मला लहाणपणी पिक्चर पहायला खूप आवडायचं! टिव्ही समोरून मी हलत नसे. खेडेगावातलं बालपण माझं! मी आजूबाजूला पहायची ती दुनिया अन् टिव्हीतली दुनिया यांत जमिनअस्मानाचा फरक. माझा इवला जीव त्यांत फार रमायचा. घरीदारी या वेडाची फार चेष्टा केली जाई. मला वाटे, आपल्या आयुष्यातपण काहितरी पिक्चरसारखं व्हावं! उन्हात पाऊस पडावा, आपल्याकडे बोलणारा पोपट असावा, पळत असताना आपले केस हिरोईनसारखे उडावे, विस्कटू नयेत, शाळेत वर्गात बसले असताना, वारा आला तरी नेमकी एकच बट गालावर यावी, सगळे केस पिंजारू नयेत, नंतर मोठी झाल्यावर ओढणी वार्याने उडून गेली तर वाटे, आता एखाद्या मुलाच्या तोंडावर जाऊन अडकते की काय? पण ती नेमकी एखाद्या दगडावर किंवा काटेरी झुडूपात तर कधी चक्क मातीत लोळत पडे! सगळ्या मैत्रिणी हसायच्या माझे मनातले विचार ऐकून! म्हणायच्या 'भोळसट आहेस अगदीच! असे कुठे पिक्चरसारखे होत असते होय?'
यथावकाश माझे लग्न झाले.नवरा अगदी हिरोसारखा दिसायला. मैत्रिणी चिडवायच्या, 'झाले तुझ्या मनासारखे. तू सारखी पिक्चर बघते ना म्हणून पिक्चरमधल्यासारखा नवरा मिळाला तुला.'
आता हळूहळू आयुष्याचा पिक्चर पुढे सरकू लागला. मुले झाली. शाळेत जाऊ लागली. दुसरीकडे नवरा यशाची शिखरे चढू लागला अन माणसे पायदळी तुडवू लागला! अन् मी जुन्या काळातील हिरोईनप्रमाणे सोशिक बाई बनू लागले.
आता मी वरवर अगदी हसून, सर्वांशी अगदी मिठ्ठास बोलत असे. छान झकपक कपडे, नट्टापट्टा करून सुखाचा संसार लोकांसमोर मिरवत असे. कार्यक्रम, समारंभात दागिने, साड्या दाखवून नवर्याची प्रतिष्ठा काटेकोरपणे सांभाळत असे. 'मेन्टेन करतेय' म्हणून शरिराची हेळसांड सहज लपत असे. घरी धाकट्या मुलाच्या खेळण्याच्या बाॅक्समधे, दर आठवड्याला एका आयोडेक्सच्या रिकाम्या बाटलीची भर पडायची. फुल बाहीच्या ड्रेसशिवाय मला जमेना. शेवटी मी एका प्रतिष्ठीत माणसाची बायको होते ना!
कधी माहेरी आले, तर मैत्रिणी हेवा करायच्या. म्हणायच्या, 'अगदी पिक्चरमधल्यासारखा, राजाराणीचा सुखाचा संसार मिळालाय तुला!' मग मी पण हिरोईनसारखं गोड हसायचे अन विषय टाळायचे. पण घरी माहेरच्या लोकांसमोर मात्र ' सांगताही येईना अन गप्पही बसवेना' असे व्हायचे. पण तीही लोकं कसली वस्ताद! मी सहज सांगतेय असे दाखवून, काही किरकोळ तक्रार करताच ' तुला सुख बोचतंय! दुसरं काही नाही. एवढा चांगला संसार मिळालाय, त्याची माती करू नको. गुणाने रहा! ', असे म्हणून माझे तोंडच बंद करायची.
