त्याचं दु:ख…

मनिष's picture
मनिष in जे न देखे रवी...
26 Nov 2019 - 3:27 pm

* १ *

संसदेला, संविधानाला नमस्कार करतात
कायद्यांसाठी मात्र चोरवाटाच वापरतात
तेंव्हा लोकशाहीची जी पायमल्ली होते,
त्याचं दु:ख…

खूनी, दंगलखोर मंत्री होतात
आपापल्या केसेस बंदच करतात
तेंव्हा कायद्याची जी चेष्टा होते,
त्याचं दु:ख…

कायद्याच्या पकडीतून नेते सुटतात
समर्थनार्थ नंदीबैल उभे करतात
खुद्द गुन्हगेारच जेंव्हा कायदे बदलतात,
त्याचं दु:ख…

राजकारणात सध्या असेच चालते
साधन शुचितेची अपेक्षा नसते
पण कपटालाच चाणक्यनीती मानले जाते,
त्याचं दु:ख…

सहभागाविना चर्चा, निर्णय होतात
तुघलकी पध्दतीने जाहीर करतात
तेंव्हा विश्वासावर जो घाव होतो,
त्याचं दु:ख…

कपटी नेते कारस्थानं करतात
निषेधाचे प्रयत्न मोडून काढतात
तेंव्हा जाणकार चक्क मूक होतात,
त्याचं दु:ख…

आपल्या, त्यांच्यात विभागण्या होतात
भडकावलेल्या झुंडी हिंसा करतात
आपुलकीचे हात जे त्यात हरवतात,
त्याचं दु:ख…

* २ *

हातातले हात सुटत जातात
बोलणे खुंटते, गैरसमज होतात
कालचे आप्त आज परके होतात,
त्याचं दु:ख…

न बोलवल्याची कारणं सांगतात
तेंव्हा मित्र नजर चुकवतात
पाणावलेले डोळे त्यांना दिसत नाही,
त्याचं दु:ख…

डोळ्यातले पाणी निग्रहाने थोपवतो
पाठीवरचा वार काळजापार जातो
मग मनातला कडवटपणा जिभेवर येतो,
त्याचं दु:ख…

निर्हेतुक गप्पा आठवणीतच उरतात
फायदे मोजूनच परिचय वाढतात
परिचितांच्या गर्दीत जे मैत्र हरवते,
त्याचं दु:ख…

सुमारांचे कळप वरचढ ठरतात
चाकोरीबाहेरील मनांची टवाळी करतात
निराळे विचार जे हद्दपारच होतात,
त्याचं दु:ख…

एकट्या जिवाची काहिली होते
एकेक सावली हिरावली जाते
नजर जी मृगजळात वाट शोधते,
त्याचं दु:ख…

वाट पायाखालची सरत नाही
प्रवासात विसावा मिळत नाही
आणि सोबतीला हात सापडत नाही,
त्याचं दु:ख…

* ३ *

अवचितच हातात हात गुंफतात
उमेदीने जिव्हाळ्याची नाती विणतात
कालांतराने प्रेम संपते, नाती उरतात,
त्याचं दु:ख…

मनातल्या इच्छांना मुरड घालतो
स्वतःलाही विसरुन साथ देतो
तरीही बेभान, बेछूट आरोप होतात,
त्याचं दु:ख…

जुळलेली मनं दुभंगू लागतात
नुसतेच देह जवळ येतात
मग रेशमाचे बंध काचू लागतात,
त्याचं दु:ख…

मनातल्या इच्छा मनातच राहतात
गंधाळलेल्या रात्री विस्मृतीत जातात,
एकाकी क्षण असे उरावर बसतात,
त्याचं दु:ख…

गात्रे शिणतात, वय वाढते,
रुप उणावते, कूसही आक्रसते
पण कुशीचं लेणं जेंव्हा दुरावते,
त्याचं दु:ख…

