हम जल्द ही लौटेंगे एक ब्रेकके बाद.. तोपर्यंत घाला पिठामध्ये तेल..
लेखनविषय (Tags)
जाहिरात जीवनाचं अविभाज्य अंग आहे. फार प्राचीन काळापासून जाहिराती केल्या जाताहेत. त्या आज वाचल्या की हसू येतं. जाहिरातदार सकाळपासूनच आपलं काम सुरु करतात. आपण आंघोळीला कोणता साबण वापरायचा, केसांना कुठलं तेल लावायचं म्हणजे ते'लंबे ,घने,काले'होतील. स्वयंपाकात कुठलं तेल वापरायचं की तुम्ही बटाटेवड्यासारखे चमचमीत पदार्थ नेहमी खाऊ शकाल. जीवनसाथी कसा निवडावा,त्यासाठी कोणत्या डॉट कॉम वर जायचं, गुंतवणूक कुठे करावी, कुठल्या जंतुनाशकानं फरशी स्वच्छ करावी,दात कशानं घासावेत म्हणजे दाताबरोबरच 'मसूडे'मजबूत होतील, क्रिम्स, डायपर, निळा रंग वापरून सँनिटरी पँडस्,चप्पल, शूज, लस्सी, दूध, कुकर,बिस्किट,नाश्ता! हुश्श! दमले. हे सगळं आपण वापरावं हे ते ठरवतात. किंवा सतत ऐकवत राहतात.
जाहिरातीत सॉफ्ट टारगेट म्हणजे मुलं आणि स्रिया. त्यांना एखादी वस्तू हवी असेल तर ती घरात आणावीच लागते हे गृहीतक. तेच मुख्य गिऱ्हाईक असं मानलं जातं. त्यामुळे जाहिरातीत मुलं (आगाऊ, ज्यादा शहाणी) आणि गृहकृत्यदक्ष स्त्रियाच असतात.
जाहीराती कर्कश वाटतात ते खरंच आहे. नॉर्मल कार्यक्रमापेक्षा त्या वरच्या स्केलवरच डब केलेल्या असतात. लोकांचं लक्ष वेधावं म्हणून.
आता आसपास कोरोना आहे तर प्रत्येक साबणाच्या वापरामुळं विषाणू नष्ट होतात, हे आवर्जून सांगितलं जातं. आत्मनिर्भर शब्दाची चलती आहे सध्या, त्यामुळे आपलं उत्पादन स्वदेशी आहे हे आवर्जून सांगितलं जातं. तसंही कुठलं उत्पादन स्वदेशी आणि कुठलं परदेशी हे सामान्य माणसाच्या लक्षात राहात नाही (माझ्याही). सामान्य ग्राहक जाहिरातीत जे नाव सतत पाहतो, ऐकतो ती वस्तू तो नकळत मागतो.
स्त्रीच्या देहाचं प्रदर्शन जाहिरातीत घडतंच. ही खूप जुनी गोष्ट झाली आता. पुरुषप्रधानता इथंही दिसते. जाहिरातीतला साबण नट्या प्रत्यक्षात वापरत असतील असं वाटत नाही. तुम्ही गोऱ्या दिसा, सुंदर दिसा, का ? तर तो जवळ घेईल. तुमची त्वचा मुलायम करा, का ? तर पुरुषाला स्पर्शसुख मिळेल.
जाहिरातीतल्या आया नेहमी सुंदर, फ्रेश, न कंटाळलेल्या, शर्टावर सॉस सांडलं तरी न रागावणाऱ्या असतात. 'इझी है' असं गोड हसून म्हणत त्या कपडे धुतात (लॉकडाऊनचा काळ नसतानाही) भांडी घासतात. मग वेळ वाचला म्हणून केक करतात. मुलानं ग्लास फोडला तरी चिडत नाहीत. मला माझी आई आठवते. कपड्यावर डाग पडला किंवा बशी फुटली तर ती महिषासुरमर्दिनीचा अवतार धारण करायची. मार तर इतका बसायचा की सांगता सोय नाही. माझ्या आईचं उदाहरण कशाला? माझंच उदाहरण देते ना. पोरांनी कुठे काही सांडणं, कपडे खराब करणं वगैरे केलं तर इतकी भयंकर वैतागायची.. माझी साडीसुद्धा झाडझूड करताना वर खोचलेली आणि पदर कमरेला आवळलेला, रौद्र रूप, केस विस्कटलेले मी कुठून सुंदर दिसणार जाहिरातीतल्या आईसारखी. मुलं घाबरणारच.