पिक्चर त्याच्या वेगाने पुढे सरकत होता. पण सगळे सुरळीत चालले, तर तो कसला पिक्चर? एक मोठा ट्विस्ट आला! एक दिवस दुपारी मुले शाळेत गेली होती. काही खरेदीच्या निमित्ताने आम्ही दोघेच गाडीने जरा लांबच्या ठिकाणी निघालो होतो. मुले शाळेतून यायच्या आत घरी परतायची घाई होती. नवरा नेहमीप्रमाणे सुसाट वेगाने गाडी पळवत होता. अन अचानक एका वळणावर, जरा निर्जन रस्त्यावर त्याचा गाडीवरचा ताबा सुटला. गाडी रस्ता सोडून खाली उतारावर वेगाने जाऊन दूरवर एका मोठ्या खडकाला धडकली!
आज बरोबर एक महिना झाला! सर्व नातेवाईक आपापल्या घरी कधीचेच गेले होते! वरचेवर फोनवर मात्र माझी खुशाली विचारत असायचे. तसे मला काही कमी नव्हते आणि माझा कुणावरही भार होणार नव्हता! मी माझा स्वतंत्र नविन व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले होते! तसे मी माहेरी बोलून दाखवले आणि तयारीला लागले.
आज माझ्या नविन व्यवसायाचा शुभारंभ झाला! कितीतरी दिवसांनी आनंदाचा प्रसंग आला होता! मैत्रिणी म्हणाल्यासुद्धा, 'पिक्चरमधे येतो तसा ट्विस्ट आला होता तुझ्या आयुष्यात असे समज. पण शेवट नेहमी गोडच होतो. आता हा आयुष्यातला पार्ट टू देखील छानच असेल. आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत.'
मी घरी आले. मुलांची शाळेतून यायची वेळ झाली होती. सर्वात आधी खेळण्याचा बाॅक्स उघडला. होत्या-नव्हत्या तेव्हढ्या सर्व आयोडेक्सच्या बाटल्या काढल्या. कपाटातून बरनाॅल, वेगवेगळ्या वेदनाशामक क्रिम्स बाहेर काढून गोळा केल्या आणि शांतपणे डस्टबिनमधे फेकल्या! आता त्यांची गरज पडणार नव्हती! कपड्यांच्या कपाटातील सर्वात तळाशी गेलेला एक सुंदर हाफस्लिव्हजचा टाॅप काढून घातला.आरशात बघितले. आता अगदी पूर्वीसारखेच सुंदर दिसत होते हात. कसलेही वळ नव्हते. मी स्वतःशीच हसले! खूप दिवसांनी! आणि मग हसतच राहिले!! या मैत्रिणीही किती भोळसट आहेत? असे कुठे पिक्चरमधल्यासारखे होते होय? वेड्या कुठल्या!
त्यादिवशी गाडी जोरात खडकाला धडकली अन मी दारातून बाहेर फेकले गेले! मुकामार लागला. स्वतःला सावरून कशीतरी धडपडत उठून, आधी नवर्याला शोधू लागले. गाडीने पलट्या खाल्ल्या होत्या अन नवरा दूरवर झाडीत पडला होता. त्याला बहुतेक चालता येत नसावे. खाली बसूनच खुरडत तो वरती यायचा प्रयत्न करत होता. मी त्याच्या मदतीला धावणार तोच, माझ्याकडे पाहून तो जोरात खेकसला, "ये..!! कुठं बघतेस ×××. नवरा ईकडे अडकलाय... अक्कल आहे का? आधी ईकडे ये..!!" तिडिक उठली! जवळच एक मोठा पण मला उचलता येण्याजोगा दगड होता. माझी नजर त्यावर पडली!!
आता लोकांना हे कसे कळत नाही की, असा काही आपोआप ट्विस्ट येत नसतो आयुष्यात पिक्चरसारखा! आपल्याला आयुष्य पिक्चरसारखं हवं असेल.., तर त्याची स्टोरी आपणच नको का लिहायला !!!
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह कसली भारी कथा आहे. शेवट
वाह कसली भारी कथा आहे. शेवट एकदम भन्नाट केलाय
जबरदस्त
जबरदस्त
मस्त कथा
जबरदस्त शेवट!!
भारी
भन्नाट लिहिली आहे गोष्ट
अजून विस्ताराने लिहिली असती तरी चालली असती.
