिजवणारा नाच केला होता.

हाच तो नाच https://youtu.be/pqVDGHMCr10

श्रीशांत व नेलची बाचाबाची, नंतर षटकार आणि श्रीशांतचा नाच https://youtu.be/vLep7mEC34Y

चित्रगुप्त's picture

16 Nov 2020 - 12:26 am | चित्रगुप्त

मला क्रिकेटातले काही म्हणजे काहीही कळत नाही आणि आजपर्यंत मी एकही सामना टीव्हीवर सुद्धा बघितलेला नाही, परंतु या लेखातले किस्से वाचून मजा आली. मस्त लिहीले आहे.

हा पण एक रोचक किस्सा ;)

फारएन्ड's picture

16 Nov 2020 - 1:49 am | फारएन्ड

मस्त किस्से! टाइमलेस टेस्ट बद्दल माहीत होते पण बाकी बरेचसे माहीत नव्हते. श्रीशांत चा डान्स पूर्वी पाहिलेला आहे. धमाल आहे तो :)

प्रचेतस's picture

16 Nov 2020 - 7:05 am | प्रचेतस

एकेक किस्से धमाल आहेत. मजा आली लेख वाचून.
मिपावर येत जा हो श्रीगुरुजी.

बेकार तरुण's picture

16 Nov 2020 - 2:14 pm | बेकार तरुण

मस्त लेख... सर्व किस्से आवडले

बेकार तरुण's picture

16 Nov 2020 - 2:14 pm | बेकार तरुण

मस्त लेख... सर्व किस्से आवडले

पियुशा's picture

16 Nov 2020 - 5:35 pm | पियुशा

किस्से आवडले :)

मित्रहो's picture

16 Nov 2020 - 8:41 pm | मित्रहो

धमाल किस्से आहेत. काही माहित होते काही नाही. धमाल आली वाचताना मजेशीर किस्से मस्त.

श्रीगुरुजी's picture

17 Nov 2020 - 1:22 pm | श्रीगुरुजी

चित्रगुप्त, फारएण्ड, प्रचेतस, बेकार तरूण, पियुशा, मित्रहो,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

MipaPremiYogesh's picture

17 Nov 2020 - 8:53 pm | MipaPremiYogesh

छान विवेचन

बबन ताम्बे's picture

17 Nov 2020 - 9:34 pm | बबन ताम्बे

भारी किस्से आहेत क्रिकेटचे.
बिशनसिंग बेदीने सांगितलेला एक किस्सा वाचनात आला होता. त्याने बहुतेक1965 साली किंवा त्या नंतर (साल नक्की आठवत नाही मला)कसोटी पदार्पण केले. त्याने सांगितलेय की तेव्हा एका दिवसाचे त्यांना पन्नास रुपये असे पाच दिवसांच्या कसोटीचे अडीचशे रुपये मिळत. एखादे वेळी कसोटी चार दिवसात संपली तर चारच दिवसांचे पैसे मिळत. परदेश दौऱ्यावर वर तर म्हणे आमच्या बरोबर डॉकटर पण नसायचे. एकदा इंग्लंड दौऱ्यात त्याचे पोट दुखत होते, तर त्याला लंडन मध्ये गायन्याकोलॉजिस्टकडे उपचाराला नेले होते . ☺️

गामा पैलवान's picture

18 Nov 2020 - 2:42 am | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

याची देही याची डोळा तुमचा लेख पाहून भरून पावलो. किस्से लई धम्माल आहेत.

एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात की :

चेंडू खाली पाडतेवेळी क्षेत्ररक्षण करणारे इतके हताश झाले होते की, त्यांच्यापैकी कुणीही चेंडू झेलायचा प्रयत्न केला नाही. चेंडू जर झेललाअसता तर फलंदाजांनी धावलेल्या सर्व धावा शून्य झाल्या असत्या.

हल्ली झेल घेण्यापूर्वी पूर्ण झालेल्या धावा सदर फलंदाजास मिळतात. या न्यायाने झेल घेतल्याने अपूर्ण राहिलेली केवळ एक धाव कमी झाली असती. बहुधा त्याकाळी नियम वेगळा होता.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

18 Nov 2020 - 11:37 pm | श्रीगुरुजी

>>> हल्ली झेल घेण्यापूर्वी पूर्ण झालेल्या धावा सदर फलंदाजास मिळतात. >>>

नाही. फलंदाज झेलबाद झाल्यास झेल घेण्यापूर्वी कितीही धावा पळून काढल्या तरी शून्य धावा मिळतात. खालील नियम पहा.

33.4 No runs to be scored

If the striker is dismissed Caught, runs from that delivery completed by the batsmen before the completion of the catch shall not be scored but any runs for penalties awarded to either side shall stand. Law 18.12 (Batsman returning to wicket he/she has left) shall apply from the instant of the completion of the catch.

