कोव्हीड माझा अनुभव
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
कोव्हीड माझा अनुभव
करोनाची साथ आली तेंव्हापासून मी आणि माझी पत्नी दोन्ही वेळेस दवाखान्यात जातच होतो. हा रोग आपल्याला केंव्हा ना केंव्हा तरी होणार हे माहितीच होते. याचे कारण येणाऱ्या रुग्णांपैकी कोणी ना कोणी कोणतेही लक्षण नसणारा रोगवाहक( asymptomatic carrier) असणारच होता.
त्याशिवाय इतरत्र म्हटल्याप्रमाणे आपण भारतीय लोक बेजबाबदार आहोत हे आपण परत परत सिद्ध करून दाखवत असतो. बायको गरोदर असताना सुद्धा दवाखान्यात मास्क न घालणे, मास्क नाकाच्या खाली ठेवणे, वाल्व्ह असलेला मास्क घालणे, बोलताना मास्क काढून बोलायला सुरुवात करणे, दोन खुर्च्यात ५ फुटाचे अंतर ठेवले तरी खुर्ची सरकवून जवळ येऊन बसणे. फोन आला तर मास्क काढून मोठ्या आवाजात गप्पा मारत राहणे असे करणारे अक्षरशः शेकड्यात रुग्ण पाहिले आहेत आणि आजही इतकी रुग्ण संख्या वाढत असतानाहि असेच वागत आहेत.
असे करता करता साधारण १५ ऑगस्ट च्या सुमारास मला थोडी कणकण जाणवू लागली होती. माझ्या मुलीचे लग्न ऑक्टोबर मध्ये आहे. त्यामुळे त्याच्या खरेदीची दगदग होते आहे असे वाटले. मग तीन दिवसांनी ताप आला तो १०० " फॅ होता. माझ्याकडे अनेक गरोदर स्त्रिया सोनोग्राफी साठी येतात मग उगाच धोका कशाला? म्हणून मी दवाखान्यात जाणे बंद केले. बायकोने पण धोशा लावला होता कि तू कधीही सुटी घेत नाहीस आणि हि साथ आल्यावरसुद्धा पूर्ण वेळ काम करतो आहेस.
दोन दिवस ताप होता म्हणून शेवटी बायकोच्याच आग्रहाखातर मी फुप्फुस रोग तज्ज्ञाला (डॉ सुब्रमण्यन नटराजन) फोन केला. हे डॉक्टर माझ्या चांगले परिचयाचे आहेत आणि वडिलांना NSIP हा फुप्फुसाचा आजार आहे म्हणून त्यांच्याकडे गेले दीड वर्षे उपचार चालू आहेत.
त्यांनी चाचणी करून घ्या असा सल्ला दिला त्याप्रमाणे RTPCR हि चाचणी खाजगी लॅब मधून २१ ऑगस्टला करून घेतली. त्याचा लिखित निकाल मला आलाच नाही तर तो महापालिकेकडे गेला. परंतु तेथल्या तंत्रज्ञाने फोन करून तो पॉझिटिव्ह आहे असे दुसऱ्या दिवशी सांगितले.
२२ ऑगस्ट ला महापालिकेच्या टी वॉर्ड ऑफिस मधून फोन आला कि तुमची कोव्हीड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि तुमचे वय ५५ आहे तेंव्हा तुम्हाला रुग्णालयात भरती होणे आवश्यक आहे.( ५० वर्षावरील सर्व रुग्णांनी भरती होणे आवश्यक आहे असा फतवा अगोदर महापालिकेने काढला होता आणि दुसऱ्या दिवशी तो मागे घेतला होता) यावर मी त्या कर्मचाऱ्याला सांगितले कि हा फतवा मागे घेतलेला आहे. त्यावर ती कर्मचारी म्हणाली कि सर आम्हाला असे कोणतेही पत्रक आलेले नाही. मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले कि आपण वृत्तपत्र सुद्धा वाचत नाही का? त्यात सर्व सविस्तर आलेले आहे आणि आपण आपल्या विभागातून चौकशी करू शकता.
तेंव्हा मी अजिबात भरती होणार नाही तर मी घरीच क्वारंटाईन होणार आहे आणि मी डॉ सुब्रमण्यन नटराजन यांच्या देखरेखीखाली असणार आहे. मी स्वतः एम डी डॉकटर आहे त्यामुळे रोग केव्हा बळावू शकतो आणि गुंतागुंत केंव्हा होते हे सर्व मला माहिती आहे.
