दिल जलता है तो जलने दे
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
दिल जलता है तो जलने दे
दिल जलता है तो जलने दे
आँसू ना बहा फ़रियाद ना कर
तू परदानशीं का आशिक़ है
यूँ नाम-ए-वफ़ा बरबाद ना कर
मासूम नजर के तीर चला
बिस्मिल को बिस्मिल और बना
अब शर्म-ओ-हया के परदे में
यूँ छुप छुप के बे-दाद ना कर
हम आस लगाये बैठे है
तुम वादा करके भूल गये
या सूरत आ के दिखा जाओ
या कह दो हमको याद ना कर
मुकेश
परदानशि--पडद्यातील स्त्री, शालीन, आशिक-- प्रियकर, वफा ---प्रेम, भक्ती, एकनिष्ठा मासुम ---निष्पाप, बिस्मिल ---घायाळ, प्रियकर, हया --- शरम, लाज बेदाद --- अत्याचार, जुलूम, ऑंस ---दर्द, संवेदना
http://www.dailymotion.com/video/x12mtjf_very-popular-old-indian-song-dil-jalta-hai-to-jalne-de_music
वाट पाहून पाहून तो पार थकला आहे. डोळे भरून आले आहेत व केव्हा धारा वाहू लागतील याचा भरोसा राहिलेला नाही. पण या निराश, केवलवाण्या स्थितीतही त्याला आपल्या जबाबदारीची जाणीव आहे. जर हे आपले आसू कोणी पाहिले तर त्याचे परिणाम काय होणार ? तर तीचाच बोभाटा गावभर होणार. तो स्वत:ला बजावतो, " हृदय जळते आहे ? जळू दे. आंसवे वहाता कामा नयेत. तक्रारीचा चकार शब्दही तोंडातून बाहेर पडणार नाही याची काळजी घे. शेवटी एका शालीन, मुलीचा तू प्रियकर आहेस, तू प्रेमाच्या निष्ठेला बदनाम करू नकोस."
आता तो तिला आपल्या परिस्थितीची जाणीव करून देतांना म्हणतो " तुझ्या निष्पाप नजरेतून जो बाण सुटला त्याने मला घायाळ केले." ही कल्पना काही नवीन नाही परंतू ’बिस्मिलको बिस्मिल और बना" यातील मजा पहा. बिस्मिलचे दोन अर्थ, जखमी व प्रियकर. म्हणजे " जख मीची जखम आणखी खोल झाली", " प्रियकर आणखी घायाळ झाला ", "प्रियकराचे प्रेम त्या नजरेने आणखी वाढले ", अशा अनेक छटा डोळ्यासमोर उभ्या रहातात. गझल मधली प्रेयसी, साकी, ही नेहमी निष्ठूर, बनेल असते. पण ही तशी दिसत नाही. तिची नजर अजून मासूम, निष्पाप आहे, ती लाजाळू आहे. म्हणून तो म्हणतो " या लाजेच्या पडद्यात लपून तू आणखी अत्याचार करू नकोस." हया म्हणजे शरम, लाज. "शर्म-ओ-हया" ही द्विरुक्ती झाली आहे का ? नाही. आपण साधारणत: शरम म्हणजेच लाज, लज्जा असे म्हणत असलो तरी त्यात थोडासा फरक आहे. शरम म्हणजे अपराध झाल्यामुळे वाटणारी लाज तर लज्जा ही निसर्गसुलभ भावना आहे. ती निष्पाप आहे, तिला निसर्गत: लाज वाटत असेल पण तिच्या नजरेने तो विद्ध झाला आहे, म्हणजे नकळत का होईना तिचा अपराध झाला आहे, तेव्हा तिला शरम वाटत असेलही. त्याची मागणी एकच आहे, "आता तरी पडद्या आडून हे अत्याचार करणे बंद कर, दोघांमध्ये हा पडदा कशाला ?"
शेवटी तो कळवळून म्हणतो, "मी येथे दु:खाला कवटाळून बसलो आहे आणि तू मात्र येण्याचे कबूल करून विसरून गेलीस. आता एक तर ये आणि तुझे दर्शन दे. ना तर एकदाचे सांगून टाक "मला विसरून जा "
(आपण मराठीत म्हणतो "डोळे लावून वाट बघतो आहे " येथेही "ऑंस" च्या ऐवजी "ऑंख" कसे वाटते ? )
मुकेशचे या गाण्याशी एक अतूट नाते आहे.
मुकेशचा जन्म दिल्लीत १९२३ साली झाला. बहिणीला शिकवावयाला येणार्या संगीत शिक्षकांकडे त्याने संगीताचे पहिले धडे घेतले. दहावीनंतर शाळा सोडून फुटकळ नोकर्या केल्या. त्यावेळीही संगीताची साथ सोडली नाही. पुढे मोतिलाल यांनी त्याचे गाणे ऐकून, पुढील शक्यता लक्षात घेतल्या व ते त्याला घेऊन मुंबईत आले. तिथे त्यांनी जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे त्याला संगीत शिकण्याकरिता पाठविले मुकेशला १९४३ साली नट-गायक म्हणून सिनेमात काम करण्याची पहिली संधी मिळाली. या काळी सैगलच्या गाण्याचा हिन्दुस्थानात फार पगडा होता व मुकेश सैगलला दैवत मानावयाचा सैगलच्या गाण्याची तो हुबेहुब नक्कल करत असे.
मुकेशला पहिला ब्रेक मिळाला १९४५ साली "पहिली नजर" या सिनेमात " अनिल विश्वास" याच्या सगीत दिग्दर्शनाखाली तो गायला "दिल जलता है तो जलने दो " ते गाणे अफाट लोकप्रिय झाले. असे म्हणतात की सैगलने ते गाणे पहिल्यांदी ऐकले व तो म्हणाला " आश्चर्य आहे, मी हे गाणे केव्हा गायलो ते मला आठवत नाही ".
नौशाद अलीने प्रयत्न करून करून मुकेशच्या गाण्याला सैगलच्या पगड्यापासून दूर केले. मुकेश स्वत:च्या नैसर्गिक पद्धतीने गाऊ लगला. मुकेश प्रथम दिलिपकुमारचा पार्श्वगायक होता व महमद रफ़ी राज कपूरचा. त्यातील अनेक गाणी आजही लोकप्रीय आहेत. पण नंतर दिलिपकुमारने रफ़ीला निवडले व मुकेशला राज कपूरने. नंतर राज कपूर व मुकेश हे इतके एकरूप झालेले दिसतात की म्हणे मुकेशच्या मृत्यूनंतर राज कपूर म्हणाला "आज माझा आवाज गेला "
मुकेशने १२००-=१३०० गाणी गायली आहेत. रफीच्या तुलनेत हा आकडा लहान असला तरी मुकेश गाण्यांबद्दल जास्त चोखंदळ होता. शेवटी शेवटी हृदयविकाराच्या आजारपणाने त्याच्यावर बंधनेही आली. त्याला अनेक पारितोषकेही मिळाली.
२७ -८-१९७६ ला अमेरिकेच्या दौर्यात तो मिशिगन येथे हृदयविकाराच्या धक्क्याने मरण पावला. .
शरद .
प्रतिक्रिया
वाह! खूप आवडले...
दिल जलता है तो जलने दे
लेख लैकण्यात येत आहे.
शिरीष कणेकरांच्या ' गाये चला जा ' मध्ये
मुकेश ... क्या बात है ...
छान ओळख
सुंदर लेख
खजीना
दरबारी कानडा
मुकेशच्या चाहत्यांसाठी पुन्हा एकदा