रुजवण
लेखनविषय (Tags)
रुजवण
अक्का गाडीत बसून अगदी दिसेनाश्या होईपर्यंत ती तिथेच उभी होती.डोळ्यातलं पाणी निखळलं पूर्ण आणि मग ती आत वळली.उण्यापुऱ्या सात दिवसात काय जीव लावला ह्या बाईनं! म्हणायला गेलं तर आत्तेसासू पण सर्वार्थाने ह्या घरची एकमेव बाई.लग्न झाल्यानंतरच्या आठ दिवसात घरातलं पीठामिठासकट सगळं सगळं दाखवलं त्यांनी.आज त्या त्यांच्या घरी परत जाताना तिला लग्नाच्यादिवशी डोळ्यात आलेल्या पुराची आठवण करून गेल्या.आता तिला एकदम पोक्त वाटायला लागलं. घरात सासरे,नवरा,वीस वर्षाचा, तिच्यापेक्षा एखाद्या वर्षानी मागे एक दीर, आणि दहा वर्षांचे जुळे, आवळेजावळे दीर. स्वयंपाकाला येणारा आचारी आणि पूजेला येणारे गुरुजी..बाई कोणीही नाही. सगळा पुरुषांचा कारभार. सासऱ्यांनी सगळं जिथल्या तिथे ठेवलेलं दिसत होतं.पण जवळ जवळ दहा वर्षांत बाईचा हात फिरलेला नाही घरात.
आता तिला सांभाळायचं होतं. उण्यापुऱ्या एकवीस वर्षाच्या तिला फार मोठी जबाबदारी आली होती..लग्न होऊन आली त्या दिवशी लक्षात आलं,घरात मागचं पुढचं अंगण, जागा भरपूर पण झाड एकही नाही.एकही नाही,आश्चर्य होतं.घरच्या माणसांमध्ये एक प्रकारची रुक्षता,करडेपणा जाणवत राहिला. तिला तर हिरव्या रंगाचं कोण वेड. आत्याबाईना हे विचारलं हळूच,तेंव्हा म्हणाल्या,तुझ्या सासूला भारी आवड,जाताना तिच्याबरोबर गेलं हो सगळं!पण तुला आवडत असेल तर तुळस लावू आपण.त्यांच्या मनातला ओलावा तिच्यात झिरपला.
त्या जायच्या आधी तुळशीवृंदावनात तिच्या हातून तुळस लावून हाती सोपवून गेल्या.एक बाई मिळाली मनातलं बोलायला.
~१~
सासऱ्यांच्या नजरेचा धाक,नवऱ्याची प्रेमळ नजर,नवऱ्यापेक्षा धाकट्या दीराच्या नजरेत थोडा अविश्वास, धाकट्या जुळ्यांच्या नजरेत कुतूहल ह्या सगळ्या भावना हळूहळू जिरवत पुढे जात राहिली.श्रावणात मंगळागौर करायची असं आत्याबाईंचं पत्र आलं आणि तिला खूप आनंद झाला, आजूबाजूला थोड्या बायकांची ओळख झाली होती, त्यांना बोलावू का असं नवऱ्याकरवी सासऱ्यांना विचारुन होकारार्थी उत्तर मिळालं होतं,मन अगदी फुलून फुलून येत असतानाच, आत्याबाईंची तब्बेत ठीक नसल्याचा निरोप आला आणि सगळ्यावर पाणी पडलं.नेमकं आधीच्या शनिवारी जुळे दोघे आनंदानी घरी आले,शाळेत दोन दोन रोपं दिली होती ती घेऊन.तिनं चटकन मनाशी निर्णय घेतला.मंगळवारी भल्या पहाटे उठून स्वयंपाक केला,
गुरुजींच्या मदतीनं साधीच पूजा केली , सासऱ्यांनी खूप वर्षांनी नैवेद्याचा स्वयंपाक उत्तम झाल्याची पावती दिली आणि तिलाच तृप्त वाटलं,ती चटकन त्यांच्या पायाशी वाकली आशीर्वाद स्वीकारताना भरुन आलं आणि मग दुपारी जुळ्या दीरांना हाताशी घेऊन ती चार रोपं तिनं मागच्या अंगणात लावली.खड्डा खणणे, झाड लावणे,पाणी घालणे ह्या सगळ्यात तिघांची गट्टी चांगली गट्टी जमली.हिरवे छोटे कोंब त्यांच्या नात्याला फुटले. नवऱ्यानं आधीच आणून ठेवलेलं प्राजक्ताचं रोप हातात दिलं आणि तिला अगदी फुलून आलं.संध्याकाळी मंगळागौरीचा असा खास बेत केला आणि दुपारीच सासरे गावी गेल्याने, ते चौघे आणि ती ,अगदी पहाटेपर्यंत गप्पा मारत बसले. तिच्या लहानपणच्या,तिच्या घरच्या, शाळेच्या,त्यांच्या शाळेतल्या गंमती जमती ऐकताना पहाट झाली मग वेलदोडा जायफळ घालून कॉफी झाली आणि खऱ्या अर्थानं जागरणासकट मंगळागौर साजरी झाली.नंतर
एकदा तापानं आजारी असलेल्या जुळ्यातल्या एका दीराच्या कपाळावर पट्टी ठेवून बसली असता, त्यानं तिचा आई म्हणून हात घट्ट धरला..झाड रुजलं..