मला एकंदर चार पाच दिवस फक्त ताप आला त्यासाठी मी पॅरासिटामॉल ( क्रोसीन) ची एक गोळी घेत असे तेवढी एकच गोळी मला दिवसभर पुरत असे. ( याचा डोस दिवसात ३ ते ४ वेळेस आहे) कारण आपल्याला ताप नक्की केंव्हा येतो आणि त्याचा आकृतिबंध ( पॅटर्न) काय आहे हे पाहायचे होते.या बरोबर माझ्या तोंडाची चवही गेली होती आणि वास सुद्धा नीटसा जाणवत नसे.
मला डॉक्टर सुब्रमण्यन यांनी फॅवीपिराव्हीर हैड्रोक्सी क्लोरोक्वीन आणि आयव्हरमेक्टीन हि तीन औषधे चालू केली. पहिल्या दिवशी २४ गोळ्या ( १२ सकाळी आणि १२ संध्याकाळी) घ्यायच्या होत्या आणि पुढचे चार दिवस दिवसभरात १२ (६ सकाळी आणि ६ संध्याकाळी) अशा घ्यायच्या होत्या. या २४ गोळ्या घेतल्यापासून पुढचे ५ दिवस माझे पोट डब्ब होत असे. थोडासा खाल्लं तरी पोटात ट्राफिक जॅम ची संवेदना येत असे. भूक लागत होती परंतु एक पोळी खाल्ली कि पोट भरल्याची संवेदना होत असे. प्रत्यक्ष कॉव्हिडचा नव्हता इतका परिणाम त्या गोळ्यांचा होत होता. परंतु आलीया भोगासी असावे सादर या नात्याने मी मानसिक दृष्ट्या तयार झालो. एक सुदैवाची गोष्ट म्हणजे मला गोड चव व्यवस्थित लागत होती त्यामुळे श्रीखंड गुलाबजाम सारख्या गोष्टींबरोबर मी पोळी खाऊ शकत होतो आणि फळं सुद्धा व्यवस्थित खाता येत होती. परंतु आंबट, तिखट आणि खारट चवी मात्र बदलून गेल्या होत्या. पावभाजीची चव मातकट येत होती.
माझी चाचणी पॉझिटिव्ह आली म्हणून मी डॉक्टर सुब्रमण्यन याना घरच्यांची चाचणी करावी का याबद्दल विचारले त्यावर ते म्हणाले इतके दिवस तुम्ही एकत्रच राहत आहेत तेंव्हा तुमच्या बायकोला आणि मुलांना झाला असणारच उगाच चाचणी वर पैसे खर्च कशाला करताय? त्यांनी म्हटल्याप्रमाणे माझ्या बायकोची चव आणि वास दुसऱ्या दिवशी गेले. मुलीला बारीकसा ताप आला आणि मुलाला थोडासा घसा खराब झाला. दोन्ही मुले दुसऱ्या दिवशीच ठीक ठाक झाली. बायकोच्या तोंडाची गेलेली चव आणि वास मात्र परत यायला पाच सहा दिवस लागले.
माझा आणि बायकोचा दवाखाना २१ दिवस पूर्ण बंदच होता. मुलाने वर्क फ्रॉम होम घेतले होते आणि मुलीचे काम तर फ्री लान्सिंगचा आहे.
चार पाच दिवसांनी आम्ही सर्व व्यवस्थित झालो होतो. यानंतर घरी केवळ विश्रान्तीच घेत होतो. दिवसात १०-१२ वेळेस आम्ही दोघे पल्स ऑक्सिमीटरने रक्तातील प्राणवायूची पातळी तपासत होतो ती कधीही ९५% च्या खाली आली नाही. मला कधीही श्वास घ्यायला त्रास झाला नाही.मला खोकला सर्दी हे सुद्धा झाले नाहीत.
दोन वेळेस मी एक्स रे काढून घेतला तो व्यवस्थित होता. इतर चाचण्या सुद्धा ठीक होत्या( डी डायमर, सी रीएक्टिव्ह प्रोटीन, सी बी सी, क्रिऍटिनिन इ ).
