“WHO ला काय कळतं?"
परवा एका राजकीय मुखपत्राचे संपादक काहीतरी बोलले आणि त्यावरूनच बरेच विनोद, मिम्स असल्या गोष्टीचं सत्र सुरु झालं. पण त्यांच्या बोलण्याचं मूळ सुद्धा आपल्यात अजाणतेपणी रुजलेल्या समजुतीत आहे असं मला वाटतं. ते म्हणजे “डॉक्टरला काय कळतं?” ह्याचं एक्स्टेन्शन “WHO ला काय कळतं?
का म्हणे? डॉक्टरला काही कळत नाही तर २ दिवस अंगावर दुखणं काढून झालं की रात्री अपरात्री डाक्टर का आठवतो मग? ते राहू दे, त्याबद्दल पुन्हा केव्हातरी बोलू.
पण गेल्या काही महिन्यात जेव्हा जगावर हे महासंकट आलं तेव्हा WHO मध्ये बसलेल्या त्या तज्ज्ञ लोकांवर किती दबाव असेल, जबाबदारीचं ओझं किती असेल ह्याचा विचार केलाय कुणी? अख्खं जग त्यांच्या मार्गदर्शनाची वाट पाहतंय, संकटाशी निपटावं की एकेक Conspiracy theories ऐकून त्यावर विचार करावा असले दिवस ते.
एक सकाळ उजाडली आहे आणि समोर रोज हजारो लोकांच्या मृत्यूचं थैमान चालूय. जगात कुणालाच ज्ञात नसलेला एक virus समोर उभा ठाकलाय जो दिसतो कसा माहित नाही, उपलब्ध औषधे त्याला चालतात की नाही, तो मरतो कसा?, पसरतो कसा?, संक्रमणानंतर किती दिवसांनी रुग्णाला त्रास होतो?, किती दिवसांनी रुग्णाला काय काय लक्षणं दिसतात, प्राण्यांकडून संक्रमण होतं की नाही? असे प्रमुख आणि त्यांच्या जोडीने अनेक उपप्रश्न घेऊन.
काय करायचं त्यांनी अशा वेळी? त्यांनी अनेक कोलांट्या उड्या मारल्या म्हणून आज ते टीकेचे धनी झालेत, त्याच्या फंडिंगमध्ये कपात झालीय. आणि कोलांट्या उड्या काय तर म्हणे आता ते म्हणतायत की sanitizer वापरून फायदा नाही!
काय करायला हवं होतं त्यांनी? वर उल्लेख केलेले प्रश्न, statistics पाहून वर्तवलेला रोगाचा पसरण्याचा वेग, रोजचे होणारे मृत्यू आणि संशोधनासाठी अपुरा वेळ; हे हाती असताना जे योग्य तेच केलं ना त्यांनी? रोगाचा प्रसार हवेतून होतो, किती अंतरापर्यंत virus जाऊ शकतो, त्याला मारायला आपल्या जीवन शैलीतील gestures पाहता अल्कोहोल आणि साबण हे जालीम आणि स्वस्तातील उपाय सांगितले, चेहऱ्याला स्पर्श नको हे सांगितलं आणि एकीकडे संशोधन सुरु ठेवलं.
मुळात संशोधन म्हटलं की बदल आलाच. २० वर्षांपूर्वी होतं तसंचं जग असतं तर आज कशाचीच गरज पडली नसती. संशोधन नको अन् काही नको. पण असं नाही ना होत. मग त्या संशोधनातून जे जे निष्कर्ष पुढे आले ते सांगून जगाला सावध केलं, शहाणं केलं तर WHO वाईट? अरे हे काय लॉजिक आहे?
म्हणजे त्यांनी जुन्याच गोष्टी तुमच्या माथी मारल्या असत्या, तर ते चाललं असतं तुम्हाला? तिथेही कितीही उच्च शिक्षित डॉक्टर असले तरी मानव आहेत ना ते? देव नाहीत. Virus त्यांनाही आपल्या इतकाच नवीन आहे. मानव म्हणून आपल्यावर जी बंधनं आहेत, तीच त्यांच्यावरही आहेत. एक इलेक्ट्रोन microscope हाती आला म्हणून virus त्याची कुंडली सांगायला बसत नाही ना? तोही एक जीव आहे, त्याच्या अस्तित्वासाठी जे काही करावं लागतं ते तो सुद्धा करतो. म्हणूनच अनादी काळापासून माणसाला सर्दी होते. सगळ्यावर डॉक्टरांनी औषधे शोधली, बनविली तरी सर्दी होते कारण Antigen म्हणजे ज्याच्या मुळे आपल्याला आजार होतात तेही स्वत:ला बदलत राहतात.
अशा वेळी आपण ज्यांच्या ज्ञानावर विसंबून आहोत त्यांच्या डोक्यावर टपला मारून त्यांना विचलित न करता त्यांच्या मागे उभं का राहू नये? मी तर म्हणतो नतमस्तक का होऊ नये? आपली आहे का तयारी संशोधनाची, संसाधने आहेत का आपल्याकडे? मग ज्यांच्याकडे आहेत त्यांना करू दे ना काम? टीका कशाला करत बसायचं? आपण कोण आहोत, आपली पात्रता काय?, हे विसरून दर वेळी बोलण्याची खरंच गरज आहे का?.
बघा पटतंय का. बाकी इंदुरीकर महाराज म्हणतात तसं की आधी एक देव फिक्स करा. म्हणजे तो येईल तरी तुमच्या मदतीला. नाहीतर कुणाचाच कुणावर विश्वास नाही. जगात हे संकट किती काळ राहणारे आपल्याला नाही माहित. म्हणून WHO नव्हे तर एकुणातच सगळेच आरोग्य कर्मचारी आपल्या ह्या असल्या कमेंट्समुळे नाउमेद होऊ नयेत ही इच्छा आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आजारी पडल्यावर काँग्रेस काळात
डॉक्टर ना विदेशी कंपन्या
लेखाशी सहमत
संजय राऊत ह्यांच्या कमेंट मुळे
म्हणून WHO ला काहीच कळत नाही
संजय राऊत असोत की राज ठाकरे