फारएन्ड's picture

19 Nov 2020 - 4:54 am | फारएन्ड

रन आउट होण्याआधीच्या मिळतात. झेल घेतला तर नाही.

गापै - उगाच नवीन आय्डिया देउ नका आयसीसी/आयपीएल वाल्यांना. आधीच फार फलंदाजांच्या बाजूने नियम झाले आहेत :)

श्रीगुरुजी's picture

19 Nov 2020 - 8:52 am | श्रीगुरुजी

धावबाद होणे हा एकमेव अपवाद आहे. फलंदाज वाईड चेंडूवर धावबाद किंवा यष्टीचित झाला तरी वाईडची एक धाव मिळते.

>>> गापै - उगाच नवीन आय्डिया देउ नका आयसीसी/आयपीएल वाल्यांना. आधीच फार फलंदाजांच्या बाजूने नियम झाले आहेत :) >>>

ख्या ख्या ख्या . . .

गामा पैलवान's picture

19 Nov 2020 - 10:45 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

अहो, आमच्या गल्लीत झेलबाद होण्यापूर्वी धावून काढलेल्या धावा फलंदाजास मिळायच्या. आम्ही फलंदाजांच्या मेहनतीस पुरेपूर न्याय द्यायचो. हल्ली आंतरराष्ट्रीय क्रिकेट आमच्या गल्लीक्रिकेटासारखे पुरोगामी राहिले नाही. गेले ते दिवस ....

नियम ३३.४ ची ऐशीतैशी असो ! हा अन्यायकारक नियम कष्टकऱ्यांचे शोषण करणारा आहे. लाल बावटा झिंदाबाद.

आ.न.,
-गा.पै.

सुबोध खरे's picture

26 Nov 2020 - 9:53 am | सुबोध खरे

आ न
गा पै

उजवीकडून डावीकडे झुकल्याचे पाहून डोळे पाणावले

अभिजीत अवलिया's picture

19 Nov 2020 - 7:45 am | अभिजीत अवलिया

रोचक किस्से आहेत. 'कालातीत कसोटी सामना' ह्याबद्दल कधीच माहिती न्हवती.

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Nov 2020 - 10:46 am | ज्ञानोबाचे पैजार

या निमित्ताने गुरुजी मिपावर पुन्हा लिहिते झाले याचे समाधान आहे. आता थांबू नका गुरुजी.

सर्वात मोठ्या कसोटी सामन्याचा किस्सा माहित नव्हता. माझ्या आठवणीतल्या कसोटी सामन्यात तीन दिवसांनंतर एक विश्रांतीचा दिवस असायचा

बाकीचे किस्सेही आवडले

पैजारबुवा,

श्रीगुरुजी's picture

19 Nov 2020 - 1:13 pm | श्रीगुरुजी

धन्यवाद!

कसोटी सामन्यात पूर्वी ३ दिवसांनंतर विश्रांतीचा दिवस असायचा. कधीकधी २ दिवसांनंतर विश्रांतीचा दिवस असायचा. एका कसोटी सामन्यात तर पहिल्या दिवसानंतर विश्रांतीचा दिवस होता.

पूर्वी पाकिस्तानमधील कसोटी सामन्यात शुक्रवारी पहिल्या सत्राचा खेळ २ तासांऐवजी अडीच तासांचा असायचा. नंतर भोजनासाठी ४० मिनिटांऐवजी दीड तास खेळ बंद ठेवायचे कारण पाकी खेळाडूंना नमाज पढायचा असायचा.

टिलू's picture

19 Nov 2020 - 11:02 am | टिलू

द्वारकानाथ संझगिरींनी सांगितलेला किस्सा २००७ मधला नाही. बहुधा बराच जुना आहे - कदाचित ८० च्या दशकातला...

सोत्रि's picture

19 Nov 2020 - 1:02 pm | सोत्रि

धमाल किस्से!

-(क्रिकेट बघणे बंद केलेला) सोकाजी

सरिता बांदेकर's picture

22 Nov 2020 - 11:14 pm | सरिता बांदेकर

हल्ली क्रिकेट अजिबात बघत नाही. तरी क्रिकेटचे किस्से वाचायला, ऐकायला नेहमीच आवडतात.
मजा आली वाचताना आणखी वाचायला आवडेल

चौथा कोनाडा's picture

25 Nov 2020 - 5:10 pm | चौथा कोनाडा

बहारी आणि भारी किस्से, एकसेएक !

श्रीगुरुजी's picture

25 Nov 2020 - 7:44 pm | श्रीगुरुजी

सर्व प्रतिसादकांना मन:पूर्वक धन्यवाद!

श्रीगुरुजी's picture

25 Nov 2020 - 7:45 pm | श्रीगुरुजी

परवापासून भारत-ऑस्ट्रेलिया मालिका सुरू होत आहे. त्या मालिकेसाठी एक धागा सुरू करण्याचा विचार आहे.

नूतन's picture

26 Nov 2020 - 7:05 pm | नूतन

रोचक किस्से आवडले.