जाहिराती जागा व्यापतात. वेळ व्यापतात. पंधरा मिनिटांचा प्रत्यक्ष एपिसोड तर पंधरा मिनिटं जाहिराती. टी.आर.पी. वाढला की जाहिराती वाढतात. टी.आर.पी.वाढण्यासाठी तडजोडी कराव्या लागतात. जाहिराती सिझनल असतात. थंडीत कोल्डक्रिम.उन्हाळ्यात शीतपेयं,एसी,कूलर्स.रवरीप ,रब्बी हंगामापूर्वी खतं बियाणं. वेळेनुसार त्या बनवून लोकांवर आदळत राहणं म्हणजे कष्टच.
पण एवढे कष्ट करुन,एवढे पैसे खर्च करुन बनवलेल्या जाहिराती प्रेक्षक बघतात का? तर बहुधा नाही. ते ब्रेक आला की टीव्ही म्यूट करतात. लहानलहान कामं उरकतात. ताटं वाढून आणणे, गादी घालणे, पाणी पिणे, शू ला जाऊन येणे, फोन करणे, मेसेज पाठवणे, प्लेटस् सिंकमधे ठेवणे, रात्रीचे ब्रशिंग करणे. खरं की नाही? तुम्हीही करता ना? हाईट ऑफ इट म्हणजे अँकर म्हणतो "कही जाईएगा मत। हम जल्दही वापस आ रहे है।"
म्हणजे प्रेक्षक जाहिराती बघत नाहीत हे अँकर खुल्लमखुल्ला कबूल करतो. ज्यांनी पैसे दिल्यामुळे, ज्यांच्या जिवावर प्रेक्षक मालिकेचा तो एपिसोड बघतात, त्याच जाहिराती लोक बघत नाहीत हे अँकर कबूल करतो. त्यावर कोणताही जाहिरातदार निषेध,आक्षेप नोंदवत नाही? का तेही स्वतःच्या जाहिराती बघत नाहीत? हा यातला आंतर्विरोध आहे.
लहानपणी मी आईबरोबर सिनेमा पाहायला जायची. सिनेमाच्या आधी जाहिराती आणि फिल्म डिव्हिजनची डॉक्युमेंटरी असायची. त्यावेळी मला जाहिराती फार आवडायच्या. सिनेमा समजायचा नाही त्यामुळे आवडायचा नाही. लहानपणचा काळ गेला. आता जाहिराती आवडेनाशा झाल्या. त्या डोळ्यांवर, कानावर आदळतात. मी म्यूट करुन डोळे बंद करते आणि मालिकेसाठी अंदाजाने डोळे उघडते.
आपण वयाने मोठे झालो पण जाहिराती आहेतच.
जाहिरातींशिवाय आपल्याला बाजारात कोणती नवी उत्पादनं आली आहेत , हे कसं समजणार?तेव्हा जाहिराती होत्या,आहेत आणि पुढेही असणार आहेत. त्या म्हणजे एक नेसेसरी इव्हिल आहेत.
प्रतिक्रिया
आजी...
मस्त लिहिलंय आजी. आपण नाही पण
+१
छान लिहलेय काही जाहिराती
पंधरावी विद्या आणि पासष्टावी
पैसे की दुनिया
आजच्या जाहिरातींबद्दल काय
जाहिरातींमुळे काय ओळ तोंडात
अगदी नेमकं
हा हा खरंच, आठवलं.
+१
बोगस किंवा बोरिंगशिरोमणी
कॅडबरी फाईव्ह स्टार ची
वोडाफोन चे जुजू चांगले लक्षात
पण काही जाहीराती तर
हॅहॅहॅ
रेड लेबल च्या हिंदू फोबिया ने
मी जेम्स बोंडे
भारी आहे :)
छान लिहिले आहे.
एरिकसन
गारगाय. काय इन्स्टंट पुरावा!!
माझ्या अनेक जुन्या आवडत्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- LYRICAL: Ghamand Kar | Tanhaji The Unsung Warriorचांदणे संदीप-लहानपणी
फुकट पैसे वाया