पहाट झाली! पृथ्वी उठली !
मोहक आळस हसूनी दिला!
पक्ष्यांच्या त्या संगीताने
आसमंतही स्वर झाला!
नादमधुर ती घंटा वाजे!
पदर धुक्याचा दूर झाला
हलके हलके जाई गारवा
सूर्य गुलाबी वर आला!
हसला देव! हसली सृष्टी!
लाजून रवी तो चूर झाला!
ओले पृथ्वीचे लावण्य
बघूनी तेजतरूण झाला!
जाई गारवा! उब आली!
पृथ्वीला किरणांचा शेला
अस्फुट कळीचे चुंबन घेण्या
भ्रमर आवेगे धावत आला!
दाहक स्पर्श! प्रियकराचा
स्वेदबिंदू! ते वसुंधरेला
आच्छादूनी मेघडंबरी
सूर्य सखा तो! खजील झाला!
डोलत फुले! डोलत शेते!
आसमंतही डोलू लागला
सूर्यपृथ्वीचे मिलन होऊनी
दिन सोनेरी जन्मा आला!!
कविता
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1698
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख..
सुन्दर पहाट