वासांसि जीर्णानी आता समजते
शिशिरातही पानगळ होतच असते
पण कोवळी पालवी गळून पडते,
त्याचं दु:ख…

रक्ताची नाती डोळ्याआड जातात
तनामनाचे जोडीदार वेगळे होतात
संवादाविना हे मन आक्रंदतच रहाते,
त्याचं दु:ख…

* ४ *

सांगायला मनात बरंच असते
पण ऐकायला कोणीच नसते
मग पोरकी व्यथा उशी भिजवते,
त्याचं दु:ख…

मनडोहात डोकवायला भीती वाटते
आरशातली प्रतिमा अनोळखी होते
गुढ अस्तित्वाचे जे गुरफटत राहते,
त्याचं दु:ख…

मनात अस्वस्थता घोंघावत राहते
व्यक्त होण्याशिवाय गत्यंतरच नसते
लेखणीची सीमा जी वेसण घालते,
त्याचं दु:ख…

तीन आवर्तात दु:ख भिरभिरते
अस्तित्व व्यापून दशांगुळे उरते
वेदना जेंव्हा कंठाला सूर मागते,
त्याचं दु:ख….

सूर मनासारखा लागत नाही
तारा तंबोर्‍याच्या जुळत नाही
मैफिल काही केल्या रंगतच नाही,
त्याचं दु:ख…

नकळतच एक जाण झंकारते
आपलेच काहीतरी खोलवर बिनसते
व्यथा मनातली जी भवतालात झिरपते,
त्याचं दु:ख…

महाकवी दु:खाचा हलकेच हसतो 1
साहिरच्या काव्यातला अर्थ उमगतो 2
लख्ख जाणीवेचा क्षण डोळे ओलावतो,
त्याचं सुख.

~ मनिष

  1. कवी ग्रेस उर्फ माणिक गोडघाटे
  2. साहिर लुधियानवी - कभी खुदपे कभी हालात पे
कविता

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

26 Nov 2019 - 3:34 pm | यशोधरा

चपखल.
३ री कविता वाचताना बा भ ह्यांची कविता आठवली. वाचली आहेस का?

कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर?
जुने शब्द सुने होउन वाजतात कसे बद्द निसूर?

लख्ख जाणिवेच्या क्षणाचं सुख. खरं आहे.

मनिष's picture

26 Nov 2019 - 5:15 pm | मनिष

आवडत्या ओळी -

कळत जाते तसे कशा मूर्ती सार्‍या झिजून जातात
पापण्यांमधले स्नेह थिजून ज्योती कशा विझून जातात?

~ बोरकर

यशोधरा's picture

26 Nov 2019 - 6:29 pm | यशोधरा

माझ्याही.

खिलजि's picture

26 Nov 2019 - 3:50 pm | खिलजि

वाह ,, सुंदर आणि समयोचित

मुक्त विहारि's picture

28 Nov 2019 - 1:21 am | मुक्त विहारि

काळजाला भिडणारी कविता आवडली

मनिष's picture

2 Dec 2019 - 2:38 pm | मनिष

एक छोटी पुरवणी -

ह्या ४ वेगवेगळ्या कविता नाहीत तर एकात एक गुंफलेले आवर्त/स्पायरल्स आहेत - ते सामाजिक-राजकीय दु:खापासून आत-आत खोलवर वैयक्तिक, खाजगी दु:खांकडे जात रहातात. आधीच्या आवर्तात 'हात' हा ह्या साखळीचा दुवा आहे तर शेवटी वैयक्तिक ते intrapersonal (ह्याला मराठीत काय म्हणता येईल?) होतांना 'मन' आहे.