अशक्तपणा मात्र फार जाणवत असे म्हणजे घरात थोडेसे काम केले कि दमायला होत असे. असे झाल्यावर मी बऱ्याच वेळेस पल्स ऑक्सिमीटरने रक्तातील प्राणवायूची पातळी तपासत होतो ती कधीही ९५% च्या खाली आली नाही.
कोण रुग्ण कधी सायटोकाइन स्टॉर्म मध्ये जाईल हे कधीच सांगता येत नाही.यामुळे त्यावर आम्ही डोळ्यात तेल घालून नजर ठेवत होतो. माझे असंख्य डॉक्टर मित्र, वैद्यकीय नियतकालिके, शोध निबंध यांच्यातून गेले ६ महिने मिळत असलेल्या विविध वैद्यकीय माहितीच्या आधारे आम्हाला एवढे माहिती होते कि साधारणपणे आपल्याला होणार आजार इतक्या पातळीवर बळावणार नाही. कारण आम्ही सडपातळ आहोत आम्हाला कोणालाही मधुमेह हृदयविकार रक्तदाब नाही. माझा रक्त गट ओ पॉझिटिव्ह आहे( ज्यात रोग गंभीर होण्याची शक्यता कमी असते.( ए पॉझिटिव्ह ला अशी शक्यता जास्त असते). आम्ही सर्व प्रतिबंधात्मक हैड्रोक्सी क्लोरोक्वीन घेत होतो.
असे असले तरी "मन चिंती ते वैरी न चिंती" या न्यायाने सगळे गंभीर आजार आणि वाईटात वाईट गुंतागुंत याबद्दलचे विचार डोक्यात आले होते. मी दोन्ही मुलांना जवळ बोलावून माझा १ कोटी रुपयाचा टर्म विमा आहे. आमच्या सगळ्यांचा १५ लाखाचा आरोग्य विमा आहे त्या सगळ्याची कागदपत्रे दाखवून ठेवली.
आपल्याला काही झाले तर आपल्याकडे किती पैसे आहेत ज्यावर आपल्यामागे आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालेल कि नाही याचाही पूर्ण विचार करून झाला. एकदा आपल्या आयुष्याचा आणि आर्थिक स्थितीचा आढावा घेतल्यावर माझे मनही शांत झाले. अर्थात बायकोजवळ मी हे काहीच बोललो नाही.
पुढचे काही दिवस घरीच विश्रांती घेऊन मी २१ दिवसांनी आपला दवाखाना परत चालू केला. सुरुवातीचे दोन तीन दिवस मला अशक्तपणा जाणवत असे.
माझा दवाखाना २१ दिवस बंद होता तरीही बरेच रुग्ण माझ्यासाठी थांबून होते. त्यात काही कर्करोगाचे रुग्ण होते ज्यांची केमोथेरपी झालेली होती, कोणी हर्निया शल्यक्रियेसाठी साठी थांबला होता. अशा लोकांना पाहून मला भरून आले.
१७ दिवस महापालिकेच्या कर्मचाऱयांनी दिवसात ३ वेळेस फोन करून अक्षरश:त्रास दिला कधी सकाळी ११ वाजता २ वाजता ३ वाजता ४ वाजता कधीही फोन येत असे. तुमची तब्येत कशी आहे तुमचे तापमान किती आहे हृदयाचे ठोके किती आहेत प्राणवायूची पातळी किती आहे असे विचारून कंटाळा आणला होता. अगदी मी स्वतः हे सर्व सांगितले आणि मला कोणताही त्रास नाही म्हणून सांगितले तरी परत परत केवळ रकाने भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तेच तेच प्रश्न विचारून अगदी काव आणला होता. त्यांना कितीही सांगितले कि आता कोणताही त्रास नाही आणि तुमच्या फॉर्म मधील लक्षणांच्या सर्व रकान्यात काही नाही असे भरा असे सांगूनही काही कर्मचाऱ्यांच्या डॉक्त्यात शिरतच नसे. असो १७ दिवसांनी हा त्रास संपला. सरकारी रेमेडोकेपणा कसा असतो ते म्हणजे माझी चाचणी २१ तारखेला झाली आणि त्याचा निकाल २२ ला आला म्हणजे मला २१ तारखेला कोव्हीड झाला होता त्यानंतर १४ दिवस क्वारंटाईन असणे आवश्यक आहे परंतु या लोकांनी आपल्या रेकॉर्डमध्ये २४ तारीख टाकली होती. त्यातील एका कर्मचाऱ्याला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण कोणाच्याही डोक्यात ते शिरतच नव्हते. शेवटी मी कंटाळून तो प्रयत्न सोडून दिला.
