Skip to main content

एक प्रसंग, दोन कवी आणि दोन कलाकृती

लेखक सुनील यांनी सोमवार, 30/03/2009 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे? कचेरीत जाता-येताना गाणी ऐकणे हा माझा एक आवडता छंद. गाण्यांचे दोन संच आहेत. एक संच आहे जलद, उडत्या चालींतील गाण्याचा. अशी गाणी सकाळी कचेरीत जाताना ऐकली की, काम करायला जणू दुप्पट उत्साह येतो! आणि दुसरा संच आहे तो शांत, संथ लयीतील गाण्यांचा, जी रात्री घरी परतताना ऐकायला खूप बरी वाटतात! असंच परवा येताना हे गाणं लागलं होतं. हृदयनाथांचे संगीत आणि आशाबाईंचा आवाज हे दोन्ही श्रवणीयच परंतु त्याहीपेक्षा जास्त भावते ती भटसाहेबांची समर्थ लेखणी. यायला उशीर होणार हे माहीत होतेच. म्हणून संध्याकाळी कचेरीतच काहीतरी अरबट-चरबट खाऊन घेतले असल्यामुळे भूक नव्हती. झोपही येत नव्हती. शेल्फमधले एक पुस्तक काढले. लॉर्ड टेनीसन - एक प्रतिभावान कवी. Home they brought her warrior dead: She nor swooned, nor uttered cry: All her maidens, watching, said, 'She must weep or she will die.' लढाईवर गेलेल्या एका तरुण वीराचा मृतदेह घरी आणलेला. मागे उरलेत फक्त त्याची तरूण पत्नी आणि तान्हे मूल. कलेवराकडे दिग्मूढ होऊन बसलेली पत्नी आणि तिने आपला थोपवलेला आवेग मुक्त करावा, धाय मोकलून रडावे आणि आपले मन मोकळे करावे, अशा प्रयत्नात असलेले तिचे स्वकीय. हर प्रयनांनेही ती बधत नाही हे पाहिल्यावर, एक म्हातारी उठते आणि त्यांच्या तान्हुल्याला तिच्या मांडीवर ठेवते. तिच्या अश्रूंचा बांध आता फुटतो. Rose a nurse of ninety years, Set his child upon her knee-- Like summer tempest came her tears-- 'Sweet my child, I live for thee.' डोळे भरून येतात. पुढचे काही वाचवत नाही. बिछान्यावर पडतो आणि ते मघाशी ऐकलेले गाणे पुन्हा मनात रुंजी घालू लागते. आताच वाचलेली कविता आणि हे गाणे...कधी न उमगलेला, गाण्याचा हा नवा अर्थ हळू हळू उलगडू लागतो. एकच प्रसंग, दोन समर्थ कवींनी किती सुंदरतेने चितारलाय. अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे? .. .. उमलते अंगांग माझे, आणि तू मिटलास का रे? आणि मूळ गझलेत असलेले (पण गाण्यातून वगळलेले) ओठ अजुनी बंद का रे, श्वासही मधुमंद का रे? बोल शेजेच्या फुलांवर, तू असा रुसलास का रे? टेनीसन आणि सुरेश भट - दोघेही तोलामोलाचे आणि प्रतिभासंपन्न कवी. अकाली वैधव्य आलेल्या युवतीचे अंतरंग किती हळूवारपणे शब्दबद्ध केले आहे त्यांनी! टीप - भटसाहेबांच्या ह्या सदर गझलेचा हा मला (नव्याने) उमगलेला अर्थ. भटसाहेबांना हाच अर्थ अभिप्रेत होता काय, याविषयी मला निश्चित माहिती नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 30192
प्रतिक्रिया 80

प्रतिक्रिया

In reply to by गामा पैलवान

रसभंग करुन काहीही विधायक होणं असंभव कारण ती वृत्तीच मुळात निर्मितीशी विसंगत आहे. याला चांगल्या चाललेल्या गाडीचं बॉनेट उघडणं म्हणतात !

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर, मला इथे रसभंग झाल्याचं वाटंत नाही. रसहानी म्हणता येईल. शेवटचं कडवं फारसं कुणाला माहित नाही. ते वगळून गीत बघितलं तर संशयाचा फायदा द्यायला वाव आहे, असं माझं मत. आ.न., -गा.पै.

तब्बल साडे अकरा वर्षांनी हा धागा वर आला, अनेक जुने आयडी दिसले आणि स्मरणरंजन झाले. बाकी हे गाणं वरचा खुलासा कळल्यानंतर अनेकवेळा ऐकूनही ते विरहगीत/मृत्यूसमयीचं दु:खी गीत वाटत नाही. माझ्यापर्यंत तरी त्यातून 'का रे दुरावा' सारखा शृंगारीक भावच पोहोचतो.

सुंदर लिहिलं आहे. इंग्लिश कविता ही सुंदर ! असाही अर्थ आहे असं मध्यंतरी वाचण्यात आले होते. शेवटी जो अर्थ आपल्या मनात भिनलाय तोच आठवत राहणार.

सुंदर लिहिलं आहे. इंग्लिश कविता ही सुंदर ! असाही अर्थ आहे असं मध्यंतरी वाचण्यात आले होते. शेवटी जो अर्थ आपल्या मनात भिनलाय तोच आठवत राहणार.

In reply to by चौथा कोनाडा

कवीने ज्या अर्थाने काव्य लिहीले तो अर्थ, काव्याच्या लोकांनी लावलेला अर्थ यांसहीत एखादा काव्य रसिक वेगळाच अर्थ लावू शकतो.