ही कविता कित्येक महिने मनात घोळत होती, काही-काही प्रसंगांवरून उस्फुर्त कडवी लिहिली, मग काही महिन्यांपुर्वी नव्या कडव्यांबरोबर त्यांची एकत्र साखळी बनवून ही कविता तयार झाली. एका प्रथितयश, छापील दिवाळी अंकाने कविता आवडल्याचे कळवले पण नंतर काही दिवसांनी दिवाळीपुर्वी ही छापता येणर नसल्याचे कळवले. असो.

प्रतिसाद देणार्‍यांचे, वाचणार्‍यांचे मनापासून आभार.

अप्रतिम, याशिवाय काय बोलू?

1.
मनात घर करून गेलेल्या काही ओळी पुन्हा येथे देतो.. खुप आवडल्या.. कुशीचे लेणं हा शब्दप्रयोग अप्रतिम.

वाट पायाखालची सरत नाही
प्रवासात विसावा मिळत नाही
आणि सोबतीला हात सापडत नाही,
त्याचं दु:ख…

अवचितच हातात हात गुंफतात
उमेदीने जिव्हाळ्याची नाती विणतात
कालांतराने प्रेम संपते, नाती उरतात,
त्याचं दु:ख…

जुळलेली मनं दुभंगू लागतात
नुसतेच देह जवळ येतात
मग रेशमाचे बंध काचू लागतात,
त्याचं दु:ख…

मनातल्या इच्छा मनातच राहतात
गंधाळलेल्या रात्री विस्मृतीत जातात,
एकाकी क्षण असे उरावर बसतात,
त्याचं दु:ख…

गात्रे शिणतात, वय वाढते,
रुप उणावते, कूसही आक्रसते
पण कुशीचं लेणं जेंव्हा दुरावते,
त्याचं दु:ख…

सांगायला मनात बरंच असते
पण ऐकायला कोणीच नसते
मग पोरकी व्यथा उशी भिजवते,
त्याचं दु:ख…

तीन आवर्तात दु:ख भिरभिरते
अस्तित्व व्यापून दशांगुळे उरते
वेदना जेंव्हा कंठाला सूर मागते,
त्याचं दु:ख….

गणेशा's picture

26 May 2020 - 9:09 am | गणेशा

2.

कवी ग्रेस बद्दल काय बोलावे, माझे आवडते कवी..
वाऱ्याने हलते रान च्या वेळेस मी दादर ला भेटलो होतो असाच.. तेव्हडीच आठवण..
----
तुमच्या मुळे आज ते आठवले..
(आता वीकएण्ड पर्यंत बिझी असलो तरी चालतंय )ग्रेस ची सगळी पुस्तके माझ्याकडे होती.. आता फक्त चंद्र माधवीचे प्रदेश राहिलेय.. वाऱ्याने हलते रान कोण घेऊन गेले माहीत नाही.. पण ते हवे होते, त्याला त्यांची आठवण होती..

कवी ग्रेस.. तुमच्या कवितेला आधारीत..

-->

मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदीपरि खोल
दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल...
.
ही नीज घेऊनी माझी हा वारा जातो कोठे?
दगडांच्या भिंतींनाही हे दुःख वाटते मोठे…
.
सूर्य रोज अस्ताला जातो कळेना मज काही
झोळीत कधीही माझ्या अंधार उगवला नाही..
.
जे सोसत नाही असले तू दुःख मला का द्यावे
परदेशी अपुल्या घरचे, माणुस जसे भेटावे
.
तू मला कुशीला घ्यावे अंधार हळू ढवळावा ..
सन्यस्त सुखाचा कांठी वळीवाचा पाउस यावा !
.
आणि...

ती गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता.
अंगणात गमले मजला
संपले बालपण माझे
खिडकीवर धूरकट तेव्हा
कंदील एकटा होता

धन्यवाद गणेशा. 'कुशीचे लेणं' लिहितांना हे दोन अर्थ होते मनात -

१. वाढतं वय आणि मेनोपॉज
२. वाढतं वय, आणि दुरावणारी टीनेज मुलं

सविस्तर, रसिक प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. __/\__