~२~
एकदा स्वयंपाक करणारे मधूकाका आले नाहीत, हिनं सगळा स्वयंपाक केला , अजून अंदाज कुठला एवढा ,पोळ्या लाटायसाठी घेतलेलं पीठ जास्त झालं, तिची आई करायची तसं, तिखटमीठ घालून चटकन धिरडं घातलं तव्यावर,खमंग वास दरवळला, दीर दारात उभा राहिला, काय केलं आहेत वहिनी म्हणाला , ती म्हणाली कणकेचं धिरडं, त्यानी विचारलं मला मिळेल का, "अहो काय हे, घ्या की, वाढू का तुकडा, त्यावर तो म्हणाला तुकडा नाही, पूर्ण, मी एकटा खाणार.हिला काही समजेना तेंव्हा म्हणाला की आई करायची माझ्यासाठी, अख्खं मी खायचो.ती हसली मग बहुतेक एक दिवसाआड तिच्या हातून पोळ्यांना लावायचं पीठ जास्त व्हायला लागलं.थोड्याच दिवसात तो तिला फुलं आवडतात म्हणून बकुळीचं रोप घेऊन आला ..
~३~
बाग हळुहळू वाढायला लागली.पहिल्या बाळंतपणाला माहेरी जाताना तिला गलबलून आलं.लेकीला घेऊन आली तेंव्हा बाग तशीच बहरलेली दिसली तेंव्हा तिला फार बरं वाटलं.हिरवा रंग घरभर पसरायला लागला होता. लेकीच्या आगमनाप्रीत्यर्थ सासऱ्यांनी मागे आंब्याचं झाड लावलं तेंव्हा हा रंग पक्का झाला हे कळलं. व्यापात असली,तरी हिचा न चुकता वेळ बागेत जायचा.हिरवा अंगठा असल्यानं भराभर बाग वाढत गेली. तिच्या झाडांनाही बाळं मोठी व्हायला लागली.
मनातलं सगळं झाडांपाशी सांगायची तिची जुनी सवय चालूच राहिली .झाडं तिच्यासाठी माहेर आणि मैत्र दोन्ही होती.मन भरुन आलं तरी तिथे मोकळं व्हायचं आणि आनंद झाला तरी तिथेच.पुढे घरात ये जा वाढत गेली.कुटुंबही मोठं झालं,हिची संसारवेल वाढली,पाठच्या दीराचं लग्न झालं,जुळे दोघे मोठे झाले.काळ पुढे पुढे चालला.सासरे निवर्तले आणि खऱ्या अर्थानं मोठेपण आलं. जबाबदाऱ्या वाढल्या.
हिचा जीव कायमंच घरात आणि बागेत छान रमायचा, हिचं हिरव्या रंगाचं वेड सगळ्यांना ठाऊक झालं होतं.मुळात ती लाघवी आणि माणसं जोडणारी, भरपूर गोतावळा जमा झाला.नात्यांची लावलेली सगळीच झाडं लागली असं नाही.जुळ्यांमधल्या एकाच्या बायकोचं नाहीच पटलं इथं. तो विस्कटून म्हणला वहिनी काय करू, हिनं सांगितलं की तू तुझा संसार प्रेमानं सांभाळ. आमचं तुझ्यावरचं प्रेम सदैव कायम राहिल, ते कमी होणार नाही!तो बाहेर पडला पण स्वतःच्या घरात खूप झाडं लावून सांभाळत बसला.घराला,तिच्या मायेला कधी विसरला नाही..
~४~
ती आता शरीरानं थकली पण नातू हट्ट सोडेना म्हणून अठरा तासांचा प्रवास करुन अमेरिकेत पोचली.नातवाने खूप हिंडवलं. त्याचं घर फार आवडलं तिला!दोघांनी खूप गप्पा मारल्या त्या मुक्कामात,अगदी मनसोक्त.तिनं आडपडदा न ठेवता सगळं सांगितलं त्याला, सुख,आनंदाचे टपोरे थेंब दुःख, टोचण्या , बोचण्या जे जे ती झाडांना सांगायची ते सगळं.
नातू अचंबित होऊन ऐकत राहिला.घरात आणि बागेत रमलेल्या आजीकडे केवढा खजिना आहे ते त्याला जाणवलं.आयुष्य जगायची तिची हातोटी वेगळीच होती.
तिचा आयुष्याचा पट सगळा हिरवाईभोवती लपेटलेला होता.आजोबा गेल्यानंतर हळुहळू वेगळं झालेलं घर.घराला वय असते रे ,थकत जातं तेही पण बागेला नसतं, कारण तिथला जिवंतपणा पुढे पुढे जात राहतो हे सांगणारी आजी त्याला नव्यानं भेटली. आयुष्य पुढे जाण्याचं दुसरं नाव आहे हे आपल्यापेक्षा आजीला जास्त चांगलं माहिती आहे हे नातवाला कळलं. निघायच्या आदल्या दिवशी तिनं नातवाला विचारलं परत नाही का येणारेस तू!नातू हसला ,ती समजली आणि शांत बसली! नातवाने दोन झाडाची रोपं तिच्याहाती लावून घेतली,तिनं त्या झाडांच्या कानात त्याची काळजी घ्या सांगून तिनं जवळ घेतलं. विमानतळावर तिला सोडताना म्हणाला, कदाचित मी इथे नाही राहिलो तरी हिरवी बोटं असणारा तुझा हात इथं लागलाय.हे मी कधी विसरणार नाही, नाती जपीन नक्की,तिच्या डोळ्यांना धारा लागल्या.. सासूबाईंच्या जाण्यानं गेलेला ओलावा असलेला हिरवा वसा, तिनं कष्टानं परत आणला होता आणि आता तिचा नातू तोच पुढे नेणार होता.रुजवण केलेलं बरंचसं तरारलं होतं..
ज्येष्ठागौरी
प्रतिक्रिया
छान लिहीलंय
लेखन आवडले.. छान 21
+१