समाजाची वृत्ती-- कोव्हीडची साथ सुरु झाल्यापासून मार्च महिन्याच्या सुरुवातीला मी भाड्याने राहत असलेल्या सोसायटीच्या लोकांनी कुरबुर करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर सरकारी लॉक डाऊन होण्याच्या अगोदरच १० मार्च पासूनच यांनी सोसायटीत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना इमारतीत येण्यास बंदी घातली होती. कचरेवाल्याला सुद्धा इमारतीत खालूनच कचरा घेऊन जायला सांगितले होते. मी सांगायचं प्रयत्न केला कि इमारतीतील २५ लोकांनी लिफ्टने खाली येण्यापेक्षा एकाच कचरे वाला ज्याला सॅनिटायझर वापरून सर्वांचा घराबाहेर ठेवलेले कचरा घेऊन जाऊ दे. पण नाही
यावर मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता कि हीच स्थिती मोलकरणीची आहे यावर तुम्ही भाडेकरू आहात आम्ही तुम्हाला सोसायटीच्या बाहेर काढू म्हणून मला धमकी दिली गेली . मी तेंव्हा भांडण नको म्हणून गप्प राहिलो.
नंतर १ जूनपासून सरकारने अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना( घरगुती कामगार प्लमबर इलक्ट्रिशियन इ) सोसायटीत परवानगी नाकारता येणार नाही असे परिपत्रक काढले तरी आमच्या सोसायटीत कामवाल्या कर्मचारुयाना परवानगी नाकारली होती. मधल्या काळात व्यवस्थापकीय समितीतील( मॅनेजिंग कमिटीतील) एका सदस्याला कोव्हीड झाला म्हणून तो रुग्णालयात भरती झाला त्याच्या बायको आणि दोन्ही मुलींना कोव्हीड झाला.त्याना मी फोन करून सर्व समजावले आणि काही मदत लागली तरी मला फोंन करा असेही सांगितले. हा माणूस रेशन चे दुकान चालवतो आणि ते सर्व पूर्ण बरे झाला तरी त्याचं घरात आजही कामवाल्या बाईला परवानगी नाही.
अजून दुसऱ्या घरात दोन जणांना कोव्हीड झाला होता. म्हणजे मोलकरणीला इमारतीती परवानगी दिली तर कोव्हीड होईल या त्यांच्या दाव्याला कोणताही आधार नाही हे सिद्ध हि झाले.
शेवटी २८जुलै रोजी मी सोसायटीला एक पत्र दिले कि सरकारच्या पत्रकाप्रमाणे तुम्हाला मोलकरणीला थांबवता येणार नाही. आम्ही दोघे अत्यावश्यक सेवा मध्ये गणले जातो आणि आमच्या मुलीचे ऑक्टोबर मध्ये लग्न आहे तर आमच्या घरी एका घरगुती कर्मचाऱ्यास परवानगी द्या. यावर त्यांनी परवानगी नाकारली. मी त्याना परत सांगितले कि जे काही सांगायचे ते मला लेखी द्या आणि अशी परवानगी नाकारली तर मी सोसायटी आयुक्तांकडे तक्रार करेन.
त्यांना आमच्या भागाचे आमदार श्री मिहीर कोटेचा यांचा व्हिडीओ सुद्धा पाठवला ज्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते कि सोसायटीच्या अधिकाऱ्यांना अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांना थांबवता येणार नाही असे केल्यास त्यांच्यावर सरकार कठोर कायदेशीर कारवाई करेल.
यावर त्यांनी ताठर भूमिका घेतली आणि मला सांगितले कि तुम्ही "भाडेकरू" आहात आम्ही तुमच्याशी संपर्क ठेवणार नाही जो काही व्यवहार करायचा आहे तो घरमालकाशीच करू.
मी दुसऱ्या दिवशी श्री मिहीर कोटेचा याना फोन केला त्यांनी सोसायटीच्या सेक्रेटरीचा फोन घेतला आणि बहुधा सेक्रेटरीला "समजावले" असावे.