पैजारबुवा,
कथा आवडली म्हणता येत नाही
पण तुमची लिहिण्याची स्टाईल एकदम ओघवती आहे. शिवाय इतकं शुद्ध आणि सोपं मराठी अंतरजालावर फार क्वचित वाचायला मिळतं.
ऑल द बेस्ट !
लिहित रहा.
सुपर्ब!
सुपर्ब!
- (आयुष्याच्या पिक्चरची स्टोरी लिहीणारा) सोकाजी
मस्त
मस्त कथा
जबरी... छान ट्विस्ट आहे
जबरी... छान ट्विस्ट आहे
ओहो
जव्हेरभौला काम्पिटीशन!
आयुष्याच्या कथेला दिलेला ट्विस्ट भन्नाट!
सं - दी - प
धन्यवाद.
विजूभाऊ, महासंग्राम, कोण, ज्ञानोबाचे पैजार, संजय क्षीरसागर, सोत्रि, मित्रहो, सुखी, चांदणे संदीप, सर्वांचे मनापासून आभार!
@संदीप, अहो मीच जव्हेरभाऊंची फॅन आहे.पणआता मला हरबर्याच्या झाडावर चढल्यासारखं वाटतंय☺
जबराटच..
कथा आवडली. तुमच्या लिखाणाची सूचक शैली आवडली. अगदी कसलेल्या दिग्दर्शकाने बनवलेल्या पिक्चरमधल्या कट-शॉट सारखी..
शेवटची कलाटणी खासच.
+१११
In reply to जबराटच.. by चिगो
+१११
वाह! पहिलाच पिक्चर सुपर हीट .
वाह! पहिलाच पिक्चर सुपर हीट ...मस्तच लिहलय! पुढे व्यवसायात व आयुष्याच्या लढाईत कशी यशस्वी झाले व स्वतःला सगळ्यांसमोर कशी सिद्ध केली ते लिहला असतात आणि मग तो ट्विस्ट आणला असता तर अजून मज्जा आली असती....
ओघवती लेखनशैली.
ओघवती लेखनशैली.
कथेला दिलेली कलाटणी जबरदस्त...
झकास ! आवडली कथा.
झकास ! आवडली कथा.
👍
धन्यवाद!
चिगो, प्राची, सुजित, vrinda, टर्मिनेटर मनापासून आभार!
मस्त
मस्त कथा! आवडली,
मस्त! फारच जबरी कथा!
मस्त! फारच जबरी कथा!
भारी आहे पिक्चर !
भारी आहे पिक्चर !
शेवट वाचून अंगावर टाका आला !
पार्ट-२ च्या प्रतिक्षेत !
मस्त
जबरदस्त.... ओ.टी.टी. प्लट्फोर्म ला साजेशी अगदि....
जबरदस्त!
जबरदस्त कथा! खूप आवडली.
धन्यवाद!
अमिबा, रूपी, चौथा कोनाडा, निलस्वप्निल, स्मिता उत्स्फूर्त प्रोत्साहनाबद्दल खूप आभार.
आवडली!
बर्याच दिवसांनी मिपावर इतके सुंदर आणि उत्कंठावर्धक वाचायला मिळाले. कथा छोटीच आहे पण झकास जमून आलीये. एखादा चित्रपट होऊ शकतो या कथेवर!
अरे वा, अरे वा, अरे वा!!
इतके दिवस ही नजरेतून सुटून गेली होती. दिवाळी अंकाच्या गडबडीत वाचायची राहिली बहुतेक. लई दिवसांनी अशी झक्कास कथा वाचली.
वरील सगळ्या प्रतिसादाशी सहमत.
खूप खूप लिहा, आम्हाला खूप खूप वाचायचंय.
पिच्चरिश कथा
कथेचा बाज अगदी पिच्चरीश आणि शीर्षक खुद्द 'पिच्चर' मस्त जमून आला आहे योग. लिहित रहावे.
कथा छान.
आवडली.
ओघात वाहून गेलो
नदीला पुर आला की आपण फक्त उडी मारायची बाकी नदीचा सुसाट प्रवाह काळजी घेतो.
कथा वाचताना तसाच अनुभव आला.
मस्त.