।। मातृदशक ।।

अमोल_००३'s picture
अमोल_००३ in जे न देखे रवी...
28 May 2020 - 2:02 am

आता वंदितो आईसी | जिने धरिले उरासी |
जेव्हा आलो जन्मासि | वात्सल्याने || १ ||

नवमांस गर्भ वाढविला | सोसूनि सर्व यातना-कळा |
न जाणो तूज किती वेळा | दुखावले मी || २ ||

हाती धरोनि चालविले | बोल बोबडे बोलविले |
शहाणपण शिकविले | जगण्याप्रती || ३ ||

कलागुणांचा वारसा | दिला आम्हां छानसा |
स्वयें दाखविला आरसा | योग्य वेळी || ४ ||

निरपेक्षभावे मनासि | दिले अखंड ज्ञानासि |
अज्ञानी या मुलासि | शहाणे केले || ५ ||

जैसी घार पिलांसि | जैसी वेल फुलांसि |
तैसे जपले मुलांसि | सावधपणे || ६ ||

घडल्या चुका जरी हातून | मार्ग दाखविला त्यातून |
जेणेंकरुन त्या परतून | न होणे कधी || ७ ||

आई तुला मी काय म्हणू | माझ्या ठायीचा अणू - रेणू |
जीवननौकेचा सुकाणू | आहेस तू || ८ ||

जाणतो मी मनोगती | तुझी भावना आमुच्याप्रती |
तरी पुन्हा ही विनंती | एकवार || ९ ||

धरावे ऐसेचि शिरी | आपुल्या मंगल करी |
कृपाछत्र आमुच्यावरी | अखंडित || १० ||

कविता

प्रतिक्रिया

रातराणी's picture

28 May 2020 - 11:32 am | रातराणी

_/\_ छान!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 May 2020 - 11:59 am | ज्ञानोबाचे पैजार

सुरेख लिहिले आहे, आवडले,
आता पितृदशक, भ्रातृदशक, भगिनीदशक, आचार्यदशक, मातामहदशक, पितामहदशक, मातुलदशक, पितृव्यदशक आणि सखादशकही लिहून दशकांचे दशक लिहावे ही आग्रहाची विनंती.
पैजारबुवा,

संजय क्षीरसागर's picture

29 May 2020 - 4:32 pm | संजय क्षीरसागर

मिपा दशक राहीलं !

गणेशा's picture

28 May 2020 - 7:45 pm | गणेशा

अप्रतिम,
---
थोडे माझे लिहितो असेच...

नवमांस गर्भ वाढविला | चिरंजीवी श्वास दिला |
तोच स्वर्ग बनविला | माझ्यासाठी||

पुनर्जन्म तेथीची व्हावा | पुन्हा मायेचा ठेवा |
तुझ्या काळजाचा तुकडा | माझ्यासाठी ||

- गणेशा

अमोल_००३'s picture

29 May 2020 - 4:29 pm | अमोल_००३

रातराणी, पैजारबुवा, गणेशा,

प्रतिसाद / प्रतिक्रिया दिल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद !!!

@ पैजारबुवा : दशकांचे दशक ही फार मोठी गोष्ट आहे. तरीही आपल्या विनंतीला मान देण्याचा माझ्या क्षमतेनुसार जमेल तसा नक्कीच प्रयत्न करेन.

@ गणेशा : तुम्हीही फारच सुंदर लिहिले आहे. एकाच गोष्टीकडे / घटनेकडे किती तरी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो आपण !! आणि तरीही ती गोष्ट / घटना १०० % तशीच आहे किंवा असावी याची खात्री देता येईलच असे नाही, किंबहुना तशी ती देता येतच नाही. कारण ती गोष्ट त्या पलीकडेही अजून शिल्लक उरलेलीच असते. जेवढी आपली जाणण्याची कुवत किंवा क्षमता तेवढेच आपल्यासाठी सत्य, हेच खरं !!!

पुन्हा एकदा सर्वांचे आभार !!!

अमोल_००३

मन्या ऽ's picture

31 May 2020 - 12:51 am | मन्या ऽ

अप्रतिम

Prajakta२१'s picture

31 May 2020 - 11:34 pm | Prajakta२१

पु ले शु