कारण १ ऑगस्ट पासून आमच्या घरी एका घरगुती कर्मचाऱ्यास सोसायटीने परवानगी दिली. आम्ही दिलेले पत्र पाहून आमच्या मजल्यावरील इतर दोघांनी सुद्धा आम्च्या घरगुती कर्मचाऱ्याला परवानगी द्या म्हणून मागणी केली त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा घरगुती कर्मचारी येण्यास सुरुवात झाली.
व्यवस्थापकीय समितीतील( मॅनेजिंग कमिटीतील) एक आपल्या वृद्ध आईला आजार आहे म्हणून आमच्या घरि दाखवायला आला. सेक्रेटरीच्या बायकोला ताप आला म्हणून त्याने रात्री साडे अकरावाजता दोन वेळेस फोन केले. एका सदस्याला कामावर रुजू होण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे होते त्यासाठी आला होता. इमारती तील डॉकटर आहे त्याचा फायदा उठवण्यासाठी मात्र सर्व लोक पुढे आले होते. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या एक भाडेकरूंच्या( हे भावनगरहुन आलेले होते) पत्नीचा गर्भपात झाला. त्यांची सर्व सोय आम्ही केली. यानंतर त्याने घरच खाली करून तो बायकोला घेऊन परत भावनगरला निघून गेला.
आम्हाला कोव्हीड आजार झाला आहे हे महापालिकेकडून सोसायटीच्या सेक्रेटरीला कळवण्यात येते ते सोसायटीतील सर्व सदस्यांना कळवण्यात आले. परंतु एकही महाभागाने आम्हाला साधा फोन करण्याची तसदी घेतली नाही कि तुम्हाला काही हवे आहे का? औषध मागवून हवंय का? भाजी फळे किराणा इ पाहिजे का? एकही सदस्याने संबंध ठेवला नाही.
घरात मोलकरीण नाही, आम्ही सर्व आजारी अशक्तपणा आलेला असल्यामुळे आम्ही जवळच असलेलय एका शेफ कडून पार्सल मागवणे चालू केले यामुळे भांडी घासणे आणि स्वयंपाक करणे त्यापासूनही सुटका झाली. बाकी झाडू मारणे कपडे वाळत घालणे हि कामे होतीच.
एवढेच नव्हे तर सेक्रेटरीने आमच्या घरमालकांना असेही कळवले कि याना कोव्हीड झाला असूनही हे बाहेर फिरताना आढळले असे बेजवाबदार वर्तन सोसायटी खपवुन घेणार नाही त्यांना योग्य ती समज द्यावी.
मी घरमालकाला कळवले कि मी एक्स रे काढण्यासाठी गेलो होतो. कारण घरी एक्स रे होत नाही बाकी सर्व रक्त चाचण्या कर्मचाऱ्याला घरी बोलावून केल्या गेल्या आहेत. आणि सेक्रेटरी आणि कंपनी केवळ आकसाने असे वर्तन करीत आहेत. हाच मेसेज मी सेक्रेटरीला सुद्धा पाठवला.
आश्चर्य म्हणजे आमच्या आजाराबद्दल आम्हची साधी विचारपूस न करणाऱ्या एका सदस्याला परवा पासून ताप आहे तर त्याने आम्हाला फोनवरून काय करायचे याबद्दल सल्ला मसलत केली. आपण याना २० दिवसात काहीही विचारलं नाही याची थोडीशी लाज/ खंत असावी असेही नाही.
असाच अनुभव माझ्या माहितीतील असंख्य डॉक्टरांना आला आहे.डॉक्टर कोव्हीड केंद्रात कामालाआहेत म्हणून त्यांनी बाहेरच राहावे अशी असून सूचना केली गेली. अत्यावश्यक सेवा असूनही बहुसंख्य स्त्री डॉक्टरांच्या घरी घरगुती कर्मचाऱ्याला बहुसंख्य सोसायटीत परवानगी नाही.
गाझियाबाद येथे नीलकमल कॉम्प्लेक्स या सोसायटीने तेथे राहणाऱ्या पण दिल्लीत काम करणाऱया दोन डॉक्टरांना त्यांच्या मुळे सोसायटीत कोव्हीड येण्याची शक्यता आहे म्हणून सोसायटीत येण्यास मनाई करणारा हुकूम जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळवला. त्या आदेशात असे म्हटले होते कि दिल्लीत ळक्म करणाऱ्या डॉक्टरांनी तेथेच आपली राहण्याची सोया करावी.
यावर इंडियन मेडिकल असोसिएशन ने जिल्हाधिकारी आणि सोसायटीच्या लोकांना नोटीस जारी केली कि जसे हे डॉक्टर दिल्लीत काम करत आहेत तसेच आमचे गाझियाबादचे सगळे डॉक्टर येथे कोव्हिडच्या रुग्णांसाठी काम करत आहेत. आमच्या डॉक्टरांच्या मुळे सुद्धा नीलकमल कॉम्प्लेक्स च्या लोकांना कोव्हीड होण्याची शक्यता आहे. तेंव्हा असा धोका टाळण्यासाठी त्यांना विनंती आहे कि यापुढे नीलकमल कॉम्प्लेक्स च्या लोकांनी वैद्यकीयसेवेसाठी गाझियाबाद सोडून इतर कोणत्याही शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांची सेवा घ्यावी हि विनंती.
त्यांनी जिल्हाधिकारी याना अशी बेकायदेशीर आणि अधिकाराच्या बाहेरचे ( out of jurisdiction) पत्रक काढल्याबद्दल न्यायालयात का खेचले जाऊ नये अशी नोटीस जारी केली.
या नोटीशीनंतर आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आणि नीलकमल कॉम्प्लेक्स च्या लोकांचे धाबे दणाणले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आपले पत्रक मागे घेतले.
समाजाची वृत्ती हि इतकी स्वार्थी झाली आहे. यामुळे माझ्या माहितीतील असंख्य डॉक्टर अक्षरशः आपला व्यवसाय बंद करावा काय या विचारात आहेत.
अशाच तर्हेचे काही विचार आम्हाला झालेल्या या आजारापूर्वी लिहिलेल्या लेखात मी व्यक्त केले होते https://www.misalpav.com/node/46888
गरज सरो आणि वैद्य मरो हि म्हण किती योग्य आहे.
प्रतिक्रिया
डॉक्टरसाहेब कोव्हिड विरूध्दचा
मला अपेक्शित असलेला लेख ...
Covid19 मधून बाहेर पडल्या
फॅवीपिराव्हीर हैड्रोक्सी
वैद्यकीय सेवेतील सर्व
कोव्हीड १९ मधुन बरे झाल्या
अभिनन्दन!
वैद्यकीय क्षेत्र
@ सुबोध खरे : या लेखाबद्दल मनःपूर्वक आभार !
कोव्हीड १९ मधुन बरे झाल्या
खरे काका तुम्ही सर्व बरे झालात हे वाचुन चागले वाटले
कोव्हीड १९ मधुन बरे झाल्या
आजची अस्पृश्यता
यात अस्पृश्यता नाही की विशेष
यात अस्पृश्यता नाही की विशेष
तुझ्या नणंदेने हे इच्छापत्र
तुझ्या नणंदेने हे इच्छापत्र
खरे डॉक्टर...
खरे सर.. सर्वप्रथम तुम्ही
अगदी सहमत
काळजी घ्या डॉ. खरे
एक प्रश्न आहे.
डॉ. खरे आपण आणि आपले कुटुंब
डॉक्टर पेशा कायम वंदनीय आहे
अभिनंदन
लेख आत्ता वाचला
लेखात अनुभव दिलेत ते बरं झालं
अभिनंदन डॉ साहेब
सोसायटीत लीव लायसनवरच्या
जेंव्हा मी सोसायटीला पत्र
यावर मटा मधे लेख होता
खरे साहेब ,
काय हे!
जात असतेच ..
+१
मी जेव्हा सेक्रेट्री होतो
सर .... एक मदत हवी तुमच्या कडून
धन्यवाद.
उत्तम लेखन, इतरांसाठी खूप
आरोग्यसेतुचा फोन नाही आला ?
बापरे!
कोव्हीड मधुन बरे झाल्या
सुबोधजी व्यनी केला आहे.
कोविड संकटाचा यशस्वीपणे
अभिनंदन, वूहानच्या चिनी विषाणूला तुम्ही सर्वांनी पराभूत केले
एका दिवसात चोवीस गोळ्या
उपकरणे.
ऑक्सिजन ची टक्केवारी आणि
मी तेच मांडले आहे.
खरे साहेब !
Pagination